डोळ्यातल्या डोहामध्ये

डोळ्यांतल्या डोहामध्ये
खोल खोल नको जाऊ;
मनांतल्या सावल्यांना
नको नको, सखे, पाहू;

जाणीवेच्या गाभा-यात
जाऊ नको एकटीने ;
गेलेल्यांना साधले का
व्यथेवीण मागे येणे ?

व्यथेच्या या पेल्यांतून
सत्याचे जे घेती घोट,
पूस त्यांना कसा कांपे
पिता पिता धीट ओठ !


कवी - विंदा करंदीकर

एवढे लक्षात ठेवा

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा ।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥

ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी ।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।

जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा ।
मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥

चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता ।
उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥

विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी ।
सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥

दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।
तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥

माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी ।
त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥


कवी - विंदा करंदीकर

मी

कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची;
कधी वाढता वाढता व्योम व्यापी
कधी धावतो विश्व चुंबावयाला
कधी आपणाला स्वहस्तेच शापी

कधी याचितो सत कधी स्वप्न याची
कधी धावतो काळ टाकुन मागे
कधी वर्षतो अमृताच्या सरी अन
कधी मृत्युच्यी भाबडी भीक मागे

कधी दैन्यवाणा, निराधर होई
कधी गुढ, गंभीर, आत्मप्रकाशी
कधी गर्जतो सागराच्या बळाने;
कधी कापतो बोलता आपणाशी!

कधी आपणा सर्व पिंडात शोधी;
कधी पाहतो आत्मरुपात सारे;
कधी मोजीतो आपणाला अनंते
अणुरुप होती जिथे सुर्य, तारे

टळेना अहंकार साध्या कृतीचा;
गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे;
कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे!
कधी सत्य ते वाटते सोंग साचे!

कधी संयमी, संशयात्मा, विरागी
कधी आततायी, कधी मत्तकामी
असा मी... तसा मी... कसा मी कळेना;
स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी!


कवी - विंदा करंदीकर

लागेल जन्मावें पुन्हा...

माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी.

तू झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी;
मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी.

तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे,
मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी.

होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे,
ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी.

म्हणतेस तू, "मज आवडे रांगडा सीधेपणा!"
विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरीं.

लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें;
हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी.


कवी - विंदा करंदीकर

चुकली दिशा तरीही

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे!

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे (न्या रे?)

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - जातक

माझ्या मना बन दगड

हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको, डोळे शिव!
नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो!

हा रस्ता अटळ आहे !
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य!
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद!

बन दगड आजपासून
काय अडेल तुझ्यावाचून
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे निःश्वास
मरणाऱ्याला देतील श्वास?
आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे तेवढे दुःखच फार
माझ्या मना कर विचार
कर विचार हास रगड
माझ्या मना बन दगड

हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज!
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - मृद्‌गंध

वेड्याचे प्रेमगीत

येणार तर आत्ताच ये;
येणार तर आत्ताच ये;
उद्या तुझी जरूर काय?
... आज आहे सूर्यग्रहण;
आज मला तुझा म्हण;
उद्या तुझी जरूर काय?
बेकारीच्या खुराकावर
तुझी प्रीती माजेल ना?
सूर्याच्या या तव्यावरती
चंद्राची भाकर भाजेल ना?
... भितेस काय खुळे पोरी;
पाच हात नवी दोरी
काळ्या बाजारात उधार मिळेल.

सात घटका सात पळे
हा मुहूर्त साधेल काय?
संस्कृतीचे घटिकापात्र
दर्यामधे बुडेल काय?
... उद्याच्या त्या अर्भकाला
आज तुझे रक्त पाज;
... भगवंताला सारी लाज.
येणार तर आत्ताच ये;
अंधाराच्या मांडीवरती
जगतील सात, मरतील सात;
आकाश आपल्या डोक्यावर
पुन:पुन्हा मारील हात.
... भरल्या दु:खात रडू नये;
येणार तर आत्ताच ये;
येणार तर आत्ताच ये;
उद्या तुझी जरूर काय?


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - जातक