दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरु पीऊन अगदी
झींगली होती कार्टी...

दु:ख म्हणाले " दोस्तानों!
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणून
राग मानू नका!

मनात खूप साठल आहे
काहीच सुचत नाही
माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय
आता राहवत नाही...

मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेव्हा
जत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला...
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखाचा हात सुटला!

तेव्हा पासून फ़िरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का 'सुख' माझा
कुणाच्या ही नजरेत..."

सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दु:ख ढसाढसा रडले!

नशा सगळ्यांची उतरली
दु:खाकडे पाहून!
दु:खालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून...

सुखाच्या शोधामध्ये आता
मी सुद्धा फ़िरतोय
दु:खाला शांत करायचा
खूप प्रयत्न करतोय...

जीवनाच्या रथाचे
आहेत सुख दु:ख सारथी
सुख मिळाले तर दु:खाच्या घरी
मीच देईन पार्टी

बायको पाहिजे कशी

बायको पाहिजे कशी तर म्हणतात..
जशी कपा खाली बशी..
आणि डोक्या खाली उशी..

"तिला समजू नका हो तुमचा नौकर..
जीन जीवन भर कराव तुमची चाकर.".
"पुरुषाच्या मना येव्हडे कसे कळेना..
आणि बरोबर जागेवर लक्ष्य त्याचे वळेना.".
"मग ती कशी पण असो..चालेल.."

अहो कस चालेल..काळी असली तर..
नाही हो देखणी असायला हवी..
आणि हातात लेखणी असायला हवी..
नुसती लेखणी चालणार कशी..
कपा खाली लागत नाही का बशी..

"आता काय नौकरी वाली चालणार.".
मग घरात भाकरी कोण घालणार ..
अहो पाहिजे तर कशी..?

जशी कपा खाली बशी..
आणि डोक्या खाली उशी.
असावी ती दहावी पास..
आणि दिसायला पण खूपच खास..

"आधी बघा किती झालाय तुमच वय..
तुम्हा बघूनच वाटेल हो तिला भय.".

वाटूद्याना हो तुमच काय जातंय..
आणि तुमच्या बापच कोण खातंय

"अहो तिचे माय-बाप ऐकून काय म्हणतील..
आणि लोक पण तुम्हा जोड्याने हाणतील"

मग नौकरी वाला म्हणून सांगा ..
बघा कश्या लागतील माझ्या पुढे रांगा.

"थोडी तर वातुद्याहो हो तुम्हाला लाज..
एव्हडा कसा सुटला हो माज."
"दिसायली असली तरी खूपच साजूक..
तीच मन खूप असतंय हो नाजूक.".

मग मला काय करायचंय ..
 फक्त माझ पोट भरायचंय ..
मग नाजूक असो व लहान..
ठेवा म्हणा माझ्या कडे गहान...

"पैश्या चा दाखवून हो नाद..
आयुष्य करू नका तीच बरबाद.."
"वयाला शोभेल अशी बघा..
मग नेसवा तिला झगा
ती पण दिसेल लहान..
आणि लोक पण म्हणतील महान.."

न्हाय न्हाय न्हाय..
मला बायको पाहिजे अशी .
जशी कपा खाली बशी
आणि डोक्या खाली उशी..

"मग काढून टाका तुमची मिशी..
आणि हाकत बस म्हशी"
"तुम्ही म्हणता बायको जशी..
आता  मिळणार नाही तशी..
आता पोरी लय भारी शिकल्यात..
आणि तुमच जग त्या जिंकल्यात..
तुमचा नाद सोडा खुळा
आणि चांगल्या रस्त्यावर वळा"
राहील नुसताच खुळा कप..
मग संन्याश्या सारख करा जप.."


