पैसे परत

झंप्या पॅराशूटच दुकान काढतो....

गिऱ्हाईक : कस चालत हे?
हऱ्या : अगदी सोप्प ! याला घेऊन विमानातून
उडी मारायची आणि हे लाल बटन दाबायच...मग
तुम्ही हळूहळू तरंगत जमिनीवर उतरणार......
गिऱ्हाईक : आणि समजा पॅराशूट उघडलच
नाही तर......

झंप्या : पैसे परत

आई भवानी तुझ्या कृपेने

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्‍ताला
अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये ....

गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

उधं उधं उधं उधं उधं

गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ
हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ
धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
भक्‍ती दाटून येते आई नाव तुझे घेता
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये ....

गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

उधं उधं उधं उधं उधं

अग सौख्यभरीला माणिकमोती मंडप आकाशाचा
हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा
अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला

आज आम्हावरी संकट भारी धावत ये लौकरी
अंबे गोंधळाला ये

गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये

अंबाबाईचा ..... उधं उधं उधं उधं उधं
बोल भवानी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं
सप्‍तशृंगी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं


गीत     -     अजय-अतुल
संगीत  -     अजय-अतुल
स्वर     -     अजय गोगावले
चित्रपट -    सावरखेड एक गाव (२००४)

आई उदे ग अंबाबाई

आई उदे ग अंबे उदे, उदे

आई उदे ग अंबाबाई !
उदे उदे ग अंबाबाई

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई

तुळजापूरची तुकाई आई ..... गोंधळा ये
कोल्हापूरची लक्षुमी आई ..... गोंधळा ये
मातापूरची रेणुका आई ..... गोंधळा ये
आंबेजोगाई जोगेश्वरी ..... गोंधळा ये

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई

आईची मूर्ति स्वयंभु वरी शोभली, सिंहावरी साजरी
सिंहावरी साजरी, हिर्‍यांचा किरिट घातला शिरी
चंडमुंड महिशासूर आईनं धरून रगडला पायी
आई उदे ग अंबे उदे, उदे

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई

आला नवरात्राचा महिना, आळवावा आईचा महिमा
आळवावा आईचा महिमा, त्याला काय सांगावी उपमा ?
अहो येळ साधुनी खेळ मांडिला आशिर्वाद दे आई
आई उदे ग अंबाबाई

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई

शिवछत्रपतींची शिवाई..... गोंधळा ये
शाहुराजश्रींची अंबाई..... गोंधळा ये
विदर्भनिवासिनी चंडी आई..... गोंधळा ये
महाराष्ट्र कुलस्वामिनी आई..... गोंधळा ये

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई



गीत      -     जगदीश खेबूडकर
संगीत   -      राम कदम
स्वर      -     राम कदम
चित्रपट -    आई उदे ग अंबाबाई (१९७१)

कर आता गाई गाई

कर आता गाई गाई
तुला गाते मी अंगाई
आज माझ्या बाहुलीची
झोप कुणी नेली बाई ?

बोळक्यांची उतरंडी
लुटुपुटीची चूल
आवरले आहे बाई
आता कुठे घरकुल !

काम सारे उरकता
थकला ग माझा जीव
नको छळू तूही राणी
येऊ दे ना जरा कीव ?

नीज नीज लडिवाळे
नको रडू, देते झोका
उभा बागुल दाराशी
सांग त्यास बोलावू का ?




गीतकर  -     शांता शेळके
संगीत    -     श्रीनिवास खळे
स्वर       -     सुषमा श्रेष्ठ

सागरा प्राण तळमळला !

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ! ||धृo||

भूमातेच्या चरणतला तूंज धूंता, मी नित्य पाहिला होता ;
मज वदलासी अन्य देशिं चल जाउं; सृष्टिची विविधता पाहू .
तैं जननी हृद् विरहशंकितहि झालें, परि तुवां वचन तिज दिधलें,
'मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टिं वाहीन. त्वरि तया परत आणीन !'
विश्वसलों या तव वचनीं, मी, जगदनुभवयोगें बनुनी,मी,
तव अधिक शक्त ऊद्धरली मी, "येईन त्वरें" कथुनि सोडिलें तिजला,
सागरा, प्राण तळमळला ! || १ ||

शुक पंजरिं वा हरीण शिरावा पाशीं, ही फसगत झाली तैशी !
भूविरह कसा सतत साहुं यापुढतीं, दश दिशा तमोमय होती,
गुणसुमनें मी वेंचियली या भावें, कीं, तिनें सुगंधा घ्यावें !
जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा.
ती आम्रवृक्ष-वत्सलता, रे, नव कुसुमयुता त्या सुलता, रे,
तो बालगुलाबहि आतां, रे, फुलबाग मला, हाय! पारखा झाला!
सागरा, प्राण तळमळला ! || २ ||

नभिं नक्षत्रें बहुत, एक परि प्यारा- मज भरतभूमिचा तारा.
प्रासाद ईथें भव्य; परी मज भारी- आईची झोपडी प्यारी.
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा- वनवास तिच्या जरी वनिंचा.
भुलविणें व्यर्थ हें आता, रे, बहु जिवलग गमते चित्ता, रे,
तुज सरित्पते, जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालतो तुजला
सागरा, प्राण तळमळला || ३ ||

या फेनमिषें हंससि,निर्दया,कैसा,कां वचन भंगिसी ऐसा ?
त्वस्वामित्वा सांप्रति जी मिरवीते, भिऊनि कां आंग्लभूमीतें,
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी ? मज विवासनाते नेसी ?
जरि आग्लभूमि भयभीता, रे, अबला न माझि ही माता, रे,
कथिल हें अगस्तिस आतां,रे, जो आंचमनी एक क्षणी तुज प्याला,
सागरा, प्राण तळमळला || ४ ||


कवी      -     स्वा. विनायक दामोदर सावरकर
संगीत   -     पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर      -     लता मंगेशकर,  उषा मंगेशकर,  मीना मंगेशकर
                    पं. हृदयनाथ मंगेशकर

हंस व नळराजा

न सोडी हा ऩळ भूमि पाळ माते...।
असे जाणोनी हन्स वदे त्याते....।।
हन्स हिन्सा नच घडो तुझ्या हाते..।
सोड राया जाईन स्वस्थळाते...।। १।।

जाग जागी आहेत वीर कोटी..।
भले झुन्जारही शक्ति जया मोठी....।।
तया माराया धैर्य धरी पोटी..।
पाखरू हे मारणे बुद्धि खोटी....।।२।।.।

वधुनि माझी हे कनक रूप काया..।
कटक मुकुटादिक भूषणे कराया..।।
कशी आशा उपजली तुला राया..।
काय नाही तूजला दया माया...।।३।।

म्हातारी उडता न येचि तिजला, माता मदिया अशी।
कान्ता काय वदू नव प्रसवती, साता दिसाची तशी ।।
पाता त्या उभयास मी मज विधी घातास योजितसे..।
हातासाजी न्रुपा तुझ्या गवसलो. आता करावे कसे....।।४।।

सदय ह्रदय याचे भूप हा ताप हारी,।
म्हणुनी परिसता मी होय येथे विहारी..।।
मजही वध कराया पातकी पातला जो..।
वरूनि पति असा ही भूमि कैसी न लाजो..।।५।।

येणे परी परिसता अती दीन वाचा..।
हेलावला नळ पयोधि दया रसाचा.।।
सोडी म्हणे, विहर जा अथवा फिराया..।
राहे यथा निज मनोरथ हन्स राया..।।६।।

सुटुनि खग पळाला, बैसला शाल शाखे..।
क्षणभरि निज देही मुक्ति विश्रान्ति चाखे..।।
स्वजन तव तयाचे भोवताली मिळाले...।
कवळिती निज बन्धु बाष्प बिन्दु गळाले...।।७।।

निसावा घे काही, उडुनि लवलाही परतला...।
न्रुपाळाच्या स्कन्धि बसुनि मणिबन्धि उतरला...।।
म्हणे हन्स, क्षोणी पतिस तुज कोणी सम नसे...।
दयेचा हा ठेवा तुज जवळी देवा वसतसे...।।८।।

ऐक राया तू थोर दया सिन्धु..।
नीति सागरही तूचि दीन बन्धु..।।
निखन्दोनी बोलिलो नको निन्दु...।
तुझे ऐसे उपकार जया वन्दु....।।९।।

हन्स मिळणे हे कठिण मयी लोकी...।
सोनियाचा तो नवल हे विलोकी..।।
तशा मजलाही सोडिले तुवा की..।
तुझा ऐसा उपकार मी न झाकी...।।१०।।

किति रावे असतील तुझ्या धामी...।
किति कोकिळ ही सारिका तसा मी..।।
चित्त लागियले तूझिया लगामी...।
न्रुपा योजी मज आपुलिया धामी...।।११।।

हे पाखरू मजसी येईल काय कामा ।
ऐसे न्रुपा न वद पूरित लोक कामा ।।
मोले उणे व्यजन ते धरिता पुढारी ।
छाया करी तपन दीप्तिस ही निवारी।।१२।।

दुबळी माझी झोळी

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी

एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया

गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

होते तितुके देई याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा

अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाची पाळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी


कवी       -     ग. दि. माडगूळकर
संगीत    -     सुधीर फडके
स्वर       -     सुधीर फडके
चित्रपट   -    प्रपंच (१९६१)
राग        -    मिश्र पिलू