देवा करी गा निःसंतान

ऐकावे विठ्ठल धुरे । विनंती माझी हो सत्वरें ॥ १ ॥
करी संसाराची बोहरी । इतुकें मागतों श्रीहरी ॥ २ ॥
कष्ट करितां जन्म गेला । तुझा विसर पडला ॥ ३ ॥
माळी सावता मागे संतान । देवा करी गा निःसंतान ॥ ४ ॥


रचना - संत सावता माळी 

घनु वाजे घुणघुणा

घनु वाजे घुणघुणा ।    वारा वाजे रुणझुणा ।
भवतारकु हा कान्हा ।    वेगीं भेटवा का ॥१॥

चांदु वो चांदणे ।    चांपेवो चंदने ।
देवकीनंदने ।    वीण नावडे वो ॥२॥

चंदनाची चोळी ।    माझे सर्व अंग पोळी ।
कान्हो वनमाळी ।    वेगीं भेटवा कां ॥३॥

सुमनाची सेज ।    सितळ वो निकी ।
पोळे आगीसारिखी ।    वेगीं विझवा कां ॥४॥

तुम्ही गातसां सुस्वरे ।    ऐकोनि द्या उत्‍तरे ।
कोकिळें वर्जावें ।    तुम्हीं बाईयांनो ॥५॥

दर्पणी पाहतां ।    रूप न दिसे आपुलें ।
बाप रखुमादेवीवरें ।    विठ्ठलें मज ऐसें केलें ॥६॥


रचना    -    संत ज्ञानेश्वर
संगीत   -    पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर     -    लता मंगेशकर
राग      -    बागेश्री

विश्वाचे आर्त


विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले
अवघेची झाले देह ब्रह्म ।।१।।
आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले
नवल देखिले नभाकार गे माये ।।२।।
बापरखुमादेविवरु सहज निटू झाला
ह्रदयी न दाविला ब्रह्माकारे ।।३।।

रचना - संत  ज्ञानेश्वर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर

मुंगी उडाली आकाशीं

मुंगी उडाली आकाशीं ।
तिणें गिळीलें सूर्याशीं ॥१॥

थोर नवलाव जांला ।
वांझे पुत्र प्रसवला ॥२॥

विंचु पाताळाशी जाय ।
शेष माथां वंदी पाय ॥३॥

माशी व्याली घार झाली ।
देखोनी मुक्ताई हांसली ॥४॥


रचना    -     संत मुक्ताई
संगीत   -     सी. रामचंद्र
स्वर      -     आशा भोसले
चित्रपट -    श्री संत निवृत्ति-ज्ञानदेव (१९६०)


ताटी उघडा ज्ञानेश्वरा

योगी पावन मनाचा ।
साही अपराध जनाचा ॥१॥

विश्व रागे झाले वन्ही ।
संते सुखे व्हावे पाणी ॥२॥

शब्द शस्‍त्रे झाले क्लेश ।
संती मानावा उपदेश ॥३॥

विश्वपट ब्रम्ह, दोरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥


रचना     -     संत मुक्ताई
संगीत    -     वसंत देसाई
स्वर      -     प्रसाद सावकार
नाटक   -    गीता गाती ज्ञानेश्वर

निर्गुणाचे भेटी आलो

निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे ।
तंव झालों प्रसंगी गुणातीत ॥१॥

मज रूप नाहीं नांव सांगू काई ।
झाला बाई काई बोलूं नये ॥२॥

बोलतां आपली जिव्हा पैं खादली ।
खेचरी लागली पाहतां पाहतां ॥३॥

म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी ।
सुखासुखीं मिठी पडली कैसी ॥४॥


रचना    -     संत गोरा कुंभार
संगीत   -     यशवंत देव
स्वर     -     रामदास कामत
राग      -    शुद्ध सारंग


निर्गुणाचा संग धरिला

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी ।
तेणें केलें देशोधडी आपणियाशी ॥१॥

अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें ।
एकलें सांडिलें निरंजनीं, मायबापा ॥२॥

एकत्व पाहतां अवघें लटिकें ।
जें पाहें तितुकें रूप तुझें, मायबापा ॥३॥

म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा
तुम्हां आम्हां ठावा कैसे काय, मायबापा ॥४॥


रचना     -     संत गोरा कुंभार
संगीत    -     पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर      -     फैयाज
नाटक   -    गोरा कुंभार (१९७८)
राग       -    धानी