बगळ्यांची माळ

बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत
भेट आपुली स्मरशी काय तूं मनात ॥धृ.॥

छेडिति पानांत बीन थेंब पावसाचे,
ओल्या रानांत खुले उन अभ्रकाचें,
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरांत
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥१॥

त्या गांठी, त्या गोष्टी नारळिच्या खाली,
पौर्णिमाच तव नयनीं भर दिवसा झालीं,
रिमझिमतें अमृत ते कुठुनि अंतरांत
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥२॥

हातांसह सोन्याची सांज गुंफतांना,
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजतांना,
कमळापरि मिटति दिवस उमलुनी तळ्यांत,
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥३॥

तूं गेलिस तोडुनि ती माळ, सर्व धागे,
फडफडणें पंखांचें शुभ्र उरें मागें,
सलते ती तडफड का कधिं तुझ्या उरांत
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरांत ॥४॥


कवी - वा. रा. कांत

मुंबईतला श्रावण


झोडी पावसाच्या येती
झोत पाण्याचे उडती
मोटर-ट्रक जाता जवळून
तुंबलेल्या पाण्यातून

चिंब भिजून कपडे
मन वैतागते
ओल्या आगीत मनाच्या
कुणी पेट्रोल फेकते

मग येऊन घरी
कपडे बदलणे
ते काम संपवून
पुढच्या कामास लागणे!

देणे

सरी श्रावणाच्या येती
शेला पाण्याचा उडतो
पंखा उन्हाचा मधून
थोडा थोडा उमलतो

चिंब भिजून कर्दळ
लाल फुलांनी पेटते
ओल्या आगीत फुलांच्या
शीळ साळुंकी पेरते

मग कलत्या उन्हात
होते आभाळाचे गाणे
जेथे संपून उरते
उभ्या जन्माचे या देणे


कवी - वा.रा.कांत

ज्वाला बने ज्योती

२६/११ नंतर पेटलेली
ती आग,आग राहिली नाही.
तेंव्हा जी आली होती
ती जाग,जाग राहिली नाही.

हा महिमा काळाचा की,
आम्हीच विसराळू आहोत?
आम्हांस ना देणे-घेणे कशाचे
आम्ही फक्त दिवसपाळू आहोत?

त्या लवलवत्या ज्वालांच्या
पुन्हा ज्योती झाल्या आहेत.
नका करू कुणी खुलासे,
सार्‍या गोष्टी ध्यानी आल्या आहेत.

झटका भोवतालची राख
आतले निखारे धगधगु द्या !
दुश्मनांची हिंमत होईल कशी?
त्यांना हे निखारे बघू द्या !!


कवी - सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

श्री सूर्याष्टक.

" जपाकुसुम संकाशम काश्यपेयं महद्युतीम
तमोरीम सर्व पापघ्नम प्रणतोस्मी दिवाकरम. "

श्री गणेशाय नम : सांब उवाच||

आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर
दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमो s स्तुते||१||

सप्ताश्वरथमारुढं प्रचंड कश्यपात्मजम्|
श्वेतपद्मधर तं सूर्य प्रणमाम्यहम||२||

लोहितं रथमारुढं सर्वलोकपितामहम
महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम||३||

त्रैगुण्यंच महाशूरं ब्रम्हाविष्णुमहेश्वरम्|
महापापहरं देव तं सूर्य प्रणमाम्यहम||४||

बृहितं तेज : पुंजंच वायुआकाशमेवच्|
प्रभुचंसर्वलोकांनां तं सूर्य प्रणमाम्यहम||५||

बंधुकपुष्पसंकाशं हारकुण्डलभूषितम्|
एकचक्रधरं देवं तं सूर्य प्रणमामह्यम||६||

तं सूर्य जगद्कर्तारंमहातेजप्रदिपनं|
महापापहरं देवं तं सूर्य प्रणमाम्यहम्||७||

तं सूर्य जगतानाथं ज्ञानविज्ञानमोक्षदम्|
महापापहरं देव तं सूर्य प्रणमाम्यहम्||८||




फ़लश्रुती :-
सूर्याष्टकं पठेन्नित्यं ग्रहपिडाप्रनाशनम्|
अपुत्रो लभते पुत्रं दरिद्रो धनवान्भवेत्||९||

अमिषं मधुपानंच य : करोती रवेर्दिने|
सप्तजन्म भवेद्रोगी प्रतिजन्मदरिद्रता||१०||

स्त्रीतैलमधुमांसानि य : त्यजेत रवेर्दिने|
न व्याधिशोकदारिद्र्यं सूर्यलोकं स गच्छती||११||

हायकू

इतक्या वेगाने गाडी पुढं गेली
रस्त्यावर उमललेली रानफुलं
डोळे भरून पहातही नाही आली

 कवयित्री - शिरीष पै

हायकू

हायकू हा एक जपानी काव्य-प्रकार आहे... ५ ते ७ शब्दांच्या ३ ओळी.... पहिल्या व तिसऱ्या ओळीत किंवा दुसऱ्या व तिसऱ्या ओळीत यमक जुळते.... आणि यात निसर्गातील एखादा प्रसंग प्रतीत केलेला असतो... हा झाला प्रार्थमिक आराखडा.... खरा हायकू कसा असतो/असावा हे शिरीष पै नी त्यांच्या 'मी माझे मला' ह्या पुस्तकात लिहिले आहे...

    निसर्गात सारखं काहीतरी घडत असतं. जसं आपल्या मनात एकसारखं काहीतरी घडत असतं. पण निसर्गातली एखादीच घटना मनातल्या विचारांचा प्रवाह क्षणार्धात थांबवते. विचार थांबतात तेव्हा रिकाम्या पडलेल्या मनाच्या पोकळीत ते पाहिलेलं दृश्य येऊन बसते. मनात कुठं तरी, काहीतरी, केव्हाचं तरी किंवा आताच तरी जाग होत. मनात स्थिर झालेलं ते चित्र शब्द शोधू लागतं. शब्दमय होऊ पहात. ही सगळी ह्या मनाची क्रीडा आहे. एक नेमकं हायकू- दृश्य टिपणं, त्यात स्वतःला बेमालूम मिसळून टाकणं, त्यात स्वतःला नष्ट करून टाकणं आणि मग शब्दातून केवळ दृश्य होऊन उरणं. मन थांबत, संपतं, भूतकाळ-भविष्यकाळ दूर सारून वर्तमान होतं, तेव्हाच हायकू निर्माण होतो....
    बघताना मी भूतकाळात नाही, भाविशाकालात नाही. मी आहे आताच्या क्षणात. हे माझं आता असणं आणि फक्त असणं- हे जणू साऱ्या बंधनातून मुक्त होणं आहे. ह्या आता असण्यातच 'हायकू' पण आहे. हायकू लिहितेय तेव्हा मी हे आता असणंच शब्दातून पकडून ठेवतेय. मग नंतर कुणी तरी जेव्हा तो हायकू वाचेल तो ह्या आताच असेल.....


हायकू वाचकाला आवडतात ते त्यांच्या साध्या सोप्या मांडणीमुळे आणि तरीही अतिशय गहिरा, गंभीर विचार देण्याच्या त्यांच्या ताकदीमुळे....