शीळ

रानारानांत गेली बाई शीळ,
रानारानांत गेली बाई शीळ!

राया, तुला रे, काळयेळ नाही,
राया, तुला रे, ताळमेळ नाही,
थोर राया, तुझं रे कुळशीळ,

येडयावानी फिरे रानोवना,
जसा काही ग मोहन कान्हा,
हांसे जसा ग, राम घननीळ,

वाहे झरा ग झुळझुळवाणी,
तिथं वारयाची गोड गोड गाणी,
तिथं राया तुं उभा असशील,

तिथं रायाचे पिकले मळे,
वर आकाश शोभे निळे,
शरदाच्या ढगाची त्याला झील,

गेले धावून सोडुन सुगी,
दुर राहून राहिली उगी,
शोभे रायाच्या गालावर तीळ,

रानीं राया जसा फुलावाणी,
रानीं फुलेन मी फुलराणी,
बाई, सुवास रानीं भरतील,

फिरु गळ्यात घालून गळा,
मग घुमव मोहन शीळा,
रानीं कोकिळ सुर धरतील,
“रानारानांत गेली बाई शीळ!”



कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कंचनी

झाले आज मी बावरी, बाई, भागले लोचन !
कोठे हालली वल्लरी, कोठे नाचले नंदन ?

होती एक आशा मला : सारे धुंडले मी वन;
गेले प्राजक्ताच्या तळी : तेथे दिसे ना तो पण.

सारी हालली ही फुले; सारे नाचले हे बन;
बाई, लाजली ही कळी : तिचे घेऊ का चुंबन ?

हाका घालते का कुणी ? माझे धुंदले हे मन :
वेड्या लाघवाने क्शी करु फुलांची गुंफण ?

खाली सारखे आणतो वारा परागांचे कण;
त्यांनी माखले हे असे माझे हि-यांचे कंकण.

झाले एक मी साजणी : कुठे माझा गऽ साजण ?
झाले एक मी कंचनी : करु कोणाचे रंजन ?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

निद्रा

चंद्रप्रकाशातून ही कादंबिनीपुंजातूनी
सौंदर्यशाली श्यामला धुंदित ये वातायनी :

निद्रिस्त दोन्ही लोचने; ही मुक्त सोडी कुंतला;
भाली चकाके चांदणी; कंठात नाचे चंचला.

उत्फुल्ल या ह्रदपंकजी चालून आली मोहना :
गेले मिटूनी पद्म : तो माझी विरे संवेदना !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तुझ्या माझ्यात गं

आज आहे सखे
बहुरंगी अपार
नजरेचे जुगार
तुझ्या माझ्यात गं !

आज आहे सखे
निशिगंधास गंध
श्वसनाचा प्रबंध
तुझ्या माझ्यात गं !

आज आल्यात गं
पावसाच्या सरी
भावनेच्या भरी
तुझ्या माझ्यात गं !

आज नाही सखे
येथ कोणी दुजे
आणि ‘माझे-तुझे’
तुझ्या माझ्यात गं !

आज पाहु नको
विस्मयाने अशी
प्रीत आहे पिशी
तुझ्या माझ्यात गं !

तुझ्या माझ्यात गं !
तुझ्या माझ्यात गं !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तळमळ

मी सुखात घालू हात कुणाच्या गळां ?
राहिलो इथे : पण नाही लागला कुणाचा लळा.

मज एकहि नाही कुणी सखासोबती :
ममतेविण हिंडत आहे हे जीवजात भोवती.

वंचनाच दिसते इथे सदा सारखी;
हे स्नेहशून्य जग: येथे कोठची जिवाची सखी ?

हे वरुन आहे असे, तसे अंतर:
हे उदास जीवा, नाही, बघ, इथे कुणी सुंदर !

विक्राळ घोर अंधार जरी कोंदला
पळ एकच झळकत आली : लोपली वरच चंचला.

पोसून ध्येयशून्यता उथळ अंतरी
शून्यातच वाहत जाते ही मानवता नाचरी.

माझा पण आता पुरा जीव भागला:
मज करमत नाही येथे , ने मला दूर, वादळा!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तुम्ही

सुदूरच्या जमिनीचे तुम्ही आहात प्रवासी :
उदार राघव का हो तुम्ही अहां वनवासी ?
तुम्ही दुजी वदता ही अनोळखी परभाषा :
परंतु ती कळण्याला मला नकोत दुभाषी.


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

मालन

-१-
इवला झाला गायन गात;
चांदण्यांसवे हासली रात;
हालेना जरा वेलींचे पान;
निजली धरा; निजले रान,
आई, बहिणी झोपल्या घरी;
ये गऽ ये गऽ ये मागल्या दारी!
माथ्यावरती आला चंदीर
सांग, मी कसा धरावा धीर ?
भागले डोळे वाट पाहून :
प्रीतीची माझी ये गऽ मालन !

-२-
पुष्पवारती दवाचे बिंदू;
अंतराळात सुंदर इंदू;
पानोपानी की नाजूक वारा;
झीमझीम की झडीच्या धारा;
तशीच येते मूक, मोहन
अंगणातल्या वेलीमधून
शारदाची की ढवळी रात;
हासली प्रीत आतल्या आत !
दाविते कोण हंसीची मान ?
हासून येते माझी मालन !

-३-
पाहून तुझे काजळी डोळे
माझे गंऽ मन भुलले भोळे !
कपाळावरी चांदणी कोर;
मुक्त सोडला केसांचा भार;
हासणे गोड लावण्यखाणी;
कंठामधून कोकळगाणी ;
फुलांचे हार शोभले गळा;
रानराणीचा शृंगार भोळा.
कोणाचे ध्यान, कोणाचे गान,
प्रीतीचे कोण, सांग, मालन ?

-४-
एकाएकी का थांबली अशी ?
संध्येची दूर चांदणी जशी !
मूर्तच जशी हाले चाले ना !
उभी का दूर अधोवदना ?
कंपन ओठी, लाज नयनी :
बावरू नको रानहरिणी !
काय मनात भीती सारखी ;
नको गंऽ परी – होऊ पारखी !
प्रीतीला नाही भीतीचे भान ;
प्रीतीची माझी देवी मालन.

-५-
एकमेकांच्या आलिंगनात ;
भावनामय चुंबनगीत ;
एकमेकांच्या नयनांवरी
प्रीत मोहक, मूक, नाचरी;
एकमेकांचा हृदयनाद
घालत आहे एकच साद.
इवला झरा गायन गात;
चांदण्यांसवे हासली रात;
हासले जरा वेलीचे पान;
हासली धरा; हासले रान !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