आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो. अंधारात एक किरणही आशा देतो. सध्याच्या निष्प्रेम काळात 'मला काय त्याचे' अशा काळात, असे प्रेमळ संघ म्हणजे परम आशा होय. त्या भ्रातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पाहावयास सापडले असते. तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला- साचीव जीवनाला- स्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय.
गावात सर्वत्र शांतता होती. आकाशात शांतता होती. काही बैलांच्या गळयांतील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता. वारा मात्र स्वस्थ नव्हता. तो त्रिभुवनमंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता. आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता. श्यामने सुरूवात केली:
"माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते, तरी सुखी होते. माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती. माझ्या आईचे माहेर गावातच होते. माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते. माझी आई सर्व भावंडात मोठी होती. माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते. माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत, कोणी बयो म्हणत. आवडी! खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे. बयो ! खरेच ती जगाची बयो होती; आई होती. माहेरची गडीमाणसे कांडपिणी, पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला 'बयो' म्हणून हाक मारीत, तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ! ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कळे !
"माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती. माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती. तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत. माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते. सासर श्रीमंत होते. सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात. निदान ते तरी स्वत:ला तसे समजत. आईच्या अंगावर सोन्यामोत्याचे दागिने होते. पोत, पेटया, सरीवाकी, गोटतोडे, सारे काही होते. भरल्या घरात, भरल्या गोकुळात ती पडली होती. सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते. सासरी ती लहानाची मोठी होत होती. कशाला तोटा नव्हता. चांगले ल्यायला, चांगले खायला होते. एकत्र घरात कामही भरपूर असे. उत्साही परिस्थितीत, सहानुभूतीच्या वातावरणात काम करावयास मनुष्य कंटाळत नाही. उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो.
"मित्रांनो ! माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा-अठरा वर्षांचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती. कारण आजोबा थकले होते. वडीलच सारा कारभार पाहू लागले. देवघेव तेच पाहात. आम्ही आमच्या वडिलांस भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत. आजूबाजूच्या खेडयांतील लोक आम्हांला खोत म्हणून संबोधीत.'
"खोत म्हणजे काय ?' भिकाने प्रश्न विचारला.
श्याम म्हणाला, 'खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल.'
"त्याला काही मिळत नाही का?' रामने विचारले.
"हो, मिळते तर ! सरकारी शेतसा-याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो. खोत गावातील पिकांची आभावणी करतो. पिकांचा अंदाज करतो. 'याला पीक धरणे' असे म्हणतात. एखाद्या शेतात पीक चांगले नसले, तरी चांगले लावतात! लोकांनी वसूल दिला नाही, तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात. ठरल्या वेळी खोताने शेतसा-याचे हप्ते- वसूल आला नसला, तरी पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजेत!'
"आमच्या व-हाड - नागपुराकडे मालगुजार असतात, तसाच प्रकार दिसतो.' भिका म्हणाला.
गोविंदा उत्कंठेने म्हणाला, 'पुरे रे आता तुमचे ! तुम्ही पुढे सांगा.'
श्यामने पुन्हा गोष्टीला सुरूवात केली.
"आम्ही वडवली गावचे खोत होतो. त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती. धो धो पाणी वाहत असे. दांड बांधून दुरून पाणी आणले होते. ते उंचावरून पडत असे. बागेत केळी, पोफळी, अननस लावलेले होते. निरनिराळया जातीची फणसाची झाडे होती. कापे, बरके, अर्धकापे; तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हांस मी दाखवीन. ती बाग म्हणजे आमचे वैभव, आमचे भाग्य असे म्हणत; परंतु गडयांनो! ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते ! पाप क्षणभर हसते व कायमचे रडत बसते. पाप थोडा वेळ डोके वर करते; परंतु कायमचे धुळीत मिळते. पापाला तात्पुरता मान, तात्पुरते स्थान. जगात सद्गुणच शुक्राच्या ता-याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत राहतात.
"खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे. बोलावले तर गेले पाहिजे; नाहीतर खोताचा रोष व्हावयाचा. गावातील कष्टाळू बायकामाणसांनी वांगी लावावी, मिरच्या कराव्या; कणगरे, करिंदे, रताळी लावावी; भोपळे, कलिंगडे यांचे वेल लावावे. परंतु या सर्वांवर खोताची नजर असावयाची. खरोखर या जगात दुस-याच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही. दुस-याला राबवून, रात्रंदिवस श्रमवून, त्यांना तुच्छ मानून आपण गाद्यागिर्द्यांवर लोळावे, यासारखा अक्षम्य अपराध नाही. माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले? पाणीदार मोत्यांची नथ ! खेडयातील गरीब बायकांच्या डोळयांतील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती. त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोटतोडे करण्यात आले होते. परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावयाचे होते. तो माझ्या आईला जागे करणार होता.
"माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही; परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली. खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे. कोणी ऐकली नाही की, तर त्यांना वाटे हे कुणबट माजले ! कुणब्याला कुणबट म्हणावयाचे व महाराला म्हारडा म्हणावयाचे, अशी ही पध्दत ठरलेली ! असे म्हणताना आपणच माजलो आहोत, सत्तान्ध झालो आहोत, हे ह्यांच्या लक्षातही येत नसते.
"वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला; तथापि, त्यांना फारसा अनुभव आला नव्हता. खोतपणाच्या तो-यात एखादे वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखविली जात. पूर्वजांचीही पापे होतीच. पाप किंवा पुण्य काही मरत नाही. जगात काही फुकट जात नाही. जे पेराल ते पिकेल; जे लावाल ते फोफावेल, फळेल.
"एकदा काय झाले, ती अवसेची रात्र होती. भाऊ वडवलीस गेले होते. सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोचले होते. आज गावाला जाऊ नका, आज अवस आहे, वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले; परंतु भाऊ म्हणाले, 'कसली अवस नि कसला शनिवार! जे व्हावयाचे ते होणार. प्रत्येक दिवस पवित्रच आहे. प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो.' ते वडवलीस गेले. दिवसभर राहिले. तिन्हीसांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले.
घरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले, 'भाऊदा! तिन्हीसांजा म्हणजे दैत्याची वेळ. या वेळेस जाऊ नका. त्यातून अवसेची काळरात. बाहेर अंधार पडेल. तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल. येथेच वस्तीला रहा. कोंबडयाला उठून थंड वेळेस जा.' भाऊंनी ते ऐकले नाही. ते म्हणाले, 'म्हाता-ये ! अग, पायाखालची वाट, झाली रात्र म्हणून काय झाले? मी झपाझप जाईन. दूध काढतात, तो घरी पोचेन.'
भाऊ निघाले. बरोबर गडी होता. त्या म्हातारीचा शब्द 'जाऊ नका' सांगत होता. फळणारी पापे 'चल, राहू नको', म्हणत होती. गावातील लोकांनी निरोप दिला. एक जण भेसूर हसला. काहींनी एकमेकांकडे पाहिले. भाऊ व गडी निघाले. अंधार पडू लागला. परमेश्वराचे, संताचे व सतीचे अश्रू चमकू लागले.
वडवली गावापासून दीड कोसावर एक प-ह्या होता. पावसाळयात त्याला उतार होत नसे. तो प-ह्या खोल दरीतून वहात होता. त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती. त्या झाडीत वाघसुध्दा असे. तेथून दिवसाढवळयाही जावयास नवशिक्यास भय वाटे ! परंतु भाऊ निर्भयपणे जात होते. त्यांना भीती माहीत नव्हती. भुतेखेते, जीवजीवाणू, कसलेच भय त्यांना वाटत नसे.
भाऊ दरीजवळ आले. एकदम शीळ वाजली. भाऊ जरा चपापले. पाप हे भित्रे असते. झुडुपातून अंगाला काव फासलेले मांग बाहेर पडले. भाऊरावांच्या पाठीत सोटया बसला व त्यासरशी ते मटकन खाली बसले. झटकन् गडी पळत गेला. भाऊंना खाली पाडण्यात आले. मांगांच्या हातातील सुरे चमकत होते. भाऊंच्या छातीवर मांग बसला. चरचर मान चिरायची ती वेळ. करंदीच्या जाळीत रातकिडे ओरडत होते. शेजारच्या भवनातून एक भुजंग फूत्कार करीत सणकन निघून गेला. मांगाचे तिकडे लक्ष नव्हते. इतक्यात एका म्हातारीने ओरड केली, 'अरे, बामणाला मारले, खोताला मारले, रे, धावा !' ते मांगही जरा भ्यायले.
