देवा तुझा मी कुंभार । नासीं पापाचें डोंगर ॥ १ ॥
ऐशा संतप्ते हो जाती । घडे साधूची संगती ॥ २ ॥
पूर्ण कृपा भगवंताची । गोरा कुंभार मागे हेंचि ॥ ३ ॥
- संत गोरा कुंभार
रोहिदासा शिवराईसाठी । दिली पुंडलिका भेटी ॥ १ ॥
पुंडलिका झाला अनुताप । धन्य सत्य गुरु माय बाप ॥ २ ॥
जन्मा येऊनियां काय केली करणी । व्यर्थ शिणविली जननी ॥ ३ ॥
नऊ महिने ओझें वागऊन । नाहीं गेला तिचा शीण ॥ ४ ॥
ऐसा झालो अपराधी । क्षमा करा कृपानिधी ॥ ५ ॥
ऐसा पुंडलिका भाव । उभा केला पंढरीराव ॥ ६ ॥
भक्त पुंडलिकासाठी । उभा भिंवरेच्या तटी ॥ ७ ॥
कटावरी ठेवूनी कर । उभा विटेवरी नीट ॥ ८ ॥
ऐसा भाव धीर म्हणे गोरा । तीर्था जा फजितखोरा ॥ ९ ॥
- संत गोरा कुंभार
श्रवणाचें श्रवण घ्राणाचें जें घ्राण । रसने गोडपण विठ्ठल माझा ॥१॥
वाचा जेणें उठी डोळा जेणें भेटी । इंद्रियाची राहाटी विठ्ठल माझा ॥२॥
प्राण जेणें चळे मन तेणें वोळे । शून्यातें वेगळें विठ्ठल माझा ॥३॥
आनंदी आनंद बोधा जेणें बोध । सकळां आत्मा शुद्ध विठ्ठल माझा ॥४॥
मुळाचें निजमूळ अकुळाचें कूळ । चोखा म्हणे निजफळ विठ्ठल माझा ॥५॥
- संत चोखामेळा
ज्या काणें वेद श्रुति अनुवादिती । तो हा रमापती पंढरीये ॥१॥
सुखाचें ठेवणें क्षीरसागर निवासी । तो हा पंढरीसी उभा विटे ॥२॥
भाविकाकारणें उभवोनी हात । उदारपणें देत भक्ति-मुक्ति ॥३॥
न पाहे उंच नीच याती कुळ । स्त्री क्षूद्र चांडाळ सरते पायीं ॥४॥
चोखा म्हणे ऐसा भावाचा भुकेला । म्हणोनियां स्थिरावला भीमातटीं॥५॥
- संत चोखामेळा
ज्या सुखाकारणें योगी शिणताती । परी नव्हे प्राप्ती तयांलागी ॥१॥
तें प्रेमभावें पुंडलिका वोळलें । उघडेंचि आलें पंढरीये ॥२॥
कर ठेवोनी कटीं उभा पाठीमागें । भक्ताचिया पांगे बैसेचि ॥३॥
युग अठ्ठावीस होऊनिया गेलें । नाहीं पालटलें अद्यापवरी ॥४॥
चोखा म्हणे ऐसा कृपाळु श्रीहरी । कीर्ति चराचरीं वानिताती ॥५॥
- संत चोखामेळा
आतां कोठवरी करूं विवंचना । कां हे नारायणा तुम्हां न कळे ॥१॥
सांपडलों जाळीं गुंतलोंसे गळी । जीव हळहळीं वाऊगाचि ॥२॥
कामक्रोधांचे सांपडलों हातीं । बहुत फजीति होय तेणें ॥३॥
नेणों कैसें दु:ख पर्वतायेवढें । सुख राई पाडें झालें मज ॥४॥
चोखा म्हणे तुमचें नाम न ये वाचे । बहु संकल्पाचें वोझें माथा ॥५॥
- संत चोखामेळा
किती धांवाधांवी करावी कोरडी । न कळें कांहीं जोडी हानि लाभ ॥१॥
जे जे करितों तें तें फलकट । वाउगेंचि कष्ट दु:ख भोगी ॥२॥
निवांत बैसोनी नामाचें चिंतन । करूं जातां मन स्थिर नाहीं ॥३॥
दान धर्म करूं तो नाहीं धन पदरीं । जन्माचा भिकारी होउनी ठेलों ॥४॥
चोखा म्हणे ऐसा करंटा मी देवा । काय तुझी सेवा करूं आतां ॥५॥
- संत चोखामेळा
आम्ही कोणावरी सत्ता । करावी बा पंढरीनाथा ।
होईल साहाता दुजा । तत्त्वता तो सांगा ॥१॥
तूंचि बळिया शिरोमणि । आहेसि या त्रिभुवनीं ।
देवाधिदेव मुगुटमणि । कींव भाकणें यासाठीं ॥२॥
केला माझा अंगिकार । आतां कां करितां अव्हेर ।
तुमचा तुम्ही साचार । करा विचार मायबापा ॥३॥
जन्मोजन्मींचा पोसणा । तुमचाचि नारायणा ।
भाकितों करुणा । आना मना चोखा म्हणे ॥४॥
- संत चोखामेळा
कांहो केशिराजा दूजे पैं धरितां । हें तों आश्रर्यता वाटे मज ॥१॥
एकासी आसन एकासी वसन । एक तेचि नग्न फिरताती ॥२॥
