तर काय करायचं?

परक्या देशात
दिवसाढवळ्या सुनसान रस्त्यावरुन चालताना....
आपल्या देशातले गजबजलेले रस्ते आठवले
                                                         तर काय करायचं....
परक्या देशात
आपलं माणूस  सोबत असताना
एकटं वाटलं  तर काय करायचं
परक्या देशात
आपलं माणूस सोबत असताना
एकटं ’नाही’ वाटलं  तर काय करायचं....
परक्या देशात
आपलं माणूस सोबत असताना
’त्याला’ एकटं वाटू लागलं  तर काय करायचं....
परक्या देशात आपलं माणूस
आधीच एकटं असेल तर काय करायचं
आणि परक्या देशात
आपलं माणूस कुणासोबत असेल
                                           तर काय करायचं?
परक्या देशात
लहानपणी गर्दीत हरवलं होतं म्हणून
आपलं माणूस ओळखीची गर्दी सोडून
अनोळखी गर्दीत आलंय उठून
’हे’ कळल्यावर काय करायचं....
परक्या देशात
आपलं माणूस
खूपच आपलं वाटू लागल्यावर
आपण आपलीच सोबत सोडून देऊन
हरवून गेलो
आणि सापडलो नाही आपल्यालाच
                                             तर काय करायचं.... 
परक्या देशात
प्रत्येक मिठीसरशी साठवून घेतला सुगंध आपल्या माणसाचा....
आणि आपल्या देशात
कधीतरी अचानक
सुटला घमघमाट त्या सुगंधाचा
तर काय़ करायचं....
आपल्या देशात
परक्या देशातल्या आपल्या माणसाची
आठवण आली अचानक
आणि हरवून गेला साठवलेला सुगंध
                                                तर काय करायचं....  
परक्या देशात
सोबत घालवलेली संध्याकाळ
आपल्या देशात
’संध्याकाळी’ आठवली तर काय करायचं?

खरंच!
परदेशातून
एकटं परतल्यावर
आपल्या देशात
काय करायचं?


कवी - सौमित्र

सुगी

पूर्णेच्या पाण्यामधी फार नाहीला ;
येऊन दया देवानंऽ हा दिला कौल चांगला.

चौफेर वनावर फळाफुलांच्या सरी;
डोईवर गेली, बाई, औन्दाच जवारी, तुरी !

मी राखण करते बरंऽ किती नेहमी ;
शेतात नांदते; आता येईल घरा लक्षुमी.

मळणी, अन उफणी तशी करू सोंगणी ;
फिरफिरू जशा हरिणी गऽ आम्ही मग साऱ्या जणी !

का उगाच हसता मला, अहो घरधनी !
मी खरोखरच भाग्याची लाभले तुम्हाला किनी ?

सासरी सरू, गोठ्यात जसंऽ वासरू ;
येईलच मायघराला घरट्यात जसंऽ पाखरू.

येऊ दे पण सांगते, भराला सुगी ;
वाहीन, माय अंबाई, पहिलीच तुला वानगी !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

खरे सनातनी

मी मांडितसे विचार साधे सरळ
हे अमृत नसे हे गरळ
मी सनातनी धर्माचा सदभक्त
मी पूजितसे ऋषिसंत
निज संस्कृतिचा अभिमान असे माते
मी पूजित भूमातेते
निज संस्कृति व्हावी थोर
ती होवो ना अनुदार
हो एकच मजला घोर
मी नम्रपणे वदतो ओतुन हृदय
तुम्हि ऐका सारे सदय।।

ज्या नवनव हो सतत पल्लव फुटती
त्या सनातन असे म्हणती
जे नवनव हो ज्ञान शुभंकर येते
तो वेदच माते गमते
तो वेद असे अनंत, हळुहळु मूर्त
होऊन दिसे जगतात
नवविचार मी घेईन
मी पुढतिपुढति जाईन
सौंदर्यसिंधु जोडीन
जो ज्ञानाला सादर सतत घेई
तो खरा सनातनी होई।।

जे नित्य नवे सनातन तया वदती
जीर्णा न सनातन म्हणती
श्रीगीतेचे नित्य नवीनच सार
ज्ञानेश्वर म्हणती थोर
ती वाढ पुरी ज्याची झाली त्याते
मरण्याचे केवळ उरते
सद्धर्म सदा वाढेल
नवनविन रंग दावील
नव अर्थ अंगिकारील
हे वाढतसे सदैव जीवनशास्त्र
तद्विकास असतो होत।।

त्या शब्दांचा अर्थ वाढतो नित्य
तो अनंत असतो अर्थ
त्या यज्ञाचा बघा तुम्ही इतिहास
किति झाला अर्थ-विकास
जन मरताती कल्पना न परि मरते
ती सतत वाढत जाते
ते विचार होती खोल
होतील कल्पना विमल
हा विकास सकक सकल
जगि चालतसे मानव जातो पुढती
मुंगीपरि जरि ती प्रगती।।

ते ठरले ना अजुनि जीवनी काही
सिद्धांत ना एकहि पाही
जगि हितकर ती हिंसा अथवा प्रेम
ना झाला अजुनि नेम
ते सत्य सदा पूजावे वा अनृत
अद्याप न मत निश्चित
हे प्रयोग सारे अजुनी
करितात महात्मे झटुनी
का बिळात बसता घुसुनी
निजबुद्धीला स्वतंत्र करुनी उठणे
नवरंगे उत्कट नटणे।।

हे बाल्यदशेमाजी जीवनशास्त्र
ना निश्चित काही त्यात
ज्याबद्दल ना शंका तिळभर कोणा
जगि ऐसे काहि दिसे ना
तो घेउनिया सादर पूर्वानुभव
संपदा ज्ञानास नव
ते पूर्वज सर्वज्ञानी
जरि म्हणाल तुम्ही कोणी
ते हसतिल तुम्हां वरुनी
ते फरक सदा होते देखा करित
ऋषि ऋषिला नाही मिळत।।

तो मागतसे देवा विश्वामित्र
मति सतेज निर्भय मुक्त
तो गायत्रीमंत्र सनातन दिव्य
मागतसे बुद्धी भव्य
तो धर्माचा पाया म्हणता वेद
वेदार्थे ज्ञानच सिद्ध
ज्ञानासम पावन नान्य
ते मिळवुन व्हा रे धन्य
परि घरात बसता घुसुन
जो घरि बसला त्यास मिळे ना काही
त्या एकच मरणे राही।।

तुम्हि उघडा रे बंधूंनो निज डोळे
ना अंध असावे भोळे
जे इतर जगी थोर विचारा करिती
जे प्रयोग नव दाखविती
तुम्हि त्याचाही विचार सादर करणे
उपयुक्त असे ते घेणे
ज्ञानाचा मक्ता न कुणा
अधिकार सर्व राष्ट्रांना
अभिमान देतसे मरणा
ते ऋषिमुनि ना केवळ येथे झाले
हे बघणे उघडुन डोळे।।

हे कलियुग ना सत्ययुगचि हे माना
प्रभुच्या न करा अपमाना
जो रवि उगवे तारा ज्या लखलखती
ते तेज न त्यांचे कमती
हे कलियुग ना गंगा पावन तीच
फळपुष्प तरु हे तेच
प्रत्येक दिवस जो दिसतो
तो अनंततेतुन येतो
पावित्र्ये तिळ ना कमि तो
तो मूर्खपणा बाष्कळपण ते सोडा
सद्विचार नवनव जोडा।।

ते ऋषिमुनि हो काय एकदा झाले
ते काय आज ना उरले
ते पुन:पुन्हा ऋषिमुनि अवतरतात
भुवनात सदा सर्वत्र
तो लेनिन तो तैसा सन्यत्सेन
हे ऋषीच जनतामान्य
नव मंत्र जगा जो देई
नव तेज जगा जो देई
वैषम्य लयाला नेई
तो ऋषि जाणा जाणा तोची संत
तुम्हि उघडा अपुले नेत्र।।

श्रीज्ञानेशे संस्कृतातले ज्ञान
सर्वांस दिले वाटून
श्रीनाथांनी चालविले ते काम
परि त्यांना छळिती अधम
ती ज्ञानाची खुली कराया दारे
झगडले संत ते सारे
तुम्हि अनंत छळिले त्यांना
परि आज देतसा माना
ह्या गोष्टी ध्यानी आणा
त्या संतांचे काम चालवा पुढती
सर्वांना देण्या मुक्ती।

ह्या भारतभूमाजी आजहि संत
आहेत करु नका खंत
हे संत खरे गांधी पावनचरित
दीनास्तव सतत झिजत
तो धर्म खरे त्यांनाच कळे सत्य
जे गीता आचरतात
अंबरांबुधीचे कळते
गांभीर्य कुणाला जगि ते
बुडि घेत उडत वा त्याते
सद्धर्माचा गाभा संतच मिळवी
तो पंडित साली चघळी।।

ती पांघरुनी शालजोडि जे बसती
प्रेमा न जगा जे देती
जगि अन्याया पाहुन जे ना उठती
जे वैषम्ये ना जळती
जगि दास्याला दंभा दैन्य बघुन
उठतात न जे पेटून
त्या जडां कळे का धर्म?
त्या मृता कळे का वर्म?
जे घोकित बसती धर्म
तो धर्म कळे आचरतो जो त्यास
ना धर्म कळे इतरांस।।

निज धर्माला ओठावर ना मिरवा
सतत्त्वे जीवनि जिरवा
तुम्हि प्रेम करा विचार करणे नित्य
जगतात बघा सर्वत्र
या देशाला दिवस चांगले आणा
नव मंगल मिरवा बाणा
बंधुता जीवनी येवो
तो विचार हृदयी येवो
ते धैर्य कृतीचे येवो
सतज्ञानाने सत्करणीने मिळवा
गेलेल्या अपुल्या विभवा।।

निजधर्माचे करा मुख तुम्ही उजळ
मति उदार होवो विमल
ज्या बंधूंचे छळण आजवर केले
पशुहून नीच ज्या गणिले
त्या अस्पृश्या हरजन पावन म्हणणे
प्रेमाने हृदयी धरणे
आचारी येवो समता
प्रेमाची वाहो सरिता
दंभाची न उरो वार्ता
तुम्हि संसारी अंध-धी न रे व्हावे
मति हृदय निज न मारावे।।

ती सोडावी क्षुद्र सकल आसक्ती
ध्येयाची लागो भक्ती
तुम्हि मानव्या उठणे पूजायास
निज मोक्षहि मिळवायास
निज कातडिला न कुणी कुरवाळावे
ध्येयास्तव सर्वहि द्यावे
सत्तेज भारती भरु दे
सदभाव भारती भरु दे
सदविचार रवि उगवू दे
ती संपू दे कार्पण्याची रजनी
राहोत कुणी ना निजुनी।।

हे सनातनी सकळ खरे होवोत
ज्ञानाते मिठि मारोत
नव ऐकुनिया विचार हे नाचोत
नव करणीस्तव जागोत
हे वैषम्या दंभा दुरि नेवोत
त्यागाने हे तळपोत
यज्ञ हे सनातन तत्त्व
ज्ञान हे सनातन तत्त्व
मोक्ष हे सनातन तत्त्व
तुम्हि त्याग करा, ज्ञान वरा, व्हा मुक्त
व्हा खरे सनातन-भक्त।।


- साने गुरूजी
- पुणे, फेब्रुवारी १९३५

ओसाडीत बसून

ओसाडीत बसून झुरते ओसाडीत बसून

निमिषच फुलले
नंतर मिटले
फूल उदास हसून
ओसाडीत बसून झुरते ओसाडीत बसून

दिसले मृगजळ
फिरले अवखळ
हरिण उगाच फसून
ओसाडीत बसून झुरते ओसाडीत बसून

फिरता वणवण
माझे जीवन
थकले वाट चुकून
ओसाडीत बसून झुरते ओसाडीत बसून


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

येशील का रे?

