परीटास...

परिटा येशिल कधी परतून? || धृ ||

काल दिलेल्या कपड्यांमधले दोन चार हरवून!

कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून!

उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून!

बारिकसारिक हातरुमाला हातोहात उडवून!

सद‍र्यांची या इस्तरिंने तव चाळण पार करुन!

खमिसांची ही धिरडी खरपुस भट्टीमधें परतून!

तिच्या भरजरी पैठणीची या मच्छरदाणी करुन!

गावांतील कपड्यांची सगळ्या गल्लत छान करुन!

रुमाल जरीचे आणि उपरणीं महिनाभर नेसुन!

सणासुदीला मात्र वाढणे घेई तुझे चोपुन!
परिटा येशिल कधी परतून?


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कवी आणि कारकून

बोले हासुनि कारकून कुठला गर्वे कवीला असे
'माझे साम्य तुझ्यामधे दिसतसे-आहोत बंधू जसे!
दोघेही दिनरात्र ना खरडतो काहीतरी आपण,
जन्माचे पडलेत की ठळक हे बोटास काळे वण!

'माझे अक्षर का कुणास उमगे-आला जरी तो खुदा
ब्रह्याच्याहि पित्यास का समजणे काव्यार्थ तूझा कदा!
येती कागद जे समीप करणे त्यांची मला नक्कल
तूही ना नकला अशाच करिसी-लागे न ज्या अक्कल!

आणे, पै, रुपये हिशेब करितो-ज्यांचे न हो दर्शन,
नाही पाहियली तरी करिसि ना ताराफुले वर्णन?
पोटाचे रडगान मी रडतसे वेळी अवेळी जसे
चाले संतत काव्यरोदन तुझे तीन्ही त्रिकाळी तसे!'

'मित्रा, हे सगळे खरे,' कवि वदे, 'तुझ्याप्रमाणे पण-
माझ्या मूर्खपणास ना दरमहा देई कुणी वेतन!'


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

फत्तर आणि फुले

होता डोंगरपायथ्यास पडला धोंडा भला थोरला
वर्षें कैकहि तरी न तो हाले मुळीं आपुला
आनंदी फुलवेल एक जवळी होती सुखें राहत
बाळे सांजसकाळ हासत तीचीं तैशीच कोमेजत

थट्टेखोर फुलें हंसूनि ती वदलीं धोंड्यास त्या एकदा
"धोंडा केवळ तू ! अरे, न जगती काही तुझा फायदा !"
संतापून तयांस फत्तर म्हणे " कां हीं वॄथा बोलणी
सारी सुंदरता इथेंच तुमची जाईल रे वाळुनी !"

धोंडयाच्या परि काळजास भिडले ते शब्द जाऊनिया
काळाठिक्कर यामुळें हळुहळू तो लागला व्हावया
पुष्पांच्या कवळ्या मनांतहि सले ते फत्तराचें वच
गेली तोंडकळा सुकून, पडली तीं पांढरी फारच !

कोणी त्या स्थलि शिल्पकार मग तो ये हिंडता हिंडता
त्याच्या स्फुर्तिस फत्तरांत दिसली काहीतरी दिव्यता
त्याची दिव्यकलाकरांगुलि न जों त्या फत्तरा लागली
श्रीसौंदर्यमनोरमा प्रगटुनी साक्षात् उभी राहिली

वेडा पीर असाच गुंगत कुणी एकाकी ये त्या स्थळा
ती मूर्ती बघतांच तो तर खुळा नाचावया लागला
त्यानें ती खुडुनी फुलें भरभरा पायीं तिच्या वाहिली
तों, त्यांची फुलुनी कळी खद्खदा सारीं हसूं लागली

लावण्यकॄति ती वनांत अजुनी आहे उभी हांसत
पुष्पेंही बसलींत तीं बिलगुनी पायी तिच्या खेळत


कवी - केशवकुमार

देवा तुझे

देवा, तुझे किती, सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो .

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पांखरे
किती गोड बरे गाणे गाती.

सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी.

इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील!!


कवी - ग. ह. पाटील

राजहंस माझा निजला

हे कोण बोललें बोला? 'राजहंस माझा निजला'

दुर्दैवनगाच्या शिखरी, नवविधवा दुःखी आई
तें हृदय कसें आईचें, मी उगाच सांगत नाही
जें आनंदेही रडते, दु:खांत कसें ते होई

हे कुणी कुणां सांगावे
आईच्या बाळा ठावें
प्रेमाच्या गावा जावें
मग ऐकावें या बोला, 'राजहंस माझा निजला"

मांडीवर मेले मूल, तो हृदया धक्का बसला
होउनी कळस शोकाचा, भ्रम तिच्या मानसीं बसला
मग हृदय बधिरची झाले, अति दुःख तिजवी चित्ताला

ते तिच्या जिवाचें फूल
मांडीवर होत मलूल
तरि शोके पडुनी भूल
वाटतची होतें तिजला, 'राजहंस माझा निजला'

जन चार भोंवतीं जमले, मृत बाळा उचलायाला
तो काळ नाथनिधनाचा, हतभागी मना आठवला
तो प्रसंग पहिला तसला, हा दुसरा आतां असला

ते चित्र दिसे चित्ताला
हे चित्र दिसे डोळ्यांला
निज चित्र चित्तनयनांला,
मग रडुने वदे ती सकलां, 'राजहंस माझा निजला'

करु नका गलबला अगदी, लागली झोंप मम बाळा
आधीच झोंप त्या नाही, खेळाचा एकच चाळा,
जागताच वाऱ्यासरसा, खेळाचा घेइल आळा

वाजवूं नका पाऊल
लागेल तया चाहूल
झोपेचा हलका फूल
मग झोपायाचा कुठला, राजहंस माझा निजला

हें दूध जरासा प्याला, आतासा कोठें निजला
डोळ्याला लागे डोळा, कां तोच भोवतीं जमलां?
जा, नका उठवुं वेल्हाळा, मी ओळखतें हो सकलां

तो हिराच तेव्हा नेला
हिरकणीस आता टपला
परि जिवापलिकडे याला
लपवीन, एकच मजला, राजहंस माझा निजला

कां असलें भलतें सलतें, बोलतां अमंगळ याला
छबकड्यावरुनि माझ्या या, ओवाळुनि टाकीन सकलां
घेतें मी पदराखालीं, पाहूंच नका लडिवाळा,

मी गरीब कितिही असलें
जरी कपाळ माझें फ़ूटलें
बोलणें तरी हें असलें
खपणार नाहिं हो मजला, राजहंस माझा निजला

हें असेच सांगुनि मागें, नेलात जिवाचा राजा
दाखाविलाही फिरुनी नाहीं, नाहीत का तुम्हां लाजा?
न्यावयास आतां आलां, राजहंस राजस माझा!

हा असा कसा दुष्टावा?
कोणत्या जन्हिंचा दावा?
का उगिच गळा कापावा
पाहुनी गरिब कोणाला, राजहंस माझा निजला


कवी - गोविंदाग्रज[राम गणेश गडकरी]

एखाद्याचें नशीब

काही गोड फुलें सदा विहरती स्वगागनांच्या शिरीं,
काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरीं;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि तें,
एखादे फुटकें नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारितें ।

कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हैमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळ्या पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवीं यापरी
पाही कोण अशा हताश हृदया ? जो तो असे आपला,
देवा ! तूं तरि टाकिं अश्रु वरुनी, त्यासाठीं तो तापला !


कवी - गोविंदाग्रज

एका तळ्यात होती...

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक

कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक

एके दिनी परंतू पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक

कवी - ग. दि. माडगूळकर