कोण, कुठे आहेस तरी!

उगाच फिरते तरल कल्पना बहुरंगी अनिवार पिशी
वस्तुशून्य प्रणयांत अशी

फलकावर फिरवली कुंचली स्वैर गतीने कशी तरी
चित्र निघाले रम्य परी

आवरतो पण तरी चालतो पुनःपुन्हा मी पुढे पुढे
कुण्या तरी चांदणीकडे

निशीगंधाचा परिमळ भरला फूलच नाही दिसत तरी
ही भरली हुरहूर उरी

धुक्यांत भरले मधुर चांदणे, दिसतच नाही कोर कशी?
ढगांत दडली चोर जशी

पुरे तुझी अव्यक्त त-हा, तुलाच भुलला जीव पुरा
कधी सांग येशील घरा?

तुझेच, ललिते, अधीरतेने चित्र चिंतितो परोपरी!
- कोण कुठे आहेस तरी!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

साद ही नाही तुम्हाला

धुंद या वाणीत येते पाखरांची स्वैरता
साद ही नाही तुम्हाला, का तुम्ही वेडावतां?

मुग्ध संध्याराग माझा, अन उषा ही सावळी -
काय, हो, हातात येते तोलता ? ही अंधता

गूढ अव्यक्तात आहे चारुतेची चांदणी
चर्मचक्षुनी कुणाला काय येते पाहता?

अंतरी व्याकुळ होतो ऐकता आरोप हे
मर्मभेदी हे विषारी घाव का, हो, घालता?

‘हेच गा अन तेच गा ‘का घालता ही बंधने?
मोहना माझी आसवी ना कुणाची अंकिता

पूजितो निष्पाप माझी देवता प्रेमोज्ज्वला
दूर जा, मंदीरदारी पाप का हे ठेवता?

नेटकी विक्री कराया सज्जले भोंदू निराळे
मी असा हा प्रेमयोगी काय दावू दीनता?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

उत्कंठा

खोल जमिनीमधून अश्रुत, तरी असावा असा -
झ-याचा नाद जसा चालतो
नील तरल तिमिरांत झाकल्या पुष्करिणीचा जसा -
निळा थर हळूहळू हालतो

धुक्यात भुरक्या, दूर, निवळत्या सांध्यरंगामधे -
भासते मात्र जशी चांदणी
असून ही न आठवणारी ह्रदयतरंगामधे -
जशी कल्पना विविधरंगिणी

परिमळ भरते सभोवार, पण अगोचरच रहाते -
जशी घनवनांत फुलती कळी
सर्वांतीत तरी सर्वंकष निरंतरच वाहते -
जशी वास्तवामधे पोकळी

अगम्य असला असा, तरी वाटते असावास तू!
सख्या, वाटते दिसावास तू!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

अर्पण

चहूंकडे आघात, घात, अपघातच झाले मला
जन्मलो त्याचकरता जणू!
तरी असू दे तुझा जिव्हाळा, जीव वाहिला तुला
दयाळा, फिरव कुठेही तनू!

पाय जरासे सुखाशेकडे चुकून वळले तरी
तरीही – तरी नीट नेच तू!
अजाणतेने या डोळ्यांना पाणी आले तरी
पुसावे आपुलकी नेच तू!

या जीवाचे भलेबुरे ते तुलाच कळते, सख्या,
कशाला घालावी भीड मी!
सुटला झंजावात, कुठेही जहाज जावो, सख्या,
सुकाणू तू नुसते शीड मी!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

जीवनाचे गाणे

जीवनरंगात रंगू या जीवनरंगात रंगू !

आकंठ करून प्रीतीचे पान
सौख्यात हिंडलो सोडून भान
आता या दुःखात झिंगू
जीवनरंगात रंगू या जीवनरंगात रंगू !

क्षणैक मोहक पाडून भूल
सुकले साजूक नाजूक फूल
आता हे निर्माल्य हुंगू
जीवनरंगात रंगू या जीवनरंगात रंगू !

देऊन कोवळा सोनेरी संग
लोपले सांजेचे राजस रंग
काजळी लागली पांगू
जीवनरंगात रंगू या जीवनरंगात रंगू !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

काल, आज आणि उद्या

फळाफुलाला आला होता खरोखरच, साजणे
हिवाने अखेर झडला तरु!
क्षणभर खुलले, नंतर सुकले सुधामधुर चांदणे
नको वनवास जिवाचा करु

आणभाक घालून सारखा तुझाध्यास लावला
अबोला हा धरला शेवटी
अनन्य प्रीतिशिवाय जगणे अशक्य झाले मला
आणखी जग हसले भोवती

हसते जग पण अजून आहे मला तुझा भरवसा
तरुला फुटेल, बघ, पालवी
आज जरी अंधार भासतो गगनावर या असा
उद्या बहरेल चंद्रिका नवी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

असाच

वेगळीच जात तुझी;
वेगळाच ताल
तूं अफाट वाट तुझी
एकटाच चाल.

एकटाच चालत जा
दूर दूर दूर
गात गात तूंच तुझा
एकटाच सूर

एकटाच चालत जा
उंच आणि खोल;
बोल आणि ऐक पुन्हा
तूं तुझा बोल.

तूं असाच झिंगत जा
विस्मरून पीळ
तूं असाच फुंकीत जा
अर्थशून्य शीळ

अंतरात पाहत जा
भास तूं तुझेच्;
शांततेत ऐकत जा
श्वास तूं तुझेच.

खोल या दरीत अशा
गर्द साऊलीत
हो निमग्न तूंच तुझ्या
मंद चाहुलीत.


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