रात्र बारावी : श्यामचे पोहणे

                            कोकणामध्ये पावसाळयात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हातानेसुध्दा पाणी घेता येते, इतक्या भरतात. पावसाळयामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना या वेळेसच पोहावयास शिकवितात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. सहा सहा पुरूष खोल पाणी असले, तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टी पोहणारे असतात. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांटया उडया मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगडया खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन, माना वर करून होडया करितात. नाना प्रकार करितात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांना पोहता येत असे. परंतु मला मात्र पोहता येत नव्हते.

                            दुसरे पोहत असले, म्हणजे मी मजा पाहावयास जात असे. परंतु स्वत: मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उडया टाकीत. परंतु मी मात्र भित्री भागुबाई! 'ढकला रे श्यामला!' असे कोणी म्हटले, की मी तेथून पोबारा करीत असे.

                            माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, 'अरे श्याम! पोहायला शीक. ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती? तुला बुडू का देतील इतके सारे जण? उद्या रविवार आहे. उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू, तो तुला शिकवील. नाहीतर भावोजींबरोबर जा. अरे उठल्याबसल्या आपल्याला विहिरीवर काम. येथे का पुण्यामुंबईचे नळ आहेत? पोहावयास येत असावे. कुसाताईची वेणी व अंबी, त्यासुध्दा शिकल्या पोहायला. तू बांगडया तरी भर! पण बांगडया भरणा-या मुलींहून सुध्दा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या. त्या बांध कमरेला वाटले तर. आणखी धोतर बांधून वर धरतील. उद्या जा हो.'

                            मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला. मी कोठेतरी लपून बसायचे ठरविले. आज आई पोहावयास पाठविल्याशिवाय राहणार नाही, असे मी नक्की ओळखले होते. मी माळयावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण आठ वाजायची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू आले.

'श्यामची आई! श्याम येणार आहे ना आज पोहायला? ह्या पाहा सुखडी आणल्या आहेत.' बन्या म्हणाला.

'हो, येणार आहे; परंतु आहे कोठे तो? मला वाटले, की तुमच्याकडेच आहे. श्याम! अरे श्याम! कोठे बाहेर गेला की काय?' असे, म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो.

मुले म्हणाली, 'तिकडे आमच्याकडे नाही बोवा आला. कोठे लपून तर नाही बसला? आम्ही वर पाहू का, श्यामची आई?

आई म्हणाली, 'बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर-घुशीसारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माच्याखाली लपून बसला होता; पण वरती जरा जपून जा हो. तो तक्ता एकदम वर उचलतो. अलगत पाय ठेवून जा.'

                            मुले माळयावर येऊ लागली. आता मी सापडणार, असे वाटू लागले, मी बारीक बारीक होऊ लागलो. परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले, की भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळयातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर! भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो.

'नाही रे येथे, तो का येथे लपून बसेल अडचणीत?' एक जण म्हणाला.

'चला आपण जाऊ; उशीर होईल मागून.' दुसरा म्हणाला.

इतक्यात भास्कर म्हणाला, 'अरे, तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे. श्यामच तो!' सारे पाहू लागले.

'श्याम! चल ना रे, असा काय लपून बसतोस ?' सारे म्हणाले.

'आहे ना वर? मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला. नेल्याशिवाय राहू नका!' आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले. ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावीत होतो.

'श्यामची आई! तो काही येत नाही व हलत नाही.' मुले म्हणाली.

आईला राग आला व ती म्हणाली, 'बघू दे कसा येत नाही तो. कोठे आहे कार्टा-मीच येत्ये थांबा.' आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढिले. ती मला फरफटत ओढू लागली. तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती व दुस-या हाताने ती शिंपटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली.

'तुम्ही हात धरा व ओढा. मी पाठीमागून हाकलते व झोडपते चांगला! बघू कसा येत नाही तो!'

मुले मला ओढू लागली व आई शिंपटीवर शिंपटी देऊ लागली. 'नको ग आई मारू! आई, आई मेलो!' मी ओरडू लागलो.

'काही मरत नाहीस! ऊठ, तू उठून चालू लाग. आज मी सोडणार नाही तुला. पाण्यात चांगला दोन चार वेळा बुडवा रे याला. चांगले नाकात तोंडात पाणी जाऊ दे. ऊठ. अजून उठत नाहीस? लाज नाही वाटत, भिकारडया, लपून बसायला? त्या मुली आल्या बघ फजिती बघायला!' असे म्हणून आईने जोराने मारणे चालविले.

'जातो मी. नको मारू!' मी म्हटले.

'नीघ तर. पुन्हा पळालास तर बघ. घरात घेणार नाही!' आई म्हणाली.

'श्याम! अरे मी सुध्दा उडी मारते. परवा गोविंदकाकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारिली. मजा आली.' वेणू म्हणाली.

'सोडा रे त्याचा हात. तो येईल हो. श्याम! अरे, भीती नाही. एकदा उडी मारलीस, म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले, तरी तू आपण होऊन उडया मारशील. रडू नकोस.' बन्या म्हणाला.

देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरूण होतेच. 'काय, आज आला का श्याम? ये रे. मी सुखडी नीट बांधतो, हो.' अस म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेत सुखडी बांधल्या. विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. 'हं, मार बघू नीट आता उडी.' बाळू म्हणाला.

मी आता डोकवावे पुन्हा मागे यावे, पुढे होई, पुन्हा मागे. नाक धरी, पुन्हा सोडी. असे चालले होते.

'भित्रा! वेणू, तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारील.' वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा करून उडी मारली. इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिले.

मी ओरडलो, 'मेलो-आई ग, मेलो.'

पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळयाला मी मिठी मारू लागलो. ते मिठी मारू देत ना.

'आडवा हो अस्सा. पोट पाण्याला लाव व लांब हो. हात हलव.' मला पोहण्याचे धडे मिळू लागले.

बाळूनेही उडी घेतली व त्याने मला धरिले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला.

'घाबरू नकोस. घाबरलास म्हणजे लौकर दम लागतो. एकदम कडेला धरावयाला नको बघू आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये.' बाळू वस्तुपाठ देत होता.

'आता फिरून उडी मार. चढ वर.' बन्या म्हणाला.

मी पाय-या चढून वर आलो, नाक धरिले. पुढे मागे करीत होतो; परंतु शेवटी टाकली एकदाची उडी!

'शाबास, रे श्याम! आता आलेच पोहणे भीती गेली की सारे आले.' बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरिले व आणखी शिकविले. 'आता आणखी एक उडी मार. म्हणजे आज पुरे.' सारी मुले म्हणाली.

वर येऊन मी उडी टाकिली. बाळूने न धरिता थोडा पोहलो. माझ्या कमरेला सुखडी होत्या, म्हणून बुडण्याची भीती नव्हती. माझा धीर चेपला. पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्याबरोबर मला पोचवावयाला आली.

बन्या म्हणाला, 'श्यामची आई! श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली. मुळी भ्यायला नाही आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळूकाका म्हणाले, की 'श्याम लौकरच शिकेल चांगले पोहायला.'

                            'अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम डोके चांगले पूस. ती शेंडी पूस.' आई म्हणाली. मुले निघून गेली, मी डोके पुसले. सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावून बसलो होतो. जेवणे वगैरे झाली. आई जेवावयास बसली होती. मी ओसरीवर होतो. इतक्यात 'श्याम' अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, 'काय?' आई म्हणाली, 'ती दह्याची कोंढी घे. आत दही आहे चाटून टाक. तुला आवडते ना?'

                            'मला नको जा, सकाळी मारमार मारिलेस आणि आता दही देतेस.' मी रडवेला होऊन म्हटले, 'हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोचलो, तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन?'

                            आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवेना. ती हात धुऊन आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली. हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का, असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, 'श्याम! तू भित्रा आहेस असे का जगाने तुला म्हणावे ? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत. श्यामला कोणी नाव ठेवू नये म्हणून मी त्याला मारिले. श्याम! तुझ्या आईला 'तुमची मुले भित्री आहेत', असे कोणी म्हटले, तर ते तुला आवडेल का? ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला, तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला, तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये, असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे. रागावू नको. चांगला धीट हो. ते दही खा व जा खेळ. आज निजू नको, हो. पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो.'

गडयांनो! माझ्या आईला धीट मुले हवी होती. भित्री नको होती.


********************************************************************************************
 रात्र अकरावी : भूतदया                       अनुक्रमणिका                 रात्र तेरावी : स्वाभिमान- रक्षण
********************************************************************************************

रात्र तेरावी : स्वाभिमान- रक्षण

                            "जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते, दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार. कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी, असे सांगितले आहे. इतर देशांतही उपाध्याय आहेत; इतर धर्मांतही ते आहेत. काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो; आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देई.' श्यामने आरंभ केला.

