हा अर्धा चंद्र गडद काळ्या आभाळावरचा
जणू काळ्या हबशिणीची काळोख चाटणारी जीभ
सकाळपर्यंत कढई चाटून साफ करुन निघून जाईल!
वस्तीला आग लावून पुरेसा आनंद झाला नाही...
तो आता आभाळावर हल्ला करायला निघाला आहे!
धुराच्या अंगरख्यावर रक्ताच्या वासाचे डागही पडले आहेत!
झोपडीतले चिमुकले बाळ रडता रडता
आईवर रुसून आपले आपणच झोपी गेले आहे
तात्पुरता ‘युद्धविराम’ झालेला दिसतो आहे!
मी राहातो दोस्तांच्या घरभिंतीच्या अलीकडे, पण
माझी सावली मात्र भिंतीच्या पलीकडे पडते
किती भंगूर आहे ही देहाची आणि प्राणांची सीमा?
लहानपणीच्या जखमेचा डाग दिसतो आहे चंद्राच्या कपाळावर
दिवसभर दगड, धोंडे, गलोल घेऊन खेळत होता
कितीदा सांगितले, बरी नाही संगत त्या उनाड उल्कांची!
कसला विचित्र कपडा दिला आहे मला शिवायला!
एकीकडून खेचून घ्यावा तर दुसरीकडून सुटून जातो...
उसवण्या शिवण्यातच सारे आयुष्य निघून गेले!
मोजून मापून कालगणना होते वाळूच्या घड्याळात
एक बाजू रिती होते तेव्हा घड्याळ पुन्हा उलटे करतात
हे आयुष्य संपेल त्यावेळी तो नाही असाच मला उलटे करणार?
जरा पॅलेट सांभाळ हा रंगांचा, सुगंधांचा
आकाशाचा कॅनव्हास उघडतो आहे मी...
माणसाचे चित्र पुन्हा एकदा रेखाटून पहा!
‘मीर’ नेही पाहिले आहेत तुझे ओठ,
म्हणून म्हणतो, ‘ही जणू गुलाबाची पाकळीच आहे!’
बोलणे ऐकले असते तर गालिब झाला असता!
कुंपणाच्या काटेरी तारांमुळे हवा जखमी होते
तुझ्या सरहद्दीजवळून जाताना नदी मस्तक टेकते...
माझा एक दोस्त रावी नदीच्या पल्याड राहतो आहे!
कुणालाही ठावठिकाणा विचारला त्याचा
तर दरवेळी नवाच पत्ता सांगितला जातो आहे!
तो बेघर आहे की दिसेल त्या घरात शिरणारा?
ता तर सभ्यता, संस्कृती, कला सारेच वाटून टाकले आपसात
कुठून कुणी साद घालणार नाही की प्रतिसाद देणार नाही
सारा अवकाश जणू कात्रीने कापून टाकला आहे आम्ही!
शेतकऱ्याने चालवला नांगर, जमीनदाराचे झाले शेत
वाण्याने दुकानातला गल्ला भरला, ती तर ईश्वराची कृपा
मातीची गादी तर पुन्हा रिती, जिने शेत रुजवले होते!
चला, आपले बोलणे एकमेकात वाटून घेऊ या
तुम्ही काही ऐकायचे नाही, मी समजून घ्यायचे नाही!
दोन अडाण्यांमधला किती हा सुसंस्कृत संवाद!
सर्कशीचा तंबू उभारलेला आहे
कसरत करणारे झोक्यावर आंदोळत आहेत
बुद्धीचे हे खेळ संपतच नाहीत कधी!
एक एक आठवण उचलून, पापण्यांनी पुसून ठेवून दे पुन्हा
हे अश्रू नाहीत, डोळ्यांत जपून ठेवलेले मूल्यवान आरसे आहेत
खाली पडल्या तर किंमती चिजा फुटून जायच्या कदाचित!
समुद्र जेव्हा खळबळून घुसळून निघतो वादळात
जेवढे काही मिळालेले असते ते ठेवतो किनाऱ्यावर
माणसांनी पाण्यात फेकलेले कर्म मात्र घेऊन जातो बरोबर!
शोधतो आहे या देहाच्या खोलीत आणखी कुणाला
एक जो मी आहे, एक जो आणखी कुणी चमकतो आहे
एका म्यानात दोन तलवारी राहातात कशा?
एक शेत आहे, एक नदी आहे
दोघे जोडीजोडीने राहतात... वाहतात...
शेतकरी आहेत, नावाडी आहेत, सारे नोकर चाकर आहेत!
तिथे दिसतो आहे तसा नाहीच मुळी
आरशावर उमटला आहे तो चेहरा!
एकूण काय, आरशातले प्रतिबिंब खरे नाही!
बसमध्ये बसल्याबरोबर शोधू लागलो मान वळवून
का कोण जाणे, वाटले, तू आहेस जवळच कुठेतरी
तुझ्या आवडीचा सेंट फवारला होता कुणी अंगभर!
देह आणि प्राण धुंडाळून पाहू या
हे गाठोडेही नीट उघडून पाहू या जरा
तुटका फुटका ईश्वर त्यातून बाहेर येईल कदाचित!
काटेरी तारेवर वाळत टाकले आहेत कुणी ओले कपडे
ठिबकते आहे थेंब थेंब रक्त, वाहून जाते आहे मोरीतून
काय त्या जवानाची विधवा रोज धुते त्याचा सैनिकी वेष इथे?
साऱ्या प्रवासात माझी जाणीव असते माझ्याबरोबर
परत फिरावेसे वाटते, पण प्रवृत्ती होते पुढे पुढेच जाण्याची!
रस्ते पावलात रस्सीसारखे गुरफटत राहतात...
दगडी भिंत, लाकडी फ्रेम, काचेच्या आड ठेवलेली फुले जपून
एक सुगंधी कल्पना किती आच्छादनात बंद!
प्रेमाला तर हृदयाचे एक आवरण पुरेसे, आणखी किती वेष चढवायचे?
जिंदगी काय आहे ते जाणण्यासाठी
जिवंत राहाणे आवश्यक आहे
पण आजवर जगलाच नाही ना कुणी!
माझ्या काचेच्या दरवाजाबाहेर चिमण्या उडताहेत
उन्हाच्या नाचणाऱ्या ठिणग्या सजीव झाल्या आहेत
मी मात्र चिंतांचे एक गाठोडे बनून पडलो आहे घरात!
तुझे ओठ हल्ली किती कोरडे भावशून्य वाटतात!
एकेकाळी या ओठांवर सुंदर कविता उमटायच्या!
आता त्याच ओठांनी कोरडे वर्तमान लिहायला कधी सुरुवात केली?
दिवस ढळला आणि डोळ्यातल्या पाण्यात एक चेहरा झळझळत उठला
ताज्या ओल्या जखमेसारखा प्रकाश सर्वत्र पसरला
जळणाऱ्या ज्योतीमधून किती ठिणग्या विरघळून खाली पडल्या!