ओळख


तुला का वाटते गाफील आहे मी
तुझ्या खेळामधे सामील आहे मी

हवासा वाटतो पण काय कामाचा
जुन्या पत्रातला तपशील आहे मी

तुझी उजळीत स्वप्ने रात्रभर जळतो
तुझ्या दारातला कंदील आहे मी

कशाला वास्तवाशी रोजचा झगडा
चुकीचे काय जर स्वप्नील आहे मी

कधी जमलेच तर घे गुणगुणून मजला
तुझ्या ओठातली मैफील आहे मी

जगाला काय ओळख वेगळी सांगू
खरे तर तूच माझ्यातील आहे मी

- अभिजीत दाते

घंटा

एखादी गोष्ट कधी तरी खूप आवडते आणि कधी एकदम नकोशी होते. प्रत्येकाच्याच आठवणीत एक महत्त्वाचं स्थान असलेली ही वस्तू आहे- ती म्हणजे घंटा! आमच्या शाळेत एक पितळेचा गोल तुकडा तारेने टांगलेला असायचा. शाळा सुरु व्हायची वेळ झाली, की महादेव शिपाई त्या पितळेच्या गोल तुकड्यावर अडकवून ठेवलेली हातोडी सोडवून घंटा वाजवायचा. शाळा सुरु होतांना वाजणारी घंटा अंगावर काटा उभा करायची, कारण जर उशीर झाला तर हेडमास्तर हातात रुळ घेऊन समोरच्या दरवाजात उभे असायचे. उशीर झालेल्या मुलांना हातावर फटके द्यायला! हीच घंटा जेंव्हा शाळा सुटल्यावर वाजायची तेंव्हा मात्र हिचा आवाज खूप कर्ण मधुर वाटायचा.एकाच घंटेच्या आवाजाचे किती प्रकारचे अर्थ निघू शकतात नाही का? शाळेत ८ वी मधे असतांना एक बदली शिक्षिका आल्या होत्या , त्यांचा पिरियड संपण्याची घंटा वाजू नये असे वाटायचे. :) आणि नावडत्या शिक्षकाचा पिरियड सुरु झाला, की कधी पिरियड संपल्याची घंटा वाजते इकडे लक्ष असायचं.

या घंटे मुळे आयुष्यातला खूप मजेचा वेळ ( म्हणजे झोपेचा) :) वाया गेला आहे. शाळेत असतांना उद्यापासून रोज सकाळी अभ्यासाला उठायचं म्हणून आई अलार्म क्लॉक ( जे मेकॅनिकल चावी चे असायचे त्याला) अलार्मची चावी फिरवून अलार्म सेट करून ठेवायची. सकाळी चार वाजता तो अलार्मच्या घंटीचा आवाज ऐकून घरातले सगळे जरी खडबडून उठले तरीही मला मात्र जाग यायची नाही, आणि मग पाठी वर चार धपाटे खाऊनच उठणे व्हायचे. समजा एखाद्या वेळेस जाग आली तरी पण डोक्याखालची उशी कनावर दाबून झोपायचा प्रयत्न करायचो.. तेंव्हापासून अलार्म क्लॉक मला न आवडणारी वस्तू म्हणून जी डोक्यात बसली, ती आजपर्यंत! अजूनही सकाळची फ्लाईट असली की ह्या अलार्म क्लॉकची आवाज ऐकू आला की नको ते गावाला जाणं असं वाटायला लागतं. हल्ली मोबाइल मधे किंवा फोन वर अलार्मची सोय आल्या पासून अलार्म क्लॉक ही वस्तू इतिहास जमा झालेली आहे- पण माझ्या आयुष्यातली एक खूप महत्त्वाची वस्तू म्हणून लक्षात राहील माझ्या.

लहानपणी मला नेहेमी फायरब्रिगेड चा ट्रक ड्रायव्हर व्हायची इच्छा होती. फायरब्रिगेड च्या ट्रक वर पण अगदी मागच्या भागात एक मोठी चकचकीत पितळी घंटा असायची. तिच्या लंबकाला बांधलेली एक दोरी ड्रायव्हरच्या मागे उघड्या जागेवर उभ्या असलेल्या फायर मॅन च्या हाती असायची. कुठे आग लागली कंडक्टर प्रमाणे दोरी ओढून घंटा वाजवत ,तो फायर ट्रक जायचा. ते पाहिलं की ही बेल वाजवायला मिळावे म्हणून तरी आपण फायरब्रिगेड मधे मोठं झाल्यावर काम करायलाच हवं, असं वाटायचं. हल्ली ती घंटा जाऊन तिच्या जागी सायरन आलाय, पण त्या घंटेची मजा सायरन मधे नाही.

