मारुतीची आरती

जयदेव जयदेव, जय हनुमंता
संकटकाळी तुम्हीच, हो त्राता
भक्तावर व्हावे, त्वा कृपावंता
मिटतील जगती साऱ्याच चिंता
जयदेव जयदेव जय हनुमंता

अंजनी माच्या , परमप्रिय सुता
श्री रामाच्या रे, लाडक्या दूता
तूच सर्वांचाच , असे विघ्नहर्ता
कृपा कर आम्हां त्वरित आता
जयदेव जयदेव , जय हनुमंता

शौऱ्याची तूच, साक्षात देवता
तूच धैऱ्याचा, असे रे जनिता
शरण मनोभावे, तुजला रे येता
देसी अभयदान, तूच सर्व भक्ता
जयदेव जयदेव, जय हनुमंता

सीता माईचा, संकटी तू त्राता
लंका दहनाचा ,तूच असे कर्ता
लंकेच्या नृपा, नमविले पुरता
धन्यता मिळते, वीर हनुमंता
जयदेव जयदेव , जय हनुमंता

सप्त चिरंजीवात, तुझे असे स्थान
असे तुजला रे, मृत्युलोकी मान
नमती तुजला मनोमनी, सर्व जन
मागती तुजला, शक्तीचे वरदान
जयदेव जयदेव, जय हनुमंता

पांडुरंगाची आरती

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥

आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥

पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥

विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥

दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

मारुतीची आरती

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥
गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं ।
सुर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १॥

जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचेनि प्रसादे न भीं कृत्तांता ॥ धृ ॥

दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।
थरथरला धरणीधर मानीला खेद ॥
कडकडिले पर्वत उडुगण उच्छेद ।
रामी रामदासा शक्तीचा बोध ॥ जय. देव. ॥ २॥

दशावताराची आरती

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥

अंवऋषी कारणे गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी ।
मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ १ ॥

रसा तळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकारासाठी देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेता वराहरुप होसी ।
प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥

पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ॥
सर्व समर्पण केले म्हणउनि प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ॥ ३ ॥

सगस्त्रार्जुन मातला जमंदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ॥
नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ ४ ॥

मातला रावण सर्वा उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरलें सीतेला ॥
पितृवचना लागीं रामें वनवास केला ।
मिळोनी वानर सहित राजाराम प्रगटला ॥ ५ ॥

देवकी वसुदेव बंदी मोचन त्वां केलें ।
नंदाघरि जाऊन निजसुख गोकुळा दिधले ॥
गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ ६ ॥

बौद्ध कलंकी कवियुगी झाला अधर्म हा अवघा ।
सांडुनि नित्यधर्म सोडुनि नंदाची सेवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवि द्याचि निजसुखा नंदसेवा ॥ ७ ॥

गणपति आरती

स्थापित प्रथमारंभी तुज मंगलमूर्ती।
विघ्ने वारुनी करिसी दीनेच्छा पुरती।
ब्रह्मा विष्णु महेश तीघे स्तुती करिती।
सुरवर मुनिवर गाती तुझिया गुणकीर्ती॥१॥

जय देव जय देव जय गणराजा।
आरती ओवाळू तुजला महाराजा॥धृ.॥

एकदंता स्वामी हे वक्रतुंडा।
सर्वाआधी तुझा फ़डकतसे झेंडा।
लप लप लप लप लप लप हालति गज शुंडा।
गप गप मोद्क भक्षिसी घेऊनि करि उंडा॥जय.॥२॥

शेंदूर अंगी चर्चित शोभत वेदभुजा।
कर्णी कुंडल झळ्के दिनमनी उदय तुझा।
परशांकुश करि तळपे मूषक वाहन दुजा।
नाभिकमलावरती खेळत फ़णिराजा॥३॥

भाळी केशरिगंधावर कस्तुरी टीळा।
हीरेजडित कंठी मुक्ताफ़ळ माळा॥
माणिकदास शरण तुज पार्वतिबाळा।
प्रेमे आरती ओवाळिन वेळोवेळा॥जय.॥४॥

गणपति आरती

आरती करु तुज मोरया।
मंगळगुणानिधी राजया॥ आरती॥धृ.॥

सिद्धीबुद्धीपती संकटनाशा।
विघ्ननिवारण तूं जगदीशा॥ आरती करुं.॥१॥

धुंडीविनायक तू गजतुंडा।
सिंदूरचर्चित विलसित शुंडा॥ आरती करुं.॥२॥

गोसावीनंदन तन्मय झाला।
देवा देखोनिया तुझ शरण आला॥
आरती करुं तुज मोरया.॥३॥