कशासाठी पोटासाठी

कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक्‌ शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी

उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दोन डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी

डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी? पोटासाठी !


कवी - माधव ज्यूलियन

झाल्या तिन्हीसांजा

अजुनी कसे येती ना, परधान्या राजा
किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हीसांजा ll ध्रु.ll

उशिर होई काढाया गाईंच्या धारा
शालु हिरा कालवडी देती हुंकारा
टवकारिती कान जरी वाजे दरवाजा ll१ll

वाट तरी सरळ कुठें पांदितिल सारी
त्यांतुनी तर आज रात्र अंधारी भारी
आणि बैल कसल्याही बुजती आवाजा ll२ll

'जेवणार मी पुढ्यात' घाली मधु रुंजी
झोपेने पेंगुळली तरी न नीजे मंजी
आणि किती करती आंत-बाहेरी ये-जा ll३ll

निवल्यावर हुरडयाच्या उसळीस न गोडी
लवकर कां सोडिती न मोट तरी थोडी
अधिकाधिक खाली-वर होई जीव माझा ll४ll

गुरगुरला जो पिसाळ काल जरा कांही
म्हणती त्या मेल्याला काळिज कीं नाही
परि पाठीराखी ती आहे अष्टभुजा ll५ll


कवी - यशवंत

मामाच्या गावाला जाऊया

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुनी घेऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामन खाऊया

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया


गीत      -    ग. दि. माडगूळकर
संगीत   -    वसंत पवार
स्वर      -    आशा भोसले
चित्रपट  -    तू सुखी रहा (१९६३)
राग       -    भैरवी

आला क्षण!

गडबड घाई जगात चाले,
आळस डुलक्या देतो; पण
गंभीरपणे घड्याळ बोले-
'आला क्षण-गेला क्षण!'

घड्याळास या घाई नाही,
विसावाही तो नाही; पण
त्याचे म्हणणे ध्यानी घेई-
'आला क्षण-गेला क्षण!'

कर्तव्या जे तत्पर त्यांचे
दृढ नियमीत व्हावयास मन,
घड्याळ बोले अपुल्या वाचे-
'आला क्षण-गेला क्षण!'

कर्तव्याला विमुख आळशी
त्यांच्या हृदयी हाणित घण,
काळ-ऐक! गातो अपुल्याशी-
'आला क्षण-गेला क्षण!'

लवाजम्याचे हत्ती झुलती
लक्ष त्यांकडे देतो कोण,
मित रव जर हे सावध करिती-
'आला क्षण-गेला क्षण!'


कवी -  केशवसुत

मामाची गाडी

माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो

कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेऊन जाई हो
नाही बिकट घाट,
सारी सपाट वाट,
मऊ गालीचे ठायी ठायी हो

शीळ घालून मंजूळ वाणी हो
पाजी बैलांना ओहोळ पाणी हो
गळा खुळखुळ घुंगुर माळा हो
गाई किलबील विहंग मेळा हो
बाजरीच्या शेतात,
करी सळसळ वात,
कशी घुमली अंबेराई हो

कोण कानोसा घेऊन पाही हो
कोण लगबग धावून येई हो
गहिवरून धरून पोटी हो
माझे आजोबा चुंबन घेती हो
लेक एकुलती,
नातू एकुलता,
किती कौतुक कौतुक होई हो

कवी - ग. ह. पाटील

फुलपाखरे

धरू नका ही बरे
फुलावर उडती फुलपाखरे

मजे मजेचे रंग तयांचे
संध्याकाळी जसे ढगांचे
ऊन कोवळे त्यावर नाचे
सकाळचे हासरे
फुलांवर उडती फुलपाखरे॥

हात लावता पंख फाटतील
दोरा बांधून पायही तुटतील
घरी कशी मग सांगा जातील
दूर तयांची घरे
फुलांवर उडती फुलपाखरे॥

काल पाकळ्या रात्री निजल्या
सकाळ होता सगळ्या उठल्या
आणि त्याच का उडू लागल्या
पंख फुटुनी गोजिरे
फुलांवर उडती फुलपाखरे॥


कवी - अ. ज्ञा. पुराणिक

आव्हान

छळून घ्या संकटानो,
संधी पुन्हा मिळणार नाही,
कर्पुराचा देह माझा
जळून पुन्हा जळणार नाही.

साहेन मी आनंदाने तुमचे वर्मी घाव
असाच नेईन किनार्‍याशी चुकलेली नाव
मार्ग बिकट आला तरी मागे मी वळणार नाही ll १ ll

निराश मी होणार नाही, झुंजता तुमच्या सवे
मनी माझ्या जागतील आकांक्षांचे लाख दिवे
वेदना झाल्या तरीही अश्रू मी गाळणार नाही ll २ ll

आव्हान माझे तुम्हांला चालून या माझ्यावरी
धैर्याची कट्यार माझी पाजळेन तुमच्यावरी
संकटानो सावधान गाफील मी असणार नाही ll ३ ll


कवी - अशोक थोरात