पिलोक ( प्लेग )

पिलोक पिलोक
आल्या पिलोकाच्या गाठी
उजाडलं गांव
खयामयांमधीं भेटी

पिलोक पिलोक
जीव आला मेटाकुटी
भाईर झोंपड्या
गांवामधीं मसन्‌वटी

पिलोक पिलोक
कशाच्या रे भेठीगांठी !
घरोघरीं दूख
काखाजांगामधीं गांठी

पिलोक पिलोक
आतां नशीबांत ताटी
उचलला रोगी
आन् गांठली करंटी

कवयित्री – बहिणाबाई चौधरी

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
नशीबीं दगड गोटे
काट्याकुट्याचा धनी
पायाले लागे ठेंचा
आलं डोयाले पानी
वरून तापे ऊन
आंग झालं रे लाही
चालला आढवानी
फोड आली रे पायीं
जानच पडीन रे
तुले लोकाच्या साठीं

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
दिवस ढयला रे
पाय उचल झट
असो नसो रे तठी
तुझ्या लाभाची गोट
उतार चढनीच्या
दोन्हि सुखादुखांत
रमव तुझा जीव
धीर धर मनांत
उघडूं नको आतां
तुझ्या झांकल्या मुठी

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
‘माझेज भाऊबंद
धाईसनी येतीन!’
नको धरूं रे आशा
धर एव्हढं ध्यान
तुझ्या पायानें जानं
तुझा तुलेच जीव
लावीन पार आतां
तुझी तुलेच नाव
मतलबाचे धनी
सर्वी माया रे खोटी

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
वार्‍याचं वाहादन
आलं आलं रे मोठं
त्याच्यातं झुकीसनी
चुकुं नको रे वाट
दोन्ही बाजूनं दर्‍या
धर झुडूप हातीं
सोडूं नको रे धीर
येवो संकट किती
येऊं दे परचीती
काय तुझ्या ललाटीं

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

उपननी उपननी

उपननी उपननी
आतां घ्या रे पाट्या हातीं
राहा आतां उपन्याले
उभे तिव्हारीवरती

चाल ये रे ये रे वार्‍या,
ये रे मारोतीच्या बापा
नको देऊं रे गुंगारा
पुर्‍या झाल्या तुझ्या थापा

नही अझून चाहूल
नको पाडूं रे घोरांत
आज निंघाली कोनाची
वार्‍यावरती वरात ?

ये रे वार्‍या घोंघावत
ये रे खयाकडे आधीं
आज कुठें रे शिरला
वासराच्या कानामधी !

भिनभिन आला वारा
कोन कोनाशीं बोलली ?
मन माझं हारखलं
पानं झाडाची हाललीं !

वारा आलारे झन्नाट्या
झाडं झुडपं डोललीं
धरा मदनाच्या पाट्या
खाले पोखरी चालली

देवा, माझी उपननी
तुझ्या पायी इनवनी
दैवा, तुझी सोपवनी
माझ्या जीवाची कारोनी


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

पह्यला पाऊस

आला पह्यला पाऊस
शिपडली भुई सारी
धरत्रीचा परमय
माझं मन गेलं भरी

आला पाऊस पाऊस
आतां सरीवर सरी
शेतं शिवारं भिजले
नदी नाले गेले भरी

आला पाऊस पाऊस
आतां धूमधडाख्यानं
घरं लागले गयाले
खारी गेली वाहीसन

आला पाऊस पाऊस
आला लल्‌करी ठोकत
पोरं निंघाले भिजत
दारीं चिल्लाया मारत

आला पाऊस पाऊस
गडगडाट करत
धडधड करे छाती
पोरं दडाले घरांत
आतां उगूं दे रे शेतं

आला पाऊस पाऊस
वर्‍हे येऊं दे रे रोपं
आतां फिटली हाऊस
येतां पाऊस पाऊस

पावसाची लागे झडी
आतां खा रे वडे भजे
घरांमधी बसा दडी

देवा, पाऊस पाऊस
तुझ्या डोयांतले आंस
दैवा, तुझा रे हारास
जीवा, तुझी रे मिरास

कवयित्री – बहिणाबाई चौधरी

त्याचा पाऊस तिचा पाऊस

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.

पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.

पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात


कवी- सौमित्र

पाऊस

पावसाच्या धारा येती झरझरा
झांकळलें नभ, वाहे
सोंसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले
जळ

ढगावर वीज झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया
साज

झोंबे अंगा वारे काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली
पाखरें

हर्षलासे फार नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून
खार

पावसाच्या धारा डोईवरी मारा
झाडांचिया तळी गुरे शोधिती
निवारा

नदीलाही पूर लोटला अपार
फोफावत धांवे जणू नागीणच
थोर

झाडांची पालवी चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें
रंगदार छबी

थांबला पाऊस उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी
प्रकाश

किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें
वस्तुजात खुले

सुस्नात जाहली धरणी हांसली,
वरुणाच्या कृपावर्षावाने
सन्तोषली


कवियत्री - शांता. शेळके

पाऊस

गार वारा हा भरारा, नभं टिपूस टिपूस
रानी वनी, पानोपानी, मन पाऊस पाऊस

माती खाली खोल खोल, ओल मातीच्या मनास
मातीवर थरथरे, ओला सुवास सुवास

पावसाळी पायवाटा, जरा उदास उदास
दाही दिशांत पाखरे, जणू आभास आभास

रान मोकळे मोकळे, बघे भारुन नभास
त्याचा हिरवा हिरवा, आज प्रवास प्रवास


गीतकार : सौमित्र
गायक : सौमित्र
संगीतकार : मिलींद इंगळे
चित्रपट : गारवा