रात्र एकोणीसावी : पुनर्जन्म

                            "माझे वय त्या वेळेस अकरा वर्षांचे होते. मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते. माझा मोठा भाऊ तेथेच शिकावयास होता. परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही, त्यांच्याकडून मी दोन-तीन वेळा पळून गेलो. नाना खोट्या चहाड्या मी तेथे केल्या. शेवटी असला विधुळा भाचा आपल्याकडे नसलेला बरा. उगीच स्वतःच्या व दुसऱ्याच्याही गळ्याला एखादे वेळेस फास लावावयाचा, असे मामांना वाटले व त्यांनी मला घरी पाठवून दिले.

                            त्या वेळेस कोकणात आमच्या घरी सारीच परिस्थिती चमत्कारिक झाली होती. आमचे वडील स्वदेशीच्या चळवळीत झालेल्या खटल्यात शिक्षा भोगून नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते. त्यांची प्रकृती फार अशक्त होती. म्हणून कोणा दूरच्या नातलगाकडे समुद्रतीरी प्रकृती सुधारण्यासाठी ते गेले होते. माझी मोठी बहीण माहेरी आलेली होती. माहेरी चार दिवस आनंदाने राहण्यासाठी आली; परंतु ती फार आजारी पडली. आईवर सारा कामाचा बोजा होता. घरात दुसरे बाईमाणूस त्या वेळेस नव्हते. बहीण फार आजारी होती. अशाही स्थितीत आम्ही पुण्याहून घरी आलेले. माझ्याकडे कोणीच लक्ष देईना, मी सर्वांना नावडता झालो होतो. माझ्या अक्कावर साऱ्यांचा लोभ, सर्वांचे प्रेम होते. तिची अंगावरची मुलगी होती. त्या मुलीचे त्या वेळेस फार हाल होत. कारण तिला तिच्या आईचे दूध मिळत नसे. आईचा हात तिच्या कोमल अंगाला लागत नसे. अक्काला विषमज्वर झालेला होता, म्हणून तिच्या अंगावरचे दूध पाजणे म्हणजे धोका होता. कारण ते दूध विषारी झालेले. यामुळे त्या लहानशा रंगूची फार आबाळ होत असे.

                            एके दिवशी अक्काला वात झाला. सासरी झालेले हाल तिने कधीही माहेरी सांगितले नव्हते. परंतु मनात साठविलेले ते सारे दुःख ती वातात बोलत होती. तिला शुद्ध नव्हती. त्या बेशुद्ध स्थितीत सारे हृदयातील ती ओके व ते ऐकून आईला फार वाईट वाटे. इतके पैसे खर्चून लग्न केले, तरी सासरी जाच का असावा, असे तिला वाटे.

                            ज्याप्रमाणे भाऊबंदकी, त्याप्रमाणे सासुरवास हाही आपल्यातील दुर्गुण आहे. दुसऱ्या घरातील आलेली मुलगी. तिचे आईबाप व्हावयाचे, हे खरे म्हटले तर सासूसासऱ्यांचे कर्तव्य. परंतु त्यांना वाटते, की सत्तेची मोलकरीण आली. सासरचे हाल ज्या दिवशी थांबतील, तो सुदिन. सासुरवास हा भाषेतील शब्दच सारा इतिहास सांगत आहे. मुली ओव्या म्हणतात. त्यांत पाहा सासुरवासाचे कसे वर्णन केलेले आहे.

सासरचे बोल जसे कारल्याचे वेल
गोड कसे लागतील काही केल्या
सासरचे बोल जशा रेशमाच्या गाठी
रात्रंदिन रडविती धायी धायी

 वगैरे ओव्यांत हे करुण चित्र काढलेले आहे. या ओव्या बायकांनीच रचलेल्या आहेत. त्यांनी स्वतःच्या स्थितीचे हे दीनहीन वर्णन केलेले आहे. कार्ल्याचे कडू वेल, रेशमाच्या गाठी-या उपमा बायकांनाच सुचतील. अजून साधी माणुसकीही मनुष्याला शिकावयाची आहे. सासू सुनेला छळते व सून पुन्हा सासू झाली, म्हणजे तेच करते. जणू पूर्वजांची छळाची परंपरा अखंड चालूच राहिली पाहिजे. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे, अशी म्हणच पडली आहे. ज्याप्रमाणे पंतोजी मुलांना मारतो व मुलगा पुढे पंतोजी झाल्यावर तेच करतो, तसेच हे. आम्हांला मारीत असत, म्हणून आम्ही मारतो, हेच पुष्कळ शिक्षकांचे उत्तर असते. मुले-मुली जेव्हा खेळ खेळतात तेव्हा नीट पाहावे. मुली जर सासूसुनेचा खेळ करीत असतील, तर त्यात सून झालेल्या मुलीचे केस ओढणे, तिच्या हाताला लटोपटीचा डाग देणे, तिला शिळे अन्न खायला घालणे वगैरे हाल दिसून येतील. मुलांचा शाळा शाळा म्हणून खेळ बघा. एखाद्या खांबाला विद्यार्थी करतात व त्याला खूप मारतात! "करशील गडबड, का मारू आणखी!" वगैरे बोलून जोरजोराने खांबाला मास्तर होऊन मुले मारीत असतात. माझ्या बहिणीचा मुलगा आहे. लहान आहे पाच-सहा वर्षांचा. तो मला म्हणतो, "अण्णा, मला मास्तर व्हायचे आहे, नाही तर शिपाई व्हायचे आहे." मी त्याला जर विचारले, "हे दोन धंदेच तू का पसंत केलेस?" तर तो म्हणतो, "म्हणजे सर्वांना मारता येईल. सगळ्यांना झोडपून काढीन!" मास्तर म्हणजे काय कल्पना झाली आहे, बघा. म्हणूनच शाळा म्हणजे सासुरवास वाटतो. शाळा व सासर यांचे माहेर झाले पाहिजे. मी कोठे तरी बहकत चाललो, असे म्हणाल; परंतु माझे पित्त उसळते या गोष्टींनी. साधी माणुसकी आमच्यांत नसावी! पशुपक्षी, किडामुंगी, झाडमाड यांवरही प्रेम करावयास शिकविणारी माझी थोर संस्कृती-त्या संस्कृतीचे वारसदार आज किती नादान झाले आहेत. साधी माणुसकीही कसे विसरले आहेत, हे पाहून हृदय जळते, पिळवटून येते, परंतु जाऊ दे.

                            दुपाची जेवणे कशीबशी उरकून अक्काच्या जवळ सारी जणे बसलो होतो. ताम्हनात थंड पाणी घालून ते ताम्हन अक्काच्या कपाळावर धरण्यात आले होते. खेडेगावात कोठून बर्फाच्या पिशव्या? कोठले कोलन वॉटर? आई ताम्हन धरून बसली होती. सर्व मंडळींची तोंडे चिमणीसारखी झाली होती. माझ्या आईच्या काय मनात एकदम आले, कोणास माहीत. परंतु ताम्हन मला धरावयास सांगून ती उठली. आई उठली, ती देवाजवळ गेली. देवघरीत जाऊन ती देवास म्हणाली, "देवा, शंकरा, देवळात जाऊन तुझी पिंडी तीन दिवस दहीभाताने लिंपीन, पोरीला गुण येऊ दे. उतार पडू दे. अंगाची तलखी कमी होऊ दे. ताप उतरू दे." प्रयत्न चालले होते. प्रयत्नांच्या बरोबर प्रार्थना ही चालली होती. आईचा देवावर भरवसा होता; परंतु रात्रंदिवस सेवाही करीतच होती. आपल्या प्रयत्नांत आपल्या तळमळीने देवाचे सहकार्यही आणले पाहिजे.

                            "रंगू उठली रे पाळण्यात, जा तिला घेऊन बाहेर जा. येथे रडवू नकोस." असे आई मला म्हणाली. मी उठलो व अक्काची मुलगी खांद्याशी घेऊन तिला खेळवीत बाहेर गेलो. रंगूला इकडे तिकडे हिंडवून मी कंटाळलो व घरात आलो. तिन्हीसांजची वेळ होत आली होती. बाहेर कांडपिणींना कांडप घातलेले होते. ते त्यांच्याजवळून मोजून घ्यावयाचे होते. गुरे गोठ्यात येण्याची वेळ होती. गुराखी 'गुरे आली, हो' एवढे ओरडून पुढे जात असे. त्या गुरांना बांधायचे होते. अशा त्या कामाच्या धांदलीत मीही रंगूला तेथेच ठेवून बाहेर गेलो. ती लहानगी रंगू रडू लागली. ती आईसाठी का रडत होती? आईच्या प्रेमाने थबथबलेला हात अंगाला लागावा, म्हणून का रडू लागली? आईने प्रेमाने बघावे, म्हणून का ती भुकेली होती? मुकी पोर! लहान, दुबळा जीव! तिची आई अंथरुणात तळमळत होती, वातात मधून मधून बोलत होती. रंगूला तिच्या आईचे दर्शनही दोन दोन दिवसांत होत नव्हते. तिचा आत्मा आईला भेटण्यासाठी का ओरडत होता? आक्रोश करीत होता? "माझ्या आईजवळ मला नेऊन ठेवा, क्षणभर तिच्या कुशीत मला ठेवा. मला दूध नको, काही नको. मी त्यासाठी हपापलेली नाही, तो आईचा कृश हात मला लागू दे, त्यानेच माझे पोषण होईल." असे का ती रडून सांगत होती? तिच्या रडण्याची भाषा कोणाला समजणार? त्या बालहृदयाची, त्या आत्म्याची ओळख कोणाला कशी होणार? रंगू ओक्साबोक्शी रडू लागली. टाहो फोडू लागली. कळवळली.

                            माझ्या आईने करावे तरी काय? कांडण मोजून घ्यावे, का दिवा लावावा आणि देवातुळशीस दाखवावा, का गुरे बांधावी, का धार काढावी, का काढा करावा, का भाजीभात करावा, का रंगूला खेळवावे, का अक्काजवळ बसावे? तिला काय हजार हात होते? आई! धन्य आहे तुझी. स्त्रियांसारख्या कष्टाळू स्त्रियाच. त्यांनीच त्या शेकडो खस्ता खाव्या. भारतीय स्त्रियांच्या कष्टाळूपणाला व क्षमावृत्तीला एक भूमातेचीच उपमा शोभेल, दुसरी नाही. अशा थोर स्त्रिया ज्या घरात असतात, ती मला राउळे, देवाची मंदिरेच वाटतात. त्या स्त्रिया ह्याच मी देवता मानतो व माझा माथा त्यांच्या चरणी नमवितो. दुसरी देवळे मला माहीत नाहीत.

                            माझी आई संतापली. रागावलीही. तिच्या क्षमेला सोशिकपणालाही काही सीमा होती. मर्यादा होती. "कोठे गेला हा कार्टा? नुसते खातो मेला! इकडची काडी तिकडे करायला नको! तिकडे लावलेन् दिवे, आता येथे आला आइशिला छळायला. जरा पोरीला खेळव म्हटलं, तर फुगला नुसता एरंड. तिन्ही त्रिकाळ खायला हवे मात्र रेड्याला. रिंडोजी नुसता. श्याम्या, अरे कार्ट्या! उचल ना जरा तिला. कळवळली बघ पोर. श्वास धरलंन् वाटते. तू मरत नाहीस. तू मात्र छळायला उरला आहेस." आई रागावून दुःखसंतापाने वेडी होऊन बोलत होती.

                            आईचे शब्द मी ऐकत होतो. परंतु शेवटचे शब्द माझ्या मर्मी लागले. मला रडू आले. रडत रडत मी त्या रडणाऱ्या रंगूस उचलले व बाहेर गेलो. रंगूला पोटाशी धरून मी श्लोक वगैरे म्हणू लागलो. रामरक्षा म्हटली. तिला घेऊन मी सारखा अंगणात फेऱ्या घालीत होतो. रंगू माझ्या खांद्यावर निजून गेली.

                            आईच्या शब्दांनी मी जागा झालो. कशासाठी जगावे, हे मला कळले. चकमक झडल्याशिवाय ठिणगी पडत नाही. माझ्या जीवनात ठिणगी पडली, तेज आले, प्रकाश आला. गुणी मनुष्य जगाला हवाहवासा वाटतो. गुणहीन करंटे जीवन काय कामाचे? आपला काडीचाही उपयोग नाही, आपले जीवन म्हणजे सर्वांना भार! सर्वांना त्यापासून त्रास, असे मला त्या दिवशी वाटले. माझ्या जीवनाला त्या दिवसापासून कलाटणी मिळाली. निराळी दिशा दिसू लागली. कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागत असते असे म्हणतात, ते खोटे नाही. मीही त्या दिवशी देवाला प्रार्थना केली. वर आभाळाकडे बघत, उगवणाऱ्या ताऱ्यांकडे बघत प्रार्थना केली, "देवा! आजपासून मी चांगला होण्याचा प्रयत्न करीन. माझ्या या निश्चयाने प्रसन्न हो. मला चांगला कर व माझी अक्काही बरी कर!"

                            त्या दिवसापासून अक्काला गुण पडत चालला, एवढे खरे. माझी अक्का पुढे चांगली बरी झाली. ती शरीराने बरी झाली, मी मनाने बरा झालो. दोघांचे पुनर्जन्म झाले. अक्काला नवीन शरीर मिळाले, मला नवीन हृदय मिळाले.


********************************************************************************************
 रात्र अठरावी : अळणी भाजी          अनुक्रमणिका         रात्र विसावी : सात्त्विक प्रेमाची भूक
********************************************************************************************

रात्र विसावी : सात्त्विक प्रेमाची भूक

                            "काय, सुरुवात करू ना, रे, गोविंदा?" श्यामने विचारले. "थोडा वेळ थांबावे. ते म्हातारबाबा अजून आले नाहीत. तुमच्या तोंडचा एकही शब्द गमावला, तर त्यांना वाईट वाटते." गोविंदा म्हाणाला. "इतके काय असे आहे माझ्याजवळ? साध्या गोष्टी मी सांगतो. वेडे आहेत लोक झाले." श्याम म्हणाला. “तुम्ही सांगता, ते तुम्हांला चांगले वाटते म्हणून सांगता ना? का तुम्हांलाही ते टाकाऊ वाटते? स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असला तर तुम्ही ते पाप केले, असे होईल. ती फसवणूक होईल. आपणांस जे त्याज्य व अयोग्य वाटते, ते आपणांस लोकांना कसे बरे देता येईल?" भिकाने विचारले. “शिवाय लोकांची श्रद्धा असते, तर ती का दुखवा? त्यांना तुमचे ऐकण्यात आनंद वाटत असेल, म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात." गोविंदा म्हणाला. “हे पाहा, आलेच म्हातारबाबा. या, इकडे बसा." राम म्हणाला. “इकडेच बरे आहे. असा येथे बसतो." ते म्हातारबाबा म्हणाले. “श्याम, कर सुरुवात आता." राजा म्हणाला.

सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरु झाली. त्याची हृदयंगम मुरली वाजू लागली.

                            मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून सहा कोसांवर दापोली म्हणून एक गाव आहे, तेथे इंग्रजी शिकावयास ठेवले. मामांकडून मी दिवे लावून आलो होतो. थोडे दिवस घरी वेद वगैरे शिकत होतो. परंतु वडिलांनी इंग्रजी शिकविण्याचे ठरविले. एक-दोन यत्तांइतके माझे शिक्षण झालेले होते.

                            दापोली मोठा सुंदर गाव आहे. तेथील हवा फार आरोग्यदायक आहे. तेथून समुद्र चार कोस दूर आहे. दापोलीस खूप मोठमोठी मैदाने आहेत. एका काळी येथे इंग्रजांची पलटण होती; म्हणून दापोलीस कअँप दापोली असेही म्हणतात. या कअँपनंतर 'काप' असा अपभ्रंश झाला व हल्ली कापदापोली असे म्हणतात. तसे पाहिले, तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधी गेला. नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीने बुडविले. फारच मोठी चूक होती ती. आंग्र्यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता. इंग्रजांच्या व इतरांच्या आरमाराचा आंग्र्यांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता. शिवाजीमहाराजांनी मोठ्या प्रयत्नाने आरमार उभारले होते. पूर्वी मराठ्यांचे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकत नव्हते; परंतु या महापुरुषाने आरमाराचे महत्त्व ओळखले होते. ज्याचा दर्या त्याचे वैभव. हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेले आहे. परंतु नानासाहेबाने इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आंग्र्यांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली, त्याचा मोबदला म्हणून तो मुलूख मिळाला, त्यात बाणकोट वगैरे दापोली तालुक्यातील बंदरकाठी गावे होती; परंतु ह्याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबीची तलवार गाजविणारे नाना फडणवीस, ह्याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी आमरण झगडणारे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच, असे सांगणारे "केसरी"चे संपादक, गीतारहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा गाव. त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड उभारणारे, तीन मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे, महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील. स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलीक व गणितविशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ह्याच तालुक्यातील.

                            दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहे. सुरूचे दाट जंगल आहे. त्यातून वारा लागू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानांवर पडतो. काजूची झाडेही पुष्कळ आहेत; उन्हाळ्यात लाल, पिवळे, शेंदरी असे हे काजू झाडावर हंड्या-झुंबरांसारखे डोलत असतात! दापोलीच्या आजूबाजूची गावे म्हणजे सृष्टिसौंदर्याची माहेरघरे आहेत. दापोलीची इंग्रजी शाळा त्या वेळेस मिशनची होती. दापोलीचे छात्रालय एके वेळी मुंबई इलाख्यात गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती. आजूबाजूला कलमी आंब्याची झाडे भरपूर होती. फारच रम्य दिसे शाळा. या शाळेत मी जाऊ लागलो. अभ्यास सुरू झाले.

                            दापोलीहून माझा गाव सहा-साडेसहा कोस होता. पायाने मी एवढे चालून जाईन की नाही, याचा मला आत्मविश्वास नव्हता; परंतु एक दिवस चालत गेलो व आत्मविश्वास आला. त्या वेळेपासून मी दर शनिवार-रविवारी घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी दोन वाजता शाळा सुटली की, मी घरी निघावयाचा व दिवे लागेपर्यंत घरी पोचावयाचा. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवावयाचा व सोमवारी पहाटेस उठून दहा वाजेपर्यंत पुन्हा दापोलीस शाळेत जावयाचा.

                            एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न व दुःखी होतो. जणू मला जगात कोणी नाही, असे त्या दिवशी वाटत हेते. माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे. कधी कधी एकदम मनात येते, की खरोखर कोण आहे आपल्याला या जगात? हा विचार मनात येऊन अनेकदा मी रडलो आहे. काही कारण नसावे व एकदम डोळे भरून यावे, हृदय सद्गदित व्हावे, असे अनुभव मला आले आहेत. मी म्हणजे जणू एक बिंदू! कोणा झाडाचे पान! क्षणात वाळून जाणार, पडून जाणार! असे अगतिकत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासून येत. लहानपणापासून सहानुभूती व प्रेम यांचा मी भुकेला होतो. जणू या दोन वस्तू शेकडो जन्मांत मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्माचाच जणू मी उपाशी होतो! मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल; पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल? प्रेम हे जीवनाचे जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोसते. वृक्षाच्या पानापानांत, फांद्याफांद्यांत, सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो, तसे प्रेम पाहिजे. सोडावॉटरची बाटली फोडली, की फसफस पाणी बाहेर येते. असले क्षणभर उतू जाणारे; परंतु दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास देऊ शकत नाही.

                            त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेलेला होतो. मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो. लोकमान्य टिळक म्हणत असत, "मी सिंहगडावर दोन महिने जाऊन राहतो. दोन महिने तेथील शुद्ध व स्वच्छ हवा, स्वातंत्र्याची हवा खाऊन खाली येतो. ती हवा मला वर्षभर पुरते!" माझीही जणू तशीच स्थिती होती. दर आठा दिवसांनी घरी जावयाचे व घरची प्रेमाची हवा खाऊन यावयाचे. या हवेवर प्रेमहीन जगात आठ दिवस राहावयाचे व पुन्हा घरी जावयाचे. त्या वयात मी प्रेम घेण्यासाठी भुकेलेला होतो. परंतु आज मला समजते आहे की, प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे. पण अंकुराला जर तो लहान असता प्रखर उन्हात वाळू दिले नाही, जळू दिले नाही, त्याला पाणी घातले, सुकू दिले नाही, तर तो अंकुर पुढेही छाया देईल. मोठा होऊन हजारोंना प्रेम देईल. ज्यांना वाढत्या वयात, बाळपणी प्रेम मिळाले नाही, ते लोक पुढे जीवनात कठोर होतात. त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही. मनुष्य घेतो, तेच देतो.

                            मी रस्त्याने जात होतो. मधून मधून डोळ्यांतून अश्रू येत होते. या, साडेसहा कोसांच्या रस्त्यावर वाटेत किती तरी खेडी आहेत. एके ठिकाणी वाटेत जंगल आहे. करंजणी गावाच्या जवळ वाटेत एक विहीर लागते. त्या विहिरीजवळ मागे रस्त्याने रात्री जाणारे एक सबंध लग्नच्या लग्न अदृश्य झाले होते, असे सांगतात. या विहिरीजवळ येताच मला भीती वाटू लागे. मी राम राम म्हणू लागे व पळतच सुटे. जंगल आले म्हणजे वाटे, या जंगलातून वाघबीघ तर नाही येणार! मी त्या वेळेस बारातेरा वर्षांचा होतो. फार मोठा नव्हतो. वाटेत मला तहान लागली, म्हणून विहिरीत उतरून मी पाणी प्यालो. ही घोडविहिर होती. म्हणजे घोड्यांना आत उतरून जाता येईल, अशा मोठमोठ्या पायऱ्या त्या विहिरीला बांधलेल्या होत्या. जणू बाजूने केलेला जिनाच! मी पाणी पिऊन निघालो. रात्र पडेल, म्हणून झपझप पावले टाकीत चाललो.

                            शेवटी मी एकदाचा घरी आलो. दिवे लागून गेले होते. धाकटा भाऊ श्लोक वगैरे म्हणत होता. आई चूल पेटवीत होती. आजी कोणाचा अंगारा मंत्रीत होती. कोणाला दृष्ट लागली, तर या माझ्या आजीकडे अंगारा घेण्यासाठी लोक येत असत. ती आंब्याच्या पानावर थोडी राख घेऊन येई व मंत्र म्हणत आजी ती राख बोटांनी चोळीत असे. मग ही राख नेऊन ज्याच्यावर दृष्ट पडली असेल, त्याच्या कपाळाला लावावयाची!

                            मी अंगणात दिसताच "अण्णा आला, अण्णा आला," असे धाकटे भाऊ आनंदाने जयजयकार करू लागले व मला बिलगले. मी घरात गेलो. आई म्हणाली, "उशिरा का निघालास? जरा लौकर निघावे, की नाही? बाहेर रात्र झाली." मी म्हणालो, "माझ्याच्याने चालवतच नव्हते. जणू गळून गेल्यासारखे वाटत होते." “मग कशाला बरे पायी आलास? पुढे संक्रांतीस यावयाचे." आई म्हणाली. “आई! मी तुला पाहण्यासाठी आलो. तू माझ्याकडे प्रेमाने पाहिलेस, की मला शक्ती येते. ही शक्ती घेऊन मी परत जाईन." असे म्हणून मी आईला बिलगलो व रडू लागलो. आईलाही रडू आले व भावांनाही रडू आले. आईने आपले डोळे पुसले. तिने आपल्या पदराने माझेही डोळे पुसले. “हे कढत पाणी घे व पाय धू. थांब, थोडे तेल लावत्ये. मग वर कढत पाणी घे." असे म्हणून आईने माझ्या पायांना तेल चोळले. ती माझ्या पायांना तेल लावीत होती व मी तिच्याकडे पाहात होतो. मला त्या वेळेस किती आनंद होत होता! त्या वेळच्या स्थितीस आनंद हा शब्दही मी लावू इच्छीत नाही. हा शब्दही कमी पडतो. ती स्थिती अनिर्वचनीय होती, पवित्र होती. मी पाय वगैरे धुतले व चुलीपाशी आईजवळ बसलो होतो. "अण्णा, गोष्ट सांग, नाही तर एक नवीन श्लोक शिकव." असे लहान भाऊ मला म्हणत होते. इतक्यात वडील बाहेरून आले. ते कोठून तरी त्रस्त होऊन आले होते. मला पाहून नेहमीप्रमाणे त्यांना आनंद झाला नाही. ते काही बोलले नाहीत. बाहेर पाय धुऊन आले व संध्येला बसले. “का, रे, संध्या वगैरे झाली का तुझी?" त्यांनी मला विचारले. त्या वेळेस मी संध्या करीत असे, संध्येचा अर्थ मला समजत नसे. तरी तंत्र करीत असे व तोंडाने पुटपुटत असे. "नाही केली, करतो." मी म्हटले. “तेथे चुलीजवळ काय बायकासारखा बसला आहेस? ऊठ. संध्या वगैरे करायची." ते रागाने बोलले. आई म्हणाली, "आताच तो आला. दमला आहे अगदी. गळून गेल्यासारखे वाटते, म्हणाला. जरा बसला आहे. श्याम! जा, संध्या वगैरे कर." मी उठलो व पाटावर बसलो. भस्माचे बोट कपाळास फासले व आचमने घेऊ लागलो. माझ्या डोळ्यांतील पाण्याची देवाला शतर्ध्ये सुटत होती. वडील पुन्हा म्हणाले, "तिकडे संध्या वगैरे करतोस, की नाही? आणि हे केवढे डोके वाढले आहे? हजाम मिळत नाही, वाटते? नुसता कावळा झाला आहे! मी तेथे आलो होतो तेव्हा बजावले, की डोके करून घे, म्हणून. का केले नाहीस? तुला शिंगे फुटायला लागली. उद्या सकाळी त्या गोंद्या न्हाव्याला नाही तर लख्या न्हाव्याला, बोलावून आण व डोके तासटून घे. नाही तर येथे राहू नकोस. निघून जा." मी प्रेमाचा भुकेला होऊन आलो होतो, मला शिव्या मिळाल्या. मला भाकर पाहिजे होती, दगड मिळाले. मला माझा हुंदका आवरेना. त्याचा स्फोट झाला. "झाले काय रडायला? कोणी का मारले आहे? सोंगे आणता येतात सारी." वडील म्हणाले. “पण करील उद्या डोके. तेथे पैसे द्यायला लागतात, जवळ नसतील. नसेल केले. तेथे पुन्हा दहा वाजता शाळेत जायचे. श्याम! उगी हो! संध्या झाली का? आरती करा. मी पाने वाढते. भुकेलेला असशील." आई अमृतमय वाणीने बोलत होती. मला जीवन व मृत्यू, अमृत व विष यांचा अनुभव येत होता. उन्हाळा व पावसाळा, शरद व शिशिर यांचा अनुभव येत होता.

                            आरती झाली. पाने वाढली. आम्ही जेवावयास बसलो. आईने मला दही वाढले. मलाच वाढले. माझ्याजवळ लहान भाऊ होता त्याला नाही वाढले. माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही, असे बघून माझ्या पानातील दही मी लहान भावाच्या भातात घातले व त्याला भात कालवून दिला. ते दही त्याला देताना मला धन्यता वाटत होती. मी त्या दिवशी अगदी हळुवार मनाचा झालो होतो. त्या वेळेस माझ्या शरीरास कोठेही बोट लावले असते, तर चटकन पाणीच बाहेर आले असते. जणू अश्रूमय मी बनलो होतो. आसवांची मूर्ती झालो होतो. माझ्या भावास मी मोठा झाल्यावर पैसे दिले असतील; परंतु त्या रात्री ते जे दही दिले, त्यात जी गोडी होती, जी सहृदयता होती ती पैशाअडक्यात नव्हती.

                            आम्ही भावंडे गोष्टी बोलत पडलो. त्यांना झोप लागली; परंतु मला लागली नाही. मी मुसमुसत होतो. शेवटी केव्हा तरी मला झोप लागली. पहाटे उठून वडील शेतावर वगैरे गेले. मी जागा होतो. आई पोतेरे घालीत होती. कृष्णाचे गाणे म्हणत होती.

कृष्ण यशोदेचा बाळ। सुकुमार लडिवाळ
कृष्ण यशोदेचा तान्हा। त्यासी पाजी प्रेमपान्हा
कृष्ण बाळ मेघश्याम। यशोदेचे प्राशी प्रेम

मी गाणे ऐकत होतो. माझ्या आईचे नाव यशोदा व माझे नाव श्याम. आई मला प्रेम पाजीत होती, मला प्रेमपान्हा पाजीत होती. मी उठलो व आईला जाऊन मिठी मारली. "आई, तू मला कुशीत घेऊन निजव. तुझी चौघडी घाल. चल, मला निजव; थोडा वेळ थोपट. राहू दे पोतेरे." मुलापुढे आईचे काय चालणार? मी जणू त्या वेळी कुकुले बाळ झालो होतो. आईजवळ मी निजलो. आईने मला थोपटले, ओव्या म्हटल्या.

पहाटेची वेळ
दूर कोंबडा आरवे
परी बाळा झोपी जावे
लहान तू
अंगाई
पहाटेची वेळ
वाजू लागती रहाट
बाळा तू रे पाळण्यात
झोप घेई
अंगाई
पहाटेची वेळ
का का करितो कावळा
झोपे परि माझ्या बाळा
उठू नको
अंगाई
पहाटेची वेळ
कामाची आहे घाई
बाळा, तू झोप घेई
आई म्हणे
अंगाई

                            मी ओव्या ऐकता ऐकता आईला म्हटले, "आई! मी आपला निघून जातो. मी येथे राहात नाही. मी आलो, तर भाऊ किती रागे भरले! ते घरी येण्याच्या आधीच मला जाऊ दे." आई म्हणाली, "असे नको हो, श्याम करू. हे चांगले का? अरे, ते बोलले तरी त्यांच्या मनात का असते? बाहेर कोणी अपमान केला असेल त्यांचा, रागावलेले असतील, म्हणून बोलले. आजकाल आपली स्थिती वाईट आहे. तुला कळत का नाही? त्यांचे मन निराश असते. त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यानी आजपर्यंत तुम्हांला वाढविले, तर दोन शब्द बोलण्याचाही त्यांना अधिकार नाही का? इतकी वर्षे तुमच्यासाठी त्यांनी अपमान सोसले, खस्ता खाल्ल्या, तुम्हांला लहानाचे मोठे केले. तुमच्या विद्येसाठी कर्ज काढून, स्वतः फाटकी धोतरे नेसून, ते पैसे देतात. ते तू या दोन शब्दांमुळे विसरून का जावे? आणि डोके वाढले आहे, म्हणून बोलले. जुन्या माणसांना ते बरे वाटत नाही. तुम्ही अजून लहान आहात, म्हणून बोलले. उद्या मोठे झालात तर कोण बोलणार आहे आणि कोण ऐकणार आहे? आईबापांना बरे वाटावे, म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावे का? आईबापांच्या धर्मभावना दुखविल्या जाऊ नयेत, म्हणून इतकेही तू करू नयेस का?" आई मला समजावीत होती.

                            “केसांत कसला आहे, ग, धर्म?" मी म्हटले. आई म्हणाली, "धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावे, काय प्यावे, यातही धर्म आहे. केस तरी तू का रे ठेवतोस? मोहच तो. मोह सोडणे म्हणजे धर्म." मित्रांनो! माझ्या आईला त्या वेळेस मला नीट पटवून सांगता आले नसेल; परंतु आज मला सारे कळते आहे. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे, ही गोष्ट आपणां आश्रमवासीयांस सांगावयास नको. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणे, सत्य, हित व मंगल यांसाठी करणे म्हणजेच धर्म. बोलणे, चालणे, बसणे, उठणे, ऐकणे, खाणे, पिणे, झोपणे, न्हाणे, धुणे, लेणे, सर्वांत धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जिवास धर्माची हवा, कोठेही गेले तरी हवी. मी केस ठेवीत होतो, ते मी सुंदर दिसावे, म्हणून! खरे सौंदर्य सद्गुणांचे आहे व स्वच्छतेचे आहे, हे मला आज कळते आहे.

त्या दिवशी मी वडिलांवर रागावून जाणार होतो; परंतु आईने जाऊ दिले नाही. ती मला प्रेम देई. परंतु सत्पथही दाखवी. तिचे प्रेम आंधळे, बावळट नव्हते.

                            आई कामधाम करावयास निघून गेली. मी व माझे भाऊ थोडा वेळ आणखी झोपलो. नंतर मी उठलो. न्हाव्याला बोलावून आणले. आमचा पडपणीचा न्हावी होता. पडपणीचा म्हणजे वर्षाकाठी न्हाव्याला ठरावीक धान्य द्यावयाचे. मग वर्षभर त्याने हजामती करावयास त्या घरी जावयाचे. दिवाळीच्या दिवशी अंगाला लावावयास यावयाचे. ते प्रेमळ संबंध असत. परंतु ती पद्धत आता खेड्यातूनही नाहीशी होत चालली आहे. गोविंदा न्हावी म्हणजे घरोब्याचा. "काय, श्याम! लईशी डोई वाडविलीस?" असे त्याने विचारले.

                            मी त्याला म्हटले, "गोविंदा! तुझा हात हल्का आहे. ते कापातले न्हावी फार रडवितात." माझे शब्द ऐकून गोविंदास बरे वाटले. आम्ही आंघोळी केल्या. वडील बाहेरून आले. येताना त्यांनी तंवसे आणले होते. तंवसे म्हणजे जून झालेली काकडी. कोकणात अशी तंवशी घरात टांगून ठेवतात व ती बरेच दिवस टिकतात. चार चार महिने टिकतात. पावसाळ्यातील भोपळे व तंवशी शिमग्यापर्यंत टिकतात. शिमग्याचे ढोल वाजले, म्हणजे ती टिकणार नाहीत, अशी समजूत असते. वडील आईला म्हणाले, "हे तंवसे आणले आहे. पातोळे कर. श्यामला आवडतात. ही हळदीची पानेसुद्धा आणली आहेत. तुमच्या आंघोळी झाल्या वाटते? श्याम, चुलीखाली थोड्या घाल. मी पण आंघोळ करून देवळास जातो. आज आवर्तने करणार आहे. तुझ्यासाठी मी दर पंधरा दिवशी गणपतीवर एकादशणी करीत असतो."

                            वडिलांचे गोड शब्द ऐकून मी लाजलो व शरमलो. ते मला आदल्या दिवशी रात्री रागे भरले होते, परंतु किती त्यांचे प्रेम! माझे बरे व्हावे, भले व्हावे, माझा अभ्यास नीट चालावा, म्हणून ते देवास आळवीत! मला पातोळे आवडत म्हणून बाहेर हिंडावयास जाऊन तंवसे घेऊन आले? त्यांच्यावर रागावून मी जाणार होतो! मी रागाने पुन्हा दापोलीस निघून गेलो, असे आल्यावर त्यांनी पाहिले असते, तर त्यांची केवढी निराशा झाली असती! त्या प्रेमळ व थोर पितृहृदयास किती दुःख झाले असते! हीच का आपल्या मुलाची पितृभक्ती, हीच का कृतज्ञता, हेच का प्रेम, की दोन शब्दही त्या प्रेमाला व भक्तीला सहन होऊ नयेत! दोन शब्दांनीच ती मरून जावीत, असे त्यांना वाटले असते. मी कृतज्ञतेने वडिलांकडे पाहिले. बाहेरच्या चुलीत पाणी तापवावे, म्हणून वाळलेला पातेरा वगैरे घालून विस्तव पेटविला. घरात जाऊन त्यांनी शेतावरून फुले वगैरे आणली होती, त्यांतील जास्वंदीच्या फुलांची डेखे वगैरे काढली. निरनिराळ्या रंगांची, निरनिराळ्या प्रकारची फुले ताटात निरनिराळी मांडून ठेवली. तुळशी, दूर्वा, बेल ठेवून दिला. पूजेला चिमूटभर तांदूळ ठेविले. पूजेची सारी तयारी करून ठेविली. कोरांटकीची फुले गुलाबी रंगाची फारच नाजूक दिसत होती. गोकर्ण व गुलाब यांचीही होती. तीर्थोटलीत नैवेद्यास दूध ठेविले. भस्माची पडगुली पाटाजवळ ठेवून दिली.


                            वडिलांच्या पूजेची तयारी करून मी आईला मदत करू लागलो. काकडी चिरली व ती खिसली. हळदीची पाने पुसली. कोळिष्टक वगैरे पाहिले. पातोळे लिंपण्यासही मी लागलो. मला अगदी पातळ लिंपता येत असत. तांदुळाचे पीठ काकडीच्या खिसात मिसळतात. त्यत गूळ घालतात. मग हे पीठ हळदीच्या पानावर पसरावयाचे. निम्म्या पानावर पातळ पसरून निम्मे पान त्यावर झाकण घावावयाचे, वाफेवर हे उकडावयाचे, उकडल्यावर पान सुटते व पातोळा तयार होतो.

                            वडिलांची घरची पूजा संपत आली. मग चुलीजवळ जाऊन सनकाडीने नीरांजन लावून त्यांना नेऊन दिले. ते उगीच आगकाड्या वापरीत नसत. पूजा करून वडील देवळास गेले. मी एक नारळ फोडला. पातोळ्याजवळ बोळू काय? पातोळा कशाबरोबर खावयाचा? कोकणात तूप कमी. गरिबांच्या घरी ताकाच्या थेंबानेच अन्नशुद्धि करून घेतात! कोकणात तुपाची उणीव नारळाने भरून काढतात. ओला नारळ खवावयाचा; मग तो खोवलेला नारळ थोडे कढत पाणी व थोडे मीठ घालून चांगला कुस्करावयाचा; नंतर तो पिळून त्याचा रस काढावयाचा. हा नारळाचा रस. त्याला आंगरस म्हणतात. तो फारच खमंग व उत्कृष्ट लागतो. या आंगरसाबरोबर पातोळे, मोदक, खांडवी वगैरे पक्वान्ने कोकणात खातात. मी चांगला घट्ट आंगरस काढला. जेवणाची तयारी झाली. वडील आले. आनंदाने जेवणे झाली. त्या दिवशी मला फारच आनंद होत होता. “श्यामला वाढ ग आणखी पातोळा. माझा म्हणून एक वाढ." वडील आईला म्हणाले. माझ्या आईप्रमाणे तेही प्रेमळ होते. त्यांनी शारीरिक शिक्षा आम्हांस कधीही केली नाही. दहा उठाबशा काढ, अंगणातले गवत बेणून टाक, त्या झाडाला चार कळशा पाणी आणून घाल, देवांना दहा नमस्कार घाल, अशा प्रकारच्या त्यांच्या शिक्षा असत. एखादे वेळेस रागाने बोलत; परंतु मारीत नसत.

                            आमची जेवणे झाल्यावर आई जेवावयास बसली. मी आईजवळ गोष्टी बोलत बसलो होतो. इतक्यात सर्वांत लहान पाचसहा वर्षांचा भाऊ आईजवळ आला व म्हणाला, "आई, जाऊ?" “कुठे रे बाबुल्या?" मी म्हटले. “आईला आहे माहीत. जाऊ का?" त्याने विचारले. आई म्हणाली, "जा. पण तेथे श्लोकबीक म्हणत बसू नको." हसत सदानंद निघून गेला. धाकट्या भावाचे नाव सदानंद होते. वडील त्याच नावाचे त्याला हाक मारीत, आम्ही त्याला बाबुल्या म्हणत असू. मी विचारले, "आई! करंदीकरांच्या झोपाळ्यावर का बसायला गेला?" आई म्हणाली, "नाही, रे, त्याला परसाकडे जावयाचे आहे. चावट आहे तो. परसाकडच्या वेळी परवानगी घ्यावयाला येतो! एरव्ही कुठे बाहेर जावयाच्या वेळेस नाही विचारायचा. लबाड कुठला. आणि तेथे ठाकुलीवर बसून मोठ्याने श्लोक म्हणत बसतो वेडगळ!" मला हसू आले. बोलता बोलता आई म्हणाली, "श्याम! तू आज गेला असतास, तर त्यांना किती वाईट वाटले असते! त्यांना अन्न नसते गोड लागले. घास नसता गिळवला. एखादे वेळेस त्यांना उचकी लागली किंवा हातातला घास खाली ताटात पडला, तर म्हणतात, "कोणी आठवण काढली? गजूने, की श्यामने?" त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे, श्याम! अरे, मी अशी आजारी. मी नाही हो फार दिवस जगायची! आता एकटे त्यांना सोडून मला जावे लागेल. त्यांना भाऊबहिणी कोणी पुशीत नाही. गरिबाला कोण? तुम्ही मुलगे-तुमच्याकडे पाहूनच ते जगतात. तुमचेच त्यांना सुख!" असे म्हणता म्हणता आईचा गळा दाटून आला. पुन्हा म्हणाली, "श्याम! ते नेहमी म्हणतात, की "असतील बाळ, तर फेडतील काळ, नाही तर होतील काळ." तुम्ही काळ नका होऊ, जर काळ आला, तर त्याला हाकलून द्या. त्यांना सुख द्या." आईचे जेवण झाले. मी ही तिला मदत केली. पाणी लावून पाट उचलले. पाटावर शीत वगैरे पडलेले असते, म्हणून पाणी लावून उचलतात. पूजेची भांडी वगैरे सारी उपकरणी जमविली व बाहेर घासावयास नेली. आईने भांडी घासली, मी विसळली. नंतर आईने ताकाची, दह्याची विरजणे कढत पाण्याने धुतली. सदानंदाची लहानशी कोंडुली धुतली. तीत त्याच्यासाठी दूध विरजून ठेवावे लागे. विरजणे धुऊन तिने चुलीमागे शेकत ठेवली. दुधाणीखाली विस्तव हवा का, तिने पाहिले. याप्रमाणे आईची निरवानिरव होत होती. आम्ही ओटीवर बसलो. वडिलांजवळ फर्यामर्याने आम्ही खेळलो. प्रत्येक वेळेस ते आमच्यावर सुकी काकडी लावीत. माझे सारे खडे मारा म्हणून त्यांनी उचलून घेतले. दिवस आनंदात गेला.

आईने, माझे धोतर फाटले होते, ते ठिगळ लावून दिले. रात्री वडिलांनी सुंदर गोष्ट सांगितली. जेवायचे कोणालाच नव्हते. आईने ताकास फोडणी देऊन ताकतई केली होती. ती आम्ही प्यालो.

                            पहाटे आम्ही उठलो. मी आंघोळ केली. आईने भात ठेविला होता. उडदाचा पापड व मेतकूट तिने वाढले. भातात दोन तोंडलीही तिने टाकली होती. मला आवडतात, म्हणून शेजारच्या जानकीवयनींनी ती दिली होती. माझे जेवण झाले. मी जावयास निघालो. आईच्या पाया पडलो. "आता संक्रांतीस ये, हो. पाय फार दुखत असले, तर गाडी करून ये. एखादी भरतीची गाडी पाहावी. द्यावे दोन आणे आणि यावे. जप हो." असे आई म्हणाली. वडिलांना नमस्कार केला. "श्याम! मी बोललो, म्हणून वाईट नको हो वाटून घेऊ. नीट वाग. अभ्यास कर." ते म्हणाले. नंतर मी दोघां धाकट्या भावांस कुरवाळून निघालो. महारवाड्यापर्यंत वडील पोचवावयास आले. पुढेही बेहळ्यापर्यंत आले. आमच्या गावाची हद्द संपते, तेथे एक मोठे बेहळ्याचे झाड आहे. ते माघारे गेले व मी एकटाच चालू लागलो.

                            आईबापांचे प्रेम मनात येऊन मी रडत चाललो होतो. मी दापोलीहून घरी गेलो, तेव्हा प्रेम मिळावे म्हणून मी रडत गेलो. आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्यामुळे हृदय भरून येऊन रडतच जात होतो. सुखाचे अश्रू व दुःखाचे अश्रू! वाटेत एक वाटसरू मला म्हणाला, "का रे मुला, रडतोस? तुला कोणी नाही का?" मी त्याला म्हटले, "माझे आईबाप आहेत." “ते तुझ्यावर प्रेम नाही का करीत, तुला घालवून लाविले का त्यांनी?" “नाही. ते माझ्यावर फार प्रेम करतात म्हणून मी रडत आहे. त्या थोर अपार प्रेमाला मी लायक नाही, म्हणून मला वाईट वाटत आहे. त्यांच्या प्रेमास मी कसा उतराई होऊ? खरेच कसा बरे उतराई होऊ? या विचाराने मला रडू येत आहे!" विचारणारा वाटसरू माझ्याकडे कृपाळूपणे पाहून निघून गेला. मीही जलदीने चालू लागलो.


********************************************************************************************
 रात्र एकोणीसावी : पुनर्जन्म          अनुक्रमणिका         रात्र एकविसावी : दूर्वांची आजी
********************************************************************************************

रात्र एकविसावी : दूर्वांची आजी

                            'आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे; तिचे नाव द्वारकाकाकू. आमचे वडील वेगळे झाले, तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली. तिचे शेतभात होते. त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता. म्हणून ती वडिलांकडे राहत असे. या आजीचे नाव आम्ही 'दूर्वांची आजी' असे पाडले होते. चातुर्मास्यात बायका देवाला दूर्वांची लाखोली वाहतात, कोणी पारिजातकाची लाख फुले वाहतात, कोण बटमोगऱ्याची लाखोली वाहतात, असे चालते. जिला दूर्वांची लाखोली वाहण्याची इच्छा असते, ती इतर बायकांना दूर्वा तोडावयास बोलावते व त्यांच्या मदतीने लाखोली पुरी करते. आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे. 'तुका म्हणे व्हावे सत्यधर्मा साह्य' चांगल्या कामाला नेहमी मदत करावी. चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे. 'घातलीया भय नरका जाणे' हे काम होणार नाही, तुला त्रास पडेल, अशी भीती जो घालतो, तो नरकास जातो. सत्कर्म सिद्धीस जावे म्हणून सर्वांनी झटावे. आमची आजी कोणाही बाईसाठी दूर्वा खुडायच्या असोत, तेथे हजर. आम्हांस जर कोणी विचारले, 'आजी कोठे आहे', तर आम्ही सांगावे, 'गेली दूर्वांना.' असे करता करता त्या आजीचे नावच मुळी 'दूर्वांची आजी' असे पडले. आम्ही मोठे झाल्यावरही तिला दूर्वांची आजी असेच म्हणत असू.

                            दूर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते. उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले, तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्याने पाणी घागरीत भरी व आई वर ओढून घेई. रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी. एकदा तिने चोर पकडले होते! तिला भीती ही वस्तूच माहिती नव्हती. तिला अंगारा मंतरता येत असे. मुले आजारी पडली, गुरे एकदम दूध देतनाशी झाली, तर आजीकडे अंगारा यावयाचा. अंगारा जपत असता तिला जर सारख्या जांभया आल्या, तर दृष्ट फार वाईट पडली, असे ती म्हणे. गुरांच्या अंगाऱ्याबरोबर पेंडीचा तुकडा आणीत. तो मंतरलेला पेंडीचा तुकडा म्हशीस वा गाईस खावयास द्यावयाचा. दूर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत असे. कोणाचे पाय वळत असले, पोट दुखत असले, पाठीत कळा येत असल्या, तर दूर्वांच्या आजीस तेल लावावयास बोलावणे यावयाचे. तिने चोळले, की गुण यावयाचा. तिच्या हातात जणू धन्वंतरी होता. माझे डोळे बिघडले होते, तेव्हा माझ्या तळपायास रोज गाईचे दूध ती चोळीत असे व भराभर ते जिरवीत असे.

                            दूर्वांच्या आजीजवळ सर्व प्रकारचे बी-बियाणे असावयाचे. तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते. त्यात भेंडी, पडवळ, सहस्त्रफळी, दोडका, चिबूड, काकडी, कारेती इ. सर्व प्रकारचे बी असावयाचे. सोंगट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात ती पटाईत होती. कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाटसुद्धा ती जमिनीवर किती आखल्यासारखे काढी. रेषा सरळ असावयाच्या. मंगळागौर वगैरे असली, म्हणजे दूर्वांची आजी तेथे असावयाची. मुलामुलींना नाना प्रकारचे खेळ खेळावयास ती लावावयाची. आगीनपासोड्याचा खेळ तिच्या आवडीचा. या खेळात मुले पांघरुणात लपवावयाची असतात व दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपविलेली आहेत, त्यांची नावे सांगावयाची. आजी आम्हांला लपवावयाची. लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगावयाची "जरा लहान हो. अंग चोरून घे." लपणारा लहान असला, तर त्याला ती सांगे, "जरा मोठा हो!" हेतू हा, की ओळखायला कठीण जावे. हा खेळ मोठा गमतीचा. दूर्वांच्या आजीला देवादिकांची, तशीच देवावरची किती तरी गाणी येत असत. दशावतार, चिंधी, उषाहरण, पारिजातक किती तरी गाणी तिला येत.

                            दूर्वांच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे असे. लहान मुले असली, तर ती खेळवावयाची, हेही काम असे. त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करावयाची होती. भाजणी दळताना जाते जड जाते. आजी हात लावील, ह्या भरवशावर आईने भाजणी करण्याचे ठरविले होते; परंतु आजी जरा लहरी होती. आदल्या दिवशी तीच म्हणाली होती, "उद्या करू हो भाजणी." परंतु उजाडत आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले. खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते. मधून मधून ती त्यांच्याकडे जात असे. बाकी आजी म्हणजे गाव-आजी होती. सर्वांकडे तिचा घरोबा व सारी जणे तिला बोलावीत असत. खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते, म्हणून आजीला तिकडेच जेवायला वगैरे व पापड घालण्यास बोलावण्यासाठी तो मनुष्य आला होता. आजीने त्या माणसाला "येत्ये. तू जा" असे सांगून पाठविले.

                            आईला राग आला. आता भाजणी कशी होणार? जाते कसे ती एकटी ओढणार? आई आजीला म्हणाली, "तुम्ही जाणार, येथे भाजणी कशी होईल?" "मी काय पत्कर घेतला आहे, की काय, तुझ्या कामाचा? वाहवा, ग! म्हणे, भाजणी कशी होईल? माझ्याने नाही ओढवत जाते, समजलीस." आजी मोठ्याने बोलू लागली. आईलाही चेव आला, संतापली ती. "म्हणे, ओढवत नाही! तुम्हांला लोकांकडे काम करायला शक्ती आहे. घरी तेवढे हात मोडतात! साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना; परंतु येथे हात लावतील तर शपथ! येथे काम कराल, तर बाटाल जशा! येथे जरा हात लावायला हात दुखतात. येथे घरी अयाई ग, बया ग, परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल व कमरेवर हांडे घेऊन पाणी भराल! ढोंग आहे सारे तुमचे, ढोंग." "हो, करणार लोकांकडे काम, करणार. तू कोण मला बोलणार? मी का तुझ्या घरचे खाते आहे? माझे शेत आहे. तू मला, येश्वदे, असे बोलत जाऊ नकोस. ते माझ्या कामा येणार नाही. म्हणे, लोकांकडे काम करतात. तुम्हांला असतील लोक, मला नाही कुणी लोक. जशी तुम्ही; तशीच खऱ्यांकडचीही. ढोंगी-कोणाला, गं, म्हणतेस ढोंगी! असले नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलणे! फारच शेफारलीस तू." आजी भांडू लागली. "मग काल कशाला सांगितले उद्या करू भाजणी, म्हणून? मी तयारी केली, जाते धुऊन ठेवले. परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपला तिसरीकडेच! दुसऱ्याला तोंडघशी पाडता येते तुम्हांला. आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का?" आई म्हणाली. "मी का हात लावीत नाही? शर्थ आहे बाई, तुझ्या बोलण्याची! नाही जात खऱ्यांकडे, हो. तुझ्या डोळ्यांत खुपत असेल, तर नाही जात! जगाने चांगले म्हणावे म्हणून मी हपापल्ये, होय? बाई, तू चांगले म्हण." मित्रांनो! पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार साळसूद असतात. दुसऱ्यांकडे ते चार धंदे करतील; परंतु घरी इकडची काडी तिकडे करावयाचे नाहीत. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाच्या स्तुतीला, मनुष्य लालचावलेला असतो. घरच्यांना तळमळत ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते, तर स्वार्थामुळे. वाहवा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते त्याज्य होय. माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते. आई व आजी यांची भांडणे अशी नेहमी होत असत. ते काही नवीन नव्हते. परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे. मध्येच आलेले ते वादळ असे. परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे, घाण बाहेर निघून जाई व पुन्हा मने स्वच्छ होत. वादळ येते, जे शांत होण्यासाठी येते. रोग येतात, ते शरीरातील घाण जाळण्यासाठी येतात व मरण येते, ते पुन्हा जीवनरस देण्यासाठी येते. माझी आई शांत झाली. बोलेनाशी झाली. आजीचे थोडा वेळ सुरूच होते मधून मधून. "लोकांकडे म्हणे काम करतात. माझे हात, मी वाटेल तेथे काम करीन. तू कोण माझ्यावर लादणार, सक्ती करणार? तुला का माझा हेवा? मला लोक बोलावतात, तर तुला का मत्सर?"

                            आईचे तोंड बंद झाले, म्हणून आजीचेही बंद झाले. थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली, "मी चुकल्ये, हो. बोलू नये ते बोलल्ये. तुम्हांला मी कोण बोलणार? तुम्ही किती मोठ्या! परंतु अलीकडे या साऱ्या दगदगीने, काळजीने व दुखण्यांनी मी अगदीच वेंगल्ये आहे. मला नाही राहात मग सुमार. भान जणू मी विसरत्ये. मी मग कोणाला बोलत्ये, याची शुद्धही मला राहात नाही. मेले, असले जगून तरी काय करायचे? चुकल्ये हो." "जगून काय करायचे, असले अभद्र काय ग बोलतेस? तुझी पोरेबाळे आहेत अजून लहान. तू नाही जगलीस तर त्यांचे कोण करील? पुष्कळ जग. मुलाबाळांची लग्ने होऊ देत. सुना घरात येऊ देत, वेडेविद्रे नको बाई मनात आणू! अग, तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो. मागाहून वाईट वाटते." आजी म्हणाली. "तुम्ही जा खऱ्यांकडे. येत्ये म्हणून कळविले आहेत तुम्ही, तर जा. भाजणी उद्या होईल. तसेच जाते धुतलेले ठेविले, म्हणजे झाले. वरती दुसरे काही दळले नाही, की झाले. तुम्हांला आज चहा देत्ये करून; म्हणजे दम नाही लागणार. आज गारवा आहे बाहेर फार." आई गोड बोलली.

                            अलीकडे घरात चहाची पूड असे. कधी कोणी आजारी असले, कोणाला दमा लागला, तर आई करून देई. आईने दूर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी खऱ्यांकडे जावयास निघाली व जाताना म्हणाली, "जात्ये, ग, यश्वदे. रागावू बिगावू नकोस, हो. मनात धरू नकोस."

                            "तुम्हीच नका धरू मनात, म्हणजे झाले. कशा झाल्यात तरी तुम्ही वयाने मोठ्या. मी तुमच्या सुनेसारखी, लेकीसारखी, माझे बोलणे पोटात घालीत जा." आई म्हणाली. आजी गेली व आई घरकाम करू लागली. मित्रांनो! माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती. दोष कोणात नाहीत? चुका कोण करीत नाही? निर्दोष फक्त एक परमेश्वर. बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून त्या जगन्माऊलीसमोर जावयाचे आहे! चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण. माझी आई चुका करी; पण सावरून घेई. चुका करण्यातच ती ऐट मिरवीत नसे."


********************************************************************************************
 रात्र विसावी : सात्त्विक प्रेमाची भूक          अनुक्रमणिका         रात्र बाविसावी : आनंदाची दिवाळी
********************************************************************************************

रात्र बाविसावी : आनंदाची दिवाळी

                            दिवाळीचे दिवस जवळ जवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोलीस जवळच शिकत होतो. त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो. मला व माझ्या धाकट्या भावांना एकेक नवीन सदरा वडिलांनी केला. परंतु त्यांच्या नेसूची धोतरे मात्र फार फाटली होती. आईने ती सतरांदा शिवली होती. सतरा ठिकाणी शिवली होती. ती आता इतकी विरली होती, की शिवणे कठीण झाले होते. आम्हां मुलांना त्यांनी नवीन कपडे केले; परंतु स्वतःला नवीन धोतरे घेतली नाहीत.

                            आईला वाईट वाटत होते. परंतु ती काय करणार? तिच्याजवळ थोडेच पैसे होते? किती तरी दिवसांत तिला सुद्धा नवीन लुगडे मिळाले नव्हते. परंतु तिला स्वतःचे इतके वाईट वाटत नसे. परंतु वडिलांचे दैन्य पाहून तिचा जीव करपे. रोज फाटका भाग निऱ्यांमध्ये लपवून वडील वेळ मारून नेत असत.

                            मुंबई पुण्याकडे लोक दिवाळीत घरी येतात. दिवाळीच्या सुमारास बोटी सुरू होतात. समुद्र शांत असतो. मुंबईहून घरी येणारे लोक येताना फटाके, खेळणी वगैरे दिवाळीसाठी मुलांना घेऊन येतात. माझा मोठा भाऊ पुण्यास मामांकडे शिकत होता. तो काही येणार नव्हता. परंतु पुण्याहून कोणसे आमच्या गावी आले होते. त्यांच्या बरोबर पुण्याच्या मामांनी आईला भाऊबीजेचे तीन रुपये पाठविले होते. आमच्यासाठीही खाऊ पाठविला होता.

ते तीन रुपये पाहून आईला आनंद झाला. तिने सर्वांची खुशाली विचारली. रुपये देऊन तो गृहस्थ निघून गेला. आम्ही आईच्या भोवती जमा झालो. "मामीने खाऊ पाठविला. आम्हांला दे." आम्ही तिच्या पाठीस लागलो. जर्दाळू व पेपरमिंटच्या वड्या होत्या. आईने एकेक जर्दाळू व दोन दोन वड्या दिल्या. माझा धाकटा भाऊ 'दोन जर्दाळू पाहिजेत' म्हणून हट्ट धरून बसला. आई म्हणाली, "अरे, तो तुमच्यासाठीच आहे. आज का एकदम संपवावयाचा आहे? पुरवून खाल्लात, तर तुम्हांलाच बरेच दिवस पुरेल." तो म्हणाला, "तर मग आणखी एक वडी दे आणि ही बदलून दे. मला गुलाबी रंगाची दे." आईने त्याला वडी बदलून दिली व शिवाय आणखी एक दिली. आम्ही अंगणात खेळू लागलो. चिंध्यांचा देशी चेंडू केला होता व धबाधबी आम्ही खेळत होतो.

                            आईने खाऊ फडताळात, मुंग्या न येतील, अशा व्यवस्थेने ठेवून दिला. थोड्या वेळाने तिने मला हाक मारली. मी घरात गेलो. आई म्हणाली, "श्याम, अमृतशेटजींकडे जाऊन नवीन धोतरजोड्यास काय पडते विचारून ये. त्यांच्यासाठी हवा आहे, म्हणून सांग. घरात आहेत का, म्हणून त्याने विचारले, तर गावाला गेले आहेत, उद्या येतील, असे सांग. चौकशी करून येण्याला मला सांगितले, म्हणून आलो, असे सांग. जा."
मी अमृतशेटजींच्या दुकानात गेलो. मोहन्या व बद्री त्यांचे मुलगे तेथे होते. मोहन्या मला म्हणाला, "काय, रे, श्याम, काय पाहिजे? चित्रे पाहिजे असतील, म्हणून आलास होय ना?"
मी त्याला म्हटले, "चित्रे देत नाहीस, मग कशाला मागू? मी तुझ्याजवळ कधी मागणार नाही. परंतु धोतराचा भाव विचारावयास मी आलो आहे."
"कोणाला धोतरजोडा? तुला?" त्याने विचारले.
"नाही, भाऊंसाठी. चांगला लांब-रुंद हवा. पोत चांगले हवे. किंमत काय, ते विचारावयास मी आलो आहे. दोन-तीन नमुने दे. ते मी घरी दाखवून आणतो." असे मी सांगितले.
मोहन्या मारवाड्याने दोन-तीन प्रकारचे धोतर दिले. अमृतशेट म्हणाले, "दाखवून लौकर आण हो, श्याम."
"आम्ही काही घरी ठेवणार नाही व ठेवले, तर पैसे देऊ." असे मी अभिमानाने म्हटले.
"तुझ्याजवळ भारी झालेत वाटते पैसे? बापाजवळ तर फद्या नाही!" अमृतशेट म्हणाले.
मला ते शब्द ऐकून वाईट वाटले. अमृतशेटांचे आम्हांला कर्ज होते, म्हणून ते तसे बोलले. स्वाभिमानाने जगू म्हणणाऱ्याने मरावे; परंतु कर्ज कधी काढू नये.
मी ते नमुने घेऊन घरी आलो व आईला दाखविले. त्यांतील एक आईने पसंत केला. किंमत बेताचीच होती. तीन, साडेतीन रुपये काही तरी होती. आईने मजजवळ पैसे दिले व म्हणाली, "हा घेऊन ये. बाकीचे परत कर." मी धोतरजोडे परत केले व एक विकत घेऊन आलो. आईने त्याची दोन पाने निरनिराळी फाडली व त्या प्रत्येकाला कुंकवाचे बोट लावून ठेवले.
वडील गावाहून परत आले, तरी त्यांना ही गोष्ट कळली नव्हती. दिवाळीच्या दिवशी पहाटे मंगल स्नाने झाल्यावर आई वडिलांना नवीन धोतर नेसावयास देणार होती. आम्ही मुले होतो, तरी ती गोष्ट आम्ही फोडली नाही. आईच्या कटात आम्ही तिची मुले सामील झालो होतो.

                            उद्याची दिवाळी. आम्ही टाकळ्याच्या शेंगा आणून त्यांतले इंद्रजव काढिले; ते वाटून आईने अंगाला लावण्यासाठी तयार करून ठहवले. पायाखाली नरकासुर म्हणून चिरडण्यासाठी कारिंटे आम्ही गोळा करून ठेवली. अंगण झाडून स्वच्छ केले. घाण दूर करणे म्हणजेच खरोखर नरकासुर मारणे. नरक हाच असुर आहे. नरक म्हणजे घाण. ह्या घाणीसारखा दुष्ट राक्षस कोण आहे? राक्षस शंभर माणसे खाईल; परंतु घाणीतून उत्पन्न होणारा रोगरूपी राक्षस हजारो लोकांना खातो, तरी तृप्त होत नाही. घाणीसारखा शत्रू नाही. पावसापाण्यात सर्वत्र घाण होते. विष्ठा, शेण सारे आजूबाजूला पडले असते. ही घाण दूर करावयाची, म्हणजे नरकासुराला मारणे होय आणि मोठी गंमत आहे. सत्यभामेने नरकासुराला मारले. ती कृष्णाला म्हणाली, "तुमच्याने हा मरणार नाही, याला शेवटी मीच मारीन." घाण दूर करून स्वच्छता निर्माण करणे यात स्त्रियांचा हातखंडा आहे. पुरुष घरात घाण करतात; परंतु बायका स्वच्छ ठेवतात. बायकांच्या बाहेरपणात पुरुषांच्या हातांत घर असते. ते धड केर काढणार नाहीत, चूल सारवणार नाहीत, शेण नीट लावणार नाहीत, भांडी घासणार नाहीत, दिवे पुसणार नाहीत! चार दिवसांत घर म्हणजे उकिरडा अशी स्थिती करून टाकतात. परंतु स्त्रिया अंग धुताच पुन्हा सारे आरशासारखे स्वच्छ करतात. नरकासुर सत्यभामाच मारील. घाण स्त्रियाच दूर करतील. परंतु अलिकडच्या स्त्रिया घरातील घाण रस्त्यात फेकतात! राक्षस रस्त्यात ठेवला, तरी तो वाईटच. घाण रस्त्यात फेकू नये. म्युनिसिपालिटीच्या पेट्या असतील, त्यांत जवळ जाऊन घाण टाकावी.

                            आम्ही सारे स्वच्छ करीत होतो. तुळशीचे वृंदावन आईने नवीन घातले. आईने पणत्या पुसून तयार केल्या. वाती तयार केल्या. सायंकाळी त्या ठिकठिकाणी आम्ही लावल्या. पहाटे लवकरच उठावयाचे, म्हणून आम्ही मुले लौकर झोपलो. आई मात्र बराच वेळ काम करीत होती. उटणी वगैरे तयार करीत होती.

                            मोठ्या पहाटे उठून आईने बाहेरच्या चुल्यात विस्तव घातला. तिने स्वतः आपले न्हाणे आटोपले व मग आम्हां एकेकाला ती उठवू लागली. अंगाला उटणे, तेल चोळू लागली. आधी तेलाचे पाच ठिपके जमिनीवर काढून मग ती आमच्या अंगाला लावी. खूप पाणी आंघोळीला ती देत होती. वडीलही केव्हाच उठले होते. त्यांनी देवाच्या पूजेसाठी फुले आणून ठेवली. आमची स्नाने झाल्यावर ते आंघोळीस गेले.
आम्ही घरच्या देवाला नमस्कार केले व देवळातून सुद्धा जाऊन आलो. आईने वडिलांना आंघोळीस पाणी दिले. त्यांची आंघोळ झाली. जुना कद नेसून त्यांनी देवाची पूजा केली. देवांना थोडे वासाचे तेल त्यांनी लावले. आज देवांनासुद्धा कढत पाण्याची आंघोळ. रोज बिचारे थंड पाण्याच्या अभिषेकात कुडकुडायचे! परंतु आज त्यांना गरम पाणी. वडिलांनी देवांची पूजा केली. करंजी-अनारशांचा नैवेद्य होता. पहाट झाल्यापासून भुत्ये भिक्षेसाठी येत होते. अंबाबाईची गाणी म्हणत होते, पै-पैसा, पोहे, करंजी मागत होते व आम्ही त्यांना घालीत होतो. वडिलांनी आम्हांला हाक मारली व देवांचा नैवेद्य त्यांनी आम्हांला दिला. रोजचे सूर्याचे नमस्कार घालून ते देवळात गेले. देवळातून थोड्या वेळाने ते परत आले.

"माझे धोतर, ग, कुठे आहे आज? दिसत नाही ते." त्यांनी आईला विचारले.
"त्याची दोन अंगपुसणी केली. किती फाटले होते ते?" आई म्हणाली.
"अग, मग नेसू काय आज? आणखी महिनाभर ते गेले असते." ते म्हणाले.
"त्याचा अंत तरी किती पाहावयाचा? ते धोतर धुताना मला रोज लाज वाटत होती व वाईट वाटत होते." आई म्हणाली.
"अग, मला नेसायला सुद्धा वाटत होती. परंतु करायचे काय? लाज वाटली, म्हणून वरून काही पैसे पडत नाहीत." ते म्हणाले.
"हे धोतर नेसा आज." आईने धोतर पुढे केले.
"हे कोठले? कोणी आणले?" त्यांनी विचारले.
"अमृतशेठकडून मी आणविले." आई म्हणाली.
"अग, तो मला उधार देत नव्हता. मी त्याच्याजवळ मागितले का नाही? परंतु तो उधार देईना. 'माझी पूर्वीची बाकीच कशी वसूल होईल, हीच मला काळजी आहे. तुम्हांला उधार देऊन फसलो,' असे तो मला म्हणाला. तू घेऊन आलीस वाटते? का मोहन्याला बोलावून त्याला गळ घातलीस?" वडील चौकशी करू लागले.
"मी ते विकत आणले आहे. श्यामने जाऊन आणले." आई म्हणाली.
"श्यामजवळ कोठले पैसे?" त्यांनी विचारले.
"मी दिले." आई म्हणाली.
"तुझ्याजवळ कोठले?" त्यांनी विचारले.
"पुण्याहून आप्पाने भाऊबीजेचे म्हणून त्या काळ्या कृष्णाबरोबर पाठविले." आईने सांगितले.
"केव्हा आला काळा कृष्णा?" त्यांनी विचारले.
"झाले दोन दिवस." आई म्हणाली.
"तुझे लुगडे फाटले आहे, त्याला ते झाले असते. तुझ्या भावाने पाठविलेली ओवाळणी-तुझा त्यावर हक्क. ते आम्हांला घ्यावयाचा हक्क नाही." भाऊ म्हणाले.
"तुम्ही व मी निराळी का आहोत? इतकी वर्षे एके ठिकाणी संसार केला; सुखदुःखे पाहिली; नाना बरेवाईट अनुभव घेतले; अजून का आपण निराळी आहोत? माझे सारे तुमचेच आहे व तुमचे ते माझेच आहे. आहे तरी काय आपणांजवळ? तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मीच नवीन लुगडे नेसल्यासारखे आहे. त्यातच माझा आनंद आहे. नेसा, मी त्याला कुंकवाचे बोट लावले आहे." आई म्हणाली.
"मी नवीन धोतर नेसावे व तुला नवीन लुगडे नसावे, याचे मला नाही का वाईट वाटणार? तुला आनंद होत आहे; परंतु मला दुःख होत आहे! तू आपल्याला आनंद मिळविलास आणि मला?" त्यांच्याने बोलवेना.
"माझा आनंद तो तुमचाच आहे. तुम्हांला बाहेर चारचौघांत जावयाचे असते. गंगूअप्पांकडे आज सोंगट्या खेळायला बोलावतील, गेले पाहिजे. मला आज कोठे जायचे आहे बाहेर? पुढे सवड झाली, की आधी मला लुगडे घ्यावे. असे उगीच मनाला लावून घेऊन नये. आज दिवाळी; आज साऱ्यांनी हसायचे, आनंदात राहायचे, आम्हांला आनंद देण्यासाठी तरी आनंदी व्हा." आई म्हणाली.
"तुझ्यासारखी जन्माची सोबतीण व अशी गोड व गुणी मुले असल्यावर मी का आनंदी होणार नाही? मी दरिद्री नसून श्रीमंतांहून श्रीमंत आहे. मग मी का हसणार नाही, का सुखी होणार नाही? आण ते धोतर." असे म्हणून आईच्या हातातून ते धोतर त्यांनी घेतले. ते ते नेसले व देवांना त्यांनी नमस्कार केला.

                            वडिलांचे नेसूचे धोतर पाहून आम्हांलाही आनंद झाला; परंतु खरा आनंद जर कोणाला झाला असेल, तर तो माझ्या आईला. तो अनुभव स्वतःच अनुभवून पाहावा लागतो. प्रेम-पूर्वक त्यागातील आनंद त्याची चव तसे करीत गेल्यानेच समजू लागते. एकदा चटक मात्र लागली पाहिजे.


********************************************************************************************
 रात्र एकविसावी : दूर्वांची आजी          अनुक्रमणिका         रात्र तेविसावी : अर्धनारी नटेश्वर
********************************************************************************************

रात्र तेविसावी : अर्धनारी नटेश्वर

                            मे महिन्याच्या सुटीत मी घरी गेलो होतो. इंग्रजी चवथीत मी गेलो होतो. मी घरी गेलो, म्हणजे आईला आधार वाटे. कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई; दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागावयाची. ताप आला की निजावयाचे, ताप निघताच उठावयाचे. ती फार अशक्त झाली होती. मी आलो, म्हणजे तिला बरे वाटे. मी तिला पाणी भरण्यास, धुणे धुण्यास मदत करीत असे. अंगणाची झाडलोट करीत असे. आईचे पाय चेपायचे, हा तर सुटीतील माझा नेमच झालेला असे.

                            एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते. जेवणखाणे झाली होती. वडील जेवून बाहेर गेले होते, धाकटे भाऊ झोपी गेले होते. आईचे उष्टे, शेण वगैरे झाले. आई मला, म्हणाली, "श्याम! थोडे दळायचे का रे? का तुझे हात दुखत आहेत? संध्याकाळी तू खणले आहेस. घोळीचा दळा केलास ना? हात दुखत असले तर नको."
मी म्हटले, "मुळीच हात दुखत नाहीत. जात्याच्या खुंट्याला तुझा व माझा हात दोन्ही असतात. तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते. चल, मी अंगणात जाते घालतो. पोत्यावर जाते घालतो." आईने घाल म्हणून सांगितले.
                            मी अंगणात जाते घातले. आईने दळण आणले. दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करावयाच्या होत्या. मला आंबोळ्या फार आवडत असत. मायलेकरे अंगणात दळत होती व चंद्र वरून अमृताचा वर्षाव करीत होता. मंद गार वारा सुटला होता. आई ओव्या म्हणत होती व त्या ओव्यात "श्याम बाळ" असे माझे नाव गुंफीत होती. मला आनंद वाटत होता.
दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते. कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे. आईबरोबर दळीत असता मी जात्यात वैरण घालावयासही शिकलो होतो.
आम्ही दळीत होतो. दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकीवयनी आल्या.
"बाई, हे काय, श्याम का दळतो आहे? मी म्हटले, "आज रात्री एकट्या कशा दळीत बसल्यात, म्हणून पाहायला आले, श्याम, हे रे काय? तू इंग्रजी ना शिकतोस?" जानकीवयनी मला म्हणाल्या.
मी आईला विचारले, "आई! दळायला हात लावला, म्हणून काय झाले?"
आई म्हणली, "श्याम! अरे जानकीबाई थट्टा करतात हो तुझी. त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे, म्हणून पाहावयाला आल्या. अरे, काम करणाराला का कोणी नावे ठेवतील? आणि आईला मदत करण्यात रे कसली कोणाची लाज? आईला मदत करणाऱ्याला हसेल, तो रानटीच समजला पाहिजे. तुझ्या भक्तिविजयात जनाबाईबरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत?"
"हो, खरेच आहे! पण खरे असेल का ग ते? देव कबिराचे शेले विणू लागे, जनाबाईचे दळण दळू लागे, धुणी धुऊ लागे; नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी, नाचे खरे का, ग, हे सारे?" असे मी विचारले.
"बसा ना, जानकीबाई, अशा उभ्या का?" असे जानकीबाईस विनवून आई मला म्हणाली, "श्याम, अरे, खरेच असेल ते. देवावर ज्यांची श्रद्धा असते व त्याचे स्मरण ठेवून जे काम करतात, त्यांना देव मदत करतो. तू मला मदत करीत आहेस, ती देवानेच पाठविली. मे महिना आला, की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो. अनेकांच्या रूपाने मदत करावयास देव उभा राहतो. कधी श्यामच्या रूपाने, कधी जानकीबाईंच्या रूपाने."
"आई, मला भेटेल का, गं, देव?" मी एकदम विचारले.
"पुण्यवंताला भेटतो. पुष्कळ पुण्य करावे. सर्वांच्या उपयोगी पडावे. म्हणजे देव भेटतो." आई म्हणाली.
जानकीवयनी मला म्हणाल्या, "श्याम, का बोवा वगैरे व्हायचे आहे की काय; मग शिकतो आहेस कशासाठी? इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर. आईला नोकरीवर ने."
मी म्हटले, "मला साधू व्हावेसे वाटते, भक्त व्हावे, असे वाटते. आई! ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत ध्रुव बसला होता. मी बसलो, तर मला भेटेल का देव?"
आई म्हणाली, "बाळ, ध्रुवाची पूर्वपुण्याई केवढी थोर! त्याचा निश्चय किती अभंग! बाप राज्य द्यावयास लागला, तरी तो माघारी फिरला नाही. इतके दृढ वैराग्य कोठून आणावयाचे? या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर. मग केव्हा तरी देव भेटेल!"
जानकीबाई म्हणाल्या, "श्याम! सोड, मी लावते आता हात. दमला असशील तू."
मी आईला म्हटले, "आई, तूच जरा हात सोड. जानकीवयनी व मी दळतो. जानकीवयनी, मला वैरण घालता येते. डोळे मिटूनसुद्धा घालता येते. मी आता तरबेज झालो आहे. आई, सोड ना हात थोडा वेळ."
मी आईचा हात सोडविला व जानकीवयनी आणि मी दळू लागलो. मी वैरण घालू लागलो. "जानकीवयनी! पाहा, कसे पीठ येत आहे, ते? डोळ्यात घातले, तरी खुपायचे नाही. पाहा ना." मी त्यांना म्हणालो.
जानकीवयनी आईला म्हणाल्या, बाई, "श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलेत!"
आई म्हणाली, "माझ्या घरात कोण आहे मदत करावयास? अजून सून थोडीच आली आहे घरात? श्याम नाही मदत करणार, तर मग कोण करील? जानकीबाई! बायकांना कधी कधी पुरुषांची कामे करावी लागतात. त्यांना कमीपणा थोडाच आहे? श्याम मला डाळ-तांदूळ निवडावयाला लागतो, धुणी धुवायला लागतो, भांडी विसळायला- सर्व कामात मदत करतो. त्या दिवशी माझे लुगडे धुतलेन् हो. मी म्हटले, "श्याम, लोक तुला हसतील." तर म्हणे कसा, "आई! तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे. तुझी चौघडी मी पांघरतो, मग धुवावयाला का लाज वाटेल?" जानकीबाई श्यामला काही वाटत नाही. मी श्यामला बायको करून टाकले आहे, तरी त्याला ते आवडते."

                            मित्रांनो! आईचे ते स्फूर्तिमय शब्द मला अजून आठवतात. पुरुषांच्या हृदयात कोमलता, प्रेम, सेवावृत्ती, कष्ट सहन करण्याची तयारी, सोशिकता, मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे, असे म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य, प्रसंगी कठोर होणे, घरी पुरुषमंडळी नसेल, तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणे, हे गुण येतील, तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला आहे, असे म्हणता येईल. ह्यालाच मी लग्न म्हणतो, लग्न करून हेच साधावयाचे. लग्न करून पुरुष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो. स्त्री बुद्धीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुद्धी, भावना व विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरुषांच्या हृदयात स्त्रीगुण येणे व स्त्रीजवळ पुरुषगुण येणे म्हणजे विवाह होय. अर्धनारीनटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. स्वतः पुरुष अपूर्ण आहे. स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे. परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात. दोन अपूर्णांच्या लग्नाने दोन पूर्ण जीव जणू बनतात. निराळे लग्न लावण्याची आई मला जणू जरूरच ठेवीत नव्हती. प्रेम, दया, कष्ट, सेवा या स्त्री-गुणांशी आई माझे लग्न लावून टाकीत होती.


********************************************************************************************
 रात्र बाविसावी : आनंदाची दिवाळी          अनुक्रमणिका         रात्र चोविसावी : सोमवती अवस
********************************************************************************************

रात्र चोविसावी : सोमवती अवस

                           ज्या सोमवारी अवस येते, तिला सोमवती अवस म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राम्हणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात. सोमवारी अवसेला कोणत्या तरी १०८ वस्तू देवाला वाहावयाच्या असतात. मग पुढे १०८ विडे, १०८ आंबे, १०८ रुपये, १०८ दिडक्या, १०८ केळी, १०८ खण, १०८ पेढे, १०८ नारळ, १०८ लुगडी ज्याला जशी ऐपत असेल, त्याप्रमाणे देवाला द्यावयाचे. दान करावयाचे, अशी घटना आहे. ज्याचा जो उपाध्याय असेल, त्याला हे सारे मिळते. परंतु तो उपाध्यायही सर्व स्वतःच्या घरीच ठेवीत नाही. पारावर इतर उपाध्येमंडळींत तो ते वाटतो. ही पद्धत फारच सुंदर आहे. त्यागावर ती उभारलेली आहे व तीमुळे उपाध्येमंडळींत परस्परांचा द्वेष-मत्सरही करण्याला अवकाश राहात नाही.

                            माझी आई जेव्हा एकत्रात होती, भरल्या घरात श्रीमंतीत होती, तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते. १०८ पावल्या, १०८ विडे, १०८ पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्या वेळेस घातल्या होत्या; परंतु आता गरिबी आली होती. तिलाच नेसावयास लुगडे नव्हते; तर १०८ लुगडी कोठून देणार? तिलाच खावयास नव्हते, तर ती काय देणार? सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही. घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार? पतीजवळ काय होते?

                            नाताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो. सोमवती आली होती. मी आईला विचारले, "या सोमवतीला तू काय घालणार? काय ठरविले आहेस? जानकीवयनी १०८ सुपाऱ्या-ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत."
आई म्हणाली, "बाळ, १०८ पोफळे माझी घालून झाली आहेत. मागे सीता आत्याने पाठविली होती."
"मग तू काय घालणार आहेस? दोन दिवस तर राहिले सोमवतीला. काही ठरवावयास हवे ना! आई! १०८ गूळ म्हणजे का १०८ गुळाच्या ढेपा वाहावयाच्या! १०८ तेल म्हणजे का १०८ तेलाचे डब द्यावयाचे!"
आई म्हणाली, "कोणी १०८ डबे दिले, तरी हरकत नाही. परंतु गरीब असला, तर तो ठरवितो, की १०८ अदपाव देईन; १०८ पावशेर देईन किंवा एकदम सवा मण गूळ, सवा मण तेल असेही देतात. त्यात वाटेल तसे १०८ भाग बसवावे."
मी विचारले, "आई! तू १०८ अदपाव गूळ घातलेस, तर?"
आई म्हणाली, "श्याम! घरात विष खावयास दिडकी नाही, गळफास लावायला सुतळीचा तोडा नाही. कोठून आणावयाचे पैसे? झाड का आहे आपल्या अंगणात? हलविले की पडले पैसे! आपण गरीब आहोत, श्याम!"
मी म्हटले, "# आवळे घातलेस, तर?"
"बाळ १०८ आवळे एकदा मी घातले होते. सोवलीहून त्यांनी आणले होते. आपला सोवलीचा तुकाराम नव्हता का, त्याने दिले होते." आई म्हणाली.
"आई! १०८ चिंचोके घातले, तर नाही का चालणार?" मी हसत हसत विचारले.
आई म्हणाली, "हो, चालतील तर काय झालं! पण-"
"पण काय लोक हसतील, होय ना? हसतील त्यांचे दात दिसतील! त्यांचे हसायला काय जाते? द्यायला थोडेच कोणी येते आहे? हसायला सारे, मदत करायला कोणी नाही. देव तर हसणार नाही ना? देव रागावणार नाही ना?" मी विचारले.
आई म्हणाली, "श्याम! देव नाही रागावणार. अरे, देवाला विदुराघरच्या कण्यासुद्धा आवडल्या; मिटक्या मारमारून त्याने खाल्ल्या. सारखे ताट चाटीत होता, तरी त्याची तृप्ती होईना. देवाने सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले, जसा अधाशी व उपाशी! रुक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना. देव उपाशीच असतो. प्रेमाने त्याला कोण देतो? लाखांत एखादा! प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटात जावयाचे. भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली. देवाला प्रेमाने द्या. ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे. शबरीची उष्टी बोरे. ती कशी खाल्ली रामाने? तू वाचले आहेस ना? देवाला सारे चालते. त्यात भावभक्तीचे तूप ओतलेले असले म्हणजे झाले. त्यात हृदयाचा ओलावा असला, म्हणजे झाले. मग चिंचोकेच काय, पण १०८ दगड जरी देवाला दिलेत, तरी त्याला खडीसाखरेप्रमाणे गोड लागतील! ते प्रेमाने दिलेले दगड तो चघळीत बसेल, शतजन्म चघळीत बसेल व म्हणेल, भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला. पटकन फुटत नाही. विरघळत नाही. एकेक खडा तोंडात धरून ठेवावयास वर्ष पुरेल. श्याम! देवाला रे काय? त्याला काहीही द्या; परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे. श्याम! द्रौपदी, शबरी यांच्या भक्तीइतकी माझी कोठे आहे भक्ती? मला कोठे तशा भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहेत? आपली नाही हो तितकी लायकी."
"मग तू काय घालणार आहेस, सांग ना. ठरविले असशील काही तरी." मी विचारले.
आई म्हणाली, "मी १०८ फुले वाहणार आहे. फुलासारखे निर्मळ व शुद्ध दुसरे काय आहे? फुले वाहीन, हो, मी."
आई म्हणाली, "श्याम! जे वाहावयाचे, ते देवासाठी असते. ते भटजीसाठी नसते. देवाच्या पायांवर वाहिलेले फूल राहील. आपणांस दुसरे काही देता येत नाही, तर काय करावयाचे? देता येईल, ते देवाला द्यावे."
"मग कोणती १०८ फुले वाहणार आहेस? आपणांकडे फुले तरी चांगली कोठे आहेत? नाही तर, आई! १०८ पानेच वाहा. १०८ तुळशीची पाने, १०८ बेलाची पाने, १०८ दूर्वा, आई! देवाला फुलांपेक्षा पानेच का, ग, जास्त आवडतात? कितीही फुले असली, तरी तुळशीपत्र, दूर्वा, बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही. विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दूर्वा, शंकराला बेल. त्यांना फुलांपेक्षा यांचीच आपली जास्त आवड कां, ग, आई?" असे मी विचारले.
आई म्हणाली, "तुळशीपत्र, दूर्वा वगैरे मिळावयास त्रास नाही पडत. वाटेल तेथे होतात. थोडे पाणी घातले, की झाले. फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलावयाची. परंतु पाने आपली नेहमी आहेत. झाड जिवंत आहे, तोपर्यंत पाने आहेतच. पानांचा दुष्काळ फारसा नाही. म्हणून ऋषींनी, संतांनी देवाला पानच प्रिय आहे, असे सांगून ठेवले. ते तरी नेहमी देवाला भक्तीने वाहावयास माणसाला अडचण पडू नये. माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान वाहावयासही लाज वाटू नये. दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये, खण, नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये, म्हणून देवाला पान प्रिय आहे, असे संतांनी ठरविले. श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटावयास नको व गरिबाला गरिबीची लाजही वाटावयास नको, असा या पत्रपूजेत अर्थ आहे. श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली, तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यावयाची. हेतू हा, की श्रीमंताला आपण फार दिले, असे वाटू नये. आपण एक पान दिले, असेच त्याला वाटावे. गणपतीच्या पूजेला, हरताळकांना, मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे. ही साधी, सुंदर पाने आधी हवीत. १०८ तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे."
"मग या वेळेस कशाची फुले घालणार? तू तर सांगतच नाहीस!" मी अधीर होऊन म्हटले.
आई म्हणाली, "मी परवा रात्री त्यांना सांगितले, की सोमवतीला चांगलीशी फुले घालावयाचे ठरविले आहे. झेंडू, पांढऱ्या चाफ्याची फुले ही आहेतच. परंतु जर चांगली सुवासिक आणता आली कोठून, तर आणावी."
मी एकदम म्हटले, "म्हणून भाऊ गावाला गेले आहेत, होय."
"होय, ते जालगावला गेले आहेत. तेथे बर्व्यांची मोठी बाग आहे. त्या बागेत नागचाफ्याची फुलझाडे आहेत. ती १०८ फुले मिळाली तर पाहावी, म्हणून ते लांब गेले आहेत. "आपल्याजवळ पैसे नाहीत; परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत" असे ते म्हणाले." आई म्हणाली.