                            'आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते. शेवंतीवाङनिश्चय जेव्हा करितात, तेव्हा उभय मंडळपात-वधूवर मंडपात-दक्षिणा वाटतात. आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात. वधूघरचा एक उपाध्याय व वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात. जितकी वराकडची तितकीच वधूकडची. वराकडच्यांनी चार चार आणे दिले, तर वधूपक्षही चार चार आणे देतो. जो हात पुढे करील, त्याला दक्षिणा देण्यात येत असते. लग्नाला जेव्हा मंडळी जाते, तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळीजवळच बसलेली असली, तर हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळते. 'अरे, आपण नाही हो हात पुढे करावयाचा' वगैरे ते मुलांना सांगतात.

                            परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही. पैशासाठी आपण हपापलेले आहोत. फुकट मिळेल, तेवढे घ्यावे. अशी वृत्ती झाली आहे. आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात व श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढताना मी पाहिलेले आहेत. श्रीमंतसुध्दा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील. श्रीमंतांची मुलेसुध्दा नादारीसाठी अर्ज करतील. दारिद्रयाचा व दास्याचा हा परिणाम आहे.

                            मी लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो. शाळेतील बरोबरीची आम्ही मुले एकत्र बसलो होतो. एका बाजूने बसले, म्हणून खोडया करता येतात, टवाळकी करता येते. कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा, कोणाच्या खिशात खडे टाक, कोणाला हळूच चिमटा घे, असे चालते. दक्षिणा वाटण्यात आली. काही मुलांनी हात पुढे केले. मीही माझा हात पुढे केला. सहज गोष्ट होऊन गेली. माझ्या लक्षात चूक आली नाही. लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो. मी ते दोन-आणे घेऊन घरी आलो व मोठया हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो. जणू माझ्या कमाईचे, माझ्या श्रमाचेच ते होते! भटजी बाराबारा वर्षे मंत्र शिकतात, ते विधी करितात, तर त्यांना घेऊ दे. मला ते दोन आणे घेण्याचा काय अधिकार? प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा, तरच ते शोभून दिसते.

                            आईने विचारले, 'कोठले रे पैसे?' मी म्हटले. 'शेवंतीवाड्.निश्चयाचे लग्नात मिळाले.' आई एकदम ओशाळली. तिचे तोंड म्लान झाले. आम्ही गरीब झालो होतो. आपण गरीब, म्हणून मुलाने दक्षिणा आणली का? का आपण गरीब झालो, म्हणून कीव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला, तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे, 'वेडया! तू का हात पुढे करावयाचा? तू त्या डोंग-यांकडचा ना? माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाहीत? त्यांना आमची कीव आली. जगात दुसर्‍याने आपली कीव करावी याहून करुणास्पद व दु:खप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे? आईच्या मनात असे शेकडो विचार त्या वेळी आले ती बोलेना. शून्य दृष्टीने पाहत राहिली.

'आई, घे ना ग पैसे. मी काही चोरून नाही हो आणले,' मी काकुळतीस येऊन म्हटले.

                            आई म्हणाली, 'श्याम! आपण गरीब असलो, तरी गृहस्थ आहोत. आपण भिक्षुक नाही. भिक्षुकीचा धंदा आपला नाही. आपण दक्षिणा घ्यायची नसते, ते आपले काम नाही. आपण दुस-याला द्यावी. भटजी वेद शिकतात, धार्मिक कामे करतात, त्यांना शेतभात नसते, ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न.'

मी म्हटले, 'आपल्या गावातील ते पांडूभटजी किती श्रीमंत आहेत! त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का? सावकारी करतात; शेतीभाती आहे. हे असले कसले भटजी?'

                            आई म्हणाली, 'तो त्यांचा दोष. पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली, तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत; घरी मुले शिकावयास ठेवीत. त्या पांडवप्रतापात नाही का, की नळराजाने ब्राह्मणास खूप धन दिले. ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसर्‍याना वाटून दिले. ऋषींच्या घरी किती तरी मुले शिकावयास राहत असत. आपण गृहस्थ. आपण दक्षिणा घेऊ नये. तू पुन्हा पुढे हात करू नकोस. रोहिदास पाणपोईचेही पाणी प्यायला नाही. गृहस्थाने जगास द्यावे. जगापासून घेऊ नये.'

                            आईने ते दोन आणे शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले. मित्रांनो! जगापासून जितके आम्ही घेऊ, तितके जगाचे आपण मिंधे होत असतो. आपण दीनवाणे होत असतो. दुस-यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो. दीनवाणे जगणे हे पाप आहे. ताठरपणे, उन्मत्तपणे जगणे हेही पापच. जगाचे मिंधे होणे नको. युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकविण्यात येत असते. आईबापांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिंधेपणा व कमीपणा मानतात. अमेरिकेचे प्रेसिडेंट हूव्हर यांची गोष्ट सांगतात. त्यांनी आपल्या तेरा वर्षे वयाच्या मुलास मजुरीने काम करावयास पाठविले. धनाढय अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हूव्हर होते; परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंडयाच्या हातांखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालले होते. ते चालले असता काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला. हूव्हरसाहेबास वाईट वाटले; परंतु ते म्हणाले, 'माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकविण्यासाठी माझा मुलगा मेला!'

                            स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे. स्वावलंबनाने मान वर राहते. परावलंबनाने मान खाली होते. श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये. 'तुका म्हणे घेतो तोही नरका जातो!' आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशीही पापी. कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा, दीनवाणा असतो व आपण ऐटीत असतो. याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करुन घ्यावे, लाकडे फोडून घ्या, कपडे धुऊन घ्या, जमीन खणून घ्या. काहीतरी काम करून घ्या. त्यात खरोखरच त्या माणसाचा उध्दार आहे.

                            उद्योगहीनास पोसण्यात देवाचा अपमान आहे. देवाने दिलेल्या हातापायांचा, बुध्दीचा अपमान आहे. स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम ह्यांची महती आज रशियात शिकविण्यात येत आहे. नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता. रशियातील परिस्थिती, तेथील अंतर्बाह्य परिवर्तन पाहावयास तो गेला होता. मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या (फाऊंटन पेने), चाकोलेटच्या वडया, सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या. मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला. परंतु एकही हात पुढे झाला नाही. कोणीही वस्तू घेतली नाही. तो म्हणाला, 'घ्या, मी प्रेमाने देत आहे.' ते मजूर म्हणाले, 'स्वत:च्या श्रमाने मिळवावे. दुसर्‍याने दिलेली देणगीही घेऊन कदाचित मनात आलस्य, मिंधेपणा व परावलंबन यांचा उदय व्हावयाचा. या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरविले आहे.'

तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला. केवढी ही विचारक्रांती! ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत, तेथे एकही हात पुढे झाला नाही. केवढे स्वावलंबन केवढे तेज, केवढी श्रमाची पूजा!

                            श्रमात आत्मोध्दार आहे, फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल, तो सुदिन. घरी दारी, शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे. उष्टे कोणाला घालू नये, असा धर्मनियमच झाला पाहिजे. खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होय. आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा, दोघे किडेच! श्रीमंतही दुस-याच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो. हे दोघे समाजवृक्षावरील बांडगुळे आहेत. उन्हातान्हात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, मेलेली गुरे फाडणारा ढोर, वहाणा बांधणारा चांभार हे सारे, आयतेखाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत. काहीतरी निर्माण करा. विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा. काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकर असे, निर्माण करा; तरच जगण्याचा तुम्हांस अधिकार आहे. ज्या राष्ट्रात समाजसंवर्धक, समाजरक्षक, समाजपोषक श्रमाची पूजा होते, ते राष्ट्र वैभवावर चढते. बाकीची भिकेस लागतात.

माझ्या आईने मला स्वाभिमान शिकविला; मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकविले; दुसर्‍याचे घेऊ नकोस, दुसऱ्यास दे, हे शिकविले.


********************************************************************************************
 रात्र बारावी : श्यामचे पोहणे                 अनुक्रमणिका                रात्र चौदावी : श्रीखंडाच्या वड्या
********************************************************************************************

रात्र चौदावी : श्रीखंडाच्या वड्या

                            आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या. त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारीपाजारी बोलावीत असत व आईही आनंदाने जात असे. दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद.

                            पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती. पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती. वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास लावी. एक दिवस आई मला रागे भरली होती. त्या वेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते. वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे.

                            त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, "श्यामची आई! वेणू परवा सासरी जाणार. तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणत्ये. तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी? तुम्ही कशा छान करता! तिच्या सासरी पाठवावयाच्या आहेत, तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले." माझी आई म्हणाली, "येईन हो. वेणू परवाच का जाणार? मला वाटले होते की, राहील संक्रांतीपर्यंत. मलासुद्धा तिची करमणूक होती. यायची, गाणी म्हणून दाखवायची." पार्वतीबाई म्हणाल्या, "तिच्या सासरचे पत्र आले आहे, पाठवून द्या म्हणून. मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे! आली चार दिवस, पुष्कळ झाले. त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्षे झाली, तरी माहेरी पाठवीत नाहीत. तिची आई त्या दिवशी रडली हो. त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना? मग या हं उद्या. वेणूला तुम्हांला बोलवायला पाठवीन. जात्ये मी." आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या. दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली, परंतु आईला बरे वाटत नव्हते. उष्टी-खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली. मी आईला विचारले, "आई, निजलीसशी?" "श्याम! अंग दुखते आहे. जरा चेपतोस का?" आई म्हणाली. मी आईचे अंग चेपू लागलो. आईचे अंग कढत झाले होते. तिचे कपाळ मनस्वी दुखत होते. मी मग बाहेर खेळावयास गेलो. इकडे वेणू आईला बोलवायला आली. आई निजली होती. "येता ना श्यामची आई, आई तुमची वाट पाहते आहे." वेणू गोड वाणीने म्हणाली. आई उठली. आई तिला म्हणाली, "जरा पडले, तो डोळा लागला. मी विसरल्ये नव्हत्ये. आता येणारच होत्ये. चल." आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली. निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या. मी खेळून घरी आलो तो आई नाही. मी आईला शोधू लागलो. शेवटी वेणूताईकडे गेलो. मला अंगणात पाहताच, "काय, रे श्याम! आईला पाहावयास आलास वाटते? ये, तुझी आई माझ्यासाठी वड्या करिते आहे. मी उद्या सासरी जाणार आहे, श्याम." वेणू मला बोलली. मी म्हटले, "जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागावली, तर माझी बाजू कोण घेणार?" मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले. "ये श्याम! आपण केशराची पूड करू. तू ते वेलदोडे नीस व त्याचे दाणे काढ." वेणूच्या कामात मी मदत करू लागलो. वेणूने केशर खलले व मी सहाणेवर वेलदोड्याची पूड केली. "श्याम! कशाला रे आलास?" आईने मला विचारले. आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले, "मी काही वड्यांसाठी नाही आलो. वेणूताई! मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास. मी मागितला होता का?" वेणू म्हणाली, "श्याम! तू चांगला आहेस. श्यामची आई! श्यामला रागे भरत जाऊ नका." आई म्हणाली, "वेण्ये! अगं, मला का माया नाही? एखादे वेळेस रागावते. पण त्याच्या बऱ्यासाठीच. श्यामला जगाने नावे ठेवू नयेत, म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला. तो चांगला आहे. परंतु आणखी चांगला व्हावा, असे मला वाटते. पार्वतीबाई, पाक झाला हो. पाहा, गोळी झाली." ताटात वड्या थापण्यात आल्या. आई केळीच्या पानाने भराभर थापीत होती. पाच मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली, "पार्वतीबाई, थोड्या वेळाने वड्या काढून घ्या, मी आता जाते." वेणू म्हणाली, "थांबा ना थोडा वेळ. तुमच्या हाताने सारे करून जा." आईला नाही म्हणवेना. थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या. कशा सुंदर झाल्या होत्या! पार्वतीकाकूंनी त्या डब्यात भरल्या. वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली. वेणूची आई म्हणाली, "श्याम, हे ताट खरवडून खा. घे." मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले. पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वड्या ठेविल्या व आई कुंकू लावून घरी गेली. मी वेणूकडेच बसलो होतो. "श्याम! तुझे सद्र्याचे बटण तुटले आहे वाटते. सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देत्ये." वेणू म्हणाली. मी वेणूताईला सदरा काढून दिला. तिने फणेरे काढले. बायका सुईदोरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात, त्याला कोकणात फणेरे म्हणतात. वेणूताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते, तेथेही शिवले. मी सदरा अंगात घातला. वेणूताई म्हणाली, "श्याम! चल, गुलबाक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ." आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो. माझ्याबरोबर वेणूही आली होती. "श्यामची आई!" वेणूने हाक मारली. परंतु आई कोठे होती? ती विहिरीवर गेली होती, का गोठ्यात होती? ती अंथरुणावर होती. आम्ही एकदम आईजवळ आलो. वेणू म्हणाली, "निजल्यातशा? बरे नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का?" वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला. "श्यामची आई! बराच आला आहे हो ताप!" ती खिन्नपणे म्हणाली. मी म्हटले, "वेणूताई! आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते. ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपीत होतो." वेणूने विचारले, "मी तुम्हांस बोलावण्यास आले होते तेव्हा तुम्हांला बरे नव्हते वाटत का? म्हणून का तुम्ही पडला होतात? मला काय माहीत? तुम्ही बोललासुद्धा नाही. श्यामची आई! अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात?" आई म्हणाली, "वेणू! अगं, त्या वेळेस काही फार ताप नव्हता हो. अंग जरा कणकण करीत होते एवढेच. श्याम! जा, बाळ, दिवा लाव, तिन्हीसांजा झाल्या." मी दिवा लावला व देवातुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होते. ती गहिवरून म्हणाली, "श्यामची आई! तुम्ही अंगात ताप असता वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला. नसत्या वड्या झाल्या तर नसत्या. आईने कशा तरी केल्या असत्या. प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत?" माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, "अगं, अशा एवढ्याशा तापाने काय होते? वेणू, आम्हां बायकांना त्याचे काही वाटत नाही. अंगात ताप फणफणत असावा, कपाळ दुखत असावे, तरी धुण्याची मोट घेऊन ती आम्ही धुऊन आणतो. दहा माणसांचा स्वयंपाक करितो. असे मनाला लावून नको घेऊ. अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईन. जा आता तू घरी. आई तुझी वाट पाहत असेल." वेणू आईजवळ बसली. ती जाईना. मी वेणूस म्हटले, "वेणूताई! त्या फुलांची माळ करतेस? आईला ताप आला आहे. तूच कर." वेणूताईने माळ केली. वेणू आईला म्हणाली, "श्यामची आई! माझ्यासाठी हा तुम्हांला त्रास. हा ताप." आई म्हणाली, "वेण्ये, वेड्यासारखे काय बोलतेस? तू मला परकी का आहेस? जशी माझी चंद्रा, तशीच तू. वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेविली असती, तर तुला किती वाईट वाटले असते? माहेरच्या माणसांस नावे ठेविलेली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते. वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत, म्हणून मी आल्ये. पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी. त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली, म्हणून काय झाले? तुला श्याम परका वाटत नाही, तशीच मला तू वाटत नाहीस. मला त्रास का झाला? केवढे समाधान वाटते आहे मला! वड्या करायला आल्ये नसते, तर मनाला सारखी रुखरुख लागली असती. जा हो आता घरी. मी सकाळी येईन. रात्री घाम येऊन ताप निघेल. सकाळी मोकळी होईन." वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली, "श्याम! चल तू आमच्याकडे. आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पडघुलीभर तुझ्याजवळ देत्ये. मग तुझ्या आईने नुसता भात केला, म्हणजे झाले. नाही तर मी भात ठेवूनच जाते." माझी आई म्हणाली, "वेण्ये! अग श्याम ठेवील भात, तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले." परंतु वेणूने ऐकले नाही. तिने विस्तव पेटविला, तांदूळ घेऊन ओवरा धुतला व आधण येताच भात ठेवून निघाली. तिच्याबरोबर मीही गेलो. मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली. माझे डोळे भरून आले होते.

आई म्हणाली, "श्याम! काय झाले?" मी म्हटले, "वेणू म्हणाली, 'श्याम! तुझी आई फार थोर आहे. तू तिचे ऐकत जा. तुझे भाग्य मोठे, म्हणून अशी आई तुला मिळाली." असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरविला व मला एकदम रडू आले ते मला अजून आवरत नाही." "जा बाळ! भात झाला असेल, तर उतरून ठेव; नाही तर खालून ओढेल." आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला. दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली. आम्हां सर्वांना वाईट वाटले. त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात. वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या. वेणूसुद्धा जगली नाही; परंतु ते प्रेम अजून आहे. ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात; परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात.


********************************************************************************************
 रात्र तेरावी : स्वाभिमान- रक्षण          अनुक्रमणिका         रात्र पंधरावी : रघुपती राघव राजाराम
********************************************************************************************

रात्र पंधरावी : रघुपती राघव राजाराम

                            लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या, साधुसंतांच्या गोष्टी सांगायचा. मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते. लहानसे मखर केले होते. त्याला बेगड वगैरे लावून ते सजविले होते. सुंदर शाळिग्राम या देवळात मी ठेविला होता. तो शाळिग्राम फार तेजस्वी दिसत असे. चंद्रहासप्रमाणे तो शाळिग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा, असे मला वाटे.

                            रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू. कधी कधी आम्ही कथाकीर्तनही करत असू. आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्ये थोडीच होती! घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तोच जोरजोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई.

विठोबाला वाहिली फुले भजन करिती लहान मुले विठोबाला वाहिली माळ भजन करिती लहान बाळ

वगैरे किती तरी भजने म्हणत आम्ही नाचत असू. भक्तिविजयातील निरनिराळ्या प्रसंगींचे धावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू.

                            गजेंद्राची ऐकून करुणा सत्वर पावलासी, जगज्जीवना प्रल्हादरक्षका मनमोहना पावे आता सत्वर द्रौपदीलज्जानिवारणा पांडवरक्षका, मधुसूदना गोपीजनमानसरंजना अनाथनाथा रुक्मिणीवरा भीमातीरवासी विहारा जगद्वंद्या जगदुध्दारा पावे आता सत्वर

वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गदित होते.

                            आम्ही त्या वेळेस फार मोठे नव्हतो. मराठी पाचवीत मी होतो. वय अकरा वर्षांचे होते नव्हते. परंतु भक्तिभावाने आजच्यापेक्षाही त्या वेळेस मी मोठा होतो. त्या वेळेस ना शंका, ना संशय. गोड श्रध्दाळू भावमय भक्ती. निर्जळी एकादशी मी करावयाचा. परमेश्वराचा जप करायचा, कार्तिकस्नान, माघस्नान, वैशाखस्नान वगैरे करावयाचा. कथासारामृत या पोथीत स्नानाचे महत्त्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली, तर अमृत होते, असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राम्हणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले, अशी कथा दिली आहे. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते. मी आईला विचारले, "मी पहाटे अंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळीन. मग तो उठेल. नाही का?"

                            आई हसली व म्हणाली, "तू वेडा आहेस."त्या वेळची ती भोळी श्रध्दा चांगली, की आजचा संशय चांगला, मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या. मी गोष्ट सांगणार आहे, ती निराळीच.

                            चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणी तरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी चार, साडेचारच्या सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते. त्या वेळेस आजोळच्या घरी आम्ही राहात होतो. देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले, तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला दहा-पाच पुरुष व दहा-वीस बायका बसत असत.

                            त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले होते. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून, देवदर्शन घेऊन ती परत येत असे. घरात कोणी नव्हते. आम्ही मुले जमलो होतो. भजन करण्याचे ठरले. घरातील रिकामे डबे आणले. टाळ घेतले व भजन सुरू झाले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा कर्कश आवाज आम्हांला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजांत संगीत वाटते. मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो. परंतु मोठ्या माणसांस ती कटकट होते!

"श्रीराम जयराम जयजयराम" असा घोष दुदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो. प्रभुसवे लढू आम्ही कुस्ती प्रेमाची चढली मज मस्ती रे प्रेमाची चढली मज मस्ती

                            आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्रीबोवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना. "काय शिंची कार्टी!"असे कोणी म्हणू लागले. "हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे-येथे पुराण चालले, समजू नये का?" "पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे? त्यांनी बंद नको का करायला!" "अहो, पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवितात." अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो.

                            देवळातील मंडळींनी गुरवाला बोलाविले व त्याला ते म्हणाले, "जा, रे, त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर. येथे पुराण चालले आहे." परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते.

                            आई आल्याचे आम्हांला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, "श्याम!" तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले, टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. "काय झाले आई?" मी विचारले. "लाज नाही रे वाटत हा धुडगूस घालायला-" आई रागाने बोलली. "आई, हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळिग्राम मला दिलास? बघ, कसा दिसतो आहे! छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावलीस होय?" मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरव आला व म्हणाला, "श्याम, देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडधिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने." "आम्ही नाही बंद करणार जा. त्यांचे पुराण चालले आहे, तर आमचे भजन चालले आहे." माझा एक मित्र म्हणाला. "अरे श्याम, जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि ह्या झांजा? मोठ्याने ओरडले म्हणजेच देव मिळतो, असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल, तर ते रे कसले भजन?" आई शांतपणे म्हणाली. "साधुसंतसुध्दा टाळ वाजवीत व भजन करीत." मी म्हटले. "परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत. इतरांना त्रास झाला असता, तर त्यांनी भजन थांबविले असते. श्याम, तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजविणे प्रिय आहे?" आईने विचारले. "वाजविले म्हणजे आई, रंग चढतो. नुसते नाव कंटाळा आणील." मी म्हणालो. "हळूहळू टाळ्या वाजवा. ताल धरा, म्हणजे झाले. मुद्दाम अडून बसू नये. वाजविणे ही महत्त्वाची गोष्ट नाही. तुम्हांला देवाच्या नावापेक्षा आरडाओरडा व वाजविणे हेच आवडते? श्याम, ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो, ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये, माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत, तर तुमचेही काम होईल व देवळात पुराण पण नीट चालेल. भिकू, जा तू. हे नाही हो गलका करणार." असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला.

                            आम्हां मुलांत वादविवाद सुरू झाला. "मोठे आले डुढ्ढाचार्य आम्हांला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावच्या कुटाळक्या करीत बसतात!" वगैरे आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे, ते ठरेना. शेवटी मी म्हटले, "आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणू या व नुसत्या टाळ्या वाजवू या. मोठ्याने वाजविण्यात काय आहे?" "श्याम! तू भित्रा आहेस. आपल्याला नाही हे आवडत." बापू म्हणाला. "यात भित्रेपणा कोठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे. अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे?" मी विचारले. माझ्यावर रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना रामनामापेक्षा डबे बडविणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर "रघुपती राघव राजाराम" करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले. त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहीन. लहानपणाप्रमाणेच आजही रडत रामराम म्हणत बसेन. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे : "तुला एकटेच जावे लागेल. जा, तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंजावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल. परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक. तुला एकट्यानेच जावे लागेल."

रात्र सोळावी : तीर्थयात्रार्थ पलायन

                            सिंहस्थात नाशिकला व कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते. त्या वेळेस उत्तरेकडची गंगा, दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटावयास येते, अशी गोड कल्पना आहे. आपल्या भारतवर्षात निसर्गाला सुध्दा कोमल भावना दिल्या आहेत. निसर्गाला मानवी कुटुंबातला बनविला आहे. दूरदूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटावयास येतात, मग माणसांनी भेद नये का विसरू? हा महाराष्ट्रीय व हा गुजराती, हा बंगाली व हा मद्रासी, हा पंजाबी व हा परदेशी, असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो! परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचे ऐक्य नाना रीतींनी आपल्या मनावर ठसविण्याचे प्रयत्न केले आहेत. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखूनही मधुर मीलन करता येते. गंगा सागराला मिळालेली आहे व तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. भेदात अभेद पाहणे, ही पूर्वजांची थोर दृष्टी होती.

                            त्या वर्षी कन्यागत असल्यामुळे वाईला हजारो स्त्री-पुरुष यात्रेला जात होते. आमचा लहानसा पालगड गाव वाईपासून कित्ती दूर! परंतु आमच्या गावाहून बैलगाड्या करून किती तरी लोक जात होते. माझे एक चुलत आजोबा-माझ्या आईचे चुलते-त्यांच्या पत्नी व इतर गावातील बरीच मंडळी जाण्याचे ठरत होते. चांगल्या दहा-बारा गाड्या एकदम निघणार होत्या. पालगड ते खेड व खेड ते चिपळूण असे मुक्काम करीत त्या गाड्या जाणार होत्या. वाटेत रानात उतरावे, नदीकाठी मुक्काम करावा, पिठलेभात करावा, जेवावे व पुढे जावे, असे करीत मंडळी जाणार होती. अशा प्रवासात खूप मजा येते. मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत नाही. सृष्टिमाईजवळ एक मिनिट उभे राहावे व जावे, त्यात काय आनंद! आईच्या मांडीवर लोळावे, तिच्याजवळ बसावे, खेळावे. यातील सुख, त्याचे वर्णन का करता येईल? निसर्गही आपली माताच. त्या मातेला भरभर पाहण्यात काय अर्थ? तिच्याजवळ घटका घटका राहू या. या बैलगाड्यांच्या प्रवासात फार मौज असते. रात्रीच्या वेळी तर फारच आनंद. शांत वेळ असते. झाडांमधून वरचे तारे व चंद्र मधून मधून डोकावत असतात. बैलांच्या गळ्यांतील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो! आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा, त्याचे ते आगीसारखे, ताऱ्यांसारखे डोळे! हाकारे करावे व वाघ पुन्हा जंगलात शिरावा. त्या बैलगाड्यांच्या प्रवासात हे सारे अनुभव मिळत असतात.

                            लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मलाही वाटले, की आपणही वाईस या सर्वांबरोबर जावे. मी आईच्या पाठीमागे लागलो होतो; परंतु माझे कोणी ऐकेना. मला फार वाईट वाटले. मी आईला म्हटले, "आई! जाऊ दे ना मला! मी वाटेत हट्ट करणार नाही. खोल पाण्यात जाणार नाही. तात्या (माझे चुलत आजोबा) सांगतील तसा वागेन. भाऊंना (वडिलांना) सांग, म्हणजे ते नाही म्हणणार नाहीत. आई! त्या पोथीत स्नानाचे महत्त्व आहे म्हणून मी माघस्नान, कार्तिकस्नान सारी केली. मला गंगेचे स्नान करून येऊन दे. तुझा मुलगा पुण्यावान नको का व्हायला?"

                            आई म्हणाली, "श्याम! अरे, आजच्याने काय झाले? तू पुढे मोठा हो व जा गंगा-गोदांना भेटायला. आज आपण गरीब आहोत. नाही म्हटले, तरी पाच-सहा रुपये तुझ्याकरिता द्यावे लागतील. कोठून आणायचे, बाळ, पैसे? आईबापांची आज्ञा हीच तुझी कृष्णा, हीच गंगा. पुंडलीक आईबापाचे पाय सोडून, समोर देव आला तरी उठला नाही. तो त्यांचे पाय चेपीत बसला. खरं ना?"

                            परंतु मी म्हटले, "आई! ध्रुव तर आईबापांना सोडून गेला. पुराणात दोन्ही प्रकार आहेत. आई! पुढचे कोणी पाहिले आहे? चांगले करावयाचे मनात आले, की लगेच करावे. त्याला वेळ बघत बसू नये, असे त्या सत्यनारायणाच्या कथेत नाही का? आई, जाऊ का? तात्यांना सांगितले, तर ते मला फुकटसुद्धा नेतील. ते का पैसे मागतील?"

                            आई म्हणाली, "अरे ते पैसे घेणार नाहीत, हा त्यांचा मोठेपणा; परंतु असे आपण ओशाळवाणे जीवे का? दुसऱ्यावर बोजा घालावा का? दुसऱ्यांच्या जिवावर देवाची पूजा नाही करता येत. दुसऱ्यांनी लावलेल्या व वाढविलेल्या फुलझाडांची फुले तोडून देवाला वाहण्यात काय रे स्वारस्य? स्वतः श्रमावे, स्वतः मिळवावे व देवाला अर्पण करावे. जायचे असेल, तर पायी जा. आहे ताकद?"

                            मी म्हटले, "आई! मी दमून जाईन. सहा कोस चालेन. परंतु पुढे? आणि गाड्या पुढे निघून जातील. मला सोबत? मला भीती वाटेल आणि गाड्यांबरोबरच चालत जाणे म्हणजे त्यांना लाजविणे. ते मग मला गाडीत घेतीलच. त्यांना तर मी पायी येत आहे, हे कळता कामा नये. परंतु त्यांची सोबत तर हवी आणि पुन्हा इतके चाळीस-पन्नास कोस माझ्याने चालवेल तरी कसे?"

                            आई म्हणाली, "ध्रुवाच्या गप्पाच सांग. ध्रुवाला भीती वाटली नाही. जो देवाकडे जावयास निघाला, त्याला कोणाची आली आहे भीती? साप-वाघ त्याला मार्ग दाखवितील. खाणार नाहीत. तो दमून जर रस्त्यावर झोपला व त्याच्या तोंडावर उन्हाचा कवडसा पडला, तर साप त्याच्यावर फणा धरील. त्याला तहान लागली, तर पक्षी चोचीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालतील. त्याला भूक लागली, तर गाय-माऊली येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडील. देवाकडे जो जावयास निघाला, त्याला सारे मित्र, सारे सखे. त्याचे सारे गडी, सीरे साहाय्य करणारे. आहे का ध्रुवाची श्रद्धा? त्याचा तो भाव? वेडा! हे काय? रडावयास काय झाले? अरे, आपण लहान माणसे. अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत. वेडा हट्ट घेऊ नकोस."

                            मला खूप वाईट वाटले. उजाडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती. त्या गाड्यांच्या पाठोपाठ त्याना न दिसू, अशा रीतीने आपण जावे, असे मनात येत होते. आपण दमू, थकू, आपणांस भूक लागेल, खायला काय? नाना शंका मनात येत होत्या; पाणी प्यावे व झाडाचा पाला ओरबाडून खावा, बकरी पानांवर जगते, आपण जगू. चिंचेची, करवंदीची कोवळी पाने खाऊ, असे मनात योजत होतो. रात्री विचार करता करता केव्हा झोप लागली, ते कळलेही नाही. मी उठलो, तेव्हा साऱ्या गाड्या निघून गेल्या होत्या. त्या दिवशी शनिवार होता, शाळा होतीच. मी पटकन परसाकडे, तोंड धुणे आटोपले. झटपट आंघोळ केली. संध्या केली. नमस्कार घातले. तुळशीला पाणी घातले. पाटी-दप्तर घेऊन मी शाळेत जावयास निघालो.

आई म्हणाली, "अरे इतकी घाई का? मी पानगी करत्ये, ती खा व मग जा शाळेत. बन्या, बापू कोठे अजून गेले आहेत? बस जरा."

मी रागाने म्हटले, "मला नको जा पानगीबिनगी. खायला देतेस; पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस. मला वाईची भूक आहे, खायची नाही. मी आपला शाळेत जाऊन बसतो."

                            आई जरा रागाने म्हणाली, "पुन्हा माग तर खरे खायला. बघ देईन का. सारे तुझ्या मनाप्रमाणे झाले पाहिजे. मोठा राजाच की नाही तू? राजाच्या तरी पोटी यायचे होते. भिकाऱ्याच्या घरात जन्मून राजाची ऐट रे कशी चालणार? चांगली पानगी देत्ये, ती नको म्हणतो, दुपारी पण नको जेवूस. खायची भूक नाही म्हणे. किती दिवस राहतोस उपाशी, ते तरी बघत्ये. श्याम, मागे फीर, आईचे ऐकावे हो सांगितलेले."

                            परंतु मी न ऐकता झपाझप जात होतो. अजून शाळेत मुले यायला लागली नव्हती. वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला व "देवा! माझा निश्चय तू टिकव. तू माझा साहाय्यकारी हो." अशी प्रार्थना केली. मी शाळेत गेलो, तेव्हा एकसुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता. शाळा अद्याप उघडलीही नव्हती.

                            माझे दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवले व मी शाळेतून बाहेर पडलो. मुलांनी मला पाहू नये, म्हणून मी झपाट्याने जात होतो. मी गावाबाहेर आलो. गावची नदी ओलांडली व पुढे चाललो. तिठ्ठ्यावर आलो. जेथे तीन रस्ते फुटतात, त्या जागेला तिठ्ठा म्हणतात. एका बाजूला दापोलीचा रस्ता होता, एका बाजूला खेडचा होता. मी खेडचा रस्ता धरला व चालू लागलो. पहाटे निघालेल्या गाड्या किती तरी लांब गेल्या होत्या. त्या गाड्या दहा-अकरा वर्षांचा मुलगा कशा गाठणार? मला माझे भानच नव्हते. परंतु ऊन लागू लागले. मी दमून गेलो. मला रडू येऊ लागले. घरी परत जाण्याची लाज वाटू लागली. परंतु घरी नाही जावयाचे, तर कोठे जावयाचे? रानात कोठे राहणार आणि किती वेळ राहणार?

                            मी माघारी वळलो, माझ्या गावाकडे पावले वळविली. डोळ्यांतून पाणी गळत होते व सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जात होते. जणू सूर्याचे किरण माझे अश्रू पुशीत होते. भर दुपार होण्याची वेळ. सूर्य डोक्यावर आला. मी घामाघूम झालो. सकाळपासून पोटात काही नव्हते. मी पालगड गावाजवळ आलो. परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली. स्वाभिमान म्हणे, "गावात जाऊ नको. परत घरी जाऊ नकोस." पोट म्हणे, "घरी जा." घरी न जाण्यात कसला स्वाभिमान? आई-बापांशी का स्वाभिमान दाखवायचा? प्रेम करणाऱ्यासमोर स्वाभिमान दाखविणे म्हणजे प्रेमाचाच अपमान आहे.

                            गावात शिरण्याचे धैर्य मला झाले नाही. गावाबाहेर नदीकाठी झोळाईचे देऊळ होते. ही आमची ग्रामदेवता. बाळंतिणी झोळाईचे देऊळ होते. ही आमची ग्रामदेवता. बाळंतिणी बाळंतपणातून उठल्या, की मूल घेऊन झोळाईला जातात. तिची खणानारळांनी ओटी भरतात. माहेरवासिनी सासरहून आल्या तर झोळाईला जातात. मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो. त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार आहे. अंधारात लपून बसलो.

                            परंतु किती वेळ बसणार? पोटात कावळे ओरडत होते. शेवटी लाजलज्जा सोडली. स्वाभिमान दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो. गावच्या रस्त्याला लागलो. गावातील घरे दिसू लागली. खाली मान घालून चाललो होतो. पाय चटचट भाजत होते. आत हृदय जळत होते. वरून डोळे गळत होते. असा मी चाललो. डोळे भरून येऊन पुढे काही दिसत नव्हते. इतक्यात माझे मनगट कोणी तरी धरले! "अरे, आहेस तरी तू कोठे? तुला शोधायचे तरी किती? गळ्याला फास लावायचास एखाद्या वेळी!" असे शब्द माझ्या कानी पडले. ते माझे चुलते होते. गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता. चुलते, वडील, घरची, शेजारची सारी माणसे मला धुंडीत होते. शाळेतील मुलांनी पाटीदप्तर घरी आणून दिले; तेव्हा कळले की, मी हरवलो.

