चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो
काळ्या आईच्या पोटात खुडलेला कोवळा गर्भ दाखवतो
चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो ।।१।।
कोरडा डोळा , कोरडी विहीर
कोरड्या राजकारण्यांचे ,कोरडे संदर्भ दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।२।।
वावरात शेतकऱ्याची सत्ता नाही,
विहिरीत पाण्याचा पत्ता नाही,
पाच वर्षा पासुन, कनेक्शन साठी केलेला अर्ज दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।३।।
या वर्षी वावरात, पिकांची शाळाच नाही डवरली,
कि निसर्गानं वावराची, फी च नाही भरली,
अनुपस्थित पिकांचा, सुनसान वर्ग दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।४।।
बिजवाई घेतली तं,खताची असते उधारी
पोराला शिकोलं तं ,पोरगी राह्यते कोरी
दुःखाचा तं उकळा रोज ,सुख वर्ज्य दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।५।।
असे उसने आयुष्य जगण्याचा, फायदा तरी काय,
एंड्रिन च्या दुकानाकडे , आपोआप वळतात मग पाय,
जहर खाण्यासाठीही ,काढलेलं कर्ज दाखवतो
चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो ।।६।।
योजना नको सांत्वन नको ,नकोच करू हाऊस
देवा तू फक्त वेळेवर, पाडत जा पाऊस
माझ्या डोळ्यात लपवलेला मग, निसर्ग दाखवतो
"चाल दोस्ता तुला "विदर्भ" दाखवतो " ।।७।।