देवाचा मोबाईल

किती करू मी तुझा धावा
तुझा मोबाईल नंबर दे रे देवा
नाही माणस कलीयुगी खरी
येता जाता चालती कुरबुरी
मुखी राम बगल मे छुरी
नाही कळत त्यांचा कावा||१||

अवतरलास तू द्वापारी
खूण होती तुझी बासरी
पण जमाना आला नवा
आता नाही चालणार तुझा पावा
तुझा मोबाईल नंबर दे रे देवा||२||

चारी युगात तुझा बोलबाला
फार नाही मागायचं मला
घाई गर्दीत शोधू कुठे तुला
आहे एकच उपाय ठावा
तुझा मोबाईल नंबर दे रे देवा|||३||


कवियत्री - प्रभा मुळे

वीज येते आणिक जाते


वीज येते आणिक जाते ..!!
येताना सर्व वास्तू उजळिते,
आणि जाताना मिट्ट काळोख करते !
गावागावांना ती अशी छळते,
आणि काही शहरांच्या कुशीत शिरते !

कोणाच्या राजकारणाने ती झळाळते?
येणे जाणे कधी न सरणे,
विद्यार्थ्यांच्या ऐन परीक्षेत गुल होणे,
पिकाला पाणी देताना ती नसणे,
कारखाने व गिरण्यांची गोची करणे,

रात्री रस्त्यावरून चालताना तिचे जाणे,
तरुणांचे उगीचच तरुणींपाशी अडखळणे !
येताना ती कसली रीत,
गुणगुणते ती जाण्याचे गीत !
जाते कधीमधी आणि फिरून ये,

येण्यासाठीच दुरु नये !
तिच्या असण्याने तिची उधपट्टी करणे,
ती नसल्याने डोळ्यात असावे येणे !
प्रेमात येते तर कधी निघून जाते,
आणि जाण्याने तिच्या सबुरी संपवीते !
विज येते आणिक जाते......!!!


कवी - जगदीश पटवर्धन

ती येते आणिक जाते

ती येते आणिक जाते
येताना कधि कळ्या आणिते
अन्‌ जाताना फुले मागते
येणे-जाणे, देणे-घेणे
असते गाणे जे न कधी ती म्हणते

येताना कधि अशी लाजते
तर जाताना ती लाजविते:
कळते काही उगीच तेही
नकळत पाही काहीबाही,
अर्थावाचुन असते ’नाही’, ’हो’, ही म्हणते

येतानाची कसली रीत:
गुणगुणते ती संध्यागीत,
जाताना कधि फिरून येत,
जाण्यासाठिच दुरुन येत,
विचित्र येते, विरून जाते जी सलते

कळ्याफुलांच्या मागे येते
कोमट सायंचेहरा घेते
उदी उदासी पानी भरते
"मी येऊ रे ?" ऐकू येते
मध्यरात्रभर तेच तेच प्रतिध्वनि ते


कवी /गीतकार : आरती प्रभू
गायक : महेंद्र कपूर
संगीत : हृदयनाथ मंगेशकर

ये रे घना

ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना

फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना


गीतकार - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण 
गायक - आशा भोसले
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर

आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर

                     मराठी साहित्यविश्वाला `नक्षत्रांचे देणे' देणारे प्रतिभासंपन्न कवी!


वेंगुर्ला तालुक्यातील ‘बागलांची राई’ या ठिकाणी चिं. त्र्यं. खानोलकर यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. एस.एस.सी. पर्यंतच शिक्षण होऊ शकले. ते बुद्धीने अत्यंत तल्लख पण थोड्या विक्षिप्त स्वभावाचे होते. कोकणात नित्यनेमाने चवीने चघळल्या जाणार्‍या भुताखेतांच्या कथा, एकूणच कोकणातील निसर्ग, गूढरम्यता, माणसांच्या मनाचा कसून शोध यांकडे त्यांचे लिखाण जास्त झुके.
साधारणपणे १९५० मध्ये त्यांनी लेखनास सुरुवात केली. सत्यकथेच्या १९५४ च्या फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘शून्य शृंगारते’ या कवितेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. नंतर विंदा करंदीकर व पाडगावकरांच्या ओळखीने मुंबईला १९५९ साली ते आले. आकाशवाणीवर र्स्टों आर्टिस्ट म्हणून ते नोकरीस लागले. पण काही कारणांमुळे १९६१ मध्ये त्यांना नोकरी सोडावी लागली.

