चिमणा राजा

गृहराज्यावर गाजवि सत्ता राजा चिमणा एक
जन्मजात हा! नको कराया यास कुणीं अभिषेक! ।।१।।

कटि आईची मृदुल आपुलें सिंहासन बनवून
मधुर बोबड्या अस्फुट वचनीं सोडि हुकूम तिथून ।।२।।

बसावयाला सुंदर घोडा त्यास असे काठीचा
परि आवडता अधिक त्याहुनी ताईच्या पाठीचा! ।।३।।

त्या घोड्यावर डौलें बैसे, चाबुक नाजुक हातीं
सहल करोनी देखरेखही ठेवी राज्यावरतीं ।।४।।

राजदंड जड राजे दुसरे वागविती स्वकरांत
मनें दुज्यांची मुठींत परि हा ठेवितसे दिनरात! ।।५।।

मृदुल करांची मिठी सोडवूं येइ न मल्लांनाही
अमोघ याची शक्ति यापरी, उपमा कसली नाहीं ।।६।।

पराभवाचें लक्षण दिसतां रुदनास्त्रा सोडीत
प्रबल शत्रुही मग त्यायोगें सहजचि होई चीत!।। ७।।


कवी - दामोदर अच्युत कारे

ऐकव तव मधु बोल

ऐकव तव मधु बोल, कोकिळे,
ऐकव तव मधु बोल ॥ध्रु॥

नकोत मजला मैना, राघू,
साळुंकी, चंडोल
नकोत मजला विविध सुरांचे
कृत्रिम हे हिंदोल ॥१॥

एक तुझा स्वर आर्त खरोखर
वाटे मज बिनमोल,
वसंत नाहीं अजुन संपला,
कां झालीस अबोल? ॥२॥

सुखें वसंतासंगें जा मग
पहावया भूगोल,
गा शेवटचा बोल लपुनहि
पर्णांमाजीं खोल ॥३॥

पाहिन नंतर वाट वर्षभर
दाबुनि चित्त विलोल
नको करूं पण आस एवढी
जातां जातां फोल! ॥४॥


कवी - माधव जुलियन

पावसाच्या धारा

पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागोजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ

झळके सतेज, ढगांवर वीज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज

झोंबे अंगा वारे, काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें

हर्षलासे फार, नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार

झाडांचिया तळी, डोईवरी मारा
रानातील गुरे शोधिती निवारा

नदीलाही पूर, लोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर

झाडांची पालवी, चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें रंगदार छबी

थांबला ओझर, उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश

किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुले

धरणी हासली, सुस्नात जाहली
वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली


कवयित्री - शांता शेळके

प्रेमस्वरूप आई

प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

तू माय, लेकरू मी; तू गाय, वासरू मी;
ताटातुटी जहाली, आता कसे करू मी ?

गेली दुरी यशोदा टाकूनि येथ कान्हा,
अन्‌ राहिला कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे;

नैष्ठुर्य त्या सतीचे तू दाविलेस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीष्य साधण्याते.

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.

चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही,
आईविणे परी मी हा पोरकाच राही.

सारे मिळे परंतू आई पुन्हा न भेटे,
तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे.

आई तुझ्या वियोगे ब्रम्हांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे.

किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोंती,
अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती !

ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही

वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?

घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !


गीतकार -  माधव ज्यूलिअन
गायक    -  गजाननराव वाटवे
संगीत    -  जी. एन्. जोशी

पतंग उडवूं चला

पतंग उडवूं चला
गडयांनो, पतंग उडवूं चला
रंग ढगांवर मावळतीचा
लाल पिंवळ्सर किती मजेचा
झुळझुळ वारा नदीकांठचा
बाजुस डोंगरमळा.

करु चला सुरवात बरोबर
सोडा सोडा रीळ भराभर
पंतग चढवा हे वार्‍यावर
ढगांस भेटायला.

मउ वाळुंत पाय रोवुनी
देउं झटका दोरा ओढुनी
पतंग जातील वर वर चढुनी
पंख नको त्यांजला.

जशीं पाखंरें आभाळांत
पंख पसरुनी तरंगतात
दिसतील तैसे पतंग रंगीत
खेळ किती चांगला !

सूर्य डोंगराआड लपेल
काळा बुरखा जग घेईल
खेळ तोंवरी हा चालेल
मजेदार आपुला.


कवी - अ.ज्ञा. पुराणिक

घननिळ

घननिळ सागराचा घननाद येतो कानी,
घुमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी,

चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत,
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत,

आकाश तेज भारे माडावरी स्थिरावे,
भटकी चुकार होडी लाडात संथ धावे,

वाळूत स्तब्द झाला रेखाकृती किनारा,
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा,

जलधी बरोबरीचे आभासमान नाते,
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे,

सानिध्य सागराचे आकाश पांघराया,
परी साथ ना कोणाची अस्तीत्व सावराया


कवी - विद्याधर करंदीकर

कादरखां

[ मुंबईत झालेल्या हिंदू -पठाणांच्या दंग्यात गारद झालेल्या एका पठाण विरास उद्देशून सदरहू 'विलापिका' रचिली आहे ]

हा कोण इथे पडलेला ! 'कादरखां काबुलवाला' ! धृ.

धिप्पाड देह हा अडवा ! पसरला सहा अन् फूट !
पालथे पलिकडे पडले ! विक्राळ खिळ्यांचे बूट !
चुणिदार चोळणा आतां ! फाटून होय चिरगूट !
बैसला पठाणी बडगा ! बाजूला दूर निमूट !

चिखलांत बुडाले कल्ले !
त्यां ओढिति चिल्लें-पिल्लें !
खिसमीस खिशांतिल उरलें
कुणी मारि तयावर डल्ला ! 'कादरखां काबुलवाला' !.....।।१।।

अफगाण दर्‍यांतिल आतां ! डुरकाळ्या फोडिति शेर !
बुरख्यांतुनि कंदाहारी ! उठलासे हाहा:कार !
तो शर्बत पीतां-पीतां ! दचकेल मधेंच अमीर !
'क्या हुवा!' ओरडुनि ऐसें ! बडवतात सगळे ऊर !

ते हेरतचे अक्रोड
ते बदाम-पिस्ते गोड
रडरडुनी होती रोड
अल्बुखार अंबुनि गेला ! 'कादरखां काबुलवाला' !....।।२।।

तो हिंग काबुली आतां ! विकणार यापुढें कोण ?
व्याजास्तव बसुनी दारीं ! गरिबांचा घेइल प्राण ?
खाणार कोण यापुढतीं ! तीं कलिंगडें कोरून?
सजवी नूर नयनांचा ! कीं सुरमा घालुनि कोण ?

रस्त्यावर मांडुनि खाटा
हुक्क्यासह मारिल बाता-
हिंडेल कोण वा आतां
घालून चमेलीमाळा ? ! 'कादरखां काबुलवाला' ! .....।।३।।

करुं नका गलबला अगदीं ! झोंपला असे हा वीर !
जन्मांत असा पहिल्यानें ! पहुडला शांत गंभीर !
राहणें जितें जर, मागें ! व्हा दोन पावलें दूर !
हा बसेल मानगुटीला ! ना तरी होउनी पीर !

जा पळा-पंचनाम्याला
तो आला डगलेवाला,--
अडकवील कीं साक्षीला,
मग म्हणाल "पुरता भंवला ! 'कादरखां काबुलवाला' !....।।४।।


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें