मोरपिसें आणि कावळा

मिरवितों खोवुनी मोरपिसें पंखांत,

म्हणुनिया कावळे शिष्ट मला हंसतात.

परि देइन जर हीं फेंकुन रस्त्यावरती,

हे शिष्ट मनांतुन टपले उचलाया तीं !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २५ डिसेंबर १९३७

कागदी फुलें

किति तरी गुलाबें फुललीं ह्रुदयान्तरीं;

अर्पीन तुला तीं म्हणुनि खुडुनि ठेविलीं.

परि फुलांपरीसहि न्यारी कांहीं तरी,

ह्रुदयांतिल वाटे मला प्रीतिवल्लरी;

"क्षणभंगुर अंर्पू गुलाबपुष्पें कशीं ?

अमर ती वल्लरी अर्पिन कधिंतरि तुशी."

दोलयमानमति असल्या संशयतमीं

होऊन राहिलों अमर्याद काल मी.

कागदी गुलाबें सवंग घेउनि कुणी,

अर्पितां जाहलिस त्याची, मज सोडुनी !

काळजास डसले सहस्त्र विंचू मम,

जगणेंहि जाहलें कांहिं काल जोखम.

दुखवितां नाग उभवितो फणा आपुली,

उसळुनी तेंवि मम स्वत्ववृत्ति बोलली,

"कागदी फुलांवर भाळणार ती खुळी,

जाहली न तुझि हें भाग्यच तूझें मुळीं !"


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २० नोव्हेंबर १९३५

चालली मिरवणुक

चालली मिरवणुक गीतांची माझिया;

कुणि निळीं दूकुलें नेसलिं, कुणि मोतिया.

नादांचे नूपुर घालुनिया नाचती;

रंगीत भरजरी रुपकांत मिरवती !

पाहुनी झोंक हा कुतुक नयनिं थाटतें;

परि कुठें कांहितरि चुकलेंसें वाटतें !

मनिं विचार येई सत्व पहावें तरी,

वस्त्रे नि नूपरें काढुनि करुं खातरी.

हीं विवस्त्र उघडीं फिरतिल रस्त्यांतुन,

पाहतील सगळे रसिक चकित होउन !

कल्पना आगळी वाटतसे सोज्वळ,

गाणेंपण परि का गाण्यांचें राहिल ?


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १० ऑक्टोबर १९३४

मी करितों तुजवर प्रेम

मी करितों तुजवर प्रेम असें म्हणतात;

परि प्रेमाची ही नवीच कांहीं रीत !

तव प्रेमजलामधिं खोल खोल जों बुडतों,

मम द्वेषवन्हि तों अधिकच भडकत जातो !

कुणि म्हणती किति तव टपारे डोळे काळे;

मज वाटति उघडे दोन विषाचे प्याले !

जइं दावित अपुले शुभ्र दांत तूं हंसशी,

तव कृष्णह्रुदयजलफेन गमे तो मजशीं !

मी तुला बाहतां दूर पळुनिया जाशी !

परि सोडुनि जातां घट्‌ट कवळुनी धरिशी !

हंसुनिया चुंबितां उदास होउनि रडशी ;

मी अश्रु गाळितां खदखद मजला हंससी !

मगरीपरि भक्षक असे तुझी गे प्रीती;

पहिलीच साधुनि संधी मी सोडिन ती !

मी करिन कांही तरि वाटत होतें जगतीं;

तूं येउन माझी केलिस माती माती !

किति मोह होतसे रोज मला अनिवार,

कीं कटयार घेउनि तुला करावें ठार !

मारीन खरा छातींत तुझ्या खंजीर,

माझाच परंतू फाटुन जाइल ऊर !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १२ सप्टेंबर १९३३

लालबावटयाचें गाणें

"असेंच हें चालायाचें

गरिब बिचा-या दलितांचें ;

जगताच्या सौख्यासाठीं

मरती ते अर्ध्यापोटीं.

हा देवाघरला न्याय,

इलाज त्यापुढती काय ?"

चोरांचें तत्वज्ञान

ऐकुनि हें किटले कान.

संत आणखी सरदार

चोरांचे साथीदार !

अन्नवांचुनि जे मरती

उपास त्या शिकवा म्हणती !

व्याघ्रसिंह धांवुनी येतां

जीवास्तव त्यांशीं लढतां,

करुं नका हिंसा अगदीं !

कोंकरांस सांगति आधीं !

समतेची पोपटपंची

जपमाला मधु तत्वांची,

शक्त नसे करण्या कांहीं

दलित सदा दलितच राही.

क्रान्तीचा रक्तध्वज तो

दृष्टिपुढें फडफडत येतो.

दलित जनीं उसळत थोर,

शक्ति असे अपरंपार;

ती सारी केंद्रित करुनी

रक्तध्वज पुढतीं धरुनी

जुलुमाचें उखडूं मूळ,

ढोंग्यांचें काढूं खूळ !