                            मित्रांनो! चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा व नागचाफा. पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांस सुगंध आहे. सोनचाफ्याचा वास फार असतो; परंतु नागचाफ्याचा गोड असतो. चार बाजूंना चार चार शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपंज असे हे फूल असते. फारच सुंदर दिसते हे फूल.

                            गरिबीत राहूनही ध्येयवाद दाखवणारी व आचरणारी माझी आई होती. पतीला देता येणार नाही, ते त्याच्याजवळ मागून त्याला रडविणारी, खिन्न करणारी ती नव्हती. त्याला लाजविणारी, खाली मान घालावयास लावणारी ती नव्हती. त्याच्या जवळ साधी फुलेच मागणारी, परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा, असे सांगणारी, पतीलाही ध्येयवाद शिकविणारी, देवासाठी झिजावयास लावणारी अशी ती साध्वी होती.


********************************************************************************************
 रात्र तेविसावी : अर्धनारी नटेश्वर          अनुक्रमणिका         रात्र पंचविसावी : देवाला सारी प्रिय ********************************************************************************************

रात्र पंचविसावी : देवाला सारी प्रिय

                            संध्याकाळचे चार-पाच वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती, म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले. "आई! मी जाऊ का बाहेर? कमळ्या देवधराकडे, नाही तर बन्या वरवडेकराकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू येथे आला, तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे, असे सांग. जाऊ का?"
आई म्हणाली, "श्याम! तू जा. परंतु तुला एक काम सांगत्ये, ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक म्हारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती म्हारीण आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये; मी तुला आंघोळ घालीन, जा."
"आई! लोकांनी बघितले, तर मला हसतील. मला मारायला येतील; काव काव करून नुसते खायला येतील मला. खरेच जाऊ?" असे मी विचारले.
"लोकांना सांग 'मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का, म्हणून वाट पाहत बसणार? मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे' वगैरे सांग व घरी ये." असे आई म्हणाली.
                            आईचे म्हणणे ऐकावयाचे, एवढे मला ठाऊक. मी गेलो, मी जणू रस्त्यानेच जात आहे, असे म्हातारीला दाखविले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे, असे तिला वाटू नये, म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, "का, ग, डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी? मी देतो." असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो.
"नको रे दादा, तुम्ही बामण. कोणी पाह्यलं, तर मारतील मला! नको रे दादा. जा, बाबा. कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन, तो देईल डोईवर." असे ती गयावया करून विनवू लागली.
"अग, मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो, घे" असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढविली. "अरे श्याम! ती महारीण ना? अरे, तिला शिवलास काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास, वाटतं? भाऊरावांना सांगितलेच पाहिजे." श्रीधरभट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि "श्याम! अगदीच च्येवलास तू. अरे, काही ताळतंत्र तरी!" असे ते बोलू लागले.
मी त्यांना म्हटले, "मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून काही घर बाटविणर नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जावयाला. नदीतून जावयाचे आहे तिला. मी स्नान करणार आहे. 'स्नानात् शुद्धीः' हे मला माहीत आहे." असे म्हणून मी तेथून गेलो.
मी घरी आलो. आई म्हणाली, "त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कोठे लांब जाईल गोयला घेऊन? पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटीही सरली आहेत. जा, हाक मार तिला."
"ए गोयलेवाली! अग, इकडे ये." मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरविले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, "म्हाताऱ्ये, आजारी का गं आहेस?"
"व्हय, माय. ताप लई येतो. काय करतांव, पोटाला हवं ना!" असे ती म्हणाली.
"दुपारचा भात उरलेला आहे. शिळा झाला आहे. देऊ का तुला?" आईने विचारले.
"द्या, आई, देव तुमचे भले करो. गरिबाचे दुनियेत कुणी नाही, बघा!" दीनवाणी म्हातारी बोलली.
आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला.
"वायच पाणी घालताव, दादा?" ती मला म्हणाली.
पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले. पाण पिऊन दुवा देत ती निघून गेली.
"चल, श्याम, तू आंघोळ कर." आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटले, "आई, मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो. आम्ही मांडवात जेवत होतो. पुरणपोळी खात होतो, आग्रह होत होता; भास्करभटजींना इतका आग्रह झाला, की ते रागावून उठावयास लागले. परंतु आपट्यांनी त्यांना बसविले. परंतु बाहेरच्या त्या महारणीला कोणी काही घातले नाही. ती उन्हात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळ्याचे पाणी वाढीत होते; परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती. "घास घाला हो, दादा." आई! तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे, तर एक गृहस्थ मला त्यांचे नाव नाही माहीत-ते मुंबईला नोकरीस असतात व पीतांबर नेसलेले होते. ते वाढीत होते-ते एकदम मांडवाबाहेर गेले व त्या म्हारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, "लाज नाही वाटत भीक मागायला या वेळी! अजून जेवणेही झाली नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आत ब्राम्हण जेवतात, तर येथे ओरडत बसली! तुम्ही अलीकडे माजलीत म्हारडी! नीघ, का मारू वहाण फेकून!" असे म्हणून आई, त्या पीतांबरधारी मनुष्याने खरेच वहाण उचलली. "नको, रे दादा. नको रे मारु, जात्ये, रे दादा." असे म्हणून ती निघून गेली. आई, हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात. दुसऱ्याचे जोडे पुसतात. यांची ह्या आपल्या गावात ऐट व मिजास! मघाची ती म्हारीण नाही का म्हणाली, "गरिबाला कोणी नाही," तेच खरे. आई! उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला, तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील. त्याला पानसुपारी, अत्तर, गुलाब करतील; त्याच्या गळ्यात हार घालतील. आई! पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म? हाच का, ग, ह्यांचा देव? हातात वहाण घेऊन त्याचा पीतांबर बाटला नाही. पायांत पायतणे घालून ही सोवळी, हे मुकटे, कद हातात घेऊन खुशाल जातात; परंतु ही वहाण ज्याने ह्यांना पायांत घालावयास दिली, तो मात्र घाणेरडा! त्याची सावलीही नको! आई! हे कसे, ग? हे कसले सोवळे? हा का धर्म! देवाला हे आवडेल का, ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे, नाही?"
आई म्हणाली, "बाळ! जगात सारे पैशाला, सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना. ते गरीब होते. तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारीत; परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वऱ्हाड-खानदेशात फावड्यांवारी पैसा मिळविला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना 'पंढरीनाथ बाबा' म्हणू लागले. कुणाच्याशा घरी ते गेले होते. तेथे त्यांना बसावयास पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, "तात्या, हा पाट मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता; मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही. हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हांला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत." श्याम, असे ते म्हणावयाचे. महारामांगाजवळ पैसे नाहीत, म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले, तर आपण महारमांग ठरू. श्याम! महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी. घरी येऊन आंघोळ करावी. कारण समाजात राहावयाचे आहे. समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही, म्हणून ते पापी आहेत, त्यांचा स्पर्श झाला, म्हणून नव्हे. पापी तर आपण सारेच आहोत."
"खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे, असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक मनाने भाकर मिळविणारे महारमांगच अधिक पुण्यवान आहेत, नाही, आई?" मी विचारले.
"श्याम! आपले ते विठनाककडे शेत आहे ना, ते खरे महाराचेच आहे. मला सारे माहीत आहे. काही तरी पूर्वी अदमण गल्ला दिला होता. त्याची सवाई-दिडी करून ते शेत आपण मिळविले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणांला खाली मान घालून उभे राहावे लागेल, हो!" आई खिन्न होऊन म्हणाली.
"आई! दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग झाला? महार म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटते, तर त्याने ते रूप धारण केले असते का ग?" मी विचारले.
आई म्हणाली, "श्याम! देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. ह्यातील अर्थ हाच, की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राम्हणाच्या देहात आहे, माशाच्या आहे, महाराच्याही आहे. देव गजेंद्राच्यासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गाई चारतो. त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते. त्याला गुह कोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम! देवाला सारी प्रिय आहेत. कारण सारी त्याचीच. तू माझा, म्हणून मला आवडतोस; तशी आपण सारी देवाची, म्हणून सारी त्याला आवडतो. मला आवडेल, ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल, ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, परंतु, श्याम! ज्याचे आपल्या आईबापांवर, बहीणभावावर प्रेम नाही, तो महारावर, मांगावर करील का? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा. मग एकनाथाप्रमाणे महाराच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले, म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी तुला काय सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय कळते? तू मोठा झालास, म्हणजे तुला कळेल."
आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली. मला कोणी तरी "श्याम श्याम" म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेलो.
मित्रांनो! आपण खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे वाद पुरून टाकू या. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे, हे लक्षात धरू या. हे जोपर्यंत होत नाही, तो पर्यंत मी असेच म्हणणार.

(पद चाल-मेरे मौलाबुला)
माझ्या भारती या देव मुळी नुरला
सगळा अंधार रे भारतांतरि भरला?
माझ्या..
नाहि दया स्नेह तिथे देव का असे
बंधुभाव तीळ न, तिथे प्रभु कसा वसे
देव मंदिरी ना
देव अंतरी ना
देव तो अजि मेला.
माझ्या..


********************************************************************************************
 रात्र चोविसावी : सोमवती अवस          अनुक्रमणिका         रात्र सव्विसावी : बंधुप्रेमाची शिकवण
********************************************************************************************