बरें झालें येथें आलोंसे सायासें । सुख-दुःख लेशे भोगोनियां ॥१॥
मागिला लागाचें केलेंसें खंडण । तेणें समाधान वृत्ति होय ॥२॥
एकसरें मन ठेविले बांधोनी । निवांत चरणीं तुमचीया ॥३॥
चोखा म्हणे काम क्रोध तोडियेले । येर तेही केले देशधडी ॥४॥

  - संत चोखामेळा
बैसोनि निवांत करीन चिंतन । काया वाचा मनसहित देवा ॥१॥
नामाचा आठव हेचि सोपे वर्म । अवघे कर्माकर्म पारुषती ॥२॥
यापरतें साधन आन कांहीं नेणें । अखंड वाचें म्हणे रामकृष्ण ॥३॥
सुलभ हा मंत्र तारक जीवासी । येणें भवासी उतार होय ॥४॥
चोखा म्हणे मज सांगितलें कानीं । राम कृष्ण वाणीं जप सदा ॥५॥

  - संत चोखामेळा
श्वान अथवा शूकर हो का मार्जार । परि वैष्णवाचें घर देईं देवा ॥१॥
तेणे समाधान होय माझ्या जीवा । न भाकीं कींव आणिकासी ॥२॥
उच्छिष्‍ट प्रसाद सेवीन धणिवरी । लोळेन परवरी कवतुकें ॥३॥
चोखा म्हणे कोणी जातां पंढरीसी । दंडवत त्यासी घालीन सुखे ॥४॥

  - संत चोखामेळा

आतां कासया हा दाखवितां खेळ । म्यां तंव सकळ जाणितला ॥१॥
जेथें ब्रह्मादिक वेडे पिसे झाले । न कळे वहिलें तयांलागीं ॥२॥
कोणासी हा पार न कळे तुमचा । काय बोलों वाचा कीर्ति तुमची ॥३॥
चोखा म्हणे तुमचा अविट हा खेळ । भुललें सकळ ब्रह्मांडचि ॥४॥

  - संत चोखामेळा
आतां याचा अर्थ पुरे पुरे देवा । येऊं द्या कनवळा तुम्हांलागीं ॥१॥
गुंतलोंसे काढा यांतोनी बाहेरी । माझें तो हरि कांहीं न चाले ॥२॥
वारंवार करुणा करितों देवराया । कां न ये कनवळा तुम्हांलागीं ॥३॥
चोखा म्हणे आतां न करा उदास । पुरवावि आस मायबाप ॥४॥

  - संत चोखामेळा
जन्मांचें साकडें नाहीं माझें कोडें । जेणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥
कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥
वैष्णवांचे द्वारीं लोळेन परवरी । करीं अधिकारी उच्छिष्‍टाचा ॥३॥
चोखा म्हणे जया घडे पंढरीची वारी । तयाचिये घरीं पशुयाती ॥४॥

  - संत चोखामेळा
नेणपणें मिठी घालीन पदरा । बैसेन द्वारांत तयाचिया ॥१॥
आशा हे पाठी घेवोनी सांगातें । निचेष्‍ट निरुतें भरीन माजी ॥२॥
लाभाचा हा लाभ येईल माझे हातां । मग काय चिंता करणें काज ॥३॥
चोखा म्हणे मज हेंचि वाटे गोड । आणिक नाहीं चाड दुजी कांहीं ॥४॥

  - संत चोखामेळा
इतकेंचि देईं रामनाम मुखीं । संताची संगती सेवा सार ॥१॥
निरंतर घोष जयाचे मंदिरीं । तयाचिये घरीं सुख मज ॥२॥
उच्छिष्‍ट धणिवरी पोटभरी धाये । दुजी नको सोय देवराया ॥३॥
चोखा म्हणे माझी पुरवावी आळी । माय तूं माउली कृपाळू देवा ॥४॥

  - संत चोखामेळा
आतां माझा सर्व निवेदिला भाव । धरोनी एक ठाव राहिलोंसे ॥१॥
जेथें काळाचाहि न पुरे हात । तयाचे पायीं चित्त समर्पिलें ॥२॥
भय नाहीं चिंता कोणता प्रकार । झालोंसे निर्भय नामबळें ॥३॥
चोखा म्हणे आतां लागलासे झरा । विठोबा दातारा याचि नामें ॥४॥

  - संत चोखामेळा
अखंड समाधी होउनी ठेलें मन । गेलें देहभान विसरोनी ॥१॥
विधिनिषेध भेणें न मोडे समाधी । तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥
चालतां बोलतां न मोडे समाधी । मूळ अंतरशुद्धी कारण हें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा । जाणें तो विरळा लक्षामाजी ॥४॥

  - संत चोखामेळा
पांडुरंगीं लागो मन । कोण चिंतन करी ऐसें ॥१॥
देहभाव विसरला । देव गेला बुडोनी ॥२॥
जीव उपाधि भक्ती वंद्य । तेथें भेद जन्मला ॥३॥
मुळींच चोखा मेळा नाहीं । कैंचा राही विटाळ ॥४॥

  - संत चोखामेळा
शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा ॥१॥
मी यातीहीन महार । पूर्वीं निळाचा अवतार ॥२॥
कृष्ण निंदा घडली होती । म्हणोनि महार जन्म प्राप्ती ॥३॥
चोखा म्हणे विटाळ । आम्हां पूर्वींचें हें फळ ॥४॥

  - संत चोखामेळा
निर्गुणा अंगीं सगुण बाणलें । निर्गुण सगुण एकत्वा आलें ॥१॥
शब्दाची खूण जाणती ज्ञानी । येरा गाबाळ अवघी काहाणी ॥२॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान भले । निर्गुण सगुण त्याही गिळीयलें ॥३॥
चोखा म्हणे त्यांच्या पायींची पादुका । वागवितो देखा ऐक्यपणें ॥४॥

  - संत चोखामेळा
न करी आळस जाय पंढरीसी । अवघी सुखराशि तेथें आहे ॥१॥
पहातां भिंवरा करी एक स्नान । घाली लोटांगण पुंडलिका ॥२॥
कान धरोनी सुखें नाचा महाद्वारीं । तयां सुखासरी दुजी नाहीं ॥३॥
पाहातां श्रीमुख हरे ताहान भूक । चोखा म्हणे सुख विठूपायीं ॥४॥

  - संत चोखामेळा
विठ्ठल विठ्ठल गजरीं । अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥
होतो नामाचा गजर । दिंडया पताकांचा भार ॥२॥
निवृत्ती ज्ञानदेव सोपान । अपार वैष्णव ते जाण ॥३॥
हरीकीर्तनाची दाटी । तेथें चोखा घाली मिठी ॥४॥

  - संत चोखामेळा
बहुत हिंडलो देश देशांतर । परी मन नाहीं स्थिर झालें कोठें ॥१॥
बहुत तीर्थें फिरोनियां आलों । मनासवें झालों वेडगळची ॥२॥
बहुत प्रतिमा ऐकिल्या पाहिल्या । मनाच्या राहिल्या वेरझारा ॥३॥
चोखा म्हणे पाहतां पंढरी भूवैकुंठ । मनाचे हे कष्ट दूर गेले ॥४॥

  - संत चोखामेळा
टाळी वाजवावी गुढी उभारावी ।
वाट हे चालावी पंढरीची ॥१॥

पंढरीची हाट कऊलांची पेठ ।
मिळाले चतुष्‍ट वारकरी ॥२॥

पताकांचे भार मिळाले अपार ।
होतो जयजयकार भीमातिरीं ॥३॥

हरिनाम गर्जतां भय नाहीं चिंता ।
ऐसे बोले गीता भागवत ॥४॥

खट नट यावें शुद्ध होऊनी जावें |
दवंडी पीटी भावे चोखामेळा || ५ ||

  - संत चोखामेळा
पंढरीचें सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥
त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ । दक्षिणमुख वाहात चंद्रभागा ॥२॥
सकळ संतांचा मुगुटमणि देखा । पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥
चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी । भोळ्या भाविकासी अखंडित ॥४॥

  - संत चोखामेळा
वैकुंठ पंढरी भिंवरेचे तीरीं । प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथें ॥१॥
रूप हें सांवळें गोड तें गोजिरें । धाणि न पुरे पाहतां जया ॥२॥
कांसे सोनसळा नेसला पिंवळा । वैजयंती माळा गळां शोभे ॥३॥
चोखा म्हणे ऐसें सगुण हें ध्यान । विटे समचरण ठेवियेले ॥४॥

  - संत चोखामेळा
जाणतें असोनी नेणतें पैं झालें । सुखाला पावलें भक्तांचिया ॥१॥
कैसा हा नवलाव सुखाचा पहा हो । न कळे ज्याची माव ब्रम्हादिकां ॥२॥
तो हरी समर्थ पंढरीये उभा । त्रैलोक्याची शोभा शोभतसे ॥३॥
चोखा म्हणे आमुचें दिनाचे माहेर । तें पंढरपूर भीमातटीं ॥४॥

  - संत चोखामेळा
पुंडलिकें सूख दाखविलें लोकां । विठ्ठल नाम नौका तरावया ॥१॥
जाय पंढरीसी जाय पंढरीसी । पाहे विठोबासी डोळेभरी ॥२॥
अवघा पर्वकाळ तयाचिये पायीं । नको आणिके ठायीं जाउ वाया ॥३॥
चोखा म्हणे ऐसा लाभ बांधा गांठीं । जावोनिया मिठी पायीं घाला ॥४॥

  - संत चोखामेळा
इनामाची भरली पेठ । भू वैकुंठ पंढरी ॥१॥
चंद्रभागा वाळवंट । संत घनदाट नाचती ॥२॥
टाळ मृदंग मोहरी । वैष्णव गजरीं आनंदें ॥३॥
चोखा जातो लोटांगणी । घेत पायवणी संतांची ॥४॥

  - संत चोखामेळा
सुखाची सुखराशि पंढरीसी आहे । जावोनियां पाहे अरे जना ॥१॥
अवघाचि लाभ होईल तेथींचा । न बोलावे वाचा मौनावली ॥२॥
अवघिया उद्धार एकाचि दरूशनें । भुक्तिमुक्ति केणें मिळे फुका ॥३॥
प्रत्यक्ष चंद्रभागा अमृतमय साचार । जडजीवा उद्धार पहातां दृष्टी ॥४॥
चोखा म्हणे आनंदें नाचा महाद्वारीं । वाचे हरि हरि म्हणे मुखें ॥५॥


  - संत चोखामेळा
अवघी पंढरी भुवैकुंठ नगरी । नांदतसे हरी सर्वकाळ ॥१॥
चतुर्भुज मूर्ति शंख चक्र करीं । पीतांबरधारी श्यामवर्ण ॥२॥
श्रीमुख शोभलें किरीट कुंडलें । तेंचि मिरवले चंद्र सूर्य ॥३॥
पितांबरी कांसे सोनसळा विराजे । सर्वांगी साजे चंदनउटी ॥४॥
मिरवलें कर दोनीं कटावरी । ध्यान ते त्रिपुरारि ध्यात असे ॥५॥
सनकादिक भक्त पुंडलिक मुनी । सुखसमाधानी सर्वकाळ ॥६॥
आनंदाचा कंद उभा विटेवरी । चोखा परोपरी नाचतसे ॥७॥


- संत चोखामेळा