आयुष्याच्या खेळात रस्सीखेच चालली आहे एकाच बाजूने
रस्सीचे दुसरे टोक माझ्या हाती दिले असते तर गोष्ट वेगळी!
प्रतिस्पर्धी तगडा तर आहेच, शिवाय तो समोरही येत नाही!
लोकांची तर मेळ्यामध्ये सुद्धा चुकामूक होते
पण भेटतातच ना कहाणीच्या एका सुंदर वळणावर?
तसे कायमचे थोडेच कुणी दुरावते परस्परांना?
रात्री थकल्या भागल्या रस्त्यावर एक सावली
हलत डुलत आली, खांबावर धडकली, गतप्राण झाली
खचित, काळोखाचीच कुणी बेवारस अवलाद असणार ती!
मारून टाका हे विषारी डास, उठणाऱ्या आवाजांचे –
त्यांच्या चाव्याने सूज येत राहाते
मच्छरदाणी लावूनही जगणे अवघड झाले आहे!
पृथ्वी घालते आहे सूर्याभोवती प्रदक्षिणा
आणि चंद्र फिरतो आहे पृथ्वीभोवती रात्रंदिवस
आम्ही आहोत तिघेजण, आमचे कुटुंब आहे तिघांचे!
गल्लीत सगळीकडे पत्रके वाटली जाताहेत
आपली कत्तल करणारांनाच निवडून द्या!
जवळ येऊन ठेपली आहे निवडणुकीची अवघड घटका!
कुणी दोस्त होते माझे, असायचे सतत माझ्याबरोबर
आले कुणी, घेऊन गेले त्यांना, पुन्हा आलेच नाहीत ते
फळीवरुन काढलेल्या पुस्तकांची जागा पडली आहे रिती!
कधी कधी असेही घडते बाजारात...
किंमत रास्त होती, पण खिशात पुरेसे पैसे नव्हते
असाच एकदा तुझ्याकडून आलो होतो तुला हरवून!
रांगेत ठेवलेल्या पुस्तकाची पाने फडफडू लागली अचानक
हवा दार ढकलून थेट घरात घुसली
हवेसारखीच तूही कधीतरी इथे येजा कर ना!
तुझ्यासाठी मी हे आकाशही लुटले तरी
थोडेसे चमकदार आरसे फोडून काय मिळणार?
चंद्र बोटात रुतला तर भळभळत राहील!
ती रागावून बसलेली असते नेहमी तर काही होत नाही
जेव्हा केव्हा भेटते तेव्हा मात्र डोळे घळघळ वाहतात!
सांगा ना, कुणाच्या वाट्याला बहरत्या ऋतूतच दु:ख यावे?
एखाद्या घासासारखी झोप गिळून टाकते मला
रेशमी पायमोजे पायातून अलगद निघावेत तशी...
आणि सकाळी वाटते, थडग्यातून बाहेर पडतो आहे मी!
कुणी होते प्रतीक्षेत, कुणी विरहात, कुणी मीलनातही
किती लोक कालच्या रात्री चंद्राच्या नौकेत होते
सकाळ होण्याची मात्र कुणीच बघत नव्हते वाट!
केवळ पाण्याचा आवाज येतो आहे झुळझुळता, मंद
घाट सोडून सारे नावाडी कधीच निघून गेले आहेत
चला ना! आपण या चंद्राच्या नौकेतूनच तलाव पार करु!
कुठे उधळते आहे धूळ, कुठे टोचताहेत खडे
ठेचकाळत चालली आहे पोरवयाची हवेची झुळूक
किती सुंदर वाटतात हे कौमार्यातले बालिश आविर्भाव!
रोज उठून टांगायचा चंद्र रात्री आभाळात
रोज दिवसाच्या उजेडात रात्र होईतो वाट बघायची
हातभर अंतर पार करण्यासाठी आयुष्यभर चालावे लागते!
दुसरे महायुद्ध संपूनही किती वर्षे उलटली, तरी
अजूनही कामावर येणारे काही जपानी ऑफिसर लपतछपत भेटले –
आपण आता कधी भेटणार? आताही तू नाराज आहेस का?
बिछान्यावरुन ओढावी चादर ओहटणारी नदी
तळाशी झोपलेल्या कुणाला शोधते आहे ती?
पाण्यात बुडलेल्यांना झोपूही देत नाही सुखाने!
भडकलेल्या वणव्यासारखी माझ्याजवळून जातेस
कुठल्या ज्योतीपासून उजळले आहे देवाने तुला?
माझे घर तर काड्यामोड्यांचे, आलीस तरी काय बिघडले?
आली समोरुन, पाहिले, बोलली दोन शब्द
हसली सुद्धा! सारे लाघव जुन्या ओळखीखातर
कालचा पेपर होता, उघडून पाहिला, ठेवून दिला
रोजचा नाही तो सकाळचा झगडा, नाही रात्रीची ती बेचैनी
नाही पेटत चूल तसे धगधगत नाहीत डोळे सुद्धा!
ही भयाण शांतता आणि मी घरात असा उदास!
सांजवेळ मला अगदी लगटून निघून गेली, पण
भोवती दाटू लागलेल्या रात्रीने जीव घाबरतो आहे
आणि माथ्यावर चढणाऱ्या दिवसाचेही त्यामुळेच भय वाटते आहे
हातात हात मिळवला, जरा विचार करुन नावही घेतले माझे,
जणू एखाद्या कादंबरीचे अंतरंग वरवर चाळूनच प्रथम पाहिले...
काही नाती पुस्तकात बंदिस्त असतानाच चांगली वाटतात!
या, सारेजण आरसेच वेढून घेऊ अंगभर
साऱ्यांना आपलाच चेहरा दिसत राहील त्यात
आणि साऱ्यांना सारेच सुंदर वाटतील इथे!
विचार भिरकावला मी बेफिकीरपणे अवकाशात
तो आता ईश्वरापाशी जाऊन पोहोचणार की त्याच्याही पार जाणार?
की पलीकडे जाऊनही पुन्हा माझ्यापाशीच येणार?
सारा दिवस बसलो होतो हातात भिकेचा कटोरा घेऊन
रात्र आली, चंद्राची कवडी आत टाकून निघून गेली
आणि आता हा कंजूस दिवस ही सुद्धा हिरावून घेईल!
आईचा आशीर्वाद : चंद्रासारखी देखणी वधू मिळेल!
आज संध्याकाळी ती ‘चंद्र’मुखी पाहिली फुटपाथवरुन
चंद्र भाकरीसारखा जळत राहिला रात्रभर!