लाखांचें मारुनि पोट,

चाटित जे बसले ओंठ,

त्या चौरां हतबल करुनी,

सर्वस्वा त्यांच्या हरुनी,

लोकांचें सर्वस्व असें,

लोकां देउनि टाकुं कसें !

वसुंधरामाई अमुची

चोरुनि जे बसले त्यांची

हिरावुनी शक्ती घेऊं

लोकांचें लोकां देऊं !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ७ ऑगस्ट १९२९

फासावरुन

हा प्रणाम भारतमाते

घे शेवटला बाळाचा । माय भू ।

ही थोडी प्रियतम माती

ह्रुदयीं धरितों दो हातीं । घट्ट गे.

जरि असल्या चरणीं बेडया

विसरशील का मज वेडया । कधि तरी ?

इतरांस

दुष्ट दैत्यांस

भासलों खास

जरी द्रोही मी-नाहलों तरी तव

प्रेमी । उत्कट !

मज नको स्वर्ग सुखधाम

चिंतीन सदा तव नाम । गोडसे.

मरणाची भीती कोणा ?

देशद्रोही षंढाना । भेंकडा !

देशार्थाचि जन्मा आलों

देशार्थाचि स्वर्गी गेलो । हांसत !

हे प्राण

देशनिर्वाण

मायभूत्राण

कराया नाही-वेंचिले जयें

लवलाही । धिक्‌ तया !

दे जन्म हजारों मजला

स्वातंत्र्यास्तव लढण्याला । देशि या.

पाहतोंच डोळे भरुनी

रुप गे तुझे प्रिय जननी । एकदां !

बघु नकोस केविलवाणी

मजकडे दीन नयनांनी । देवते !

स्वातंत्र्य

दिव्य हा मंत्र

स्फुरवि जरि रक्त

तुझ्या बाळांचे-दिन पूर्ण

स्वातंत्र्याचें । जवळची

या शेवटल्या घटिकेला

दिसतसे भावि तव काळ । मज गडे !

स्वातंत्र्याच्या उद्यानीं

फिरतांना दिसशी जननीं । वैभवी.

करितांना तव प्रिय काज

देहास ठेवितों आज । धन्य मी !

पाहुनी

प्रेत मम कुणी

थरकला जनीं

देशभक्तीनें-तरि धन्य धन्य मम

मरणें । जाहले !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

कोणि म्हणती

कोणि म्हणती कसलिं ही प्रतिभेस घेसी बंधनें ?

चांदराती आणखी तीं वल्लभेचीं चुंबनें----

---टाकुनी हें काय गासी रुक्ष, कर्कश, रांगडें ?

शेणमातीचीं खुराडीं आणि रंकांचे लढे !

राव सत्तावंत किंवा दास मध्यमवर्गिय,

गा गडया, त्यां खूष करण्या गान तूझें स्वर्गिय !

तीं तुझीं गुलगूल गाणीं ऐकुनी विसरावया---

---लाव रंकां झुंज जी लढतात ते सत्ता-जया !

वल्ल्भा जाईल माझी मीहि माती होइन;

रंकरावांची रणें इतिहास टाकिल तोडुन.

आणखी उगवेल साम्याची उषा जगतांत या;

काय ते म्हणतील काव्या त्या क्षणीं या माझिया ?

मानवांचे पुत्र लढले, आणि तुटलीं बंधनें;

गाइला हा चांदरातीं वल्लभेची चुंबनें !

क्रांतियुध्दाची चढाई आज जर ना गाइन,

मानवी इतिहास का देईल फिरुनी हा क्षण ?


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ९ ऑगस्ट १९३३

दोन देवभक्त

होतीं चार धुरांडि ओकत ढगें काळ्या धुरांचीं जिथें,

संपाग्नी भडकून ना चिलिमही सोडी धुरांतें तिथें!

तेंव्हां मालकही मनीं गिरणीचा झाला बहू रंजित;

सारें एकावटून चित्त मग तो देवा बसे प्रार्थित.

"केली दोन कलक रोज बसुनी पूजा तुझी भक्तिनें

वस्त्रें घालुनि मख्मली, किति तुला मीं घातले दागिनें !

होतां वृध्द मदीय राख तिजला देतों जरी टाकुनी,

नाही का तव मंदिरें दिधलिं मीं नांवें तिच्या बांधुनी ?

होत्या चार स्वयंगती परि अतां मीं ठेविल्या दोन ना !

माझे हाल कसे तुझ्या बघवती देवा, खुल्या लोचना ?

आतां कांहिं तरी असें कर जयें मालास या भाव ये

टक्के आठ करुनि काट मजुरी, बांधीन रुग्णालयें."

होता त्याच क्षणीं कुणीं मजुरही देवाकडे पाहत

डोळे लाल करुनि, मूठ वळुनी मूर्तीस त्या साङत.

