अशीच एक सांज

अशीच एक सांज होती
डोळ्यात क्षीतज साठवलेली
अंताच्या शोधत फिरणारी
अन तुझ्यासाठी झुरलेली

अशीच एक सांज होती
आठवणीत तिच्या हरवलेली
मनातील त्या भरतीने
नयनाची किनारे गाठलेली

अशीच एक सांज होती
माझ्या एकट्याने मंतरलेली
अश्रुना सोबत घेवून
तुझ्या शब्दाने भरलेली

अशीच एक सांज होती
माझ्या एकट्याचीच झालेली
काळोख येण्यापुरी
तिनेच मला साथ दिलेली

प्रेम म्हणावं याला .... की भास

ती पाहते यार माझ्याकडे
जेव्हा मी पाहतो तिच्याकडे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?

मी पहिले की ती नजर चोरून घेते
हलकेच मग गालावरील खळी खोल होते
एसीची हवा थांबून सुरु होतात गुलाबी वारे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?

बोलता बोलता माझ्याशी खोल पाहते डोळ्यामध्ये
बोललो जरी कामाचे तरी व्हायोलीन वाजतो मनामध्ये
ऑफिस मधील दिवे जणू वाटू लागतात धुंद तारे
प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे?

जवळून फक्त जातानाही उगाचच नसलेली बट सावरते
नजरा नजर होताच लगेच स्वतःशीच बावरते
वाटते मला जे काही ... तिलाही जाणवत असेल का बरे?
खरच प्रेम म्हणावं याला .... की भास आहेत हे सारे ?

ते बाबा असतात.....

आपले चिमुकले हाथ धरून
जे आपल्याला चालायला शिकवतात....
ते बाबा असतात.....

आपण काही चांगले केल्यावर
जे अभिमानाने सगळ्याना सांगतात..
ते बाबा असतात.....

माझ्या लेकराला काही कमी पडू नए
या साठी जे घाम गाळतात
ते बाबा असतात.....

आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात..
ते बाबा असतात.....

आपल्या लेकराच्या सुखा साठी
जे आपला देह ही अर्पण करतात..
ते बाबा असतात......

वडील

त्यांच्या खांद्यावर बसून
जग दिसतं ते आपल्याला नवं नवंच
आयुष्यभर घरासाठी
वडील होऊन राहतात कवच

सावरण्यासाठीच असतात
त्यांचे मजबूत हात
असतात वडील तोवर
जाणवत नाहीत आघात

ऊन वारा पाऊस झेलत
वडील लकाकी हरवून जातात
उडून जातात पाखरं तेव्हा
वडील एकाकी होऊन जातात

दाटून येतो कंठ गळ्यात
पण अश्रू पापणीतून गळत नाही
आपण वडील झाल्याशिवाय
मोठेपण त्यांचं कळत नाही
करंगळीला धरुन आम्हाला,
तु चालायला शिकवलंस,
बोट धरुन आमचं तु,
पाटीवरचं अक्षर गिरवलंस,
रडु आमचं आवरावं म्हणून,
...घोडा होऊन आम्हाला रिझवलंस,
आता पर्यंतचं आयुष्य तु,
आमच्या साठी झिजवलंस,
सासरी गेल्यावर आमची,
आठवण काढशील का रे...?
बाबा... आम्हाला माहीत आहे,
सासरी जाताना,
एका कोपर्‍यात जाऊन,
आमच्यासाठी लहान मुलासारखा,
रडशील ना रे.......??????


कवी - ऋषीकेश
चुली जवळ माय, तर कंपनीत तुम्ही राबत होता..
माझी वाट तुम्ही, ते नऊ महिने पाहत होता..
पाळण्यात मला पाहून, पेढे वाटायलाही तुम्ही पळाला होता..

बोटाला तुमच्या धरून, शाळेत दाखला मी घेतला होता..
फाटकी बनियन तुम्ही, तर नवीन गणवेश मी घातला होता..
बाबा, तेंव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार-फार मोठे होता...!

ताप मला असो का ताईला, रात्र-रात्र तुम्ही जागत होता..
शाळेचा खर्च वाढल्यामुळे, ओवरटाइमही तुम्हीच करत होता..
बाबा, तेंव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार-फार मोठे होता...!

ताईच्या लग्नासाठी, पी.एफ.ही तुम्ही काढला होता..
ताईला वाटी लावताना, तुम्ही मात्र ढसाढसा रडला होता..
बाबा, तेंव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार-फार मोठे होता...!

देवा, आता मात्र मला, त्यांच्यासाठी कष्ट करू दे..
तू फक्त आता, जगातील सर्व बाबांना, उदंड आयुष्य दे..


कवी - विकास

तोच आहे

लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे

लहानपणी धाकटयावर दाद्गिरी करायचो
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो