भक्ताचिया काजासाठी

भक्ताचिया काजासाठी, साधुचिया प्रेमासाठी,
सोडली मी लाज रे ॥१॥

धुतो अर्जुनाचे घोडे, सदा राहे मागे पुढे ।
घाली अंगणात सडे, बांधुनिया माज रे ॥२॥

वेडी गवळीयांची पोरे, त्यांचे ताक प्यालो बा रे ।
स्वाता भिल्लिनीची वोरे, उच्छिष्ठाची चोज रे ॥३॥

दुर्योधन सदनी गेलो, विदुराच्या गृहा आलो ।
आवडीने कण्या प्यालो, जोंधळ्‌ची पेज रे ॥४॥

पुर्णब्रह्म ह्मणती माते, पुर्णब्रह्म मींच त्यांते ।
ऐंसी याची जाणीव ते, ह्मणे अमृतराय रे ॥५॥


 - संत अमृतराय महाराज

हरिभजनाविण काळ घालवू नको

हरिभजनाविण काळ घालवू नको रे ॥१॥

दोरीच्या सापा भिवुनी भवा ।
भेटी नाही जिवाशिवा ।
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ॥२॥

विवेकाची ठरेल ओल ।
ऐसे की बोलावे बोल ।
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ॥३॥

संत संगतीने उमज ।
आणुनि मनी पुरते समज ।
अनुभवावीण मान हालवू नको रे ॥४॥

सोहिरा ह्मणे ज्ञानज्योती ।
तेथ कैचि दिवस-राती ।
तयावीण नेत्रपाती हालवू नको रे ॥५॥


 - संत सोहिरोबानाथ

अजि मी ब्रह्म पाहिले

अजि मी ब्रह्म पाहिले

अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी
कटिकर नटसम चरण विटेवरी, उभे राहिले

एकनाथाच्या भक्तिसाठी, धावत आला तो जगजेठी
खांदी कावड आवड मोठी, पाणी वाहिले

चोख्यासंगे ढोरे ओढिता, शिणला नाही तो तत्त्वतां
जनीसंगे दळिता कांडिता, गाणे गाईले

दामाजीची रसिद पटवली, कान्होपात्रा ती उद्धरिली
अमृतराय ह्मणे ऐसी माऊली, संकटा वारिले


रचना - संत अमृतराय महाराज
राग -  जयजयवंती

देह शुद्ध करुनी

देह शुद्ध करुनी भजनीं भजावे ।
आणिकांचे नाठवावे दोष-गुण ॥१॥

साधनें समाधी नको पां उपाधी ।
सर्व समबुद्धी करी मन ॥२॥

ह्मणे जनार्दन घेई अनुताप ।
सांडी पां संकल्प एकनाथा ॥३॥


 - संत जनार्दन महाराज

संतपदांची जोड दे

संतपदांची जोड दे रे हरि साधुपदाची जोड ॥१॥

संतसमागम आत्मत्वाचा, सुंदर उगवे मोड ॥२॥

सुफलित करुनी पूर्ण मनोरथ । पुरविशि जिविंचें कोड ॥३॥

अमृत ह्मणे रे हरि । भक्ताचा शेवट करिसी गोड ॥४॥


 - संत अमृतराय महाराज

धवळे

विवाहात गायल्या जाणार्‍या नवरदेवाविषयीच्या गीतांना "धवले" किंवा "धवळे" असे म्हणतात

मंगलाष्टके

मंगलाष्टक : हिंदूंमध्ये मातापित्यांच्या पुढाकाराने किंवा संमतीने होत असलेल्या धार्मिक पद्धतीच्या विवाहाप्रसंगी महाराष्ट्र आणि त्याच्या आसपासच्या भागांत म्हटल्या जात असलेल्या पद्यरचनांना मंगलाष्टक या नावाने ओळखले जाते. मंगलाष्टकाची प्रथा विशेषकरून महाराष्ट्रीय हिंदू समाजात प्रचलित आहे. विवाह समारंभात वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करून त्यांना आशीर्वाद देण्याच्या प्रथेचा एक भाग म्हणून मंगलाष्टके आपली ओळख राखून आहेत.

मंगलाष्टकांचे मूळ विवाहप्रसंगी ज्येष्ठांनी वधूवरांना त्यांच्या दांपत्यजीवनासाठी द्यावयाच्या आशीर्वचनात आहे.पारंपरिकरीत्या मंगलाष्टक ही आठ ओळींचा चरण असलेली, विशिष्ट सुरांत म्हणण्याची पद्यरचना असते. तिचा एक चरण संपल्यानंतर जमलेली मंडळी वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करतात. ही पद्यरचना मराठी किंवा संस्कृतमध्ये असते. मात्र विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून मंगलाष्टके स्वरचित म्हणण्याचा परिपाठही वधू वराचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांनी सुरू केला आहे. वधू आणि वराला त्यांच्या दांपत्यजीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद हा या रचनांचा मुख्य गाभा मात्र टिकून आहे.

स्रोत : विकिपीडिया