                            आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोडी पुस्ती वाईट आली होती, म्हणून मला मारले होते. मी निघून गेलो, त्यामुळे पुन्हा आज मार बसेल कदाचित, म्हणून गेलो असेन, असे हेडमास्तरांस वाटले. ते हेडमास्तर फार मारकुटे होते. निगडीच्या काठ्यांचा भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवीत व मुलांना गुरासारखे झोडपीत. छत्रीच्या लोखंडी काडीनेसुद्धा मुलांच्या उपड्या हातावर, बोटांच्या पेऱ्यांवर ते मारीत. ते गांजा ओढीत असत व तर्र होऊन येत असत. त्यांची बदली व्हावी, म्हणून देवाला आम्ही नवस करीत होतो. मी पळून गेलो, म्हणून त्यांना वाईट वाटले. आपल्या मारण्यामुळे हा परिणाम झाला, असे त्यांनी मनात घेतले. ते जरा घाबरले. या श्यामने विहिरीत जीवबीव तर नाही ना दिला, अशी त्यांना धास्ती वाटली. शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले, तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशीच्या पुस्तीबद्दलच्या माराची हकीकत सांगितली. वडिलांना वाटले, की माराला भिऊन श्याम पळाला. वडील पहाटे उठवून मला घरी खर्डे घासायला व कित्ता गिरवायला लावीत असत. अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो. "मास्तरांनी उगीच श्यामला इतके मारले. पोरगा कोठे गेला? आता काही कमीजास्त झाले, तर; न व्हावे ते झाले, तर!" असे शेजारी म्हणू लागले. वडील हेडमास्तरांकडे गेले व त्यांना पुष्कळ टाकून बोलले.

                            हेडमास्तर म्हणाले, "आजपासून तुमच्या मुलाला चार बोटेही लावणार नाही. म्हणजे तर झाले ना? तुमची मुले चांगली व्हावी, म्हणून लावतो हात. मला त्यात काय मिळायचे आहे? तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही बरे, भाऊराव!"

परंतु वडील म्हणाले, "पुन्हा लावणार नाही. परंतु आधी सापडू दे तर खरा!"

                            घरात जेवणे तशीच राहिली होती. आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो, अशी शंका आली; परंतु तिने ती बोलून दाखविली नाही. तिला ते शक्य वाटले नाही. चुलत्यांनी माझी बकोटी धरून आणिले. रस्त्यात मुलांची गर्दी. चोराला पाहावयास जसे लोक जमतात, तसे मला पाहावयास मुलगे जमले. वाटेत वडीलही भेटले. "जा रे आपापल्या घरी. का तमाशा आहे?" वडील मुलांना रागाने बोलले व मुले निघून गेली.

वडील माझ्यावर रागवले नाहीत, काही नाही. ती वेळ रागे भरण्याची नव्हती. मी दमलो होतो. घरी येऊन अंथरुणावर पडलो.

                            थोड्या वेळाने वडील आले व म्हणाले, "श्याम! ऊठ बाळ. पुन्हा नाही हो मास्तर मारणार. अरे, मास्तरांनी मारले तर असे पळून का जावे? आमच्या वेळेस तर घोडीवर सुद्धा चढवीत. मुलाला उलटे टांगून खालून मिरच्यांची धुरी घालीत व वर छड्या मारीत. माराला भिऊन कसे चालेल? मास्तर मारणारच. मारणार नाही, तो कसला मास्तर? ऊठ. हातपाय धू. तोंड बघ कसे झाले आहे कोकंब्यासारखे लाल. वाढ ग त्याचे पान आधी."

                            मी उठलो. हातपाय धुतले. माझ्या पळण्याचे निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेले पाहून मनात जरा बरे वाटले! मारण्याचे आता कमी करतील, असे वाटले. माझ्यामुळे ते जपून वागतील व इतर मुलांनाही मारलेच, तर बेताने मारतील, असे मनात येऊन आनंद झाला. इतर मुलांवर मी केवढा उपकार केला, असे वाटले. ती मुले माझे आभार मानतील, असे वाटले. बाजीरावाच्या पळण्याने मराठ्यांचे स्वराज्य गेले, परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य, अगदी पूर्ण जरी नाही, तरी वसाहतीचे तरी मिळाले! आणि हे सारे श्यामच्या ध्यानीमनी नसताही!

                            मी का पळून गेलो होतो, हे तीन जणांना माहीत होते. मला, आईला व देवाला. शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हतीच. मी जेवून पुन्हा निजलो. खूप दमलो होतो व ऊनही सडकून लागले होते. तिन्हीसांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली, तरी मी झोपलेलाच होतो. आई माझ्या अंथरुणाजवळ आली. ती माझ्याजवळ बसली. तिने माझ्या कपाळाला हात लावून पाहिले. तिने हाक मारली, "श्याम!" मी डोळे उघडले. आईने अंगावर हात ठेवला होता. ती वात्सल्याने म्हणाली, "श्याम, बरे नाही का वाटत? अंग दुखते? मी सांगितले, तरी ऐकले नाहीस!" असे म्हणून आई माझे अंग चेपू लागली. मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेविले व रडू लागलो. माझे रडणे आवरून मी आईला म्हटले, "आई! मी तुझे ऐकले नाही. असा पळून गेलो, म्हणून तू रागावलीस होय? मास्तरांनी मारले, म्हणून नाही हो मी पळालो. तू नाही का एखादे वेळेस मारीत! म्हणून पळतो का मी? भाऊंना वाटले, की त्यासाठी मी पळालो. तू काल म्हणालीस, "जायचे, तर पायी जा. आहे ताकद?" आई! मी पायी जाऊ पाहत होतो. परंतु माझ्या शक्तीपलीकडचे मी करू पाहत होतो. कोठे बाळ ध्रुव आणि कोठे तुझा शेंबडा श्याम! आई, तुझ्या श्यामवर रागावू नकोस. तुझा श्याम आततायी व हट्टी आहे. मनात येईल, ते तो करू बघतो. मग असा फसतो व रडतो. तू नाही ना रागावलीस? तुझे न ऐकता व न सांगता पळून गेलो, म्हणून नाही ना रागावलीस. सांग, आई सांग. नाही म्हण."

                            माझे तोंड कुरवाळून व माझे डोळे पुसून आई म्हणाली, "श्याम मी का रागावेन? मला रागही आला नाही व तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही. तुझ्या काळजीमुळे वाईट वाटले. तू लहान, तुझे कसे होईल यामुळे डोळे भरून येत होते. मी काल तसे बोलल्ये, माझेच शब्द कारण म्हणूनही वाईट वाटत होते. परंतु तू पळून गेलास, हे फार वाईट केलेस, असे मनात येऊन सुद्धाही वाईट वाटले नाही. श्याम, तू वाईट गोष्टीसाठी थोडाच पळून जात होतास? परवा गावातला कुणाचासा मुलगा नाटक कंपनीत जाण्यासाठी पळून गेला, तसा का तू पळून जात होतास? तू देवासाठी पळून जात होतास. गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास. तुला मी कशी रागावू? बाळ, तुझा मला अभिमानच वाटेल. माझा श्याम पळून गेलाच तर देवासाठी गेला, असे मी अभिमानाने म्हणेन. श्याम! एक लक्षात ठेव, तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव- "चोरी-चहाडी करून पळू नकोस. वाईट संगतीसाठी पळू नकोस. भीतीने पळू नकोस. देवासाठी पळून गेलास तर जा. साऱ्या संतांनी तेच केले. देवासाठी माझा मुलगा पळून जावा. अशी मी प्रार्थनाही करीन!"



********************************************************************************************
 रात्र पंधरावी : रघुपती राघव राजाराम      अनुक्रमणिका     रात्र सतरावी : स्वावलंबनाची शिकवण
********************************************************************************************

रात्र सतरावी : स्वावलंबनाची शिकवण

                            "मी लहानपणी पोथ्यापुराणे पुष्कळ वाचली; परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देवं,... अनन्तं वासुकिं शेषं,... अच्युतं केशवं विष्णु..., अशी दोन-चार लहान लहान स्तोत्रेच येत होती. 'अनन्तं वासुकिं' हे नागाचे स्तोत्र आहे. ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकविले होते. परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हते. विष्णुसहस्त्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे. त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते. वडिलांना रामरक्षा येत होती; परंतु त्यांनी ती मला शिकविली नाही. रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते. मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येऊ नये, याचे मला वाईट वाटे."

                            आमच्या शेजारी गोविंदभटजी परांजपे राहात होते. त्यांचा एक मुलगा भास्कर, त्याच्याजवळ रामरक्षेचे पुस्तक होते. तो रोज एक-दोन श्लोक पाठ करीत होता. संध्याकाळ झाली, म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे. ते ऐकून मला राग वाटे व भास्करचा राग येई. आपला अहंकार दुखावला गेला की, आपणांस राग येत असतो. आपण नेहमी आपल्या भोवती असणारांची स्वतःबरोबर तुलना करीत असतो. या तुलनेत आपण जर हिणकस ठरलो, तर आपणाला राग येत असतो. उंच मनुष्य पाहून जो खुजा बुटबैंगण असतो, त्याला त्याचा तिरस्कार वाटतो. आपल्याहून दुसरा हुशार आहे, असे पाहून आपण दुःखी होतो. भास्करला रामरक्षा येते, याचे मला वैषम्य वाटे आणि तो मुद्दामच परवचा, स्तोत्र वगैरे म्हणण्याच्या वेळेसच आमच्याकडे येऊन ते श्लोक जरा ऐटीने म्हणे. त्यामुळे मला जास्तच चीड येई. हा आपणांस मुद्दाम चिडविण्यास ऐटीने येतो, असे पाहून मी फार संतापे.