"तेथें त्या बघ गोघडींत पडलें अन्नाविणें कुंथत,

माझे बाळ तयास ना मिळतसे रे, खावयाला शित !

वाहोनीं तुजला फुलें फुकटचा पैसा हरुं गांठचा;

गाडया दोन मजेंत तो उडवितो आहे धनी आमुचा !

आकाशांतिल पोलिसा ! छळिसि कां दीनांस आम्हां बरें

देतो टाकुनि मूर्ति ही गिरणिच्या काळ्या धुरांडयांत रे !"


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १४ जुलै १९३२

कवने

जुनी पटकुरें अङ्गीं धरुनी

पाउसचिखलीं वणवण खपुनी,

शेतकरी तो फुलवी अवनी'

परी उपाशी बाळें त्याची ।

धान्य खाउनी तेंच पोटभर.

सुखे त्यावरी देउन ढेंकर,

पुष्ट प्रियेचा करि धरुनी कर,

गात असूं किती गोंड्स कर हा ।

यंत्रशक्तिची प्रचंड घरघर,

दमही न घेता मजूर क्षणभर,

वस्त्र विणितसे त्यावर झरझर

रक्ताळ्ति मग डोळे त्याचे

वस्त्र जरा तें जाड म्हणोनी

रुसुनि प्रिया तें देई फेकुनि

क्रुध्द तिच्या ये लाली नयनी

त्यावर आम्ही गाऊं कवने

शंभरातील नव्वद जनता

धुरकटलेल्या कोंदट जगता

'घरे' म्हणोनी त्यांतच कुजतां

औषधास त्या चंद्र ना दिसे ।

आकाशातील तारासंगे

विलासी शशी प्रेमे रंगे,

कृष्ण्मेघ तो येउनि भंगे-

-प्रणय तयाचा, रडतों आम्ही ।

अपुरी भाकर चट्ट खाउनी

रडति आणखी हवी म्हणोनी

कामकर्‍यांच्या मुलांस जननी,

अश्रु दाबुनी नाही म्हणते.

मुर्ख कुणी तरि जोबनवाली,

खुशालचेंडुस ' नाही ' वदली

हृदयिं तयाच्या आग पेटली,

त्यावर शिंपू काव्यजलाला ।

नक्षत्रांची , फुलाफळांची ,

कृष्णसख्याच्या व्याभिचारांची

आणिक झुरत्या युवयुवतींची

खूप जाहलीं हीं रडगाणीं

धनीजनांशीं झुंज खेळुनी

क्षणभर ज्यांना आली ग्लानी

त्यांना आम्ही गाऊं गाणी

ऐकुनि जीं चवताळुनि लढतिल

आणि स्थापितिल सत्ता अपुली


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३० ऑक्टोबर १९३१

बेगमेच्या विरहगीता'ला शिवाजीचें उत्तर

मज पाहुनी तुवा गे । लिहिलेंस बेगमे तें

अड्खळत वाचुनीयां । आनन्द होई माते.

ते ' नाथ ' आणि ' स्वामी ' । मज सर्व कांहि उमजे

इश्की, दमिश्कि, दिल्नूर । कांहीच गे, न समजे ।

जरि या मराठमोळ्या । शिवबास बोधा व्हावा,

तरि फारशी-मराठी । मज कोश पाठवावा


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३ जुलै १९२८

लग्नघरातील स्वयंपाकिणींचें गाणे



कुणि नाही ग कुणी नाहीं
आम्हांला पाहत बाई ।
झोंपे मंडळि चोंहिकडे ,
या ग आतां पुढे पुढें
थबकत, थबकत
'हुं' 'चूं' न करित,
चोरुं गडे, थोडे कांही
कोणीही पहात नाही ।



या वरच्या माळ्यावरतीं
धान्याची भरलीं पोतीं,
जाउं तिथें निर्भय चित्तीं
मारूं पसे वरच्यावरती.
उडवुनि जर इकडे तिकडे
दाणे गोटे द्याल गडे
किंवा चोरुनि घेतांना
वाजवाल जर भांड्यांना,
जागी होउन
मग यजमानिण
फसेल सगळा बेत बरें ।
चळूं नका देऊं नजरे



एखादी अपुल्यामधुनी
या धंद्यांत नवी म्हणुनी
लज्जामूढा भीरुच ती
शंसित जर झाली चित्तीं
तर समजावुनि
अथवा भिववुनि
धीट तिला बनवा बाई,
करुं नका उगिचच घाई.



आशा ज्या वस्तुचि चित्तीं
तीच हळुच उचला वरती.
डब्यांत जर थोडे असलें
घेउं नका बाई , सगळे,
मिळे म्हणोनी
उगाच लुटुनी
यजमानिण जरि ती बाला,
करूं नका शंकित तिजला.