कवी - बळीराम भोसले

पडु आजारी, मौज हीच वाटे भारी

पडु आजारी, मौज हीच वाटे भारी

नकोच जाणे मग शाळेला
काम कुणी सांगेल न मजला
मउ मउ गादी निजावयाला
चैनच सारी, मौज हीच वाटे भारी

मिळेल सांजा, साबूदाणा
खडिसाखर, मनुका, बेदाणा
संत्री, साखर, लींबू आणा
जा बाजारी, मौज हीच वाटे भारी

भवती भावंडांचा मेळा
दंगा थोडा जरि कुणि केला
मी कावुनि सांगेन तयाला
‘जा बाहेरी’, मौज हीच वाटे भारी

कामे करतिल सारे माझी
झटतिल ठेवाया मज राजी
बसेल गोष्टी सांगत आजी
मज शेजारी, मौज हीच वाटे भारी

असले आजारीपण गोड
असून कण्हती का जन मूढ ?
हे मजला उकलेना गूढ-
म्हणुन विचारी, मौज हीच वाटे भारी


गीत - भानुदास
संगीत - श्रीधर फडके

आई तुला प्रणाम

वंदे मातरम ----- मराठीत

आई तुला प्रणाम ॥ धृ ॥

सुजल तू, सुफल तू, मलयानिलशीत तू ।
हरीतशस्यावृत्त तू ॥
चांद्रज्योत्सनापुलकित यामिनी ।
उदितपुष्प-लता-वनांनी विभूषिते ॥
सुहासिनी, सुमधूर भाषिणी ।
सुखदा, वरदायिनी ॥ १ ॥ आई, तुला प्रणाम

कोटी कोटी मुखांनी अभिव्यक्त तू ।
कोटी कोटी बाहूंचे बल प्राप्त तू ॥
अबला कशी? महाशक्ती तू ।
अतुलबलधारिणी ॥
प्रणितो तुज तारिणी ।
शत्रुदलसंहारिणी, तुला प्रणाम ॥ २ ॥ आई, तुला प्रणाम

तू विद्या, तू धर्म ।
तू हृदय, तू मर्म ॥
तूच प्राण अन् कुडीही ।
तूच मम बाहूशक्ती ॥
तूची अंतरीची भक्ती ।
तुझीच प्रतिमा वसे, हर मंदिरी, मंदिरी ॥
तुला प्रणाम ।
आई तुला प्रणाम ॥ ३ ॥ आई, तुला प्रणाम

तू ची दुर्गा, दशप्रहरणधारिणी ।
कमला, कमलदल विहारिणी ॥
वाणी, विद्यादायिनी ।
तुला प्रणाम, कमले तुला प्रणाम ॥
अमले, अतुले, सुजले, सुफले, आई ।
आई तुला प्रणाम ॥
श्यामले, सरले, सुस्मिते, भूषिते ।
तूच घडवी, पोषी तू, आई ॥ ४ ॥ आई तुला प्रणाम


मराठी रुपांतर - श्री. नरेंद्र गोळे

वृंदावनी वेणू

वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे ।
वेणूनादे गोवर्धन गाजे ॥१॥

पुच्छ पसरूनी मयूर विराजे ।
मज पाहता भासती यादवराजे ॥२॥

तृणचारा चरू विसरली ।
गाईव्याघ्र एके ठायी झाली ।
पक्षीकुळे निवांत राहिली ।
वैरभाव समूळ विसरली ॥३॥

यमुनाजळ स्थिरस्थिर वाहे ।
रविमंडळ चालता स्तब्ध होय ।
शेष कूर्म वराह चकीत राहे ।
बाळा स्तन देऊ विसरली माय ॥४॥

ध्वनी मंजूळ मंजूळ उमटती ।
बाकी रुणझुण रुणझुण वाजती ।
देव विमानी बैसोनी स्तुति गाती ।
भानुदासा पावली प्रेम-भक्ति ॥४॥


रचना – संत भानुदास
स्वर – अजित कडकडे

बेमालूम

खरा प्रार्थनेत असणारा
कधी सावध नसतो.
पण त्या दिवशी आमचं तसं नव्हतं.
नाही म्हटलं तरी आम्हाला चाहूल होतीच.
आम्हांला करायची होती पारध.
तुझी उभी काठी कोसळली
अन् आम्ही त्याच्यावर झडप घातली.
बोटं दाखवायला कुणीतरी
हवाच होता आम्हाला
तो अनायासे सापडला.
खरं तर केव्हाचे आम्ही सारे
गोळी होऊन दडून बसलो होतो
त्याच्या पिस्तुलात ....
पण कसे दोघेही फसलात !