खानोलकर हे अतिशय प्रतिभासंपन्न लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार होते. त्यांच्या लेखनाचा झपाटा दांडगा होता. त्यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाचा काळ लक्षात घेतला, तर त्यांच्या लेखनाचा वेग किती प्रचंड होता हे सहज लक्षात येईल. तरीही त्यांच्या लेखनातील वेधकता व गुणवत्ता वादातीत आहे.

घरचे दारिद्रय, आप्तस्वकीयांचा मृत्यू, उपेक्षा, त्यांच्या स्वभावामुळे होत जाणारे गैरसमज, घरची -दारची आजारपणे, नियतीने कधी कधी केलेली कुतरओढ या सगळ्या पसार्‍यात अडकूनही खानोलकरांच्या लिखाणात कधी खंड पडला नाही. त्यांच्या सगळ्याच यशस्वी लेखनाला एक प्रकारचा पारलौकिकाचा संजीवक स्पर्श झालेला आढळतो.

काही लेखन करायचे असले की, खानोलकर जणू कसल्यातरी भावसमाधीत जात आणि एका विलक्षण अवस्थेत देहभान विसरून लिहीत राहत, झपाटल्यासारखे... आणि ती भावसमाधी उतरली, की त्यांचे लेखन थांबे. मग त्या अवस्थेत जे काही लेखन होई, ते स्वयंभू, स्वयंपूर्ण अशी अनुभूती देणारे असे.

त्यांच्या कवितेने सौंदर्यवादी जाणिवेकडून अस्तित्ववादी जाणिवेकडे केलेली प्रगल्भ वाटचाल, त्यांच्या कथांमधून प्रकट झालेले जीवनाच्या शोकात्मतेचे विविधरूपी आकार, माणूस व विश्व यांच्यातील अनेकविध ताण, काम, प्रेम, द्वेष, हिंसा, सूड, निष्ठा, मत्सर इ. वृत्तीप्रवृत्तींनी भरलेले त्यांच्या कादंबरीमधले गुंतागुंतीचे जग - या सार्‍यांमुळे खानोलकरांचे लेखन वाचकांना व समीक्षकांना गूढ आव्हान देत राहते. विश्वाच्या अफाट पसार्‍यात आणि नियतीच्या निर्विकार दृष्टीसमोर माणूस अगदी नगण्य, शून्य आहे, हा बोध त्यांच्या सर्वच लेखनातून येतो.

अनाकलनीय, अतर्क्य दैवी शक्ती, पापपुण्याच्या संकल्पना, धार्मिक श्रद्धा, माणसाला कोणत्याही पातळीवर नेऊ शकणारी काम प्रेरणा, निसर्गाचे कोमल तसेच उग्रकठोर रूप, वासनांचे विखारी फुत्कार ही सूत्रे खानोलकरांच्या आशयबंधातून फिरून फिरून वेगवेगळे आकार घेताना दिसतात. या आशय सूत्रांची सामर्थ्याने व सहज अभिव्यक्ती करू शकणारी प्रतिमांकित भाषाशैली हे त्यांना लाभलेले वरदानच होते.

त्यांचा ‘जोगवा’ हा पहिला काव्यसंग्रह १९५९ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर १९६२ मध्ये ‘दिवेलागण’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दोन्ही काव्यसंग्रहांमध्ये त्यांच्या व्याकूळ, दु:खविव्हल अवस्थेतल्या कविता जास्त आढळतात. स्मृतिजन्य व्याकुळता हा त्यांच्या पूर्वार्धातील निर्मितीचा ठळकपणे जाणवणारा विशेष वाटतो. इतर समकालीन कवींप्रमाणे तपशीलवार प्रेयसी चित्रण त्यांच्या कवितेत येत नाही. प्रेयसीचे वर्णन करता करताच त्यांना दु:खाची जाणीव इतक्या तीव्रतेने होते, की पुढची कविता त्या अनामिक दु:खाचा अविष्कार होते.

जराच फिरली किनखाबीची सुई, जुईचा उसवित शेला,
आणि ठणकला गतस्मृतीचा , काळोखाने कापूर पेला -

अशी त्यांची वेदना अधिकाधिक तीव्र होत जाते.

त्यामानाने १९७५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘नक्षत्रांचे देणे’ या काव्यसंग्रहात ते जास्त प्रसन्न वाटतात. आपल्या वेदनाकोशातून बाहेर आल्यासारखे वाटतात. यातील कविता संवादात्मक व नाट्यनिष्ठ आहेत. यातली एक नितांत सुंदर कविता-‘आड येते रीत’.
    ‘नाही कशी म्हणू तुला पहाटमाणगी,  परि घालायचे आहे तुळशीस पाणी
    नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, परि सारे हलक्याने आड येते रीत...

या कवितेमधे पती-पत्नीमधील सूचक शृंगार हळुवारपणे व्यक्त झालेला आहे. यातील शृंगारभाव उत्कट असला तरी त्यातील कलात्मक संयम त्यांच्या परिपक्व प्रतिभेची साक्ष देतो.

आरती प्रभूंच्या संपूर्ण कवितेला सतत निसर्गाची पार्श्वभूमी लाभलेली आढळते. नेमके आणि नीटस शब्द हे त्यांच्या निसर्गकवितेचे वैशिष्ट्य.
    हिरव्याशा गवतात हळदिवी फुले, हलकेच केसरात दूध भरु आले,
    उभ्या उभ्या शेतांमधे सर कोसळली, केवड्याची सोनकडा गंधे ओथंबली ..
अशा सुंदर रंग-गंध भरल्या शब्दांनी, प्रतिमांनी त्यांची निसर्गकविता नटलेली आहे.

कोणताही लेखक हा कवितेमधे आत्मप्रकटीकरण करतो. कादंबरीमधे मात्र लेखक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने आत्मप्रकटीकरण करण्याची संधी घेतो. म्हणून तर त्यांना गद्यलेखनाकडे वळावे लागले. माणसामधील व समाजामधील विकृतीचे चित्रण जे कवितेला कदाचित पेलले नसते, ते त्यांनी कादंबरी, नाटक व कथांमधून मांडले. त्यांनी उसवलेल्या माणसांचे विश्र्व आणि त्यांच्या आदिम वासना, प्रेरणांचा शोध आपल्या जाज्वल्य लेखणीद्वारे घेतला.

१९६६ मधे ‘एक शून्य बाजीराव’ हे नाटक रंगभूमीवर आले. झाडे नग्न झाली, पाठमोरी या कथांमुळे ते लेखक म्हणूनही प्रतिष्ठित झाले. त्यांच्या चानी, कोंडूरा या कादंबरींवर चित्रपटही निघाले.

नियतीने त्यांना पुरे जीवन जगू दिले नाही. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षीच त्यांची प्राणज्योत मालवली, अन्यथा मराठी साहित्यात आणखी काही मोलाची भर त्यांनी निश्चितपणे घातली असती.

खानोलकरांची प्रतिमांकित भाषा ही मराठी वाङ्‌मयाला मिळालेली एक अमोल देणगी आहे. अशा प्रकारची गद्य काव्यसदृश भाषा मराठी कादंबरी, नाटकांमधून दुर्मीळ होत चालली आहे. त्यांच्या यशस्वीतेचे रहस्य आणि लौकिक अपयशाची कारणे पुन: पुन्हा शोधावी असे आव्हान ज्यांच्या कलाकृतींनी वारंवार समीक्षकांपुढे ठेवले अशा अनोख्या प्रवृत्तीचा कलावंत म्हणून खानोलकर वेगळे व महत्त्वाचे ठरतात.

केशवसुत-कृष्णाजी केशव दामले

मराठी कवितेच्या प्रांतात ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे म्हणत; आशय, अभिव्यक्ती अन् काव्यविचार यात आमूलाग्र परिवर्तन घडवत; आधुनिक मराठी कवितेचे सुंदर लेणे खोदणारे युगप्रवर्तक कवी!
आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून केशवसुतांचे नाव घेतले जाते. त्यापूर्वी अध्यात्मात अडकून पडलेल्या, पौराणिक कथा -आख्यानांत रंगून जाणार्‍या मराठी कवितेला त्यांनीच प्रथम सर्वसामान्य माणसांच्या जगात आणले. चाकोरीबद्ध कवितेला स्वच्छंद, मुक्त रूप दिले. सर्वसामान्य माणसांची सु्खदु:खे, भावभावना, वासना-विकार यांना कवितेत मानाचे, जिव्हाळ्याचे स्थान दिले; कवितेला वास्तवतेचे भान दिले.

इंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. कविप्रतिभा ही एक स्वतंत्र, चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही व कसलेही आदेश देऊ नयेत असे ते आग्रहाने सांगत. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत रूढ केला.

त्यांच्या एकूण फक्त १३५ कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यातून त्यांनी तोपर्यंत मराठीत कधीही न हाताळले गेलेले विषय- व्यक्तिगत स्नेहसंबंध, स्त्रीपुरुषांमधील प्रेमभावना, कवी व कवित्व, सामाजिक बंडखोरी, उदारमतवाद, मानवतावाद, राष्ट्रीय भावना, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, निसर्ग हे विषय- हाताळलेले दिसतात.  ही स्वच्छंदतावादी मनोवृत्ती काव्यातून प्रथमत:च व्यक्त होत असल्याने त्यांच्या कविता संख्येने कमी असल्या, तरीही क्रांतिकारक व प्रवर्तक ठरल्या. आज (वर उल्लेख केलेल्या) अनेक विषयांशी संबंधित कवितांचे प्रवाह मराठी साहित्यात दिसतात. या सर्व प्रवाहांचा मूळ स्रोत म्हणजे केशवसुतांची कविता होय.

आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता. त्यातही   त्यांची तुतारी ही कविता क्रांतिकारक ठरली. या कवितेच्या नावावरून तेव्हा तुतारी मंडळ स्थापन झाले होते. गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकर यांसारखे नावाजलेले कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत.

त्यांच्या कवितांमधून सामाजिक दु:ख, अन्याय, विषमता, अंधश्रद्धा हे विषय जसे आले, तसेच त्यांच्या कवितांमध्ये प्रेमभावनेचा प्रांजळ व नितळ अविष्कारही आलेला दिसतो. उदा. आपल्या पतीचे कुशल विचारणार्‍या पत्नीला ते म्हणतात ;

करा अपुल्या तू पहा चाचपून, उरा अपुलिया पहा तपासून
प्रकृती माझीही तिथे तुज कळेल, विकृती माझी तुज तिथे आढळेल.   

किंवा

आपल्या घराची, पत्नीची आठवण काढताना ते म्हणतात;
श्वासांनी लिहिली विराम दिसती ज्यांमाजि बाष्पीय ते, प्रीतीचे बरवे समर्थन असे संस्पृत्य ज्यांमाजि ते,
कांतेची असली मला पवन हा पत्रे आता देतसे, डोळे झाकुनि वाचिता त्वरित ती सम्मूढ मी होतसे.

अशा प्रकारे प्रेमाचे विशिष्ट तत्त्वज्ञानही त्यांनी फार सूक्ष्म रीतीने व मराठीत तर प्रथमच आपल्या कवितेतून मांडले.

काव्यविषयक दृष्टीकोन, कवितेचा आशय, तिचा अविष्कार या सार्‍याच बाबतीत क्रांती घडवणार्‍या , कवितेलाच आपले जीवनसर्वस्व मानणार्‍या या कलावंताला अवघ्या ३९ व्या वर्षी मृत्यूने गाठले हे मराठी साहित्याचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

त्या काळात राजकीय क्षेत्रात लोकमान्य टिळक; सामाजिक क्षेत्रात आगरकर ज्या तर्‍हेने भूमिका पार पाडत होते, तशीच भूमिका मराठी कवितेच्या क्षेत्रात केशवसुत यांनी यशस्वीपणे पार पाडली, असे निश्चितपणे म्हणता येईल.

शंभुराजे

फसवलंय तुम्हाला शंभुराजे याचा लागलाय सुगावा
औरंग्याच्या डोळ्यात पाणी दुसरा कशाला हो पुरावा ॥धृ॥

श्‌ऊशी नव्हतीच लढाई तुम्ही परंपरेशी लढलात
भीम पराक्रमाने तुमच्या सगळा गनिमही झुरावा ॥१॥

लढाया जिंकल्या तुम्ही पण कागदावर हरलात
भटाळलेल्या लेखण्या बदलून सांधावा लागेल दुरावा ॥२॥

सांगा कसं म्हणू तुम्हाला आता धर्मवीर आम्ही
धर्मानेच केला घात, कपटाने काढला कुरावा ॥३॥

आनंदासरु आले त्यांना जेव्हा काढले डोळे तुमचे
शिरच्छेद तुमचा व्हावा, धर्माचा कोंबडा आरावा ॥४॥

देवाची खाऊनी भाड हिजड्यांनी केला कावा
नामर्दाचा अंश अजून इथल्या मातीत उरावा ॥५॥