संसार

सांगते तुम्हां वेगळे निघा । वेगळे निघून संसार बघा ॥१॥
संसार करिता शिणले भारी । सासुसासरा घातला भरी ॥२॥
संसार करिता शिणले बहू । दादला विकून आणले गहू ॥३॥
गव्हाचे दिवसे जेविली मावशी । मजला वेडी म्हणता कैशी ॥४॥
संसार करिता दगदगलें मनी । नंदा विकिल्या चौघीजणी ॥५॥
एकाजनार्दनी संसार केला । कामक्रोध देशोधडी गेला ॥६॥


रचनाकर्ते - संत  एकनाथ

जोगवा

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासूर मर्दना लागुनी ।
त्रिविध तापाची कराया झाडणी । भक्‍तांलागोनी पावसी निर्वाणी ॥१॥

आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ्व मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीसी जाईन ॥२॥

नवविध भक्‍तिच्या करीन नवरात्रा । करुनी पोरी मागेन ज्ञानपात्रा।
धरीन सद्‍भाव अंतरीच्या मित्रा । दंभ संसार सांडिन कुपात्रा ॥३॥

पूर्ण बोधाची घेईन परडी । आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वंडी । अद्‍भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥

आता साजणी जाले मी नि:संग । विकल्प नवऱ्याचा सोडियला संग ।
कामक्रोध हे झोडियेले मांग । केला मोकळा मारग सुरंग ॥५॥

ऐसा जोगवा मागुनी ठेविला । जाउनी महाद्वारी नवस फेडिला ।
एकपणे जनार्दन देखिला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥ 


रचनाकर्ते - संत  एकनाथ

जोशी

तेथूनि पुढे बरे होईल । भक्‍तिसुखें दोंद वाढेल । फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥
मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥
मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा । हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारूण । तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३॥
एकाजनार्दनी कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी । जा शरण सद्‍गुरुसी । फेरा चुकवा चौऱ्यांयशी ॥४॥


रचनाकर्ते - संत  एकनाथ

बहिरा

बहिरा झालो या या जगी ॥धृ॥

 नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण ।
नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥

नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली ।
पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥

माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता ।
बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥  


रचनाकर्ते - संत  एकनाथ

मुका

मुका झालो वाचा गेली ॥धृ॥

होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी ।
चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥

जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना ।
निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥

साधुसंतांची निंदा केली । हरिभक्‍तांची स्तुती नाही केली ।
तेणे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनी कृपा लाधली ॥३॥ 


रचनाकर्ते - संत  एकनाथ

एडका

एडका मदन तो केवळ पंचानन ॥धृ॥

धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा ।
इंद्रचंद्रासी दरारा । लाविला जेणे । तो केवळ पंचानन ॥१॥

धडक मारिली नारदा । केला रावणाचा चेंदा ।
दुर्योधना मारिली गदा । घेतला प्राण । तो केवळ पंचानन ॥२॥

भस्मासुर मुकला प्राणासी । तेचि गती झाली वालीसी ।
विश्वामित्रासरिखा ऋषी । नाडिला जेणे । तो केवळ पंचानन ॥३॥

शुकदेवांनी ध्यान धरोनी । एडका आणिला आकळोनी ।
एकाजनार्दनी चरणी । बांधिला जेणें । तो केवळ पंचानन ॥४॥


रचनाकर्ते - संत  एकनाथ

फकिर

हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥१॥
सब घरमो सांई बिराजे । करत है बोलबाला ॥२॥
गरीब नवाजे मै गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥
अपना साती समजके लेना । सलील वोही अल्ला ॥४॥
जीन रूपसे है जगत पसारा । वोही सल्लाल अल्ला ॥५॥
एकाजनार्दनी निजवद अल्ल। आसल वोही बिटपर अल्ला ॥६॥


रचनाकर्ते - संत  एकनाथ