आज कोण वार बाई

आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार सोमवार महादेवाला नमस्कार || १||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार मंगलवार मंगळागौरीला नमस्कार || २ ||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार बुधवार बुधबृहस्पतीला नमस्कार || ३ ||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार गुरुवार दत्तला नमस्कार || ४ ||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार शुक्रवार अंबाबाईला नमस्कार || ५ ||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार शनिवार शनि-मारुतीला नमस्कार || ६ ||
आज कोण वार बाई आज कोण वार
आज वार रविवार सूर्या नारायणाला नमस्कार || ७ ||

शिवाजी आमुचा राणा

शिवाजी आमुचा राणा| त्याचा तो तोरणा किल्ला |
किल्ल्यामध्ये सात विहिरी | विहिरीमध्ये सात कमळं |
एकेक कमळं तोडून नेलं | भवानी मातेस अर्पण केलं |
भवानी माता प्रसन्न झाली | शिवरायाला तलवार दिली |
तलवार घेउनी आला | हिंदूचा राजा तो झाला |
मोगलांचा फडशा तो केला | हिंदुनी त्याचे स्मरण करावे |
हादग्यापुढे गाणे गावे | प्रसन्न होईल गजगौरी |
प्रसाद वाटा घरोघरी |

दमडीचं तेल

काळी चंद्रकळा नेसू कशी
पायात पैंजण घालू कशी
दमडीचं तेल आणू कशी
दमडीचं तेल आणलं
मामंजींची शेंडी झाली
भावोजींची दाढी झाली
सासूबाईंचं न्हाणं झालं
वन्सबाईंची वेणी झाली
उरलेलं तेल झाकून ठेवलं
हत्तीणीचा पाय लागला वेशीबाहेर ओघळ गेला
सासूबाई सासूबाई अन्याय झाला चार चाबूक अधिक मारा
दहीभात जेवायला घाला माझं उष्टं तुम्हीच काढा.

हरीच्या नैवेद्याला

हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं पीठ त्याचं केलं थालीपीठ
नेऊनी वाढलं पानात, जिलबी बिघडली
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं दही त्याचं केलं श्रीखंड बाई
नेऊनी वाढलं पानात, जिलबी बिघडली
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातला उरला थोडा पाक त्याचा केला साखरभात
नेऊनी वाढला पानात, जिलबी बिघडली.
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं थोडं तूप त्याच्या केल्या पु-या छान
नेऊनी वाढल्या पानात, जिलबी बिघडली

श्रीकांता कमलाकांता

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.
असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं

वेडयाच्या बायकोने केले होते लाडू
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले
वेडयाच्या बायकोने केला होता चिवडा
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
केरकचरा म्हणून त्याने बाहेर फेकला
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
होडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्या
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकल्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
बांगडया बांगडया म्हणून त्याने हातात घातल्या
वेडयाच्या बायकोने केले होते श्रीखंड
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या.
वेडयाची बायको झोपली होती
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले.

आड बाई

आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोनी
आडात पडली मासोळी
आमचा भोंडला सकाळी
आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोनी
आडात पडली सुपारी
आमचा भोंडला दुपारी
आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोनी
आडात पडला शिंपला
आमचा भोंडला संपला

अक्कण माती चिक्कण माती

अक्कण माती चिक्कण माती
अश्शी माती सुरेख बाई जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई सपिटी दळावी
अश्शी सपिटी सुरेख बाई करंज्या कराव्या
अश्शा करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा
अश्शा पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं