पाहतां पाहतां वेधियेला जीव । सुखाचा सुखसिंधु पंढरीराव ॥१॥

माझा हा मीपणा हरपला जाणा । कळल्या आगम निगमाच्या खुणा ॥२॥

भवसागराचा दाता । विठ्ठल विठ्ठल वाचे म्हणतां ॥३॥

उभा राहुनि महाद्वारीं । चोखामेळा दंडवत करी ॥४॥


  - संत चोखामेळा

मोहळा मक्षिका गुंतली गोडीसी । तैशापरी मानसीं नाम जपे ॥१॥
मग तुज बंधन न घडे सर्वथा । राम नाम म्हणतां होसी मुक्त ॥२॥
न करी कायाक्लेश उपवास पारणें । नाम संकीर्तनें कार्यसिद्धी ॥३॥
चोखा म्हणे एकांतीं लोकांती नाम जपे श्रीराम । तेणें होसी निष्काम इये जनीं ॥४॥

  - संत चोखामेळा
केला अंगिकार । उतरिला माझा भार ॥१॥
अजामेळ पापराशी । तो ही नेला वैकुंठासी ॥२॥
गणिका नामेंचि तारिली । चोखा म्हणे मात केली ॥३॥

  - संत चोखामेळा
वोखटें गोमटें असोत नरनारी । दोचि अक्षरीं पावन होती ॥१॥
न लगे अधिकार वर्णावर्ण धर्म । नाम परब्रम्हा येचि अर्थीं ॥२॥
योगायोगादि जपतप कोटी । एक नाम होठीं घडे तेंचि ॥३॥
चोखा म्हणे ऐसा आहे शिष्टाचार । नाम परिकर श्रीरामाचें ॥४॥

  - संत चोखामेळा
भेदाभेद कर्म न कळे त्याचें वर्म । वाऊगाचि श्रम वाहाती जगीं ॥१॥
नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । पाप ताप नयनीं न पडेचि ॥२॥
वेदाचा अनुभव शास्त्रांचा अनुवाद । नामचि गोविंद एक पुरे ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच न कळे । विठ्ठलाचे बळें नाम घेतों ॥४॥

  - संत चोखामेळा
माझ्या तो मनें केलासे विचार । आणिक प्रकार नेणें कांही ॥१॥
नाम वेळोवेळां आठवावे वाचे । दुजें आणिकांचें भय नाहीं ॥२॥
आवडी बैसली विठूचे चरणीं । आतां दुजेपणीं नाहीं गोष्टी ॥३॥
चोखा म्हणे दृढ केलोसे संती । म्हणोनी विश्रांती जीवा झाली ॥४॥

  - संत चोखामेळा
भवाचें भय न धरा मानसीं । चिंता अहर्निशी रामनाम ॥१॥
मंत्र हा सोपा न लगे सायास । जपा रात्रंदिवस सुलभ तें ॥२॥
दुर्लभ सर्वांसी न ये जो ध्यानासी । वेडावले ऋषि जयालागीं ॥३॥
आदिनाथ कंठी जप हा सर्वंदा । पवित्र हे सदा अखंड जपे ॥४॥
चोखा म्हणे येथें सर्वांधिकार । उंच नीच अपार तरले नामें ॥५॥

  - संत चोखामेळा
कोणासी सांकडें गातां रामनाम वाचें । होय संसाराचें सार्थक तेणें ॥१॥
येणें दो अक्षरीं उतराल पैलपार । नाम निरंतर जप करा ॥२॥
अनंततीर्थराशि वसे नामापाशी । ऐसी साक्ष देती वेदशास्त्रें ॥३॥
चोखा म्हणे हेचि ग्रंथांचे पैं सार । राम हा निर्धार जप करीं ॥४॥

  - संत चोखामेळा
 आपुल्या स्वहिता वाचेसी उच्चारा । आळस न करा क्षणभरी ॥१॥
जाईल हा देह वाउगाचि उगा । अभ्रांची छाया जयापरी ॥२॥
असारा साराचे नक पडूं भरी । सार तेंचि धरी हरिनाम ॥३॥
चोखा म्हणे नाम हाचि मंत्र सुगम । नको आन श्रम जाय वांया ॥४॥

  - संत चोखामेळा
नाशिवंतासाठीं करितोसी आटी । दृढ धरा कंठीं एक नाम ॥१॥
भवासी तारक विठ्ठलची एक । नाहीं आणिक सुख येतां जातां ॥२॥
एक एक योनी कोटी कोटी फेरा । नरदेहीं थारा तईच लाभे ॥३॥
चोखा म्हणे येथें एकचि साधन । संतासी शरण जाईं सुखें ॥४॥

  - संत चोखामेळा
सूखा कारणें करी तळमळ । जपें सर्वकाळ विठ्ठल वाचे ॥१॥
तेणें सर्व सुख होईल अंतरा । चुकती वेरझारा जन्ममरण ॥२॥
न लगे वेचावें धनाचिये पेटी । धरा नाम कंठीं विठोंबाचे ॥३॥
बैसोनी निवांत करावें चिंतन । राम कृष्ण नारायण दिननिशीं ॥४॥
चोखा म्हणे ऐसा करावा निर्धार । नाम एक सार विठोबाचें ॥५॥

  - संत चोखामेळा
अवघा आनंद राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥
हेंचि साधन निकें जगासी उद्धार । आणिक साचार दुजें नाहीं ॥२॥
क्रोधांचे न पडतां आघात । वाचे गातां गीत राम नाम ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा । जेथें कळिकाळांचा रीघ नाहीं ॥४॥

  - संत चोखामेळा
गणिका अजामेळें काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावतां ॥१॥
नवल हें पहा नवल हें पहा । अनुभवें अनुभवा देहामाजीं ॥२॥
उच्चारितां नाम वैकुंठीचें पेणें । ऐसें दुजें कोणें आहे कोठें ॥३॥
ब्रम्हाहत्या जयासी घडल्या अपार । वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥
सुफराटें नाम न येचि मुखासी । मारा मारा ध्यासीं स्मरतां झाला ॥५॥
चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा । उद्धार अधमा स्त्री शूद्रां ॥६॥

  - संत चोखामेळा
नामाचें सामर्थ्य विष तें अमृत । ऐसी हे प्रचीत आहे जीवा ॥१॥
तें नाम सोपें विठ्ठल विठ्ठल । नको काळ वेळ जपें आधीं ॥२॥
नेम धर्म कांहीं नलगे साधन । सुखें नारायण जप करीं ॥३॥
चोखा म्हणे मज भरंवसा नामाचा । येणें कळिकाळाचा भेव नाहीं ॥४॥

  - संत चोखामेळा
त्रैलोक्य वैभव ओवाळोनि सांडावें । नाम सुखें घ्यावें विठोबाचें ॥१॥
आणिक साधनें आहेत बहुतांपरी । नामाची ती सरी न पवती ॥२॥
म्हणोनि सुलभ विठ्ठल एक नाम । गातां नाचतां प्रेमें मुक्ति तया ॥३॥
चोखा म्हणे माझा अनुभव उघडा । भवभय पीडा येणें वारे ॥४॥

  - संत चोखामेळा
महादोष राशि पापाचे कळप । नामें सुखरूप कलियुगीं ॥१॥
म्हणोनि आळस करूं नका कोणी । नाम जपा वाणी सर्वकाळ ॥२॥
आसनीं शयनीं नामाचा आठव । आन ठावाठाव करूं नका ॥३॥
चोखा म्हणे खातां जिवितां वाचें । नाम श्रीविठ्ठलाचें उच्चारावें ॥४॥

  - संत चोखामेळा
हातींच्या कांकणा कासया आरसा । धरावा भरवंसा विठ्ठलनामीं ॥१॥
नलगे साचार याग यज्ञ विचार । जप निरंतर विठ्ठलनामी ॥२॥
योग्यांचिया वाटे नलगे खटपट । नामचि फुकट जपा आधीं ॥३॥
चोखा म्हणे सुख संताचे संगती । नाम अहोरात्रीं जप करा ॥४॥


  - संत चोखामेळा
नाम हें सोपें जपतां विठ्ठल । अवघेंचि फळ हातां लागे ॥१॥
योग याग जप तप अनुष्ठान । तीर्थ व्रत दान नाम जपतां ॥२॥
सुखाचें सुख नाहीं यातायाती । बैसोनी एकांतीं नाम स्मरा ॥३॥
चोखा म्हणे येणें साधेल साधन । तुटेल बंधन भवपाश ॥४॥

  - संत चोखामेळा
 आम्हां अधिकार उच्छिष्ट सेवन । संतांचे पूजन हेंचि बरें ॥१॥
सुलभ सोपारें विठोबाचें नाम । आणिक नाहीं वर्म दुजें काहीं ॥२॥
आवडीनें नाम गाईन उल्हासें । संतांच्या सहवासें खेळीं मेळीं ॥३॥
चोखा म्हणे माझी आवडी ही देवा । पुरवावी केशवा जन्मोजन्मी ॥४॥

  - संत चोखामेळा
अखंड नामाचें चिंतन सर्व काळ । तेणें सफळ संसार होय जनां ॥१॥
सर्व हें मायिक नाशिवंत साचें । काय सुख याचें मानितसां ॥२॥
निर्वाणी तारक विठोबाचें नाम । येणें भवश्रम दूर होय ॥३॥
चोखा म्हणे नाम जपें दिननिशी । येणें सदां सुखीं होसी जना ॥४॥

