भवानी

सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला ॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥
दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६॥
एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला ॥७॥  


रचनाकर्ते - संत  एकनाथ

दादला

मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने । रांज्यात लेणे नाही ॥५॥
एकाजनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६॥  


रचनाकर्ते - संत  एकनाथ

भूत

भूत जबर मोठे ग बाई ।
झाली झडपड करु गत काई ॥१॥

सूप चाटूचे केले देवऋषी ।
या भूताने धरिली केशी ॥२॥

लिंबू नारळ कोंबडा उतारा ।
त्या भूताने धरिला थारा ॥३॥

भूत लागले नारदाला ।
साठ पोरे झाली त्याला ॥४॥

ऊत लागले ध्रूवबाळाला ।
उभा अरण्यात ठेला ॥५॥

एकाजनार्दनी भूत ।
सर्वांठायी सदोदित ॥६॥  






रचनाकर्ते - संत  एकनाथ

विंचू

विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥

पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥

मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥

ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥

सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥  


रचनाकर्ते - संत  एकनाथ

नाथाच्या घरची

नाथाच्या घरची उलटी खूण ।
पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥

आंत घागर बाहेरी पाणी ।
पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥

आजी म्या एक नवल देखिले ।
वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥

शेतकऱ्याने शेत पेरिले ।
राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥

हांडी खादली भात टाकिला ।
बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥

एकाजनार्दनी मार्ग उलटा ।
जो तो गुरुचा बेटा ॥६॥  


रचनाकर्ते - संत  एकनाथ

संसार

सांगते तुम्हां वेगळे निघा । वेगळे निघून संसार बघा ॥१॥
संसार करिता शिणले भारी । सासुसासरा घातला भरी ॥२॥
संसार करिता शिणले बहू । दादला विकून आणले गहू ॥३॥
गव्हाचे दिवसे जेविली मावशी । मजला वेडी म्हणता कैशी ॥४॥
संसार करिता दगदगलें मनी । नंदा विकिल्या चौघीजणी ॥५॥
एकाजनार्दनी संसार केला । कामक्रोध देशोधडी गेला ॥६॥


रचनाकर्ते - संत  एकनाथ

जोगवा

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासूर मर्दना लागुनी ।
त्रिविध तापाची कराया झाडणी । भक्‍तांलागोनी पावसी निर्वाणी ॥१॥

आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ्व मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीसी जाईन ॥२॥

नवविध भक्‍तिच्या करीन नवरात्रा । करुनी पोरी मागेन ज्ञानपात्रा।
धरीन सद्‍भाव अंतरीच्या मित्रा । दंभ संसार सांडिन कुपात्रा ॥३॥

पूर्ण बोधाची घेईन परडी । आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वंडी । अद्‍भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥

आता साजणी जाले मी नि:संग । विकल्प नवऱ्याचा सोडियला संग ।
कामक्रोध हे झोडियेले मांग । केला मोकळा मारग सुरंग ॥५॥

ऐसा जोगवा मागुनी ठेविला । जाउनी महाद्वारी नवस फेडिला ।
एकपणे जनार्दन देखिला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥ 


रचनाकर्ते - संत  एकनाथ