जुन्या पाऊलखुणा

शब्दांचा वाटु लागतो आधार तेव्हा ,
मनात उठु लागतात भावनांचे काहूर जेव्हा,

नाही ऐकत जेव्हा हे सूर अंर्त् मनाचे ,
भावनांची छटा सहजच ऊधळते रंग इंद्रधनुष्याचे,

स्वच्छंद करावा विहार नात्यांच्या स्वैर आकाशात ,
खुशाल सांगावे गुपित मनातले पक्षांच्या कानात ,

क्षितीजापलिकडे झेप घ्यायची जर असेल जिद्द ,
उतरतील कागदावर गौरव इतिहासाचे शब्द ,

जगात सगळंच सहज,सरल आणि सुंदर असतं ,
आणि नसलं तर तसं घडवावं लागतं ,

जरी रोज बुद्धिशी भांडतोस तू मना ,
तरी परत शोधत फिरतोस त्याच जुन्या पाऊलखुणा....!!!!


कवयित्री - स्वाती

लहरी तो बेभान वारा

सखे, तुझ्या आठवणीचा
लहरी बेभान वारा
सडा सुखाचा दुज्या
अंगणात पाडुनी गेला....

सखे, तुझी नी माझी आता
फ़क्त स्वप्नातच भेट घडते
हे गुपित आपलं कुठुनतरी
कळलय वाटतं त्याला
तसं त्याचं नी माझ
आधीच पटत नव्ह्ते
म्हणुन कदाचीत हा
आजची रात्र जागवुनी गेला............

सखे, का गं नेहमीच हा
वारा असा वेगात सुटतो
अंधा-या रात्रीस चमकता
तारा जसा नभात तुटतो
अगदी तसाच बघ हा
स्वप्न माझं तोडुनी गेला ............

सखे, आज तु माझी
नाहीस तरी माझ्या
मनात तुझ्या प्रेमाचा दिवा
अजुनही तसाच तेवत राहतो
माझं तुझ्यावरचं प्रेम जणु काही
पहावत नाहीये त्याला
तु सोडुनी जात होतिस
तेव्हा मी रडलो नव्हतो
म्हणुन कदाचीत आज हा
मला रडवुनी गेला............
सखे, तो तेवता दिवा आज हा
वारा विझवुनी गेला............

सगळीच गणितं चुकली आहेत......

सगळीच गणितं चुकली आहेत......
आता जीवनाची चक्रे थांबली आहेत,
आयुष्याचा प्रवासच जणू थबकला आहे
माहीत आहे की तु येणार नाहीस,
तरीसुध्दा वेडे मन हे तुझ्याच वाटेला डोळे लाऊन बसले आहे

पहाटेचा उत्साह आता राहीला नाही,
संध्याकाळ म्हणावी तशी रम्य होत नाही
सगळं कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतयं
कळत असुनही मन पुन्हा पुन्हा तिकडेच धावतयं

सकाळची गुलाबी थंडी, संध्याकाळची सोनेरी किरणे,
पक्षांची किलबिल आणि पावसातला गारवा
सगळं काही कुठेतरी हरवलं आहे,
निर्सगही जणु माझ्याबरोबर तिलाच शोधत आहे

माझे कुठं चुकले आता काहीच कळत नाही,
अनुत्तरीत प्रश्नाची उत्तरं शोधुनही सापडत नाहीत
म्हणुन पुन्हा नव्याने सगळी गणितं तपासत आहे ,
पण छे आता सगळीच गणितं चुकली आहेत....

गुलाल

माझी भकास शिल्पे शोधीत काल होता;
तो देखण्या व्यथेचा ऐनेमहाल होता.

स्वस्तात फार ज्याने विकले मला अवेळी;
तो गौर कातडीचा कोणी दलाल होता.

आयुष्य आज माझे देते मला शिवी ही-
श्रीमंत आसवांचा तू रे हमाल होता.

जिकून हारलो मी सारेच डाव तेथे;
निद्रिस्त प्राक्तनाचा जेथे निकाल होता.

ठेवून काळजाला शिंक्यावरी घरी अन्
मग सांत्वनास माझ्या आला रुमाल होता.

सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे;
कोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता.


गझलकार - डॉ.श्रीकृष्ण राऊत
संग्रह - गुलाल आणि इतर गझला

वरात

तसा न चंद्र राहिला, तशी न रात राहिली
अजूनही तशीच तू तनामनात राहिली

अजून आठवे मला सुरेख तीळ सावळा
अमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली

शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे
मधुर चोरटी मिठी तुझी स्वरात राहिली

कधी कधी हवेत ह्या तुझाच स्पर्श जाणवे
फिरून सावली तुझी जशी घरात राहिली

पुसून लोचने जिथे तुझा निरोप घेतला
अजून ती मनात ह्या तुझी वरात राहिली


गझलकार - डॉ. श्रीकृष्ण राऊत
संग्रह - 'गुलाल आणि इतर गझला'

दुकान

दोह्यात जीव नाही, गझलेत जान नाही;
शायर जगात दुसरा माझ्या समान नाही.

चोरून रोज खातो उर्दू मधील लोणी;
सायीवरी मराठी माझे इमान नाही.

गेली हयात सारी वाया तुझी गड्या रे;
तू एक वाचलेला माझा दिवान नाही.

आश्चर्य हे मला की झाली न ‘अहम’बाधा;
माझ्याशिवाय आता कोणी महान नाही!

तू देणगी दिली ना जाहीर वा छुपीही;
वेड्या तुला कधीही मिळणार मान नाही.

त्यांचा बुडेल धंदा विकती न जे स्वत:ला;
तोट्यात चालणारे माझे दुकान नाही.


गझलकार - डॉ. श्रीकृष्ण राऊत

पहारा

तुला पाहिजे तसे वाग तू
भल्या बुऱ्याला लाव आग तू

उगाच खोटी भीड कशाला
हक्क आपला तिला माग तू

कुठे अचानक गायब झाले
त्या सत्याचा काढ माग तू

जमेल जेथे मैत्र जिवाचे
तिथे फुलांची लाव बाग तू

मनात नाही त्याच्या काही
नकोस त्याचा धरू राग तू

अजून नाही रात्र संपली
सक्त पहारा देत जाग तू


कवी - डॉ. श्रीकृष्ण राऊत