आई...

दिवसभर कितीही दंगा केला
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही

कुणी विचारतं ..
"तुला घरी जावसं वाटत नाही?"
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाही

आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो
तरीहि तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली

घरापासून दूर ...
आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते
आता रणरणंत ऊन आहे

तू आपल्या पिलांसाठी
सगळं केलंस ...
एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ...
आणि तू त्यांना जाऊ दिलंस

पावसाच्या मनातलं.......

पावसाच्या मनातलं मला काही कळत नाही..
तो बरसतोय अन तिची आठवण काही सरत नाही..

त्याला म्हटलं, टळ की लेका,त्रास का देतोस
तुझी रिमझिम तिची चाहूल काही विसरू देत नाही

तो वाफ़ाळता कप, त्या खिडकीतल्या गप्पा
ते ओलेचिंब भिजणे,डोळ्यांना काही हसू देत नाही

म्हणतो आता जादू बघ, अन हसला गडगडाटी
दारावर टकटक झालं अन पाहतॊ तर ती उभी होती
हसली खुदकन अन ओलेतीच येउन बिलगली
आणि ओढतच मला पावसात घेउन गेली

हं, खरंच पावसाचं मला काही कळत नाही
तो सरलाय आता पण तो क्षण काही सरत नाही
तो बरसतोय अन तिची आठवण काही सरत नाही..

व्यथा

खर सांगू , आज काल मी काहीच लिहित नाही
भावनांचा शब्दांशी मेळच जुळत नाही

काहूर आहे मनात अनेक प्रश्नांचे
एकाही प्रश्नाला माझ्या
उत्तरच मिळत नाही

परिस्थिती बदललीय ,
मलाही कळतंय
पण कळलेले सगळेच
अंगी वळत नाही .

आठवांच्या सरींनी
अंग चिंब भिजते
तरीही वास्तव भोवताली जळते
कधी वेळे आधी कधी वेळे नंतर

उमलत्या कळ्या, फुललेली फुले
कुणाला आवडत नाहीत ?
खुडून टाकलेल्या फुलांना मात्र
कुणीच माळत नाही

म्हणूनच आज काल मी काहीच लिहित नाही
म्हणूनच आज काल मी काहीच बोलत नाही


कवी - रसप( रणजीत पराडकर )

माणसं

खोक्यांसारखी माणसं
एकावर एक रचलेली
गंज चढलेले मेंदू
आणि अक्कल पुसलेली

मेंढरांसारखी माणसं
मागे-मागे चालणारी
कंटाळवाणी मंदगती
पडणाऱ्यावर पडणारी..

बगळयांसारखी माणसं
ध्यान लावून बसलेली
दिसतात स्थितप्रज्ञ
मोडता घालण्या टपलेली

गेंड़यांसारखी माणसं
निगरगट्ट बनलेली
सोयर ना सूतक काही
मस्तवाल फुललेली

माणसासारखी माणसं
नावापुरती उरलेली
चिमणीच्या जातीसारखी
दुर्मीळ होत चाललेली.....


कवी - रसप( रणजीत पराडकर )

वाईट असते

एक आयुर्वेदिक गझलमाफीचा साक्षीदार
॥ ॐ धन्वंतरये नमः ॥

मध्यरात्री जागणे वाईट असते
अन दुपारी झोपणे वाईट असते

सारखे रागावणे वाईट असते
सारखे वैतागणे वाईट असते

दूध अन फळ मिसळणे वाईट असते
फ्रीजचे पाणी पिणे वाईट असते

चिप्सपिझ्झे चापणे वाईट असते
कोकपेप्सी ढोसणे वाईट असते

दूध घेणे टाळणे वाईट असते
अन चहाकॉफी पिणे वाईट असते

प्रौढ स्त्रीला सेवणे वाईट असते
अन स्वतःशी खेळणे वाईट असते

यौवनाने माजणे वाईट असते
वृद्धपण नाकारणे वाईट असते

सप्तधातू बिघडणे वाईट असते
दोषतिन्ही बिनसणे वाईट असते

आळसाने लोळणे वाईट असते
नित्यकर्मे टाळणे वाईट असते

देह शाश्वत समजणे वाईट असते
आत्मबुद्धी विसरणे वाईट असते

जेव्हा कधी......

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

एक प्रश्न...?

एक दिवस मी तिज विचारले
माझ्या संगे येशील का?

माझ्या सुंदर स्वप्न नगरीत
भरभरुन साथ देशील का?

एका माझ्या हाकेवर धावत तु येशील का?
वाटले कधी एकटे तर कवेत मज घेशील का?

मोठया तुझ्या या मनात थोडीशी जागा देशील का?
न सांगताच माझ्या भावना तु समजुन घेशील का?

रस्त्यावर चालताना प्रेमळ सावली देशील का?
भरलेल्या मनाचे अश्रु ओंझळीत तु घेशील का?

गेला कधी तोल तर हळुच सहारा देशील का?
लागली कधी भुक तर प्रेमळ घास भरवशील का?

जीवनाच्या अंधारात प्रकाश तु होशील का?
प्रकाशाने त्या जीवन तेजोमय करशील का?

चुकलो कुठे प्रेमाने धपाटा मज देशील का?
सतत येणा-या वाद्ळांना लढायला मला लावशील का?

ह्या प्रश्नाची उत्तरे मज कधी मिळतील का
अनुत्तरीत प्रश्नांची तुच उत्तरं होशील का?

सरते शेवटी एकच वचन मज देशील का?
माझ्या जाण्याच्या घडीला दोन अश्रु ढाळशील का?