देवा तुझे

देवा, तुझे किती, सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो .

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पांखरे
किती गोड बरे गाणे गाती.

सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी.

इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील!!


कवी - ग. ह. पाटील

राजहंस माझा निजला

हे कोण बोललें बोला? 'राजहंस माझा निजला'

दुर्दैवनगाच्या शिखरी, नवविधवा दुःखी आई
तें हृदय कसें आईचें, मी उगाच सांगत नाही
जें आनंदेही रडते, दु:खांत कसें ते होई

हे कुणी कुणां सांगावे
आईच्या बाळा ठावें
प्रेमाच्या गावा जावें
मग ऐकावें या बोला, 'राजहंस माझा निजला"

मांडीवर मेले मूल, तो हृदया धक्का बसला
होउनी कळस शोकाचा, भ्रम तिच्या मानसीं बसला
मग हृदय बधिरची झाले, अति दुःख तिजवी चित्ताला

ते तिच्या जिवाचें फूल
मांडीवर होत मलूल
तरि शोके पडुनी भूल
वाटतची होतें तिजला, 'राजहंस माझा निजला'

जन चार भोंवतीं जमले, मृत बाळा उचलायाला
तो काळ नाथनिधनाचा, हतभागी मना आठवला
तो प्रसंग पहिला तसला, हा दुसरा आतां असला

ते चित्र दिसे चित्ताला
हे चित्र दिसे डोळ्यांला
निज चित्र चित्तनयनांला,
मग रडुने वदे ती सकलां, 'राजहंस माझा निजला'

करु नका गलबला अगदी, लागली झोंप मम बाळा
आधीच झोंप त्या नाही, खेळाचा एकच चाळा,
जागताच वाऱ्यासरसा, खेळाचा घेइल आळा

वाजवूं नका पाऊल
लागेल तया चाहूल
झोपेचा हलका फूल
मग झोपायाचा कुठला, राजहंस माझा निजला

हें दूध जरासा प्याला, आतासा कोठें निजला
डोळ्याला लागे डोळा, कां तोच भोवतीं जमलां?
जा, नका उठवुं वेल्हाळा, मी ओळखतें हो सकलां

तो हिराच तेव्हा नेला
हिरकणीस आता टपला
परि जिवापलिकडे याला
लपवीन, एकच मजला, राजहंस माझा निजला

कां असलें भलतें सलतें, बोलतां अमंगळ याला
छबकड्यावरुनि माझ्या या, ओवाळुनि टाकीन सकलां
घेतें मी पदराखालीं, पाहूंच नका लडिवाळा,

मी गरीब कितिही असलें
जरी कपाळ माझें फ़ूटलें
बोलणें तरी हें असलें
खपणार नाहिं हो मजला, राजहंस माझा निजला

हें असेच सांगुनि मागें, नेलात जिवाचा राजा
दाखाविलाही फिरुनी नाहीं, नाहीत का तुम्हां लाजा?
न्यावयास आतां आलां, राजहंस राजस माझा!

हा असा कसा दुष्टावा?
कोणत्या जन्हिंचा दावा?
का उगिच गळा कापावा
पाहुनी गरिब कोणाला, राजहंस माझा निजला


कवी - गोविंदाग्रज[राम गणेश गडकरी]

एखाद्याचें नशीब

काही गोड फुलें सदा विहरती स्वगागनांच्या शिरीं,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरीं;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि तें,
एखादे फुटकें नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारितें ।

कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हैमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळ्या पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवीं यापरी
पाही कोण अशा हताश हृदया ? जो तो असे आपला,
देवा ! तूं तरि टाकिं अश्रु वरुनी, त्यासाठीं तो तापला !


कवी - गोविंदाग्रज

एका तळ्यात होती...

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

एके दिनी परंतू पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक

कवी - ग. दि. माडगूळकर

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे...

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

गीतकार :ग. दि. माडगुळकर

मातृवंदना

दिला जन्म तू,विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये,सुखे साहिलेस,
जिण्यालागि आकार माझ्या दिलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

गुरु आद्य तू,माझिया जीवनात
तुवा पेरिली धर्मबीजे मनात,
प्रपंचात सत्पंथ तू दाविलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

तुझा कीर्तिविस्तार माझा प्रपंच
कृपेने तुझ्या रंगला रंगमंच,
वठे भूमिका पाठ जैसा दिलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

तुझे थोर संस्कार आचार झाले
तुझे यत्नप्रामाण्य सिध्दीस गेले,
तुझ्या चिंतने,लोभ पावे निरास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

उमेचे,रमेचे,तसे शारदेचे
जपध्यान तैसे तुझे जन्मदेचे,
तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस


कवी - ग. दि. माडगूळकर

नदी मिळता सागरा

नदी सागरा मिळ्ता, पुन्हा येइना बाहेर
अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर

काय सांगू रे बाप्पानो, तुम्ही आंधळ्याचे चेले
नदी माहेराशी जाते, म्हणुनची जग चाले

सारे जीवन नदीचे, घेतो पोटात सागर
तरी तीला आठवतो, जन्म दिलेला डोंगर

डोंगराच्या मायेपायी, रुप वाफ़ेचे घेउन
नदी तरंगत जाते, पंख वाऱ्याचे लावून

पुन्हा होउन लेकरु, नदी वाजवते वाळा
पान्हा फ़ुटतो डोंगरा, तेव्हा येतो पावसाळा.


कवी - ग. दि. माडगूळकर