ओढ

स्वार्थसंगर हा म्हणा अथवा म्हणा व्यवहार की
चालली हिरहीर अन किरकीर ही तर सारखी
ओरडो विव्हळो कुणी तुडवून या पतितांस हे
धावतात पुढे पुढे सगळे करून धकाधकी

येथल्या मुलखात मी तर एक वाटसरु नवा
मानवेल कशी मला पण येथली जहरी हवा?
स्नेहशून्यच लोक हे सलगी करु भलती कशी?
देश हा परका इथे ममतेस मोबदला हवा

चाललो इकडून मी तिकडे असाच किती तरी
शेवटी पण ही कधी सरणार सांग मुशाफिरी!
एक आपुलकी हवी, असला नको परकेपणा
लागली हुरहूर रे, पण पोहचेन कधी घरी?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

फार नको वाकू

फार नको वाकू
जरी उंच बांधा
फार नको झाकू
तुझा गौर खांदा

दोन निळे डोळे
तुझे फार फंदी,
साज तुझा आहे
जुईचा सुगंधी

चित्त मऊ माझे
जशी रानकाळी
धुंद तुझी आहे
नदी पावसाळी

श्वास तुझे माझे
जसा रानवारा
प्रीत तुझी माझी
जसा सांजतारा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ


नेमके परत जाताना

भेटताच, मी हासते जुई सारखी :
राहतेच तरीही त्यांची ती नजर जरा पारखी

मी पुन्हा पुन्हा सारखी पाहते, गडे !
ते परंतू, बाई, डोळे वळवितात, दुसरीकडे !

मी पुसले काही तरी नवे अन जुने
तेवढेच चोरावाणी चुकवितात गऽ बोलणे !

का सदाकदा धरतात अबोला असे ?
सारखे, तरी इतरांशी बोलतात, बाई, कसे ?

छे ! कसा सहू मी असा दुरावा मुका ?
चांगलेच सारे सारे, वाईट फक्त मीच का?

मग, दूर मुक्याने बसून बघते जरी,
नेमके परत जाताना हसतात कशाला तरी ?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कशाला, सखू, रुसावंऽ तरी!

हा पदर शिरावर, नव्या उरावर तुला गळाभर सरी
कशाला, सखू, रुसावंऽ तरी!

तू लावण्याची कळा
नजरेत कसब आगळा
उरानुरावर नवी नव्हाळी, चिरी कपाळी जरी
कशाला, सखू, रुसावंऽ तरी!

ये उगीच जरासं रुसू
अन मुक्यामुक्यानं बसू
मधेच खुदकन हसू नये तू अशा पराण्या घरी
कशाला, सखू, रुसावंऽ तरी!

तू नको धिटाई करु
अन लहरी नजरा भरु
हसून जराशी तुझ्या सख्याशी नको करु हिरहिरी
कशाला, सखू, रुसावंऽ तरी!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

धनगरी गाणे

या माथ्यावरती ठळक चांदण्या नऊ
ही अवती भवती हिरवळ हिरवी मऊऽऽ जी !

ही झुडुपे, झाडे, रानवेल साजरे
चांदणे हिवाळी, मंद, धुंद, झांजरेऽऽ जी !

रानांत भोवती खचून भरले धुके
हातात कोकरू थकून निजले मुकेऽऽ जी !

हुरहुरु नको गऽ, नकोस दचकू, सरू,
चिवचिवते चुकले एक रानपाखरूऽऽ जी !

या झाकळलेल्या सबंध खो-यामधी
कुजबुजते गाणे धुंद एकली नदीऽऽ जी !

हा सबंध माझातुझाच सवता सुभा
भोवती मुक्यानं कळप राहिला उभाऽऽ जी !

या निजल्या मेंढ्या मुक्यामुक्यानं जुनू
हळुवार लावणी हळूहळू गुणगुणूऽऽ जी !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

पुन्हा

नको ह्रदय हासवूं, पुन्हा हे नको ह्रदय हासवूं

उगवताच सुकली मुळी
फुलविताच सुकली कळी
सरकताच जिरली खळी जळावर – कशी पुन्हा नाचवू?

तू दिलीस वचने जरी
ठरविलीस लटकी तरी
जी मुळांत नव्हती खरी प्रीत ती नको पुन्हा भासवू

ही नकोच भलती हमी
पहिलीही नव्हती कमी
भरभरुन पुनरपि सुरंग नंतर नको पुन्हा नासवूं


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

विमान

किति मौज दिसे ही पहा तरीहे विमान फिरतें अधांतरीं. ध्रु.

खोल नदींतुन कापित पाणी
मत्स्य धांवतों चहुंबाजूंनी,
घारच अथवा फिरते गगनीं,
हुबेहुब हें त्याच परी. ।।१।।

रविकररंजित मेघांमधुनी,
स्वच्छ चांदण्यामधें पोहुनी,
घुमघुम् नादें दिशा घुमवुनी,
प्रवास करि हें जगावरी. ।।२।।

परंतु केव्हा पाउस गारा
प्रांत वेढुनी टाकिति सारा
त्यांतूनहि हें जाइ भरारा,
नवल नव्हे का खरोखरी? ।।३।।

पहा जाउनी विमानांतुनी,
दिसेल शोभा अपूर्व वरुनी,
डोंगर, रानें,ओहळ, तटिनी
आणि कुठे सागरलहरी; ।।४।।

ग्रहनक्षत्रें आकाशांतिल
विमान बघुनी मनांत म्हणतिल,
"भेटाया अपणां पृथ्वींतिल
येति माणसें कुणीतरी." ।।५।।

नको सूर्यचंद्रावर जाया;
नको जगाची सफर कराया,
नेइं विमाना, मज त्या ठायां
जेथ माय मम वास करी. ।।६।।


- गोपीनाथ