तेच ते नि तेच ते

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते

खानावळीही बदलून पाहिल्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक, बुळा बोध
नऊ धगे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तीचा तोच रोग
तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती '
तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती '
तेच ओठ तेच डोळे
तेच मुरके तेच चाळे
तोच पलंग तीच नारी
सतार नव्हे एकतारी

करीन म्हटले आत्महत्त्या
रोमिओची आत्महत्त्या
दधीचिची आत्महत्त्या
आत्महत्त्याही तीच ती
आत्मा ही तोच तो
हत्त्याही तीच ती
कारण जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते

कवी - विंदा करंदीकर

समुद्रराग

पावसात जागला समुद्रराग सावळा
लाट लाट दाटते भरुन भाव कोवळा

काठ काठ ढासळे, पिसाट माड स्फुंदती
आंधळ्या ढगांतूनी प्रकाशबिंदू सांडती

हाक ये दूरुन एक झाकळून टाकते
गाढ गूढ आठवांत मूक वेल वाकते

माखते चराचरी अथांग गांग गारवा
आगळा जगास ये उदास रंग पारवा

धूसरे सरींत दूर, सूरसूर व्याकळे
भाव की अभाव हा करी सुगंध मोकळे

कोण ही व्यथा अशी सुखास लाज आणते
सागरार्थ कोणत्या उसासुनी उधाणते


कवी - बा. भ. बोरकर

माझ्या गोव्याच्या भूमीत

माझ्या गोव्याच्या भूमीत
गड्या नारळ मधाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
घट फ़ुटती दुधाचे||

माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फ़णसाची रास,
फ़ुली फ़ळांचे पाझर
फ़ळी फ़ुलांचे सुवास||

माझ्या गोव्याच्या भूमीत
वनश्रीची कारागिरी,
पाना-फ़ुलांची कुसर
पशु-पक्ष्यांच्या किनारी||

माझ्या गोव्याच्या भूमीत
उन्हाळ्यात खारा वारा,
पावसात दारापुढे
सोन्याचांदीच्या रे धारा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे आकाश सागरा||

माझ्या गोव्याच्या भूमीत
चाफ़ा पानाविण फ़ुले,
भोळा भाबडा शालीन
भाव शब्दाविण बोले||

माझ्या गोव्याच्या भूमीत
गडे साळीचा रे भात,
वाढी आईच्या मायेने
सोन-केवड्याचा हात||

माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी,
आतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी||


कवी - बा. भ. बोरकर

चित्रवीणा

निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजीशी
कुठे गर्द बांबूची बेटे

जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापॆ
सुखांसवे होऊनी अनावर

तारांमधला पतंग कोठे
भुलूनी गेला गगनमंडला
फ़णा डोलवित झोंबू पाहॆ
अस्तरवीच्या कवचकुंडला

उंचवट्यावर म्हशी गोठल्या
तसेच कोठे कातळ काळे
वर्ख तृप्तिचा पानोपानी
बघून झाले ओलेओले

कुठे तुटल्या लाल कड्यावर
चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला
सटीनकांति गोरे गोरे

फूलपंखरी फूलथव्यांवर
कुठे सांडली कुंकुमटींबे
आरसपानी पाण्यावरती
तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे

कुठे आवळीवरी कावळा
मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला राउळ इंद्राचे
कोरीव संगमरवरी रंगे

घाटामध्ये शिरली गाडी
अन रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्रवीण
अजूनी करते दिडदा दिडदा.


कवी - बा. भ. बोरकर

तव नयनांचे दल......

तव नयनांचे दल हलले गं
पानावरच्या दवबिंदूपरी
जग सारे डळमळले गं
तव नयनांचे दल हलले गं

वारे गळले तारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषी मुनी योगी चळले गं
तव नयनांचे दल हलले गं

ऋतुचक्राचे आस उडाले
आकाशातुन शब्द उडाले
आवर आवर अपुले भाले
मीन जळी तळमळले गं
तव नयनांचे दल हलले गं

ह्रुदयी माझ्या चकमक झडली
दो नयनांची किमया घडली
नजर तुझी धरणीला भिडली
पुनरपी जग सावरले गं
तव नयनांचे दल हलले गं

कवी - बा. भ. बोरकर

स्फूर्ती

काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
प्राशन करिता रंग जगाचे कणोकणी ते बदलू द्या !

अमुच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची,
म्हणेल जग आम्हांस मद्यपि पर्वा कसली मग याची !
जिव्हेची बंधने तर ढिली करा तीव्र या पेयाने,
यदुष्णतेने द्यावापृथ्वी द्रवुनि मिसळती वेगाने !
होउनिया मग दंग मनी,
व्हावे ते आणा ध्यानी,
गा मग सुचतिल ती गाणी,
परिसुनी त्यांचे शब्द, रुढीचे द्यास झणी ते खवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

सोमाचा रस वेदकाळच्या ऋषिवर्यांनी उकळीला,
शेष तयाचा द्या तर लौकर पिपासु जे त्या आम्हाला !
औचित्याच्या फोल विवेका, जा निघ त्या दुरवस्थेने
अम्हा घेरिले म्हणुनी घेतो झिंगुनिया या पानाने !
क्लृप्तीची मग करुनी नौका व्योमसागरावरी जाऊ
उडुरत्ने ती गरीब धरेला तेथुन फेकुनिया देऊ !
अडवतील जर देव, तरी
झगडू त्यांच्याशी निकरी
हार न खाऊ रतीभरी !
देवदानवा नरे निर्मीले हे मत लोकां कवळू द्या !
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

पद्यपंक्तीची तरफ आमुच्या की विधीने दिली असे,
टेकुनि ती जनताशीर्षावरी जग उलथुन या देउ कसे !
बंडाचा तो झेंडा उभवुनी धामधूम जिकडे तिकडे.
उडवुनि देऊनि जुलुमाचे या करु पहा तुकडे तुकडे !
महादेव ! हरहर ! समराचा गर्जत तो वाऱ्यावरती
येउनि घुमतो अमुच्या कर्णी ..निजती ते ठारची मरती !
उठा उठा बांधा कमरा
मारा किंवा लढत मरा
सत्वाचा उदयोस्तु करा !
छंद फंद उच्छृंखल अमुचे स्तीमित जगाला ढवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
 - मुंबई, २३ मे १८९६

आम्ही कोण?

आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके-
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया;
विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया,
दिक्कालांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके

सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके;
पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया -
सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या;
फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!

शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे?
पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते?
ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे;
ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!

आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे;
आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे!


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- फैजपूर २९ नोव्हेंबर १९०१