भाऊ त्या मांगांना म्हणाले, 'नका रे मला मारू ! मी तुमचे काय केले? सोडा मला. ही आंगठी, ही सल्लेजोडी, हे शंभर रुपये घ्या. सोडा मला!' दीनवाणेपणाने त्या मांगांना ते विनवीत होते.
म्हातारीच्या ओरडण्याने कोणी तरी येत आहे, असे दिसले. कोणाची तरी चाहूल लागली. मांगांनी त्या आंगठया, ती सल्लेजोडी, ते शंभर रूपये घेतले व त्यांनी पोबारा केला. ते मांग काही खरे खुनी नव्हते. या कामात मुरलेले नव्हते. पण दारिद्रयामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले होते. त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती, प्रेम होते. स्वत:च्या मुलाबाळांच्या प्रेमाने, त्यांची खा खा दूर व्हावी म्हणून, ते मांग तो खून करू पहात होते. कोणी म्हणतात की, जगात कलह, स्पर्धा हेच सत्य आहे. परंतु त्या कलहाच्या मुळाशी, या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे. ते प्रेम संकुचित आहे एवढेच. सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे, युध्द नाही. सहकार्य आहे, द्वेष वा मत्सर नाही. असो. भाऊंच्या बरोबरचा गडी जो पळत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला. त्याने घाब-या घाब-या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली. आमच्या घरातील व गावातील पुरूष मंडळी लगेच चालून गेली. पालगडला पोलिस ठाणे होते. तेथे वर्दी देण्यात आली.
घरात बातमी येताच आकान्त झाला. सा-यांच्या तोंडचे पाणी पळाले! घरात दिवे लागले होते; परंतु सा-यांची तोंडे काळवंडली होती. कसचे खाणे नि कसचे पिणे! तेथे तर प्राणाशी प्रसंग होता. त्या वेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो. आईला समजू लागले होते. बायकांना लवकर समजू लागते. माझी आई ती सारा कथा आम्हाला सांगे. आई देवाजवळ गेली. निर्वाणीचा तोच एक सखा. देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला. ती म्हणाली, 'देवा नारायणा ! तुला माझी चिंता, तुला सारी काळजी. आई जगदंबे ! तुझी मी मुलगी. मला पदरात घे. माझे कुंकू राख. माझे चुडे अभंग ठेव. माझे सौभाग्य-नको, आई आई! त्यावर कु-हाड नको पडू देऊ ! मी काय करू? कोणते व्रत घेऊ? देवा! माझी करूणा येऊ दे तुला, तू करूणेचा सागर. येऊ दे हो घरी सुखरूप. पाहीन त्यांना डोळे भरुन; नांदू तुझ्या आशीर्वादे सुखाने जन्मभर. मला दुसरे काही नको. नकोत हे दागिने! नकोत ती मोठी वस्त्रे! कशाला मेली ती खोती! नको मला, काही नको. पती हाच माझा दागिना. तेवढा दे देवा.' असे म्हणून आई विनवू लागली. रडू लागली.
आईने देवाला आळविले, प्रार्थिले; परंतु नुसती प्रार्थना काय कामाची? प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे, व्रत पाहिजे. माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले. मित्रांनो, जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री-पुरूष रत्ने आहेत! राम आहे, हरिश्चंद्र आहे, सीता आहे, सावित्री आहे. तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका. सावित्री अमर आहे. स्त्रियांना सदैव ती धीर देईल. मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल. मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो.
माझ्या आईचे सौभाग्य आले. भाऊ घरी आले. त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी. दरवर्षी ज्येष्ठी पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासास सुरूवात करी. घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही. या व्रतात वटपूजा करावयाची असते. आकाशाला कवटाळू पाहाणा-या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवावयाचे. वटवृक्षाप्रमाणे कूळ वाढो, ते जगाला छाया देवो. आधार देवो, वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो. त्या प्रमाणे कुळालाही वर जाण्याची, उन्नत होण्याची सदैव इच्छा असो. वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात, त्याप्रमाणेच कुळविस्तार होवो व कुळाला बळकटी येवो. या व अशाच शेकडो भावना या वटपूजेने कळत वा नकळत बायकांच्या जीवनात येत असतील.