  - संत चोखामेळा
देवा नाहीं रूप देवा नाहीं नाम । देव हा निष्काम सर्वांठाई ॥१॥
निर्गुणीं सगुण सगुणीं निर्गुण । दोहींचें कारण तेच ठाई ॥२॥
चोखा म्हणे पाहतां पाहणें लपावे । ह्रदयीं बिंबले ह्रदयचि ॥३॥

  - संत चोखामेळा
कर्मातें वाळिलें धर्मातें वाळिलें । सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥१॥
विधीतें वाळिलें निषेधा गिळिलें । सर्व हारपले जेथिंचें तेथें ॥२॥
वेदातें वाळीलें । शास्त्रातें वाळीलें । सर्व हारपलें जेथिचें तेथें ॥३॥
चोखा म्हणे माझा संदेह फिटला । देहीच भेटला एव आम्हां ॥४॥

  - संत चोखामेळा
आम्हां आनंद झाला आम्हां आनंद झाला । देवोचि देखिला देहामाजी ॥१॥
देखणें ऊडालें पाहणें लपालें । देवे नवल केलें देहामाजी ॥२॥
मागें पुढें देव रिता ठाव कोठें । ह्रदयीं भेटें देहीं देवो ॥३॥
चोखा म्हणे देव देखिला पंढरी । उभा भीमातीरीं विटेवरी ॥४॥

  - संत चोखामेळा

बालक्रीडा

नेणते तयासी नेणता लहान । थोरा थोरपणें दिसे बरा ॥१॥
पावा वाहे वेणु खांदिया कांबळा । रूळताती गळां गुंजहार ॥२॥
मुखीं दहींभात कवळ काल्याचें । उष्टें गोपाळांचे खाय सुखें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा वैकुंठींचा हरी । गोपाळा गजरीं काला वांटी ॥४॥

  - संत चोखामेळा
सपेम निवृत्ति आणि ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठल चरणीं ॥१॥
सोपान सांवता गोरा तो कुंभार । नरहरी सोनार प्रेम भरित ॥२॥
कबीर कमाल रोहिदास चांभार । आणिक अपार वैष्णव जन ॥३॥
चोखा तया पायीं घाली लोटांगण । वंदितो चरण प्रेमभावें ॥४॥

  - संत चोखामेळा
माझा शिण भाग अवघा हरपला । विठोबा देखिला विटेवरी ॥१॥
अवघ्या जन्मांचें सार्थक पैं झालें । समचरण देखिलें डोळेभरी ॥२॥
चंद्रभागे तीरीं नाचती वारकरी । विठ्ठलनाम गजरीं आनंदानें ॥३॥
दिंडया गरुड टके पताकांचे भार । होतो जयजयकार नामघोष ॥४॥
तो सुखसोहळा देवांसी दुर्लभ । आम्हां तो सुलभ चोखा म्हणे ॥५॥

  - संत चोखामेळा
माझ्या मना तूं धरी कां विचार । न करी प्रकार आन कांहीं ॥१॥
पंढरीसी कोणी जाती वारकरी । सुखें त्यांचे घरी पशुयाती ॥२॥
तयाचिया सवें घडेल चिंतन । चंद्रभागे स्नान एकादशी ॥३॥
जागर क्षिरापती वैष्णव सांगाते । घडेल आपैतें लाभ मज ॥४॥
चोखा म्हणे घडेल संतांची संगती । सहज पंगती बैसेन मी ॥५॥

  - संत चोखामेळा
आजि दिवस धन्य सोनियाचा । जीवलग विठोबाचा भेटलासे ॥१॥
तेणें सुख समाधान झाली विश्रांती । दुजे नाठवती चित्तीं कांही ॥२॥
समाधानें जीव राहिला निश्चळ । गेले हळह्ळ त्रिविध ताप ॥३॥

  - संत चोखामेळा
कोणी पंढरीसी जाती वारकरी । तयांचे पायांवरी भाळ माझें ॥१॥
आनंदें तयांसी भेटेन आवडी । अंतरीची गोडी घेईन सुख ॥२॥
ते माझें मायबाप सोयरे सज्जन । तयां तनु मन वोवाळीन ॥३॥
चोखा म्हणे ते माहेर निजाचें । जन्मोजन्मांतरिचे साहाकारी ॥४॥

  - संत चोखामेळा
वेध कैसा लागला वो जीवा । नाठवेचि हेवा दुजा कांहीं ॥१॥
पंढरीचे वाटे येती वारकरी । सुखाची मी करीं मात तयां ॥२॥
माझ्या विठोबाचें गाती जे नाम । ते माझे सुखधाम वारकरी ॥३॥
लोटांगणें सामोरा जाईन तयांसी । क्षेम आनंदेसी देईन त्यांसी ॥४॥
चोखा म्हणे माझा प्राणाचा तो प्राण । जाईन वोवाळोन जीवें भावें ॥५॥

  - संत चोखामेळा