जपून असले खेळ करूं
ओटिंत जिन्नस खूप भरू.
लागतां न कोणा वास
'हाय' म्हणुनि सोडूं श्वास
प्रभातकाळी
नामनिराळीं
होउनियां आपण राहूं
लोकांच्या मौजा पाहुं ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात

कोळ्याचें गाणे

आला खुशींत् समिंदर , त्याला नाही धिर,

होडीला देइ ना ठरू,

ग सजणे , होडीला बघतो धरूं ।

हिरवं हिरवं पाचूवाणी जळ,

सफेत् फेसाचि वर खळबळ,

माशावाणी काळजाची तळमळ

माझि होडी समिंदर , ओढी खालीवर,

पाण्यावर देइ ना ठरू,

ग सजणे, होडीला बघतो धरूं ।

तांबडं फुटे आभाळान्तरीं,,

रक्तावाणी चमक पाण्यावरी,

तुझ्या गालावर तसं काइ तरी ।

झाला खुळा समिंदर , नाजुक होडीवर,

लाटांचा धिंगा सुरू,

ग सजणे , होडीला बघतो धरु ।

सुर्यनारायण हंसतो वरी,

सोनं पिकलं दाहि दिशान्तरीं,

आणि माझ्याहि नवख्या उरीं ।

आला हांसत समिंदर , डुलत फेसावर,

होडिंशीं गोष्टी करूं,

ग सजणे, होडीला बघतो धंरु ।

गोर्‍या भाळी तुझ्या लाल चिरी ,

हिरव्या साडीला लालभडक धारीं,

उरीं कसली ग. गोड शिरशिरी ?

खुशी झाला समिंदर, त्याच्या उरावर,

चाले होडी भुरुभुरु ,

ग सजणे, वार्‍यावर जणुं पांखरु ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १७ जानेवारी १९२८

तिमदन

तिजला जणू छबि आपुली रतिची दुजी प्रत वाटते,

मदनाहुनी तिळ्ही कमी निजरूप त्या नच भासतें

नवयौवनी दोघें जंई हीऊ एकमेकां भेटती,

'जय आपुला ' ही खातरी दोघेहि चित्तीं मानिती .।

निजरूपमोहिनिजालका पसरावया ती लागतें,

गुलगूल कोमल बोलणी फ़ांसे तयाचे गोड ते ।

' जय आपुला '- दुसरा गडी झाला पुरेपुर गारद,

मनिं मानुनीं हे पारधी करिती परस्पर पारध ।

राजा निसर्गा सर्व ही अति थोर गम्मत वाटते ,

विजयोत्सवी दोघां बघु अनिवार हासूं लोट्तें ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २ जानेवारी १९२७

दोन चुंबने

पूर्णेन्दू पिवळा हळू हळु असे झाडावरी ठेपला,

झाडे सर्सर्नाद गूढ करिती-एकान्तही वाढला.

तेंव्हा येऊनिया जुन्या स्मृति मनी हो वृत्ति वेडीखुळी,

प्रेमाची दुसरी धनीण अरला होती परी लाभली.

प्रीतीचा पहिला बहार नवलें होता जिला अर्पिला,

मूर्ती येइनि आज मन्मनि तिची झाले कसेसें मला.

तेव्हा ही पहिलीच ती समजुनी वेगे हिला चुंबिले ।

'आहा' , प्रेमभरे वदे , ' मर किती प्रेमात आलिंगिलें ।'

भोळा भाव हिचा बघुन नयनीं झाली उभी आसवें,

आणि चुम्बुनिया हिला पुनरपी प्रेमास केले नवे ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २१ एप्रिल १९२७

माझे गाणें

वसुधामाई माझी जननी, हृदयिं तिच्या बिलगुन,
सदा मी जगालाच गाइन.

बाळांच्या गोंडस गालांचे चुंबन,
युवतीयुवकांचे सुगाढ आलिग्ङन ,
वृध्दांच्या प्रेमळ अश्रुंचें सिंचन,
सारें माझ्या गानिं साठवे घ्या, घ्या , तें वाटुन,
सदा मी जगालाच गाइन.

प्रेमाचा मी सागर, आणिक वैराचा डोग्ङर,
दयाळू आणिक अति निष्ठुर.
अर्भकांवरी आपुलें शौर्य दावुन
अबलांना दुबळ्या जुलमाने गांजुन,
सत्तेचे चाबुक गरिबांवर ओढुन,
अश्रु उधळीले जगतीं कोणी, त्यांना मीं शापिन,
सदा मी जगालाच गाइन .

