माझे गांव, माझे जग...!

जातोच आहेस गावाकडे
तर वेशीवरच्या संह्याद्रीला सांग नमस्कार माझा,
म्हणांव, तु ढाल होऊन उभा आहेस तीथे
म्हणूनच लढतोय इथे मावळा तुझा...

वेशीवरनं एस टी आत वळेल,
अलगद, अदखळत माझ्या गावात घुसेल,
माझे गांव, माझे जग
साऱ्या डोळ्यांनी टीपून घे,
कण कण साचवून शीदोरी बांधून घेऊन ये...

जातोच आहेस गावाकडे
तर माझ्या घरीही जाऊन ये,
दारात माज़े मुके जनावर असेल माझी वाट बघत,
थोपट त्याला प्रेमाने अन
येतोय म्हणून सांगून ये..

घरी माझी आई असेल,
तीला म्हणांव काळजी घे..
साचलीच माझी आठवण डोळ्यांत तीच्या,
तर ती माया थेंबभर घेउन ये.

थोरला भाऊही भेटेल माझा,
काही बोलू नकोस, वाकून नमस्कार कर,
त्याच्या पायाखालची चीमुट्भर धूळ घेऊन ये,
येवढं माझं काम कर....

जातोच आहेस गावाकडे
तर लवकरच परतून ये,
दूर इथे मी हळवा व्याकूळ,
गावाकडचे सुख तेवढे घेउन ये.

ज्या ज्या वयात जे जे करायचं

ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

लहानपणी ... फुलपाखरांच्या मागं धावायचं
तरुण वयात 'पाखरांच्या' मागं धावायचं
प्रौढ वयात कुटुंबासाठी धाव धाव धावायचं
म्हातारपणी देवाचं नाव घेत गप पडून रहायचं...
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

लहानपणी ऊन वारा पावसामधे मनमुराद बागडायचं
तरुणपणी प्रत्येक श्वासात मोगरा घेऊन जगायचं
प्रौढ वयात आपल्या भोवती नंदनवन फुलवायचं
म्हातारपणी त्याच बागेत निव्रुत्त मनानं रमायचं
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

लहानपणी खेळातलं भांडण जिथल्या तिथं मिटवायचं
तरुणपणी मोर्चे न्यायचे, आंदोलनसुद्धा करायचं
प्रौढ झाल्यावर आपल्या सगळ्या तक्रारींची मुळं शोधत रहायचं
उतारवयात सार्या मुळांना गीतेत बुडवून टाकायचं
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

तरीही काही गोष्टी प्रत्येक वयात जमायला हव्यात
पहिल्या पावसाच्या पहिल्या धारा अंगावरती झेलायला हव्यात
वार्यासोबत पिसासारखं हलकं होता यायला हवं
गडगडणार्या मेघासारखं बोलकं होता व्हायला हवं
अंधाराच्या गर्भामध्ये ज्योत ठेवता यायला हवी
एकटं खूप वाटतं तेंव्हा गाणी म्हणता यायला हवी
कुठ्ल्याही वयात आपला आनंद आपणच शोधत रहायचं...

तरीही...
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

जुन्या पाऊलखुणा

शब्दांचा वाटु लागतो आधार तेव्हा ,
मनात उठु लागतात भावनांचे काहूर जेव्हा,

नाही ऐकत जेव्हा हे सूर अंर्त् मनाचे ,
भावनांची छटा सहजच ऊधळते रंग इंद्रधनुष्याचे,

स्वच्छंद करावा विहार नात्यांच्या स्वैर आकाशात ,
खुशाल सांगावे गुपित मनातले पक्षांच्या कानात ,

क्षितीजापलिकडे झेप घ्यायची जर असेल जिद्द ,
उतरतील कागदावर गौरव इतिहासाचे शब्द ,

जगात सगळंच सहज,सरल आणि सुंदर असतं ,
आणि नसलं तर तसं घडवावं लागतं ,

जरी रोज बुद्धिशी भांडतोस तू मना ,
तरी परत शोधत फिरतोस त्याच जुन्या पाऊलखुणा....!!!!


कवयित्री - स्वाती

लहरी तो बेभान वारा

सखे, तुझ्या आठवणीचा
लहरी बेभान वारा
सडा सुखाचा दुज्या
अंगणात पाडुनी गेला....

सखे, तुझी नी माझी आता
फ़क्त स्वप्नातच भेट घडते
हे गुपित आपलं कुठुनतरी
कळलय वाटतं त्याला
तसं त्याचं नी माझ
आधीच पटत नव्ह्ते
म्हणुन कदाचीत हा
आजची रात्र जागवुनी गेला............

सखे, का गं नेहमीच हा
वारा असा वेगात सुटतो
अंधा-या रात्रीस चमकता
तारा जसा नभात तुटतो
अगदी तसाच बघ हा
स्वप्न माझं तोडुनी गेला ............

सखे, आज तु माझी
नाहीस तरी माझ्या
मनात तुझ्या प्रेमाचा दिवा
अजुनही तसाच तेवत राहतो
माझं तुझ्यावरचं प्रेम जणु काही
पहावत नाहीये त्याला
तु सोडुनी जात होतिस
तेव्हा मी रडलो नव्हतो
म्हणुन कदाचीत आज हा
मला रडवुनी गेला............
सखे, तो तेवता दिवा आज हा
वारा विझवुनी गेला............

सगळीच गणितं चुकली आहेत......

सगळीच गणितं चुकली आहेत......
आता जीवनाची चक्रे थांबली आहेत,
आयुष्याचा प्रवासच जणू थबकला आहे
माहीत आहे की तु येणार नाहीस,
तरीसुध्दा वेडे मन हे तुझ्याच वाटेला डोळे लाऊन बसले आहे

पहाटेचा उत्साह आता राहीला नाही,
संध्याकाळ म्हणावी तशी रम्य होत नाही
सगळं कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतयं
कळत असुनही मन पुन्हा पुन्हा तिकडेच धावतयं

सकाळची गुलाबी थंडी, संध्याकाळची सोनेरी किरणे,
पक्षांची किलबिल आणि पावसातला गारवा
सगळं काही कुठेतरी हरवलं आहे,
निर्सगही जणु माझ्याबरोबर तिलाच शोधत आहे

माझे कुठं चुकले आता काहीच कळत नाही,
अनुत्तरीत प्रश्नाची उत्तरं शोधुनही सापडत नाहीत
म्हणुन पुन्हा नव्याने सगळी गणितं तपासत आहे ,
पण छे आता सगळीच गणितं चुकली आहेत....

गुलाल

माझी भकास शिल्पे शोधीत काल होता;
तो देखण्या व्यथेचा ऐनेमहाल होता.

स्वस्तात फार ज्याने विकले मला अवेळी;
तो गौर कातडीचा कोणी दलाल होता.

आयुष्य आज माझे देते मला शिवी ही-
श्रीमंत आसवांचा तू रे हमाल होता.

जिकून हारलो मी सारेच डाव तेथे;
निद्रिस्त प्राक्तनाचा जेथे निकाल होता.

ठेवून काळजाला शिंक्यावरी घरी अन्
मग सांत्वनास माझ्या आला रुमाल होता.

सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे;
कोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता.


गझलकार - डॉ.श्रीकृष्ण राऊत
संग्रह - गुलाल आणि इतर गझला

वरात

तसा न चंद्र राहिला, तशी न रात राहिली
अजूनही तशीच तू तनामनात राहिली

अजून आठवे मला सुरेख तीळ सावळा
अमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली

शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे
मधुर चोरटी मिठी तुझी स्वरात राहिली

कधी कधी हवेत ह्या तुझाच स्पर्श जाणवे
फिरून सावली तुझी जशी घरात राहिली

पुसून लोचने जिथे तुझा निरोप घेतला
अजून ती मनात ह्या तुझी वरात राहिली


गझलकार - डॉ. श्रीकृष्ण राऊत
संग्रह - 'गुलाल आणि इतर गझला'