एकासी कदान्न एकासी मिष्टान्न । एका न मिळे कोरान्न मागतांचि ॥३॥
एकासीं वैभव राज्याची पदवी । एक गांवोगांवीं भीक मागे ॥४॥
हाचि न्याय तुमचें दिसतो कीं घरीं । चोखा म्हणे हरी कर्म माझें ॥५॥
- संत चोखामेळा
जन्मांची वेरझारी । तुम्हांविण कोण वारी ।
जाचलों संसारी । सोडवण करी देवराया ॥१॥
शरण शरण पंढरीराया । तुम्हां आलों यादवराया ।
निवारोनियां भया । मज तारा या सागरीं ॥२॥
तुम्हांविण माझें कोडें । कोण निवारी सांकडें ।
मी तों झालों असे वेडे । उपाय पुढें सुचेना ॥३॥
चोखा म्हणे दीनानाथा । आतां निवारीं हे भवव्यथा ।
म्हणोनी ठेवितसें माथा । चरणांवरी विठूच्या ॥४॥
- संत चोखामेळा
आन साधनें सायास । कांहीं न करीं आयास ।
नामाचाचि उल्हास । ह्रदयीं वास असावा ॥१॥
हेचि मागतसे देवा । हीच माझी भोळी सेवा ।
पायांसी केशवा । हाचि हेवा मानसीं ॥२॥
जन्म देई संताघरीं । उच्छिष्टाचा अधिकारी ।
आणिक दुजी थोरी । दारीं परवरी लोळेन ॥३॥
नका मोकलूं दातारा । विनंती माझी अवधारा ।
अहो रुक्मादेवीवरा । आवरा पसारा चोखा म्हणे ॥४॥
- संत चोखामेळा
जयांचियासाठीं जातो वनाप्रती । ते तों सांगाती येती बळें ॥१॥
जयांचियासाठीं टाकिला संसार । ते तों बलवत्तर पाठीं येती ॥२॥
जयाचिया भेणें घेतिलें कपाट । तो तेणें वाट निरोधिली ॥३॥
जयाचिया भेणें त्यागियेलें जग । तो तेणें उद्योग लावियेला ॥४॥
चोखा म्हणे नको होऊं परदेशी । चिंतीं विठोबासी ह्रदयामाजी ॥५॥
- संत चोखामेळा
अखंड माझी सर्व जोडी । नामोच्चार घडोघडी ।
आतां न पडे सांकडीं पडो कबाडी वाया दु:खाचिया ॥१॥
हाचि मानिला निर्धार । आतां न करी वाउगा विचार ।
वायां काय बा करकर । धरोनी धीर बैसलों ॥२॥
धरणें घेऊनि तुमचे द्वारीं । बैसेन उगाच मी गा हरी ।
कांही न करीं भरोवरी । नाम हरी गाईन ॥३॥
तुमची लाज तुम्हांसी । आपुलिया थोरपणासी ।
ब्रीद बांधिलें चरणासी । तें चोख्यासी दाखवीं ॥४॥
- संत चोखामेळा
संसाराचें नाहीं भय । आम्हां करील तो काय ।
रात्रंदिवस पाय । झालों निर्भय आठवितां ॥१॥
आमुचें हें निजधन । जोडियेले तुमचे चरण ।
आणि संतांचें पूजन । हेंचि साधन सर्वथा ॥२॥
कामक्रोधादिक वैरी । त्यांसी दवडावे बाहेरी ।
आशा तृष्णा वासना थोरी । पिडिती हरी सर्वदा ॥३॥
आतां सोडवी या सांगासी । न करीं पांगिला आणिकांसी ।
चोखा म्हणे ह्रषिकेशी । अहर्निशीं मज द्यावें ॥४॥
- संत चोखामेळा
माया मोहोजाळे गुंतलोंसे बळें । यांतोनी वेगळें करीं गा देवा ॥१॥
न कळेचि स्वार्थ अथवा परमार्थ । बुडालोंसे निभ्रांत याचमाजी ॥२॥
न घडे देवार्चन संतांचें पूजन । मन समाधान कधीं नव्हे ॥३॥
नसतेचि छंद लागती अंगासी । तेणें कासावीस जीव होय ॥४॥
चोखा म्हणे याही चोरें नागविलों । माझा मीचि झालो शत्रु देवा ॥५॥
- संत चोखामेळा
उदंड नागवले वाहावले पुरीं । ऐसी याची थोरी काय सांगों ॥१॥
ब्रम्हादिक जेणें बहु नागविले । सिद्ध ऋषि भुलविले येणें देख ॥२॥
इंद्रादि चंद्रा लावियेले काळें । कामाचिया बळें अहिल्येसी ॥३॥
प्रत्यक्ष शूळपाणि तपियां मुगुटमणी । तो हिंडविला वनीं भिल्लणीमागें ॥४॥
वृंदेचे घरीं विष्णु धरणें करी । अभिलाष करी मनें धरिला ॥५॥
चोखा म्हणे येणें बहु नाडियेले । काय आतां बोल जाय पुढें ॥६॥
- संत चोखामेळा