                            एके दिवशी भास्कर मला म्हणाला, "श्याम! आता दहाच श्लोक माझे राहिले. आणखी पाच-सहा दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल. तुला कोठे येते?" मी एकदम संतापलो व चिरडीस गेलो. मी त्याच्या अंगावर धावून गेलो व ओरडलो, "भाश्या! पुन्हा येशील तर बघ मला असे हिणवायला. तुम्हांस येते ते आहे माहीत आम्हांला. एवढी ऐट नको. तुझ्याजवळ पुस्तक आहे म्हणून. माझ्याजवळ असते तर तुझ्याआधी पाठ केली असती. मोठा आला आहे पाठ करणारा. जा आपल्या घरी. येऊ नको आमच्याकडे. मी मारीन नाही तर." आमची शब्दाशब्दी व बाचाबाची ऐकून आई बाहेर आली. तिने भास्करला विचारले, "काय रे झाले भास्कर? श्यामने का तुला मारले?" भास्कर म्हणाला, "श्यामच्या आई! मी नुसते म्हटले, की आणखी पाच-सहा दिवसांनी सारी रामरक्षा माझी पाठ होईल, तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणे, तुला मारीन, नाही तर चालता हो." आई माझ्याकडे वळून म्हणाली, "होय का रे श्याम? असे आपल्या शेजारच्यांना म्हणावे का? तूच चारदा त्यांच्याकडे जाशील." मी रागातच म्हटले, "तो मला मुद्दाम हिणवायला येतो. "तुला कोठे येते रामरक्षा?" असे मला हिणवीत तो म्हणाला. विचार त्याला, त्याने असे म्हटले की नाही ते. जसा अगदी साळसूद. स्वतःचे काही सांगत नाही. खोटारडा कुठला."

                            आई म्हणाली, "मला रामरक्षा येते व तुला येत नाही, असे त्याने म्हटले, यात रे काय त्याने चिडविले? खरे ते त्याने सांगितले. आपला कमीपणा दाखविला म्हणून रागवावे कशाला? तो कमीपणा दूर करावा. तू सुद्धा रामरक्षा शिकावी असे भास्करला वाटते, म्हणून तो तुला चिडवितो. रामविजय, हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस, पण रामरक्षा पाठ का नाही करीत?" मी म्हणालो, "भाऊ शिकवीत नाहीत व मजजवळ पुस्तक नाही." आई म्हणाली, "भास्करचे पुस्तक आहे ना, ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा. नाही तर त्याच्या पुस्तकावरून ते उतरून घे व पाठ कर."

                            भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात काही निश्चय करीत होतो. येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरून घ्यावयाची, असे मी ठरविले. मी कोरे कागद घेऊन त्यांची वही शिवली. लेखणी चांगली तयार करून ठेवली व रविवारची वाट पाहात बसलो. रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो. भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही, म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो व तिला गोड शब्दांत म्हटले, "भीमाताई! भास्करला रामरक्षेचे पुस्तक आजच्या दिवस मला द्यावयाला सांगता का? मी रामरक्षा उतरून घेणार आहे. मला पाठ करावयाची आहे. आज सुट्टी आहे. मी सबंध दिवसभर लिहून काढीन."

भीमाताईंनी भास्करला हाक मारिली व त्या म्हणाल्या, "भास्कर! श्याम एवढा मागतो आहे, तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक. तो काही फाडणार बिडणार नाही. श्याम! शाईचे डाग वगैरे नको, हो, पाडू. नीट जपून वापर. दे रे त्याला." परंतु भास्कर देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला, "आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे. मी नाही त्याला देणार पुस्तक. माझे पाठ करावयाचे राहील."

                            भीमाताई भास्करला रागावल्या, "तुझे अगदी आजच अडले आहे, नाही का रे? उद्या परवा पाठ कर. तुझ्या शेजारचा श्याम ना? त्याच्याजवळ, कसली अढी दाखवितोस? दे त्याला, नाही तर बघ." भीमाताईंचा राग भास्करला माहीत होता. भास्करने रागारागाने ते पुस्तक मला आणून दिले.

                            मी ते पुस्तक घेऊन घरी आलो. लिहावयास एकांत मिळावा, म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसलो! गुरे चरावयास गेली होती. दौत, लेखणी, वही, सारे सामान सिद्ध होते. रामरक्षा लिहावयास सुरुवात केली. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक रामरक्षा लिहून झाली. दुपारची जेवणे होताच पुन्हा लिहावयास बसलो. लिहिणे संपले, त्या वेळेस मला किती आनंद झाला होता, केवढी कृतार्थता वाटत होती. माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा! माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदादिकांच्या हस्तलिखित पोथ्या किती तरी होत्या. ठळक, वळणदार अक्षर, कोठे डाग नाही, अशा त्या पोथ्या मी पाहिल्या होत्या. पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र हातांनीच पोथ्या-पुस्तके लिहून घेत. सर्व जगात तीच पद्धत होती व ज्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर, त्याला मान मिळत असे. मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील किती तरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वतःसाठी स्वतः लिहून घेतले होते, ते दिले आहे. त्या काळात आळस माहीत नव्हता. छापखाने नव्हते. पुस्तकांची टंचाई. काशीहून पुस्तके मोरोपंत बारामतीस बोलावून घेत व त्यांचे हस्तलिखित करून घेऊन पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवीत! समर्थांच्या मठांतून ग्रंथालये असत व हजार हजार पोथ्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत. आज छापखाने गल्लोगल्ली आहेत, पुस्तकांचा सुकाळ आहे; तरीही ज्ञान बेताबाताचेच आहे. मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे. जीवन सुधारले किंवा सुसंस्कृत झाले, अधिक माणुसकीचे झाले, अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्यदक्षतेचे झाले, अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले, असे दिसत नाही. परंतु ते जाऊ दे.

                            मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता खरा. भास्करचे पुस्तक मी नेऊन दिले. "काय, रे श्याम! इतक्या लवकर लिहून झाले?" भीमाताईने विचारले. मी म्हटले, "हो! ही पाहा वही. भास्करला दुपारून पाठ करावयास पुस्तक हवे, म्हणून मी सारखा लिहितच होतो." "वा! छान आहे तुझे अक्षर. आता पाठ कर, म्हणजे भास्कर चिडवणार नाही." ती म्हणाली.

                            मी घरी आलो व रामरक्षा सारखी वाचीत होतो. एका आठवड्यात पाठ करून टाकावयाची, असे मी ठरविले. पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करावयाचे, असे मनात मी योजिले. रोज मी रामरक्षेची किती पारायणे करीत होतो, देवच जाणे. परंतु वेळ मिळताच वही हातांत घेत असे, मला संस्कृत व्याकरण येत नव्हते, तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता व पाठ करताना खूप आनंद होत होता.

                            शेवटी दुसरा रविवार आला. माझी रामरक्षा पाठ झाली होती. संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात व मी त्यांना रामरक्षा म्हणून केव्हा एकदा दाखवितो, असे मला झाले होते. शेवटी संध्याकाळ झाली. घरात दिवे लागले व आकाशात तारे चमचम करू लागले. मी अंगणात फेऱ्या घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणून बघत होतो. वडील आले व हात-पाय धुऊन घरात गेले.

                            त्यांनी विचारले, "काय, श्याम! परवचा, स्तोत्र वगैरे झाले का सारे?" मी एकदम म्हटले, "हो, सारे झाले. तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का?" ते एकदम म्हणाले, "तू कधी शिकलास? आणि कोणी शिकविली?" मी सांगितले, "भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली व पाठ केली." "बघू दे तुझी रामरक्षेची वही." ते कौतुकाने म्हणाले.

                            मी माझी वही त्यांच्यापुढे ठेविली. वहीची पाने सुंदर आखलेली होती. डाग कोठे नव्हता. परंतु अक्षर किरटे होते. वडील म्हणाले, "शाबास, अक्षर नीट आहे; परंतु जरा लांबट काढावे. असे बुटके काढू नये. म्हण पाहू आता." मी रामरक्षा खडाखड म्हणून दाखविली. वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरविला. त्यातील आनंद-तो कसा वर्णन करून सांगता येईल? जेवणे होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो. "आई, बघ; कशी आहे माझी वही? मी तुला कोठे दाखवली होती? मी तुझ्यावर रागावलो होतो." असे प्रेमाने म्हटले. आई म्हणाली, "तू उतरून घेतलेस, हे मला माहीत होते. तुझे अक्षर बघावे, म्हणून कितीदा मनात येत होते. परंतु तू आपण होऊन दाखविशील, अशी मला आशा होती. तू मला त्या रविवारीच दाखवायला हवी होतीस! आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर कोणाला? वाईटाबद्दल आई रागावेल, परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करील, तितके कोण करील? आपला मुलगा गुणी होत आहे, याचा आनंद आईला किती होत असेल? तो माझा आनंद तू माझ्यापासून आठ दिवस लपवून ठेवलास. रोज वाटे, श्याम आज आपली वही मला दाखवील व मी त्याला पोटाशी धरीन. परंतु आईवर रागावलास! होय ना! आईला वही दाखविली नाहीस. बरे, पण जाऊ दे. आता झाली की नाही रामरक्षा पाठ? पुस्तक नाही, म्हणून रडत बसला असता, तर झाली असती का? अरे, आपल्याला हात, पाय, डोळे सारे आहे. स्वतःच्या पायांवर उभे राहावे. ज्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारे काही आहे. असाच कष्ट करून मोठा हो. परावलंबी कधी होऊ नको. परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव. दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते, या गर्वाने कोणाला हिणवू नकोस. कोणाला तुच्छ लेखू नकोस. दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे." असे बोलून आईने वही हातात घेतली. तिला आनंद झाला. कृतार्थता वाटली. "या पहिल्या पानावर रामाचे चित्र असले, की झाली खरी रामरक्षा! तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र. त्याच्या दुकानातील कापडावरून असतात. माग त्याच्याजवळ व चिकटव. तू आज देवाला फार आवडशील, हो श्याम! कारण तू स्वतः कष्ट करून, सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलेस!"



********************************************************************************************
 रात्र सोळावी : तीर्थयात्रार्थ पलायन          अनुक्रमणिका         रात्र अठरावी : अळणी भाजी ********************************************************************************************

रात्र अठरावी : अळणी भाजी

                            राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, "राम! मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वांत मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टीही ऐकावयास मिळतील. मला त्या फार आवडतात." राम म्हणाला, "त्यांना गोष्टी म्हणावे, का प्रवचने म्हणावी; व्याख्याने म्हणावी; का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही. ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते." राजा म्हणाला, "श्याम बोलतो, त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते. म्हणून सांगण्याला एक विशेषच माधुरी असते. म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो." "अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोक्ते आहेत. सगळाच रुपया शुद्ध चांदीचा असेल, तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावी लागते, तेव्हाच तो खण् वाजतो व व्यवहारात चालतो." राम म्हणाला. "माझ्या मनात एक विचार आहे. तुला सांगू? तू हसशील." राजाने विचारले. "सांग, मी हसणार नाही. कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधी हसत नाही." राम म्हणाला. "श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर? मुलांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील; आईबापांस त्या उपयोगी पडतील; श्यामच्या सांगण्यात कोकणातील संस्कृती भरलेली आहे. या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे. नाही?" राजाने विचारले. "परंतु श्यामला ते आवडणार नाही. त्याला आत्मविश्वास नाही. कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य, भडक पाहिजे. "त्यांना 'लैला-मजनू'च्या गोष्टी पाहिजेत." असे तो म्हणतो." राम म्हणाला. त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली. प्रार्थनेची घंटा. दोघे मित्र आश्रमात जावयास निघाले. श्याम राजाची वाट पाहात होता. राजा व राम दोघे येताना त्याला दिसले. "आज मला नाही रे हाक मारलीत? अगदी दोघेच गेलात?" श्यामने विचारले. "तू वाचीत होतास, म्हणून नाही बोलाविले. दिवसभर इतर काम असते, थोडा वेळ वाचीत होतास तर अडथळा करू नये, असे वाटले." राजा म्हणाला. "अरे, मला तरी कोठे फारसे वाचावयास आवडते? विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्यांची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातील सुखदुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का?" श्याम म्हणाला. "श्याम, तू भरपूर वाचले आहेस, म्हणून असे म्हणतोस. सृष्टीचा ग्रंथ वाचावयास शिकावे लागते. शेतकऱ्याच्या आनंदाचे कवी वर्णन करतात; परंतु शेतकऱ्यास तो उपभोगता येत नाही. कारण त्याला ती दृष्टी नसते." राजा म्हणला.

                            इतक्यात दुसरी घंटा झाली. सारे प्रार्थनेला बसले. प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली: "मित्रांनो! प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते, ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही. कृती ही मुकेपणाने बोलते. शब्दांहूनही हे मुके परिणामकारक असते."

                            कसे जेवावे याचीसुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे. माझे वडील नेहमी सांगावयाचे, "आपल्या पानाकडे पाहून जेवावे. पानावर वस्तू असता मागू नये. येईल तेव्हा घ्यावे. पंक्तीत सर्वांना वाढायला आणतील, तेव्हा आपणांसही मिळेल. हावरेपणा करू नये. शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये. पानातील पदार्थांवर टीका करू नये. पानात गुंतवळ किंवा काही सापडले, तर निमूटपणे काढावे. वाच्यता करू नये. दुसऱ्यास वर करून दाखवू नये. कारण दुसऱ्यांना किळस येते. विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे. पान कसे लख्ख करावे." या सांगण्याप्रमाणे वडील स्वतः वागत असत. मी अनेकांना जेवताना पाहिले आहे; परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ व निर्मळ दिसे, तसे मी कोठेही पाहिले नाही. त्या ताटात कोणी जेवले आहे की नाही, हे समजण्याचीही मारामार पडे. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसावयाचा नाही. माझ्या पानाभोवती जर शिते दिसली, तर रागावत व म्हणत, "मथुरीचे एक कोंबडे जेवेल, इतकी शिते सांडली आहेस. कर गोळा सारी." "अमुक वाईट, हे असेच झाले, याला चव नाही." वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सारेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे. "राजमान्य!" त्यांना कोणी विचारावे, "भाजी कशी झाली आहे?" त्यांचे उत्तर ठरलेले असे. "राजमान्य." जेवणाची कोणतीही खोडी त्यांना नव्हती.

                            एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळास गेले, म्हणजे आम्ही पाटपाने घ्यावयास लागत असू. भाताशिवाय सर्व वाढून तयार ठेवीत असू. "आई, भाऊ आले. भाऊ आले. भात उकर." वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणीत, ते आम्ही घेतले, म्हणजे जेवणे सुरू होत.

                            त्या दिवशी आम्ही जेवावयास बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करावयास येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोवळा कोवळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणावयाची, "तिखट, मीठ व तेलाची फोडणी दिली, की सारे गोड लागते आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारेच गोड लागे. जणू तिच्या हातात पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती तयार करीत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयात ठेवलेलाच आहे.

                            परंतु त्या दिवशी मजा आली. भाजी झाली होती मुळी अळणी! भाजीत मीठ घालावयाला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेले घालावयाचे. परंतु वडील बोलत ना, म्हणून आम्हीही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दांडगा. जणू आस्वादव्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढावयास आणली म्हणजे म्हणावयाचे, "काय फाकडो झाली आहे भाजी!" पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही. कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते, म्हणून आम्हीही थोडी थोडी खात होतो. आम्हीही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, "तुला नाही का रे आवडली भाजी? खात नाहीस रोजच्यासारखी?" मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, "तो आता इंग्रजी शिकायला लागला ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील?" मी म्हटले, "असे नाही काही. इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेन, तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता?" वडील म्हणाले, "अरे, तुला राग यावा म्हणून म्हटले हो. तू जरा रागावलास म्हणजे बरे वाटते. याला फणसाची भाजी आवडते, होय ना ग? उद्या पाटीलवाडीहून आणीन हो. जून मिळाला तर उकडगरेच करा." आई म्हणाली, "आणावा. पुष्कळ दिवसांत फणसाची भाजी केली नाही." बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व विष्णुसहस्त्रनाम म्हणत शतपावली करू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चाती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे, असा दंडक होता.

                            पसारा आटोपून आई जेवावयास बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते, तो भाजी अळणी! मीठ नाही मुळी तीत. मी जवळच होतो. आई म्हणाली, "काय, रे, श्याम! भाजीत मीठ मुळीच नाही. तुम्ही कोणी बोललेही नाहीत. श्याम, सांगावे की नाही रे! अळणी कशी रे भाजी खाल्लीत?" मी म्हटले, "भाऊ बोलले नाहीत, म्हणून आम्हीही बोललो नाही!"

                            आईला वाईट वाटले. "मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे साऱ्यांनी." ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, "तरीच तू खाल्ली नाहीस. नाही तर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तूच संपवायचा. तुला गुलामा, भाजी हवी पुष्कळ. माझ्या लक्षात तेव्हाच आले पाहिजे होते. परंतु आता काय बोलून?"

                            आपली मोठी चूक झाली, असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यावयाची, ती चांगली करून द्यावी. जो पदार्थ करून द्यावयाचा तो चांगला करून द्यावा. मग भाजी असो, की काही असो. आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे झाले नाही, असे आईला वाटले. तिला रुखरुख लागली.

बरे, आईला वाईट वाटू नये, म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा, त्यात दोष पाहू नये. स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी.

                            मित्रांनो! दुसऱ्याचे मन दुखवू नये, म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजीही मिटक्या मारून खाणीरे माझे वडील श्रेष्ठ, का अळणी भाजी कशी हातून झाली, का, रे, तुम्ही कोणी सांगितले नाही, असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही, म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी, माझी आई श्रेष्ठ? दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती, संयम व समाधान यांवर उभारलेली आहे; त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आईबाप मला देत होते.


********************************************************************************************
 रात्र सतरावी : स्वावलंबनाची शिकवण          अनुक्रमणिका         रात्र एकोणीसावी : पुनर्जन्म
********************************************************************************************