अज्ञाताच्या अमर्याद या दर्यावर भडकुन ,
चालले मानवताजीचन,
दैवाच्या लाटा येउनिया कोठुन
सवंगडी आपुले टाकितील उलथुन
हें मनांत माझ्या राहि कसें डांचुन
म्हणुनिच माझें विसरुनि ' मी' पण, प्रेमाने रंगुन
सदा मी जगालाच गाइन.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ६ फेब्रुवारी १९२७

एकाचे गाणें

कैदि कुणी , घोर भयद वेड्यांनी

बध्द असे परि आनन्दे हासे

मी म्हटले, "हांसे , बा हें कसलें ? "

वेडीला दावुनिया मज वदला,

"सोन्याचीं, वलयें बघ मोलाची । "

वदुनि असें, आनन्दें तो हांसे ।

परि मजला मृत्युविवशसा दिसला ।

गहिंवरलों आणिक त्याला वदलों

" तोडुनियां, टाकूं का बेड्या या ? "

क्रुध्द झणी - होवुनियां तो हाणी,-

-बेडया त्या डोक्यावरती माझ्या ।

रक्ताने भिजलीं माझी वसनें,

परि त्याला बेडितुनीं सोडविला ।

कळवळला कृतज्ञतेने रडला ।

पुष्पांनीं पूजा माझी करुनी,

प्रतिदिवशी, गातो स्तुतिगीतांसी ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २२ नोव्हेंबर १९२६

चंदाराणी

निळ्या निळ्या आकाशांत

शोधाया आलें नाथ.

शुभ्र ढगांचा-

-मऊ पिसांचा

करुनि गालिचा,

जरा पहुडलें त्यावरती

घेण्याला क्षण विश्रांती.

चैन मुळीं नच पडे परी;

तशीच फिरलें माघारीं.

मेघनगांच्या घनकुहरीं

धुंडधुंडिलें किती तरी !

चपला येउनि मजजवळी,

'शोधाया जातें ' वदली.

इथें पळाली,

तिथें भटकली,

पुन्हा चमकली;

चंचल परि त्या बालेला

तो कुठचा गवसायाला !

मग म्हटले जावें आतां,

पाताळीं शोधित नाथा.

शोधुनि दमलें,

विकल जाहलें,

तेज पळालें;

अश्रूंचा वाहे पूर !

जीवाभावाच्या सखया

तारा भेटाया आल्या.

त्या मधल्या वदल्या कोणी,

'नका भिऊं, चंदाराणी !

जलधीमध्यें शिरतांना,

दिसला आम्हां रविराणा.'

ऐकुनि त्यांच्या वचनाला,

किति उठल्या झणिं जाण्याला.

रविरायाला

शोधायाला

जलधितळाला,

उडया पटापट त्या घेती

जीवाची सोडुनि भीती !

किती जाहलीं युगें तरी,

अशीच फिरतें पिशापरी !

प्रेमामृत जोंवरि जवळी,

आशा तोंवर ना सुटली !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ९ नोव्हेम्बर १९२२

नळावर तणतणून भांडणार्‍या एका बाईस

बाई ही रणरंगाची खाणी । धुणार्‍या बायांची ही राणी ।

लागली भांडण्या सहज मांजरावाणी

शिव्या दे अस्स्ल शुध्द मराठी ; । जमवि किति लोकांची ही दाटी ।

पडसाद अजूनी घुमती चाळीपाठी.

आधिंच गोड जनानी गळा, । कोंवळा खुले-चढे - मोकळा .

त्यांतून वश हिला भाण्डायाच्या कळा !

समजुनी देइ शिव्या दिल्‍रंगी । साथ करि चुरशीने तिचि मुलगी,

भोकांड पसरि गाढवीपरी तन्वंगी.

पायी निर्‍या न क्षणभर ठरती । पाउलें तालावर थयथयती.

शब्दांस अभिनयीं विशद करी ही सुदती.

तनू ही वेताची ज्णुं छडी । घवघवे माशी जणुं फांकडी ।

भांडणीं फडफडे नभीं जशी वावडी

दाखवी हातवार्‍यांचि चलाखी । कांही न बंद इच्या पोशाखी ;

गिर्कीस विस्तरे पदर- हातिं ना वाकी ।

कांति तर काळी काजळ जशी । सञ्चुकी कसली ठावि न मशी ।

ही कोण अवत्रे ? - पहा येउनी अशी ।

धीट ही परि नखरा भ्रूलीला, । दावण्या वेळ न या वेलीला ।

नयनिं या बटबटित रागच भरुनी उरला ।

नळावर गर्दि - चाळ हो सुनी,। हवेमधिं सिव्यागंधमोहनी,

लोकांस सहजची वाटे मनिं ओढणी.

गर्दिचा जीव हले वरखालीं। शांतता गाढ काय भवतालीं ।

तों चावट कुणि दे शाबाशीची टाळी ।

वाहवा ऐकुन मुळिं ना लाजे । क्रोध त्या काळ्या गालिं विराजे

किति उजू भयंकर नजरफेंक ही साजे ।

मुखांतुनि शिव्याशाप ही वाही, थारा शान्ततेस इथ नाही,

भाबडीसाबडी भांडकुदळ केवळ ही ।

निरागस अविट शिव्यांची झरी । गुणी तूं खचित काव्यमंजरी ।

लोट्ला वीररसाचा मजा । गमशि तूं अव्वल मजा सारजा !

धडकीवर धडकी देशी मम काळजा.

वन्‍द्य तूं खचित सदा मजलागीं । किति तुझी जात जगांत अभागी ।

घे कृतज्ञतेची अमोल तूज बिदागी ।


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २ जानेवारी १९२७

दिवाळी, तो आणि मी

दीपांनीं दिपल्या दिशा !--सण असे हा आज दीपावली.

हर्षानें दुनिया प्रकाशित दिसे आंतूनि बाहेरुनी !

अंगा चर्चुनि अत्तरें, भरजरी वस्त्रांस लेवूनियां,

चंद्र्ज्योति फटाकडे उडविती आबाल सारे जन.

पुष्पें खोवुनि केशपाशिं करुनी शृंगारही मङल,

भामा सुंदर या अशा प्रियजनां स्नाना मुदे घालिती.

सृष्टी उल्हसिता बघूनि सगळी आनंदलें मानस,

तों हौदावर कोणिसा मज दिसे स्नाना करी एकला;

माता, बन्धु, बहीण कोणि नव्हतें प्रेमी तया माणुस;

मी केलें स्मित त्यास पाहुनि तदा तोही जरा हांसला.

एखाद्या थडग्यावरी धवलशीं पुष्पें फुलावी जशीं,

तैसें हास्य मुखावरी विलसलें त्या बापडयाच्या दिसे !

तो हांसे परि मद्‌ह्रुदीं भडभडे, चित्ता जडे खिन्नता;

नाचो आणिक बागडो जग, नसे माझ्या जिवा शांतता !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ४ नोव्हेंबर १९२६

प्रेमळ पाहुणा

निरोप द्याया कुणा पाहुण्या आलिं सर्व धांवून,

परी कुणीशी दिसे न म्हणुनी मनीं मुशाफिर खिन्न.

वृध्दांचा, बाळांचा घेउनि निरोप जों वळणार,

सहजच गेली अतिथीची त्या दारावरती नजर.

दारामागुनि पहात होते डोळे निश्चल दोन,

जरा खुले, परि क्षणांत झालें दुःखित त्याचें वदन.

"दोन दिवस राहिला परी या लळा लागला अमुचा !"

पिता वदे त्या दारामागिल डोळ्यांच्या धनिनीचा !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १ जानेवारी १९२७

एक करुणकथा

असे दुहिता श्रीमन्त पित्या कोणा;

असति त्याचे तिजवरी बेत नाना.

गोष्टि साङे तरुणास कुणा एका;

तरुण जोडी ती बघे एकमेकां !

"लग्न, नवरे या झूट सर्व गोष्टी,

खूप शिकवोनी करिन इला मोठी !"

पित्यामागें राहून उभी कन्या,

कटाक्षांनीं खुणवून होइ धन्या !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १ जानेवारी १९२७

जइं भेटाया तुज

जइं भेटाया तुज आतुर होतों ह्रुदयीं,

मनिं मधु-आशांची उभी मयसभा होई !

किति रंगवितें मन मधु-चित्रें भेटीचीं,

योजितें किती बोलणीं ललितगमतीचीं !

परि जवळ जवळ तव दाराशीं जों येतों,

भय भरुनि अकारण जीव कसा थरथरतो !

पायांचीं मोजित नखें दृष्टिनें बसशी,

अनपेक्षित लाजत कांहिं तरी पुटपुटशी;

मग शेखमहम्मदि बोलांना विसरुन,

कांहीं तरि तुटकें जातों मी बोलून !

परततों कसासा उदास मनिं होऊन;

'प्रीति' ती हीच का, बघतों अजमावून !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३ नोव्हेंबर १९२६

प्रीति

'प्रीती काय ?' म्हणून कोणि पुसतां, मी बोललों हांसुनी,

'बाला कोणिहि पाहुनी तिजसवें तें बोलणें हांसणें.

येवोनी गृहिं जेवणें, मग पुन्हा निष्काळजी झोपणें !'

आतां प्रीती कळे तदा पुनरपी हे बोल येती मनी.

चक्रव्यूह असे पहा विरचिला हा प्रीतिचा सुंदर,

वेडे होऊनि आंत आम्हि घुसतो--कांहीं न आम्हा कळे !

जीवाला भगदाड खोल पडुनी हा जीव जेव्हां वळे,

तेव्हां त्यास कळे पुन्हा परतणें झालें किती दुष्कर !

देवालाहि उठून निर्भय जयें आव्हान तें टाकणें,

प्रीतीनें परि कोंकरु बनुन तो, हो दैववादी जिणें !

