बाई काऊ आला

कोणे एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला
त्याने एक उंबर तोडले बाई उंबर तोडले
सईच्या दारात नेऊन टाकले बाई नेऊन टाकले
सईने उचलून घरात आणले बाई घरात आणले
कांडून कांडून राळा केला बाई राळा केला
राळा घेऊन बाजारात गेली बाई बाजारात गेली
त्याच पैशाची घागर आणली बाई घागर आणली
घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली
उजव्या हाताला मधल्याच बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला
आणा माझ्या सासरचा वैद्य
अंगात अंगरखा फाटका-तुटका
डोक्याला पागोटे फाटके-तुटके
पायात वहाणा फाटक्या-तुटक्या
कपाळी टिळा शेणाचा
तोंडात विडा घाणेरडा किडा
हातात काठी जळकं लाकूड
दिसतो कसा बाई भिकार्‍यावाणी बाई भिकार्‍यावाणी

आणा माझ्या माहेरचा वैद्य
अंगात अंगरखा भरजरी
डोक्याला पागोटे भरजरी
पायात वहाणा कोल्हापूरी
कपाळी टिळा चंदनाचा
तोंडात विडा केशराचा
हातात काठी चंदनाची
दिसतो कसाबाई राजावाणी बाई राजावाणी

कोथिंबीरी बाई गं

कोथिंबीरी बाई गं
आता कधी येशील गं
आता येईन चैत्र मासी
चैत्रा चैत्रा लवकर ये
हस्त घालीन हस्ताचा
देव ठेवीन देव्हा-या
देव्हा-याला चौकटी
उठता बसता लाथा-बुक्की

नणंदा भावजया

नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी
मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं
आता माझा दादा येईल गं
दादाच्या मांडावर बसेन गं
दादा तुझी बायको चोरटी
असेल माझी गोरटी
घे काठी घाल पाठी
घराघराची लक्ष्मी मोठी

खारिक खोबरं बेदाणा

खारिक खोबरं बेदाणा ऽ ऽ ऽ
शेंडीचा नारळ, नि राधे कर गं फराळ
बिंदी ठेविली तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं भांगात
नथ ठेविली तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं नाकात
कुडया ठेविल्या तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं कानांत
हार ठेविला तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं गळयात
डोरलं ठेविलं तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं गळयात
वाकी ठेविली तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं दंडात
बांगडया ठेविल्या तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं हातात
तोडे ठेविले तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं हातात
अंगठी ठेविली तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं बोटात
पैंजण ठेविले तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं पायात
जोडवी ठेविली तबकात ऽ ऽ ऽ
माझ्या गळयाची शप्पथ राधे घाल गं पायात
खारिक खोबरं बेदाणा ऽ ऽ ऽ
शेंडीचा नारळ, नि राधे कर गं फराळ

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छ्या..


मी कागद झाले

मी मुलतानमधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी,
तुझे नि माझे व्हावे ते सूर कसे संवादी?

माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी,
जड लंगर तुझीया पायी तू पीस कसा होणार
माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार.

आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही,
विनायकाने मग त्यांची आळवणी केली नाही,
पापण्यान्त जळली लंका, लाह्यांपरी आसू झाले,
उच्चारून होण्याधीच, उच्चाटन शब्द आले,

दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली,
मी कागद झाले आहे, चल लिही; असे ती वदली!


कवि - मनमोहन