उन्हाळ्यात अमरावतीला रात्री घरासमोरून एक कुल्फीवाला जायचा. ही कुल्फी म्हणजे माझा जीव की प्राण! खूप आवडायची मला ती. एका हातगाडीवर मटका कुल्फी चा माठ आणि वर बांधलेली एक घंटा असायची. त्या घंटेच्या आवाजाची तर आम्ही दररोज रात्री वाट पहायचो. दोन कुल्फी वाले होते, एक भोंगा हॉर्न वाजवायचा, आणि दुसरा हा घंटी वाला. हा घंटीवाला माझा फेवरेट. हा घंटीचा आवाज ऐकला की मी पंचवीस पैसे दे म्हणून घरी मागे लागायचो, आणि एकदा पैसे हातात पडले की दुसऱ्याच क्षणी त्या कुल्फीवाल्याकडे धाव घ्यायचॊ.

नाटक सुरु होण्यापूर्वी, मोगऱ्याच्या गजऱ्यांचा आणि पर्फ्युम्स च्या सुवासाच्या पार्श्वभूमीवर स्टेज वरून तीन वेळा हातात पितळी घंटा घेऊन एक माणूस वाजवत जायचा. तिथे त्या सुगंधी पार्श्वभूमीवर तिचा आवाज पण खूप छान वाटायचा. हल्ली मात्र त्या घंटेची जागा इलेक्ट्रीक बेल ने घेतलेली आहे. काही गोष्टी कधी बदलू नये असे मला वाटते, त्यातलीच ही एक.

पूर्वी रेल्वे स्टेशन वर गाडी येण्यापूर्वी सूचना देण्यासाठी घंटा वाजवली जायची , ती घंटा ऐकली की सगळे सरसावून नीट सामान सेट करून गाडी मधे चढण्यास तयार रहायचे, ती पण हल्ली बंद केल्या गेली आहे, आणि त्या ऐवजी अनाउन्समेंट केली जाते, पण घंटेची आठवण काही पुसल्या जात नाही. कदाचित पुढच्या पिढीला अशी काही पद्धत होती हे माहिती पण रहाणार नाही.

जेंव्हा मला माझी पहिली सायकल मिळाली, ( ७वी मधे ) तेंव्हा सायकल घेतांना त्याला कुठली घंटी बसवायची ह्याचंच स्वप्न रंजन मी करत होतो. त्या काळी दोन प्रकारच्या घंट्या होत्या, एक म्हणजे फक्त एकदाच टिण्ण वाजणारी, आणि दुसरी म्हणजे तिला आत स्प्रिंग असायचं आणि स्प्रिंग अनवाईंड होऊन घड्याळाच्या अलार्म सारखा आवाज यायचा ती . मला दुसरी घंटी लावायची होती सायकलला. सायकल घेतल्यावर सायकल घेण्याच्या आनंदा पेक्षा घंटी वाजवायला मिळणार , अगदी हवी तेवढी! हा आनंद काही वेगळाच होता.

मी लहान असतांना माझ्या आजोळी जायचो, तेंव्हा घरी असलेल्या गाई म्हशी चरायला नेण्यासाठी सकाळी गुराखी यायचा, तो जेंव्हा सगळ्या जनावरांना घेऊन जायचा तेंव्हा प्रत्येक गाईच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज वेगवेगळा असायचा. त्या घंटे मधे लंबक जो असतो, तो लाकडी असायचा आणि म्हणूनच त्या मुळे होणारा घंटा नाद पण अगदी वेगळाच असायचा. शाहरुख च्या एका सिनेमात जी घंटा तो आणतो, त्याच प्रकारची घंटा असायची ती. गाईंच्या गळ्यातल्या घंटांचा लयबद्ध आवाज हा संध्याकाळी गाई घरी आल्या की सकाळ पेक्षा नक्कीच वेगळा वाटायचा. एकच घंटा पण आवाजात इतका फरक कसा काय वाटू शकतो?

नाशिकच्या नारोशंकर देवळात १८ व्या शतकाच्या मध्यंतरी बसवलेली एक घंटा आहे, ती घंटा गोदावरीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर वाढली, की आपोआप वाजेल अशी व्यवस्था केल्या गेलेली होती. धोक्याची घंटा म्हणूनच हिचा उपयोग केल्या जायचा.

घंटेचं आयुष्यातलं स्थान खूप मोठं आहे . घंटा म्हणजे केवळ धोक्याच्या वेळेस वाजवली जाते असे नाही, तर आनंदाच्या क्षणी पण तेवढ्याच उत्साहाने वाजवली जाते. दूर कशाला, आपल्या देवाला पण घंटा वाजवूनच उठवल्यावर मग पूजा करता येते, किंबहुना घंटे शिवाय पूजा पुर्ण होतच नाही. म्हणून घंटेचं महत्त्व आयुष्यभर रहातं. कितीही विसरायचं म्हटलं, तरी विसरली न जाणारी ती घंटा..

जाता जाता, कालच एक मित्राचा फोन आला होता, म्हणतो, संध्याकाळी भेटतो का? कुठेतरी ’बसू’ या थोडा वेळ. ” मी त्याला विचारले की ” तुझी बायको माहेरी गेली का? तर म्हणतो, ” घंटा , जाते ती माहेरी”… मी जोरात हसलो, आणि ठरवलं की एक पोस्ट नक्की होऊ शकतं या घंटा विषयावर. त्याच्या त्या एका शब्दात सगळं जे काही मनात होतं ते बाहेर पडलं.जरी जूनी पितळी घंटा संपली विस्मृती मधे गेली , तरी ही वाक्प्रचारांसाठी वापरली जाणारी ” घंटा ” मात्र कधीच विसरली जाणार नाही हे बाकी नक्की!

माझ्या गरीबाच्या झोपडीत

माझ्या गरीबाच्या झोपडीत नसेल ऐश्वर्य, सोन,चांदी
आहे प्रेमाची चटणी भाकर, आणि ममतेची कढी,.....
माझ्या गरीबाच्या झोपडीत नसेल शावर, आणि एसी ,
आहे ते शांतीच दालन, जिथे मिळेल शांत झोप,
माझ्या गरीबाच्या झोपडीत नसेल भरझारी कपडे, अंनि पैठणी
आहे मायेची गोधडी, तिला प्रेमाची झालर,......
ये न माझ्या झोपडीत तुझ्या नाजूक पावलांनी, नको आणूस सोनं चांदी,
भर घाल प्रेमाची नी ममतेची , ....
तेव्हा माझं मरण आल दारात, त्याला मी थोपविण
थांब माझी सखी आली तिला नको रडवूस .....
ती गेल्यावर , तिच्या आठवणीत
आनदाने तुझ्याबरोबर येईन......



जव निधर्म होता कौर्य
गाजवी धर्म, जागती शौर्य
तख्त झुकावितो, औरंग्यास रडवितो
असा मर्द शिवबाचा
"शंभूछावा"...!!

शंभू समशेरीचे पुण्य
जाहली स्वराज्य दौलत
बेशक, राणमर्द मराठा
असा मर्द शिवबाचा
"शंभूछावा"...!!

काळ समोर उभा
तरीही
ललकारीतो नभा
धर्मवीर हा मराठा
शेर शिवबाचा
"शंभूछावा"...!!

काय बाई सांगू, कसं गं सांगू ?
मलाच माझी वाटे लाज
काही तरी होऊन गेलंय आज

उगीच फुलूनी आलं फूल
उगीच जीवाला पडली भूल
त्या रंगाचा, त्या गंधाचा
अंगावर मी ल्याले साज


जरी लाजरी झाले धीट
बघत राहीले त्याला नीट
कुळवंताची पोर कशी मी
विसरुन गेले रितरीवाज

सहज बोलले हसले मी
मलाच हरवून बसले मी
एक अनावर जडली बाधा
नाही चालला काही इलाज

मैत्री करत असाल तर....


मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा

मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा

मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात अस एक मंदीर करा

मैत्री करत असाल तर
निसर्गापेक्षा ही सुंदर करा
शेवट पर्यंत निभावण्या करता
मरण सुद्धा जवळ करा

वारा गाई गाणे

वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे
धुंद आज वेली, धुंद फुल पाने

रंग हे नवे, गंध हे नवे
स्वप्न लोचनी वाटते हवे
हा निसर्ग भासे, विश्वरुप लेणे

या निळया नभी, मेघ सावळे
कल्पनेस मी पंख लाविले
झेलते पिसावरी, हे सतेज सोने

आज वेड हे कुणी लाविले ?
अंतराळी का पडती पाऊले ?
कशी सोडवू मी सुखाचे उखाणे ?

गीतकार :जगदीश खेबुडकर
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट :संसार