एकदा पाहिले लागली माया
माझी रे कोवळी वाळली काया !
नवीन लोचन आले
आणखी अधीर झाले
वाटते तुला रे, पडली भूल
प्रीतीचे पहिले नाजूक फूल !

एकली बागेत हिंडत होते
हासत हासत आलास तेथे
पाहिले–पाहिले तूही
गेले मी लाजून बाई !
प्रीतीच्या नाजूक लागल्या झळा
जाळीत मैनेचा चढला गळा

नदीच्या किनारे होते रे, उभी !
हळूच चांदण्या हसल्या नभी
आले हे भारुन ऊर
हिंडले हिंडले दूर
वेगळ्या आपल्या मिळाल्या वाटा
नदीच्या पाण्यात नाचल्या लाटा

थांबला जरासा गेलास दूर
आतूर आशेचा सुकला नूर
सुकले चांदणे जळी
सुकली चाफ्याची कळी
अवती भवती नव्हते दुवे
वाळून चुंबिले पाऊल तुझे

तुझाच सांगते लागला ध्यास
तुझ्याच नावाचे चालले श्वास
डोळ्यांत कोंडले आसू
नको रे जीवन नासू
एकदा पाहिले लागली माया
माझी रे, कोवळी वाळली काया


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

इशारा

संध्येचे, सखये, तरंग पिवळे चुंबीत होते नभा
होती मंगल सांजवात सदनी लावीत तू बैसली
दाराशीच तुझ्याकडे बघत मी होतो मजेने उभा
काळी चंद्रकळा, शशांकवदने होतीस तू नेसली !

तेव्हा जे वठले हळुहळु तुझ्या संगीत ओठांवर
गाणे ते पहिले अजून घुमते चित्तात माझ्या, सखे !
होती ती घटिका निरामय, तुझा होता गळा सुंदर
ते सारे श्रुतिसंहिताच मजला, झाले तुला पारखे

नाचवी लहरी जलावर तशी प्रीती तुझी पावन –
पाण्याच्या लहरीपरीच ठरली आता अशी नाचरी
माझा नाश करावयास असला झालीस तू कारण
मी माझा नुरलो, उदास फिरतो ओसाड माळावरी

जीवाचे जळ घालूनी फुलविले — तू जाळिले नंदना
आता हास पुढे निरंतर तुला जाळील ही वंचना !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

शिवाजीचा पाळणा

तुज जोजविते माय जिजाई बाळा । नीज रे नीज लडिवाळा ।

मध्यरात्रीचा प्रहर लाडक्या आला । झोप का येईना तुजला ॥

झोके देते गीत गात अंगाई । तरी डोळा लागत नाही ।

बाळा असला थांबिव चाळा आता । थकले मी झोके देता ॥

तू महाराष्ट्राचा त्राता । मनी धरली कसली चिंता ।

पाठिशी भवानी माता । माउलिया जीवीचा जिव्हाळा ।

नीज रे नीज लडिवाळा ॥१॥

चल ठेव दुरी हातामधली ढाल । निद्रा करी बाळा खुशाल ।

झोपली कशी बारा मावळी थेट । शिवनेर जुन्नर पेठ ॥

नि:शब्द कशी पसरली रे शांती । या मराठी भूमीवरती ॥

बागूलबुवा आला काळा काळा । झडकरी झोप रे बाळा ॥

कोकणच्या चौदा ताली । झोपल्या घाटाखाली ।

आणि रात्र बहुतचि झाली । किती सांगु तुला समजावू वेल्हाळा ।

नीज रे नीज लडिवाळा ॥२॥