निरोप

बाळ, चाललासे रणा
घरा बांधिते तोरण,
पंचप्राणांच्या ज्योतींनीं
तुज करिते औक्षण.

याच विक्रमी बाहुंनी
स्वतंत्रता राखायची,
खांद्यावरी या विसावे
शांती उद्याच्या जगाची.

म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा,
मीही महाराष्ट् कन्या
धर्मं जाणते विरांचा.

नाही एकही हुंदका
मुखावाटे काढणार,
मीच लावुनी ठेविली
तुझ्या तलवारीस धार.

अशुभाची सावलीही
नाही पडणार येथे
अरे मीही सांगते ना
जीजा लक्ष्मीशी नाते.

तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ती देईल भवानी,
शिवरायांचे स्वरुप
आठवावे रणांगणी.

घन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन.


कवियत्री - पद्मा गोळे

मी एक पक्षिण

मी एक पक्षिण आकाशवेडी
दुज्याचे मला भान नाही मुळी
डोळ्यात माझ्या असे एक आकाश
श्वासात आकाश प्राणांतळी

स्वप्नांत माझ्या उषा तेवते अन
निशा गात हाकारिते तेथुनी
क्षणार्धी सुटे पाय़ नीडांतुनी अन
विजा खेळती मत्त पंखांतुनी.

गुजे आरुणि जाणुनी त्या ऊषेशी
जुळे का पहावा स्वरांशी स्वर
बघावी झणत्कारीते काय विणा
शिवस्पर्श होताच तो सुंदर

कीती उंच जावे कीती सूर गावे
घुसावे ढगामाजी बाणापरी
ढगांचे अबोली बुरे केशरी रंग
माखुन घ्यावेत अंगावरी

कीती उंच जाईन पोहचेन किंवा
संपेल हे आयु अर्ध्यावरी
आभाळ यात्रीस ना खेद त्याचा
निळी जाहली ती सबाह्यांतरी



कवियत्री - पद्मा गोळे

तक्ता

अननस, आई, इजार आणि ईडलिंबू
उखळ, ऊस आणि एडका
सगळे आपापले चौकोन संभाळून बसलेत

ऎरण, ओणवा, औषध आणि आंबा
कप, खटारा, गणपती आणि घर
सगळ्यांच्या स्वत:च्या मालकीच्या जागा आहेत

चमचा, छत्री, जहाज आणि झबलं
टरबूज, ठसा, डबा, ढग आणि बाण
सगळे आपापल्या जागी ठाण मांडून बसलेत

तलवार, थडगं, दौत, धनुष्य आणि नळ
पतंग, फणस, बदक, भटजी आणि मका
यांचा एकमेकाला उपद्रव होण्याची शक्यता नाही

यज्ञ , रथ, लसूण, वहन आणि शहामृग
षटकोन, ससा, हरिण, कमळ आणि क्षत्रिय
या सगळयांनाच अढळपद मिळालंय

आई बाळाला उखळात घालणार नाही
भटजी बदकाला लसणाची फोडणी देणार नाही
टरबुजाला धडकून जहाज दुभंगणार नाही

शहामृग जोपर्यंत झबलं खात नाही
तोपर्यंत क्षत्रिय पण गणपतीच्या पोटात बाण मारणार नाही
आणि एडक्यानं ओणव्याला टक्कर दिली नाही
तर ओणव्याला थडग्यावर कप फोडायची काय गरजाय


कवी - अरुण कोलटकर

गरमा गरम

मक्या : गरम काय आहे ?

वेटर: चाउमीन.

मक्या : आणखी गरम?

वेटर: सूप.

मक्या: आणखी गरम?

वेटर: गरम पानी.

मक्या : आणखी गरम?

वेटर: आगीचा गोला आहे साल्या.

मक्या : घेवुन ये रताळ्या , बीड़ी पेटवाय्ची आहे .

आईपणाची भीती

आजच्या इतकी आईपणाची भीती कधीच वाटली नव्हती
अगतिकतेची असली खंत मनात कधीच दाटली नव्हती.
विचारलेस आज मला"आई कोणती वाट धरू?"
गोळा झाले कंठी प्राण आणि डोळे लागले झरू.
कोणती दिशा दाखवू मी तुला? पूर्व? पश्चिम्? दक्षिण? उत्तर?
माझ्यासारख्याच भीतीने या चारी दिशा झाल्या फ़त्तर.

कोठे ज्ञान, यश, सुख? काय त्यांच्या खाणाखुणा?
या-त्या रुपात दिसतो सैतानच वावरताना.
जळी, स्थळी, आकाशीही अणूबॉम्ब झाकला आहे
प्रत्येक रस्ता माणसाच्या रक्ताने रे माखला आहे.
आज आईच्या कुशीत सुद्धा उरला नाही बाळ निवारा
द्रौणीच्या अस्त्रासारखा हिरोशिमाचा बाधेल वारा.

कोठेतरी गेलेच पाहिजे गतीचीही आहेच सक्ती
जायचे कसे त्याची मात्र कुणीच सांगत नाही युक्ती.
खचू नको, शोध बाळा तुझा तूच ज्ञानमार्ग
कोणतीही दिशा घे पण माणुसकीला जाग.
धीर धर, उचल पाय, आता मात्र कर घाई
आणखी एक लक्षात ठेव प्रत्येकालाच असते आई.



कवियत्री - पद्मा गोळे

कुणी जाल का

कुणी जाल का सांगाल का,
सुचवाल का त्या कोकिळा
रात्री तरी गाऊ नको
खुलवू नको अपुला गळा

आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
हार पूर्वीचा दिला तो श्वास साहून वाळला
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळीला.

सांभाळूनी माझ्या जीवाला मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली हलकी निजेची पाऊले
सांगाल का त्या कोकिळा ती झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली.


कवी     - अनिल
संगीत  - यशवंत देव
स्वर    - डॉ. वसंतराव देशपांडे

~ हा नशेचा 'फास' आहे ~

सांजवेळी सोबतीला 'जी' मिळे 'ती' खास आहे
ब्रांड सारे सोड वेड्या लागलेली प्यास आहे !

सांज होता पाय माझे ओढताती 'त्या' दिशेने
काय सांगू काय होते सोडवेना 'त्रास' आहे.

सांजवेळीची नशा रे रात होता पेट घेते
जीव लागे टांगणीला, तीच माझा श्वास आहे

खोल आता बाटली ती, 'वाट' का रे लावतो तू ?
मी अताशा ढोसण्याचा घेतलेला ध्यास आहे !

काय झाले घाबराया, घे सुखाचा घोट आता
बायको नाहीच लेका 'जे' दिसे तो भास आहे !

सांज झाली, रात झाली, चेतल्यारे भावना या
ती रिकामी, मी रिकामा, हा नशेचा 'फास' आहे


कवी - रमेश ठोंबरे