सावित्रीव्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे. मी त्यासंबंधीचीच एक आठवण सांगणार आहे. आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती. त्या वेळेस मी आठ-नऊ वर्षांचा असेन. सावित्रीव्रताला आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतात तीन दिवस वडाला १०८ प्रदक्षिणा घालावयाच्या असतात. आईला जरा चालले तर घेरी येत होती.
आईने 'श्याम' अशी हाक मारली. मी आईजवळ गेलो व विचारले, 'काय आई? काय होते? पाय का चेपू?
आई म्हणाली, 'पाय नको रे चेपायला. मेले रोज चेपायचे तरी किती? तू सुध्दा कंटाळला असशील हो. पण मी तरी काय करू?'
आईचे ते करूण शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, 'श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो. पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे, करशील ना तू बाळ?'
"कोणते काम? आई मी कधी तरी नाही म्हटले आहे का? मी म्हटले.
आई गहिवरून म्हणाली, 'नाही. तू कधीसुध्दा नाही म्हणत नाहीस, हे बघ, उद्यापासून वट-सावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला १०८ प्रदक्षिणा घालता येणार नाहीत. मला भोवळ येईल. कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन. पूजा करीन. तीन प्रदक्षिणा घालीन, बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ.'
असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ व करूण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले.
"आई! माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील?' मी विचारले. 'चालतील हो बाळ, देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही. त्याला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का? अरे तू माझ्या पोटचा गोळा. माझाच जणू भाग! माझेच तू रूप! तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी, आजारी आहे हे देवाला माहिती आहे.' आई म्हणाली.
"पण मला बायका हसतील. मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत ' अहाऽ रे बायको! असे म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते, मी नाही जाणार! शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील.' अशा अनेक सबबी मी सांगू लागलो.
आईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली 'श्याम आईचे काम करावयास कसली रे लाज? हे देवाचे काम. ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील. देवाचे काम करावयास लाजू नये, पाप करावयास माणसाने लाजावे. श्याम! त्या दिवशी चुलीमागचा खोब-याचा तुकडा तू घेऊन खाल्लास. मी बघितले. पण बोलल्ये नाही. जाऊ दे. मुलाची जात आहे. परंतु त्या वेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे? मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस? तो पांडवप्रताप कशाला वाचतोस? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी, धर्माघरची उष्टी काढी. काम करावयास, प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का? नसलास जाणार तर मी जाईन हो. येऊन-जाऊन काय होईल, मी भोवळ येऊन पडेन. मरेन तर सुटेन एकदाची. देवाजवळ तरी जाईन. परंतु श्याम! तुमच्यासाठीच जगत्ये रे-' असे म्हणून आईने डोळयांना पदर लावला.
आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. 'देवाचे काम करावयास लाजू नको; पाप करण्याची लाज धर-' थोर शब्द! आजही ते शब्द मला आठवत आहेत. आजकाल ह्या शब्दांची किती जरूरी आहे? देवाच्या कामाची देशाच्या कामाची, भारतमातेच्या कामाची, आम्हास लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी-सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे ही स्थिती.
मी आईच्या पाया पडलो व म्हटले, 'आई! जाईन हो मी. कोणी मला हसो, कोणी काही म्हणो. मी जाईन. पुंडलीक आईबापाची सेवा करून मोठा झाला. देवाला बांधून आणता झाला. तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागावले, त्यांनी मारले तरी चालेल. आई! तुला माझा राग आला होय. तुला वाईट वाटले?' असे केविलवाणे मी विचारले.
"नाही हो बाळ. मी तुझ्यावर कशी रागवेन? मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम!' आई म्हणाली. गडयांनो ! मी घरी असलो व वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे. माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही. 'पाप करताना लाज वाटू दे चांगले करताना लाज नको!'
********************************************************************************************
प्रारंभ अनुक्रमणिका रात्र दुसरी : अक्काचे लग्न
********************************************************************************************