माझ्या खिशातला मोर

माझ्याजवळ,
माझ्या खिशात
नेहमी एक मोर असतो
पण माझ्या खिशातला हा मोर
साधासुधा मोर नाही.

कधीमधी उदासलं
किंवा मनावर काळे ढग दाटून आले
की हा शिकवलेला मोर
खिशातून आपोआप बाहेर येतो,
देहभर पिसारा फुलवतो अन नाचतो..
मनसोक्त...मनमुराद.

त्याला नाचताना पाहून
मुसळधार पाऊस पडतो,
उदास काळे ढग निघून जातात
अन माझं मन
पुन्हा शुभ्र होतं...निरभ्र होतं

एक गंमत सांगू?
असाच एक मनकवडा मोर
तुमच्याही खिशात आहे:
फक्त तुम्ही,
त्याला नाचणं शिकवायला हवं !


कवी - प्रशांत असनारे

छोटीसी आशा

झाली तयारी पुर्ण?
तुझा चाकू कुठाय?
हा असा बोथट का?
नीट धार करुन घे-
टेकताच रक्त आलं पाहीजे!

तुझं पिस्तूल व्यवस्थित आहे ना?
साफ केलं?
ठीक आहे,
मग आता लोड करुन ठेव.

तुझा हा वस्तरा असा का?
जुना वाटतोय;
नवीन घे.
उगाच रिस्क नको!
आणि...

...आणि हे काय?
एवढी जय्यत तयारी सुरु असताना
हा कोण मूर्ख
माउथऑर्गन वाजवतोय?

असू दे! असू दे!!
तोही खिशात असू दे.
कुणी सांगावं-
कदाचित तोच उपयोगी पडेल!


कवी - प्रशांत असनारे

सुख बोलत नाही

सुख बोलत नाही;
ते कणाकणातून फक्त झिरपत राहतं
कडेकपारीतून ठिबकणा-या सहस्त्रधारेसारखं
फेसाळत्या दुधासारखं ते जिवणीच्या कडेकडेनं सांडत असतं.
तीराला बिलगणा-या फेसासारखं ते नाच-या डोळ्यांतून खेळत असतं.
सुख बोलत नाही;
बोलू शकतही नाही.
आभाळाला ओढून घेणा-या सरोवरासारखं
ते जीवाला स्वत:त ओढून घेतं, लपेटून घेतं.
—- निरोपाच्या थरथरत्या क्षणी बोलू पाहतं ते सुखच असतं
तेव्हाही त्याची भाषा असते हुंकाराची, खुणेची,
डोळ्यांत साकळलेल्या आसवांची
सुख बोलत नाही;
बोलू शकतही नाही.
ते असतं…. फक्त असतं.


कवयित्रि  - अनुराधा पाटील

आपणच आपल्याला

आपणच आपल्याला लिहलेली
पत्रं वाचता वाचता
ओले होणारे डोळे पुसून
फडफडू द्यावित वा~यावर पानं....

थोडसं हसून आपणच आपल्याला
सांगावी कधीतरी एखादी गोष्ट
आपणच गावं आपल्यासाठी
रिमझिमत्या स्वरांच एखादं गाणं.......

आपणच जपावेत मनात;
वा~यावर झुलणारे गवताचे तुरे
एखादी धावणारी पायवाट, अन्
जपावेत काही नसलेले भास्......

जिथं आपल्यासाठी फुलं उमलतील
अशी जागा सगळ्यानाच सापडत नाही
मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना
आपणच द्यावेत थोडेसे श्वास........


कवियत्री - अनुराधा पाटील

माझ्या जीवनाचा झालो मी गायक !

कान देऊनीया बैसलो ऐकत

जीवन-संगीत माझे मीच

विविध रागांचे सुरेल मीलन

जाहले तल्लीन मन माझे

आज मी जाहलो पुरा अंतर्मुख

माझे सुखदुःख झाले गाणे

बाहेरील जगी तीव्र कोलाहल

त्यात हे मंजूळ गाणे माझे

माझ्या जीवनाचा झालो मी गायक

आणिक रसिक श्रोता मीच !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

कुतूहल

लवले होते फ़ुलुनी ताटवे नव्या वसंतात
चंद्र बिलरी शिंपित होता रजताने रात
बसलो होतो हिरवळीत गुणगुणत भावगीत
आशा पक्षांपरी उडाल्या होत्या गगनात

तोच अचानक फ़ुले कोठोनि पड्ली ओंजळ्भर
आणि खोडकर तुझे हात ते आले खांद्यावर
कलेकलेने चंद्रापरी ते प्रेमहि मावळ्ले
शिड फ़िरवुनी तारु आपले माघारी वळ्ले

आज पुन्हा त्या जागी येता तुट्लेले धागे
ताट्व्यात या दिसती अजुनि हो अंतर जागे
आज नसे ती व्याकुळ्ता ,ना राग ना अनुराग
विझुनि गेलि कधिच जी तु फ़ुलवलीस आग

मात्र कुतुहल केवळ वळ्तांना पाउले
किती जणांवर उधळलीस वा उधळ्शील तु फ़ुले


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

मातृभूमीप्रत

जन्मा येउनिया कुशीं तव; तुझ्या स्कंधीं उरीं वाढुनी
प्रेमाचा नच गोड शब्द वदलों केव्हां तुला आजुनी,
नाहीं एक विचारही अजुनिया त्वत्सेवनीं योजिला;
ऐशाला म्हणशील काय मजला तूं सांग गे आपुला ?  || १||

जे त्वत्पुत्र उदारधी झिजविती काया तुझ्या सेवनीं,
जाळाया निज पोट ही शिणविली वाणी तयां निंदुनी;
व्हावा तोष धन्यास यास्तव सदा मी हासलों त्यांजला,
आतां तूं कुरवाळशील वद का ऐशा कुपुत्रा मला ?  ||२||

'खोटी ही दुबळी, गुलाम, भरला वृद्धापकाळीं चळ,'
ऐसा दोष दिला तुला वश परां होवोनिया केवळ;
आतां हें स्मरतां मना हळहळे तें; गे गळा दाटला-
डोळे तूं पुसशील काय पदरें घेवोनि अंकीं मला ?  ||३||

जें त्वां जीवन हें दिलें, सकळ ही सत्ता तुझी ज्यावरी
जातां तें परसेवनीं न तिळही संकोचलों अंतरीं;
धिग्धिग् जीवन हें ! असें मन अतां धिक्कारितें गे मला,
त्यातें तूं धरिशील काय ह्रदयीं पान्हा फुटोनी तुला ? || ४||

आहाहा ! सुत ते असिव्रत जईं त्वत्सेवनीं पाळितां
धैर्याचे गिरि ते कधीं न डगले आकाशही फाटतां,
नेतां त्यांस दिगंतरास फुटला आई, उमाळा तुला-
डोळे तूं पुसशील का निज, यमें नर्कास नेतां मला ?  ||५||


कवी - भा. रा. तांबे