समिधाच सख्या या...

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता,
खळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे
परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता ||

खडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली,
नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परि अंकुरती वेली ||

नव पर्णाच्या या विरल माण्डवाखाली,
होईल सावली कुणा, कुणास कहाली,
तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,
"या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली !"

समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा ||


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

नदी

नदीबाई माय माझी डोंगरात घर
लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर

नदीबाई आई माझी निळे निळे पाणी
मंद लहरीत गाते ममतेची गाणी

नदीमाय जळ सा-‍या तान्हेल्यांना देई
कोणी असो कसा असो भेदभाव नाही

शेतमळे मायेमुळे येती बहरास
थाळीमध्ये माझ्या भाजी-भाकरीचा घास

श्रावणात आषाढात येतो तिला पूर
पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर

माय सांगे, थांबू नका पुढे पुढे चला
थांबत्याला पराजय चालत्याला जय


कवी - कुसुमाग्रज

अहि नकुल

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फुत्कार
ये ज्वालामुखीला काय अचानक जाग !

कधी लवचिक पाते खड्‌गाचें लवलवते,
कधी वज्र धरेवर गगनातुनी कडकडते,
कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार,
प्रमदेचे मादक वस्त्र जणूं सळसळते.

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णावर सुमने मोडुनी माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.

चालला पुढे तो-काय ऐट ! आनंद !
अग्नीचा ओघळ ओहळतो जणुं मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तांत नाहली, शिरमुंडावळ भाली,
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर खाली.

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान् मल्हारांतिल तान
चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान !

हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल
अंगावर-कणापरी नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला ! आला देख, नकूल !

थबकलाच जागीं सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनी अन् आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाका,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

पडलीच उडी ! कि तडितेचा आघात
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प
फुंफाट करी अन् पिशापरी त्वेषांत !

रण काय भयानक-लोळे आग जळांत
आदळती, वळती, आवळती क्रोधांत,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनाशी झुंजे वादळवात !

क्षणि धुळीत गेली वहात ती विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूंतुनि उपसुनी काढुनी दात
वार्‍यापरी गेला नकुल वनांतुनी दूर।

संग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले कीटक भोती !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

जालियनवाला बाग

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे

मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
"प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !"

आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात

मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !

पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशील देवा, तूं अपुले खास;

असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

सागर

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे

मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो
त्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

दर्यावरची रंगीत मखमल उचलुन घेते कुणी
कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी

दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे


कवी - कुसुमाग्रज

सहानभूती

उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाट गर्दी

प्रभादिपांची फ़ुले अंतराळी
दौलतीची नित चालते दिवाळी

कोप-याशी गुणगुणत अन् अभंग
उभा केव्हाचा एक तो अपंग

भोवतीचा अंधार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला

जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसांचा त्यात ही उपास

नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?

कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला

तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दीना त्या उभारुनी ऊर

म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी

खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिनबंधू वाट

आणी धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

कषाय-पेय-पात्र-पतित मक्षिकेप्रत

(अर्थात - चहाच्या कपात पडलेल्या माशीस... )

अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके,
जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके!
असु-परीक्षित-हारक-तक्षिके,
'क्या हुवा अफसोस!' मक्षिके.

या प्रभातसमयास मंगल,
चमकती दंवमौक्तिक निर्मल,
गात पक्षिगण हा गगनी फिरे,
पण दशा तव काय अर-अरे!

ओसरीवरुनि या तव मैत्रिणी,
गात स्वैर फिरतात सुलक्षणी;
परि तुला न बघती मुळि ढुंकुनी,
'संकटी जगि कुणा न असे कुणी!'

मंडई नव्हति का तुज मोकळी,
की मिठाई 'मघुरा-भुवनांतली',
नव्हति का 'उपहार-गृहे' खुली,
म्हणुनि आलिस शहरातिल बोळ ते,
मनुजवस्तित आलीस का इथे!

करीत 'दत्तु-भट' काय तपासणी
म्हणुनि घाबरुनी आलीस तू झणी!
शर्कराकण येथिल सांडले
सेवुनी न तुज सौख्य जाहले?

की 'यमी' करिंचे गुळखोबरे,
शमवी भूक न काय तुझी बरे?
पेय बोलुनिचालुनि घातकी,
बुडविते बघ भारतियास की !

या अशा व्यसनात विलायती,
अडकता फळ दारुण शेवटी !
नर जसा बुडतो भवडोही
तेवि खालिवर जासि अयाई!

काडी वाचवि जरी बुडत्याला,
काडीचा न परि आश्रय गे तुला!
स्थिति तुझी करुणास्पद ही अशी.
बघु तरी उघड्या नयनी कशी?

अंगि तेवि भरले भयकापरे,
आणि त्यात निवला न चहा बरे!
हाय! सोडुनि जाशिल ना अम्हा,
छे, सले नुसती मनी कल्पना?

समिप पाउसकाळहि पातला,
आणि तू निघुनि जाशिच आजला!
अहह, आम्रफल-मोसम येईल,
अम्हि असू परि तू नसशील!

फेकु सालटि चोखुनि चोखुनि,
तुजविना पण जातिल वाळुनी
तुजविना कवि-मुखे दिसतील की,
भृंगहीन कमळांसम ती फिकी,

कौन्सिलात, सभासद आणी,
मारतील कवणा तुजवाचुनी?
राजकारण रोज नवे नवे,
राष्ट्रभक्त करण्यास तयार हे.

शिंकुनि अहह! देइल त्यापुढे,
त्या इशारत कोण तरी गडे?
यापरी नव-तरंग मनात
येउनी ह्रदय होय कंपित.

पेयपृष्ठि उठली इतुक्यात,
मंद-श्वास,-लहरीसह लाट!

फड फड फड पंखा हालवी ती तराया,
तडफड बहु केली जाहले कष्ट वाया,
मिटवुनि इवलेसे पाय, ती शांत झाली,
अहह, तडक आणि खालती खोल गेली!

टाकुनी लांब सुस्कार, उमाळा दाबुनी उरी,
चहा तो शांत चित्ताने प्राशिला वरचेवरी.


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें