झाशीची राणी

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रृ ll

तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll

घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करित ती वार,
गोर्‍यांची कोंडी फोडीत, पाडीत वीर इथे आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll

मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll


कवी - भा. रा. तांबे
जाति - महाकाली
स्थळ - लष्कर-ग्वाल्हेर
साल - १९२९

लतांनो सांगू का तुम्हां !

लतांनो सांगू का तुम्हां, उद्या श्रीराम येणार!
वनाला सर्व ह्या आता, खरा आनंद होणार

तुम्हा कोठूनीया ठावा, कसा श्रीराम तो आहे
सुखशांती झरा तेथे, सदाचा वाहतो आहे
उद्या पाहाल डोळ्यांनी, सुखाचा पूर्ण आराम
मुखे लागाल भुकाया, जय श्रीराम श्रीराम

बघूनी नाथ हर्षाने, मला उन्माद येईल
नका आणू मनामाजी, चुकोनी दोष होतील
लतांनो ध्याल ना पुष्पे, झर्‍यांनो ध्याल ना पाणी
पहा ही अर्पीली कैसी, फळे या घोर वृक्षांनी

नव्हे कोठून ही उष्ठी, जरासी सावलेली ही
कडू कच्ची फळे रामा, कशी देईन गं बाई
उद्या श्रीराम येऊ दे, तुम्हांला मीच दावीन
फळे ही त्यास अर्पुनी, सुखे त्या पायी लोळेन
जय श्रीराम श्रीराम, जय श्रीराम श्रीराम


कवी - वा. गो. मायदेव

गाइ घरा आल्या

गाइ घरा आल्या । घणघण घंटानाद
कुणीकडे घालू साद । गोविंदा रे? ।। १ ।।

गाइ घरा आल्या । धूळ झाली चहूंकडे
घनश्याम कोणीकडे । माझा गेला? ।। २।।

गाइ घरा आल्या । वासरे हंबरती ।।
कुणीकडे बालमूर्ती । कृष्ण माझा? ।।३।।

गाइ घरा आल्या । ब्रह्मानंद वासरांना
काय करू माझा कान्हा । चुकला का? ।।४।।

गाइ घरा आल्या । घोटाळती पाडसांशी हाय! नाही हृषीकेशी । माझ्यापाशी ।।५।।
गाइ घरा आल्या । पाडसास हुंगीतात
माझा मात्र यदुनाथ । दुरावला! ।।६।।

गाइ घरा आल्या । आंवरेना मुळी पान्हा
राहणार भुका तान्हा । वासुदेव ।।७।।

गाइ घरा आल्या । दूध वाहे झुरूझुरू
माझ्या जीवा हुरूहूरू । मुकुंदाची ।।८।।

गाइ घरा आल्या । दूधवाट राहियेली
कुणी माझा वनमाळी । गुंतवीला ।।९।।

गाइ घरा आल्या । झाली बाई कातरवेळ
आजुनी का घननीळ । ये ना घरा? ।।१०।।

गाइ घरा आल्या । लावियेली सांजवात
बाळा दामोदरा रात । झाली न का?    ।।११।।

गाइ घरा आल्या । पाल चूकचूक करी ।
राख अंबे माझा हरी । असे तेथे ।।१२।।


कवी - वा. गो. मायदेव

थोर तुझे उपकार

थोर तुझे उपकार
ㅤㅤㅤㅤㅤㅤआई, थोर तुझे उपकार॥ध्रु॥
वदत विनोदें, हांसत सोडी
ㅤㅤㅤㅤㅤㅤकोण दुधाची धार॥१॥
नीज न आली तर गीत म्हणे
ㅤㅤㅤㅤㅤㅤप्रेम जिचे अनिवार॥२॥
येई दुखणें तेंव्हा मजला
ㅤㅤㅤㅤㅤㅤकोण करी उपचार॥३॥
कोण कडेवर घेउनि फिरवी
ㅤㅤㅤㅤㅤㅤचित्तीं लोभ अपार॥४॥
बाळक दुर्बळ होतों तेंव्हा
ㅤㅤㅤㅤㅤㅤरक्षण केलें फार॥५॥
त्वांचि शिकविलें वाढविलें त्वां
ㅤㅤㅤㅤㅤㅤआहे मजवर भार॥६॥
स्मरण तुझ्या या दृढ ममतेचें
ㅤㅤㅤㅤㅤㅤहोतें वारंवार॥७॥
नित्य करावें साह्य तुला मी
ㅤㅤㅤㅤㅤㅤहा माझा अधिकार॥८॥


कवी - भास्कर दामोदर पाळंदे

मीच का?

मी या जगांत भरल्या, दु:खास का पुसावे?
अनमोल आसवांना, ऐसेच का वहावे?

राधा न मी न मीरा, ना ती अनारकलि मी
का मीच विष प्यावे? बेड्यांत जोखडावे?

नजरांत खोट त्यांच्या, शापीत भाव सारे
सौंदर्य मीच माझे, मग शाप का म्हणावे?

सारेच ओळखीचे, दिसले ठसे हजारो
मीही तशीच का त्या, वाटेवरून जावे?

धर्मासही न चुकले, जर वागणे अधर्मी
ते पाश संस्कृतीचे मग मीच का जपावे?

भाळी कधीच माझ्या, रेखा न पाहिल्या मी
मग जे घडून गेले, संचीत का म्हणावे?

सृष्टीस निर्मिताना, ना 'तो' मुहूर्त पाही
माझ्या मनांत का मी, पंचांग बाळगावे?

ते सावलीत जाती, टाळूनिया उन्हाला
तेजोनिधीस, माझ्या मी सावलीत घ्यावे

मिळेल का अशी प्रियसी?

कधी कधी वाटत
माझं ही कुणी असाव
मीठी मध्ये तिच्या
तासन तास बसाव

पावसात एकत्र फिराव
नदीकाठी बसाव
तिच्या सहवासात
स्वताला विसराव

सुख दुखात तिच्या
अस सामील व्हाव
की रुततील काटे तिच्या पायाला
आणि लागतील माझ्या काळजाला घाव

तिच्यावर इतक प्रेम कराव
की जगातल सगळ सुख तिला द्याव
तिच्या डोळ्यात आपल
प्रेमाच जग पहाव

मिळेल का अशी प्रियसी
नेहमी शोधात फिराव...
मिळेल अशी कोणी तरी
या आशेवर जगत रहाव...!!!!

काय मिळत मोठ होवून..?

आईच्या अन्गाई गीताने लागणारी झोप,
आता लागते झोपीच्या गोळ्या खावून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

बाबान्नी बोट धरून शिकवलेले चालणे,
आता चालावे लागते काठीचा आधार घेवून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

आईने तेलाचा मारा करून वाढवीलेले केस,
आता ते ही लवकरच जातात डोक सोडून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

मित्रान सोबत रात्रन-दिवस असायच्या गप्पा,
आता फ़क्त-"हाय! कसा आहेस..?" ते ही फ़ोने वरून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

शाळेत सरांच्या रागवण्यातही असायची एक मज्जा,
आता फ़क्त संताप -चिडचिड बॉसच्या बॉसीन्ग वरून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

सारेच जगतात लहानपणीच्या आठवणिन्च्या जगात,
आनि जगतात-"आय मीस माय टीन-एज" म्हणुन..,
काय माहित काय मिळत मोठ होवून............