मामाची गाडी

माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो

कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेऊन जाई हो
नाही बिकट घाट,
सारी सपाट वाट,
मऊ गालीचे ठायी ठायी हो

शीळ घालून मंजूळ वाणी हो
पाजी बैलांना ओहोळ पाणी हो
गळा खुळखुळ घुंगुर माळा हो
गाई किलबील विहंग मेळा हो
बाजरीच्या शेतात,
करी सळसळ वात,
कशी घुमली अंबेराई हो

कोण कानोसा घेऊन पाही हो
कोण लगबग धावून येई हो
गहिवरून धरून पोटी हो
माझे आजोबा चुंबन घेती हो
लेक एकुलती,
नातू एकुलता,
किती कौतुक कौतुक होई हो

कवी - ग. ह. पाटील

फुलपाखरे

धरू नका ही बरे
फुलावर उडती फुलपाखरे

मजे मजेचे रंग तयांचे
संध्याकाळी जसे ढगांचे
ऊन कोवळे त्यावर नाचे
सकाळचे हासरे
फुलांवर उडती फुलपाखरे॥

हात लावता पंख फाटतील
दोरा बांधून पायही तुटतील
घरी कशी मग सांगा जातील
दूर तयांची घरे
फुलांवर उडती फुलपाखरे॥

काल पाकळ्या रात्री निजल्या
सकाळ होता सगळ्या उठल्या
आणि त्याच का उडू लागल्या
पंख फुटुनी गोजिरे
फुलांवर उडती फुलपाखरे॥


कवी - अ. ज्ञा. पुराणिक

आव्हान

छळून घ्या संकटानो,
संधी पुन्हा मिळणार नाही,
कर्पुराचा देह माझा
जळून पुन्हा जळणार नाही.

साहेन मी आनंदाने तुमचे वर्मी घाव
असाच नेईन किनार्‍याशी चुकलेली नाव
मार्ग बिकट आला तरी मागे मी वळणार नाही ll १ ll

निराश मी होणार नाही, झुंजता तुमच्या सवे
मनी माझ्या जागतील आकांक्षांचे लाख दिवे
वेदना झाल्या तरीही अश्रू मी गाळणार नाही ll २ ll

आव्हान माझे तुम्हांला चालून या माझ्यावरी
धैर्याची कट्यार माझी पाजळेन तुमच्यावरी
संकटानो सावधान गाफील मी असणार नाही ll ३ ll


कवी - अशोक थोरात

डराव डराव!

डराव डराव! डराव डराव!
का ओरडता उगाच राव?

पत्ता तुमचा नव्ह्ता काल
कोठुनी आला? सांगा नाव
धो धो पाउस पडला फार
तुडुंब भरला पहा तलाव
सुरू जाहली अमुची नाव
आणिक तुमची डराव डराव!

बटबटीत डोळ्यांचे ध्यान
विचित्र तुमचे दिसते राव!
सांगा तुमच्या मनात काय?
ही घ्या छत्री, ही घ्या नाव
जा गाठा जा अपुला गाव
आणि थांबवा डराव डराव!


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आभाळाची आम्ही लेकरे

आभाळाची आम्ही लेकरे,
काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा
धर्म वेगळा नाही

श्रमगंगेच्या तीरावरती
कष्टकर्‍यांची आमुची वसती
नाव वेगळे नाही आम्हा
गाव वेगळा नाही

इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
कर्म वेगळे नाही आम्हा
मार्ग वेगळा नाही

माणुसकीचे अभंग नाते
आम्हीच आमुचे भाग्याविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा
संत वेगळा नाही

कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ-रथ ओढुन नेऊ
श्वास वेगळा नाही आम्हा
ध्यास वेगळा नाही


कवी - वसंत बापट

या बाइ या

या बाइ या,
बघा बघा कशि माझि बसलि बया.

ऐकु न येते,
हळुहळु अशि माझि छबि बोलते.

डोळे फिर्वीते,
टुलु टुलु कशि माझि सोनि बघते.

बघा बघा ते,
गुलुगुलु गालातच कशि हसते.

मला वाटते,
इला बाइ सारे काहि सारे कळते.

सदा खेळते,
कधि हट्ट धरुनि न मागे भलते.

शहाणि कशी,
साडिचोळि नवि ठेवि जशिच्या तशी.


गीत    -   दत्तात्रय कोंडो घाटे
संगीत -   वसंत देसाई
स्वर    -   साधना सरगम
'मी ५ मिनिटात तय्यार होते....' असे एखाद्या मुलीने म्हणणे
.
.
.
.
आणि
.
.
.
.
.
'मी ५ मिनिटात तेथे पोहचतो....' असे एखाद्या मुलाने म्हणणे.....

एकाच नाण्याच्या दोन बाजू