कवी - सदानंद रेगे
कवितासंग्रह - वेड्या कविता

प्रकाशक

हि कविता २१ सप्टेंबर १९८२ ला सदानंद रेगे ह्यांचा मृत्यु झाल्यानंतर दिलीप चित्रे यानी 'अभिरुची' च्या जानेवारी १९८३ च्या अंकात प्रकाशित केली होती. रेग्यांच्या कोणत्याही संग्रहात ही कविता आलेली नाही.

प्रकाशक हा मदारी असतो
लिहिता ना येणार्‍यांना तो लिहिते करतो.
पाणीपुरीला जसे जिर्‍याचे पाणी
तसा तो लेखकांना अटळ असतो.
त्याच्याकडे एक भली मोठी बॅटरी असते.
काळोखातल्यांना तो प्रकाशात आणतो.
प्रकाशक हा पेटीतल्या मिठाईसारखा सुसंकृत असतो.
कशासाठी तरी तो सारखी झीज सोशीत असतो.
लेखकाप्रमाणेच तोही वरचेवर सेमिनारला वगैरे जातो.
लेखकातले जे गाणारे असतात त्यांचे गाणे करतो.
सटीसहामासी लेखकाना घरी बोलावून
तो त्याना रॉयल टी देतो.
प्रत्येक प्रकाशकाच्या देवघरात शॉयलॉकचा फोटो असतो.
या चित्रातला शॉयलॉक साईबाबांसारखा दिसतो.
दिवसाचे तेवीस तास तो वात्सल्यरसाने ओथंबलेला असतो.
पण केव्हा केव्हा तो खणखणीत परखडपणाही दाखवतो.
'कोळशाच्या दुकानातले कोळसे' तशी तुमची पुस्तकं
ही त्याची गर्जना ऐकून् भले भले लेखक शब्दगळीत होतात.
प्रकाशकाचे गणित रँग्लर परांजप्यांसारखे असते.
पै पैच्या हिशोबागणिक तो नाथांसारख्या टाळ्या वाजवतो.
प्रत्येक प्रकाशक हा मॉमपेक्षाही अधिक पैसे लेखकाला वाटतो.
देवळाच्या पायर्‍या उतरीत तो खाली येऊ लागला
की धट्टेकट्टे लेखकही लुळ्यापांगळ्याचं सोंग घेऊन उभे राहतात.
ज्या लेखकाना आयुष्यात एकदा तरी मोटरीत बसायचे असते,
त्याना प्रकाशकावरच मदार ठेवावी लागते.
प्रकाशकाचा स्वतःचा असा दरबार असतो.
या दरबारात बसून प्रकाशक लेखकाना शहाणे करूनी सोडतो.
या दरबारात येताना लेखकाना मानेला स्प्रिंगा लावून घ्याव्या लागतात.
टाळ्यांचे टेपरेकॉर्डिंग त्याने खास अमेरिकेहून आणलेले असते.
लेखक म्हणजे कारकून या सत्याचे प्रूफ प्रकाशक प्रत्यही देत असतो.
पुस्तके बांधून घेण्यापलीकडे कसलंच बायंडिंग प्रकाशकावर नसते.
लठ्ठ् लेखकांना तो नित्य नेमे डायेटवर ठेवतो.
मठ्ठ लेखकांना तो फटकन् बोलतो.
हा़डकुळ्या लेखकांच्या बेडकुळ्या काढून दाखवतो.
भांडकुळ्या लेखकांच्या तोंडाला लागायला याला लाज वाटते.
अशा या परमदयाधन प्राण्याला,
परमेश्वरा, जन्मोजन्मी प्रकाशकाचाच जन्म दे.
त्याला कुत्रं, मांजर् वगैरे करून आम्हा लेखकांची कुचंबणा करू नकोस.
तो कुत्रं झाला तर आम्हाला मांजर व्हावं लागेल.
तो मांजर झाला तर आम्ही उंदीर होऊ.
पुस्तकं खाणार्‍या झुरळांना कधीकधी
प्रकाशकाचा चेहरा फुटलेला वाटतो
म्हणून ही प्रार्थना एवढंच.
सहस्त्रयोन्या वगैरे आम्हा कर्मदरिद्रांना.
त्याला एवढी एकच ठेव,
पुस्तके छापण्याची...."


कवी - सदानंद रेगे
(आभार :-अशोक पाटील)