निळा

एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा,
दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा,
मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा,
इंद्रनिळांतला एक गोड राजबिंड निळा,
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा,
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा...

असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे?
ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे :
जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा
असा कालिंदीच्या काठी एक इंदीवरनिळा :
होऊ आपणही निळ्या, करू त्याशी अंगसंग :
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग.


कवी - बा. भ. बोरकर

लावण्य रेखा

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे
तेच डोळे देखणे जे कोंडिते सार्‍या नभा
वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा

देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे
आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळ्वंटतूनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती
देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया
लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा


कवी - बा.भ.बोरकर

पाणीच पाणी

तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी
वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी
बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी
कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी
उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी
सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी
पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी
साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी
पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी
आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी


कवी - बा. भ. बोरकर

पिपांत मेले ओल्या उंदिर

पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळें
ओठांवरती जमलें तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!


कवी - बा.सी.मर्ढेकर

ह्या गंगेमधि गगन वितळले

ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
अर्ध्या हाकेवरी उतरला बुद्धगयेचा पिवळा वारा

विटाळलेली मने उघडती झापड-दारे आपोआप
अन् चिखली ये बिचकत श्वास, जणु पाप्याचा पश्चात्ताप

सुरांत भरली टिटवीच्या कुणि, मृत्युंजयता भोळी भगवी
आणि अचानक शिवली गेली, ध्रुवाध्रुवांतील काही कडवी

अजाणत्याच्या आकांक्षांतील शंख-शिंपले येऊन वरती
उघड्या रंध्रांमध्ये अनामिक गगनगंध हा ठेवून घेती

इथेतिथेचे फुटले खापर, ढासळली अन् जरा 'अहम्'ता
उभ्या जगावर चढली अडवी, तव मायेची कमान आता

ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
असशील जेथे तिथे रहा तू, हा इथला मज पुरे फवारा


कवी - बा.सी.मर्ढेकर

झोपली गं खुळी बाळे

झोपली गं खुळी बाळे
झोप अंगाईला आली
जड झाली शांततेची
पापणी ह्या रित्या वेळी

चैत्र बघतो वाकून
निळ्या नभांतून खाली
आणि वाऱयाच्या धमन्या
धुकल्या गं अंतराळी

शब्द अर्थाआधी यावा
हे तो ईश्वराचे देणें
पेंगणाऱ्या प्रयासाला
उभ्या संसाराचे लेणे

चैत्र चालला चाटून
वेड्या सपाट पृथ्वीला
आणि कोठेतरी दूर
खुजा तारा काळा झाला

आता भ्यांवे कोणी कोणा
भले होवो होणाऱ्याचे
तिरीमिरीत चिंचोळ्या
काय हाकारावे वेचे

चैत्र चढे आकाशात
नीट नक्षत्र पावली
आणि निळ्या वायूतून
वाट कापी विश्ववाली

वेड्याविद्र्या नि वाकड्या
मनाआड मने किती
चाळणीत चाळणी अन
विचारांत तरी माती

चैत्रबाप्पा उद्या या हो
घेऊनीया वैशाखाला
आंबोणीच्या मागे का गं
तुझा माझा चंद्र गेला?

आंबोणीच्या मागे का गं
अवेळी का चंद्र गेला?


कवी - बा.सी.मर्ढेकर

ह्या दु:खाच्या कढईची गा

ह्या दु:खाच्या कढईची गा
अशीच देवा घडण असू दे;
जळून गेल्या लोखंडातहि
जळण्याची, पण पुन्हा ठसू दे
कणखर शक्ती, ताकद जळकट

मोलाची पण मलूल भक्ति
जशि कुंतीच्या लिहिली भाळी,
खिळे पाडुनि तिचे जरा ह्या
कढईच्या दे कुट्ट कपाळी
ठोकुनि पक्के, काळे, बळकट

फुटेल उकळी, जमेल फेस,
उडून जाइल जीवन-वाफ;
तरि सांध्यांतुन कढईच्या ह्या
फक्त बसावा थोडा कैफ
तव नामाचा भेसुर धुरकट.


कवी  - बा.सी.मर्ढेकर