कांहीं रम्य बघून, शब्द अथवा ऐकूनियां वेधक,

जीवानें उगिच्या उगीच बसणें होऊन पर्युत्सुक !

इष्टप्राप्तित जी सुधा, जहर जी त्यावांचुनी होतसे,

'प्रीती प्रीति' म्हणूनि नाचति कवी ती हीच प्रीती असे !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ३० सप्टेंबर १९२६

जेव्हां चिंतित

जेव्हां चिंतित मी मनांत बसतो माझ्या तुझ्या प्रीतितें,

तेव्हां दावित भीति ठाकति पुढें तीं बंधनें धार्मिक ;

प्रीतीच्या परि सृष्टिनिर्मित अशा धर्मापुढें पावक,

अस्वाभाविक बंधनें सहजची तोडीनसें वाटतें.

हे सारे तुटतील बंध सहसा धार्मीक सामाजिक;

आईच्या परि भाबडया दुखुवुं का जीवास मी प्रेमळ,

सारीं तोडुनि बंधनें सुखविण्या माझ्या जिवा केवळ ?

आईचाहि विचार पार पळ्वी मूर्ती तुझी मोहक !

अंतश्र्वक्षुपुढें परंतु सहसा ये मातृमूर्ती तदा,

जन्मापासुनि हाल सोसुनि मला जी वाढावी माउली;

माझ्या मात्र कृतघ्न नीच ह्रुदया ती कोणि ना वाटली !

हातांनीं मुख झांकिलें---मज गमे ती वृत्ति लज्जास्पदा.

दीना, वत्सल माय चित्तनयनां तेव्हां दिसूं लागली;

दुःखाचे कढ येउनी घळघळा अश्रूजळें वाहलीं.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १८ सप्टेंबर १९२६

मीं म्हटलें गाइन

'मी म्हटलें, गाइन तुलाच गीतशतांनीं;
ह्रुदयाची वीणा म्हणुनी ही लावोनी,

भिरिभिरी गाइलीं गीतें तव प्रीतीचीं;
मज दिनें वाटलीं अशीच हीं जायाचीं.

जीव हा लावुनी तुझिया जीवावरती,
म्हटलें मी, जडली तुझीहि मजवर प्रीती.

चित्तीं शंकेचीं परी वादळें उठती;
झगडतां जिवा या अनन्त खन्ती जडती.

तिमिरांतुनि कुणि ही दुसरी तारा हंसते,
क्षणभरी तुझी मग विस्मृति मजला पडते !

या नवतारेचीं गीतें गाण्या उठतों;
ह्रुदयाची वीणा छेडाया जों जातों,

तों जुनीच गाणीं वीणेवरती येती !
लज्जेनें दुःखद पीळ जिवाला पडती.


परि प्रीत असे फुलपांखरु गोजिरवाणें;
औदासीन्याच्या हिमांत तें ना जगणें !

त्या हवें स्मिताचें ऊन कोवळें जगण्या,
आणिक चुंबनमधु स्वैरसुखानें लुटण्या !

तव सौदर्याची जादु न आतां उरली ;
तव जादू कसली !--भूल मला ती पडली !

माझ्याच प्रीतिचे रंग तुझ्यावर उठले;
त्यांतून तुझें मज रुप जादुचें दिसलें !

ही दो ह्रुदयांविण जादु न चालायाची;
प्रीत ना अशी वा-यावर वाढायाची !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - २८ मे १९२७

प्रीतीची त-हाच उलटी असे !

सौंदर्याचे तुझ्या पवाडे गाती हे येउनी;

ऐकतों हांसत मनिच्या मनीं !

मूक राहुनीं सर्व ऐकतों, कांहि न वदतों परी,

बोलतों दुसरें कांही तरी !

उदास मजला बघुनी म्हणती 'ह्रुदयच ना याजला,

प्रीतिची काय कळे या कळा !'

ह्रुदयाचे माझ्या काय असें जाहलें,

जर खरी प्रीत तर तुलाच सारें कळे;

यांनी गावें तुला, आणि मी स्वस्थ बसावें असें,

प्रीतिची त-हाच उलटी असे !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १९ सप्टेंबर १९२६

चिमुकल्यास

शुध्दानन्दाची तुला चिमुकल्या पाहुनि पटते खूण ! ॥धृ॥

बालभानू येइ गगनीं;
तेजसरिता न्हाणि अवनी;
परि विषण्ण होतों काळोखाचे वाडे मनिं बांधून !

झाडपानें हलति येथें,
चिवचिवे ती चिमणि तेथें;
इवल्याहि पाहुनी सौंदर्याला जाशी तूं रंगून !

आपुल्या तान्हास धरुनी,
जातसे ही तरुणि कोणी;
पाहते मत्सरें, परि तूं खिदळशि मूल तिचें पाहून !

रोखुनीयां लाल डोळे,
दुष्ट कोणी बघत चाले;
चरकतों-कापतों मनिं मी ! --निर्भय हांसशि मूठ वळून !

खुलत असलें अधरिं हासें,
ह्रुदयिं कसला भाव नाचे ?
जर का कळला मज दाविन तर मी स्वर्ग जगा उघडून !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १ जुलै १९२६

त्यांचें प्रेम

तिची त्याची जाहली कुठें भेट;

बहुत दिवसांचा स्नेह जमे दाट.

हातिं धरुनी एकदां तिचा हात,

बोलता तो;--बोलली स्मित करीत,

"इश्श, भलतें हें काय खुळ्यावाणी,

केवढी मी, केवढे तुम्हीं आणि !

धाकटा मी समजून तुम्हां भाऊ,

भगिनिप्रेमानें घालितसे न्हाऊं!"

बोल ऐकुनि संतप्त लाल झाला;

दांत चावुनि हे शब्द बोलिजेला,

"घरीं माझ्या आहेत खूप ताई,

करा काळें बघण्याक दुजे भाई".


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - १० फेब्रुवारी १९२६

दैविकता

सारी रात्र सरुन मंद गगनी तारा फिक्या जाहल्या;

माझी गोष्ट अजून मात्र नव्हती सांगूनिया संपली.

एकामागुनि एक आठवुनियां लीला तिच्या प्रेमाला,

जीवाच्या सुह्रुदास सर्व कथिलीं दुःखें मनींचीं मुकीं;

"आतां सांग गडया, खरी मजवरी आहे तिची प्रीत ना ?"

तो बोले, "भलताच संशय असा कां घेसि वेडयापरी ?"

तेव्हां टाकुनि श्र्वास एक वदलों नैराश्यपूर्ण खरें,

"वर्षें दोन उणीं पुरीं उलटलीं नाहीं तिची दादही !"

झाली सांज तशी उदासह्रुदयें होतों कूठेंसा उभा ;

तों मागून कुणी हळू 'तुम्हिच कां!' ऐसें वदे मंजुळ.

सारा दाटुनि जीव लोचनिं बघे-तो तीच मागें उभी !

सोन्याचा क्षण तो कसा कुणिकडे ठेवूं असें जाहलें !

दैवाची दिलदारि ही बघुनियां बेहोष झालों मनीं;

'वेडया, होइल ती तुझीच' असला उल्हास ये दाटुनी.


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- ८ मे १९२६

खूळ

जिवलग राणी दुज्या भाळुनी पळे कुठे चंचळ,

मान टाकुनी म्हणुनि पडलों गाळित अश्रूजळ.

कुणी बालिका अजाण येउनि म्हणे 'प्रीति हें खुळ,

सुसकार्‍यांचे तुफान करुनी कां होता व्याकुळ ?'

खोल घोगर्‍या सुरांत वदलों हंसरा रडवा जरा,

'पांडित्याचे बोल तुझे परि झोंबति माझ्या उरा'

तरी कैकदा जवळ येउनी रमवी नानापरी,

म्हणे ' किती दिन तिच्या खंतिच्या जळवा धरणें उरी ?

अकस्मात हे शब्द ऐकुनी टकमक तिज पाहिलें,

गाळित आसू वदलि,'नाहि कां मज अजुनी जाणिलें ?"

जवळ जाउनी वदलो तिजला 'प्रीति असे ना खुळ ?

मनराणीविण खुळा जाहलो-तुम्हि कां हो व्याकुळ ? "


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ८ मार्च १९२६

रानगीत

चल ग सजणे रानामधें,

चाफ्याचे फुल तुझ्या कानामध्ये !

उठे चंद्र्मा झाडिंतुनी,

बावरशी कां तूं सजणी ?

रानवटी हिरवी झाडी,

डोंगरमाथी ही उघडी ,

चल फिरू घालुनि गळा गळे,

रोमाच्च्यांचे फुलवु मळे !

'कोण ग बाई चावट हा

पानांच्या जाळींत पहा ! "

चंद्र ग बघतो जाळिंतुनी,

बावरशी कां तूं सजणी ?

ओसाडी बघ पुष्करिणी,

बसलि कशी जळ झाकळुनी;

दोघांचे मुखबिंब गडे,

जाउनिया पाहूं तिकडे.

" कोण ग बाई चावट हा

पांढुरका पाण्यात पहा ! "

डुले कवडसा जळातुंनी

बावरशी कं तूं सजणी ?

पदर आडवा बांध झणी,

कर गुम्फूं कमरेमधुनी

" हूं,हूं करूनिया चावट हा ,

कानोसा कुणि घेत पहा !"

वायु ग फिरतो तृणातुनी,

बावरशी कां तूं सजणी ?

बावरुनी गेलिस बाई,

चाफा मुळिं फुलतच नाही !

चल तर साजणे जाउं घरी;

"नका साजणा , राहुं तरी ! "


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
 - ६ मार्च १९२६