दिसं नकळत जाई

दिसं नकळत जाई
सांज  रेंगाळून राहि.
क्षणं एकहि न ज्याला,
तुझि आठवन नाही.

भेट तुझि ती पहिली
लाख लाख आठवितो,
रूप तुझे ते धुक्याचे
कणा कणा साठवितो.

ही वेळ सखी साजणी मज
वेडावून जाई,
दिसं नकळत जाई
सांज रेंगाळून राहि....

असा भरून ये ऊर
जसा वळीव भरवा
अशी हूरहूर जसा
गंध  रानी पसरवा

रान मनातले माझ्या
मगं भिजुनिया जाई..
दिसं नकलत जाई
सांज रेंगाळून राही

किती तरी दिवसात...

किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच.

केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाऊन निर्भय
गावाकडच्या नदीत
होऊन मी जलमय.

आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी.

बरा म्हणून हा इथे
दिवा पारवा पा-याचा
बरी तोतया नळाची
शिरी धार मुखी ऋचा

रानात श्रावणात

रानात श्रावणात
बरसून मेघ गेला
देहात नि मनात
लावून आस गेला ...

रानात श्रावणात
दिसतात रंग ओले
किलबिल पाखरांत
तरू तृप्त वाकलेले ...

रानात श्रावणात
दाटी नव्या तृणांची
मधु दाटल्या फुलांत
आरास भ्रमरांची ...

रानात श्रावणात
आवाज निर्झरांचे
खडकाळ डोंगरात
चैतन्य जीवनाचे ...

रानात श्रावणात
फुलली अनेक नाती
कुणी पाहिले न हात
घडवून ज्यांस जाती ...

माझे न राहिलेले

मागु नको सख्या, जे माझे न राहिलेले
ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहिलेले 

स्वप्नातल्या करांनी, स्वप्नातल्या तुला मी
होते न सांग कारे, सर्वस्व वाहिलेले

स्वप्नात वाहिलेले, म्हणुनी कसे असत्य
स्वप्नात सत्य असते, सामील जाहलेले

स्वप्नातल्या कळीला, स्वप्नात फक्त पख
दिवसास पाय पंगु, अन हात शापिलेले

स्वप्नातल्या कळीला, स्वप्नात घेवुनी जा
हे नेत्र घेवुनी जा, स्वप्नात नाहलेले

जा नेत्र घेवुनी जा, स्वप्नांध आंधळीचे
आता पहावयाचे, काही न राहीलेले
हसायच्या आधी मला
जरा सराव करावा लागतो,
मनावरचा घाव बराच
दाबून धरावा लागतो.

कुणीतरी आठवण काढतंय

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून
बोलता बोलता शब्द ओठी जतीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतयं, बाकी काही नाही

मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही !!

जो पर्यंत आहे श्वास

("जब तक हैं जान" चे मराठी रुपांतर )

तुझ्या डोळ्यातील तेजस्वी हस्ती
तुझ्या हसण्याची बेफिकीर मस्ती
तुझ्या केसांची उडणारी दाट वस्ती
नाही विसरणार मी
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास

तुझं हाथातून हाथ काढणं
तुझ्या आत्म्याने रस्ता बदलणं
तुझं पलटून पुन्हा न बघणं
नाही माफ करणार मी
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास

पावसातील बेधडक तुझ्या नाचण्यावर
प्रत्येक गोष्टीवरून विनाकारण तुझ्या रूसण्यावर
छोट्या छोट्या तुझ्या बालिश खोडयांवर
प्रेम करेन मी
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास

तुझ्या खोट्या शपथा आणि वचनांचा
तुझ्या जाळणार्या बैचैन स्वप्नांचा
तुझ्या न लाभणार्या प्रार्थनेचा
तिरस्कार करेन मी("जब तक हैं जान" चे मराठी रुपांतर )
जो पर्यंत आहे श्वास जो पर्यंत आहे श्वास