आज जाऊ दूर रानी

प्रीत ही आली भराला : वेळ ही सौंदर्यशाली
आज जाऊ दूर रांनी : साजणा रे, सांज झाली!

आजपावेतो जगाचे पाश होते प्राक्तनी हे :
स्वैरता घेतील आता अंतरे संकोचलेली

मी अशी माळीन भोळी : सारखी घालीन माळा :
लाघवाने पुष्पमाळा गुंफणारा तूच माळी

ये, उभ्या विश्वास निंदू : प्रीतितालानेच हिंडू
ही निशा गुंफिल आता चांदण्यांची शुभ्र जाळी

गालिचे आहेत जेथे कोवळ्या दुर्वांकुरांचे ,
ये तिथे, लाजून वाचू अंतरांचे लेख गाली

वित्त, विद्या, मान सारे तुच्छतेने, ये, झुगारु :
व्यवहारी या जगाचा कायदा हा जीव जाळी.

कायदा येथील : ये, करू वेडाच सौदा :
प्रेम दे, अन प्रेम घे अन यौवनाची ही नव्हाळी.


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

एक वेळी

एकटा मी, अन होती एकली तू
का गळ्याची आण होती घेतली तू
फार वर्षांनी तुझ्या भेटीस आलो
का कपाळाला अढी ही घातली तू?

कालमानानेच आता लोपले का
मागचे सारे जुने आतुर हेतू
संपला सारा जरी आता जिव्हाळा
यापुढे साधेसुधे सौजन्य दे तू

एक वेळी वाटली होती जिवाला
चांदणी विस्तीर्ण अंधारातली तू


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

वचन

वसंत आपल्या मित्राकडे जाऊन हळू आवाजात म्हणाला, तुला एखादी गोष्ट विचारली तर ती तू कुणालाही सांगणार नाहीस असं वचन देशील?

‘हो हो. हे घे वचन. तुझं बोलणं मी कुणालाही सांगणार नाही.’

‘मला शंभर रुपये उसने पाहिजेत.’

‘ तू अजिबात काळजी करु नकोस. तू शंभर रुपये माझ्याकडे मागितलसे ही गुप्त गोष्ट कुणालाही सांगणार नाही. अरे, मित्रांनी एकमेकांसाठी एवढंही करायला नको का?

आणि पैशाचं काय’?

‘पैशाचं कुठं काय??

मी ही गोष्ट कुणाला बोलणार नाही, एवढंच वचन दिलंय मी तुला. माझ्याकडे पैसे नाहीतंच.’

पन्नास हजाराचे बक्षीस

एक्सप्रेस हायवे वरून एक गाडी भरधाव वेगात चालली होती. इन्स्पेक्टरांनी तिचा पाठलाग करून तिला थांबवली.

तेंव्हा ती गाडी चालवणाऱ्या टपोरीने विचारले,"काय साहेब, काय मिष्टिक झाली का ?"
इन्स्पेक्टर म्हणाले,"नाही. नाही. त्याचं काय आहे, आम्ही सुरक्षा सप्ताह पाळत आहोत आणि काळजीपूर्वक गाडी चालवणाऱ्यांना बक्षीस देत आहोत.
तुम्हाला पन्नास हजार रुपयांचं बक्षीस मिळालं आहे.
पण मला सांगा इतक्या पैशाचं तुम्ही करणार तरी काय?"

टपोरी म्हणाला,"पयल्यांदा एक लर्निंग लायसन घेईन म्हणतोय."
त्याच्या बाजूला एक बारबालाटाईप मुलगी बसली होती. ती म्हणाली,

"ओ इनिसपेक्टर, याच्याकडे लक्ष देऊ नका. तो पिऊन टाईट झाला ना मग काय पण अनापशनाप बडबडतो."

या बोलण्याने मागच्या सीटवर झोपलेल्या एकाची झोपमोड झाली. पोलिसांना बघून तो ओरडला, "बोंबला. पोलिसांनी पकडलं. तरी मी सांगत होतो चोरीची गाडी एक्सप्रेस हाय वे वरून नका काढू."

त्याच्या शेजारी बसलेला अर्धवट झोपेत म्हणाला, "काय कटकट आहे. झोपायला पण देत नाय. पोलिस आले तर काय झालं? त्यांनी अजून डिकी खोलायला सांगितली आहे का?डेड बॉडी बघत नाय तोपर्यंत काय वांधा आहे? झोप तू."

ये शेवटी तरी तूं

हे भागलेत डोळे, नाही उसंत जीवा
वेडा अमीर माझा, बाई कुठे बघावा!

चिंतून लौकिकाशी
संकोचले जराशी
होऊनी तो उदासी गेला उडून रावा

सारेच हासले गऽ
आला असेल राग
हा धुंद फुंद नाग डोलून का फिरावा ?

भारी अधीर तूही
केली कशास घाई ?
नाही तुला मनाई येते तुझ्याच गावा

माझी झुरे नवाई,
माया तुला न काही
वेडीपिशी कशीही घेते तुझ्याच नावा

का रे मनांत किंतू
आता, सख्या परंतू
–ये शेवटी तरी तू सोडून भेदभावा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

त्याला नाही कदर

माथी झाला सुरु
पिंगा काळा निळा;
एकाएकी अस्मानाची न्यारी झाली कळा

आता जाऊ कसं :
वै-यावाणी असं -
उराशिराला झोंबत आलं वारं येडं पिसं

ओला झाला पदर
साडी चोळी सदर
दगा दिला या दुस्मनानं त्याला नाही कदर


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