अशीच यावी वेळ एकदा

अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना ,
असे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना

उशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक ,
जवळ नसावे चीट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक

मी लज्जित, अवगुंठित आणि संकोचाचा अंमल मनावर ,
विश्वामधले मार्दव सारे दाटून यावे तुझ्या मुखावर

मनात माझ्या 'तू बोलावे' तुझ्या मनीही तीच भावना ,
तूच पुसावे कुशल शेवटी, करून कसला वृथा बहाणा

संकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे ,
समय सरावा मंदगतीने अन प्रीतीचे सूर जुळावे

तू मागावे माझ्यापाशी असे काहीसे निघताना ,
उगीच करावे नको नको मी हवेहवेसे असताना

हुशार तू पण, तुला कळावा अर्थ त्यातुनी लपलेला ,
आपुलकीच्या दिठीत भिजवुन मिठीत घ्यावे तू मजला

सचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रितीच्या जलामध्ये ,
युगायुगांची आग विझावी त्या बेसावध क्षणांमध्ये

शब्दांवाचुन तुला कळावे गूज मनी या लपलेले ,
मुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले


कवी - प्रसाद कुलकर्णी
कवितासंग्रह - स्वप्न उद्याचे घेउन ये
हे असे बागेवरी उपकार केले.
कत्तली करुनी फुलांचे हार केले

ठेवुनी शाबूत काया वार केले
फक्त आत्म्यालाच त्याने ठार केले

ऐकला मी हुंदका जेव्हा हवेचा
पाडुनी भिंती घराच्या दार केले

पाहुनी तुजला चितेवरती   'इलाही'
तारकांनी अंबरी जोहार केले


कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - जखमा अशा सुगंधी

मुक्त्तक

व्याकुळ माझ्या, नजरेला दे, नजर प्राशिण्यासाठी
तृषार्त माझ्या, अधराना दे, अधर प्राशिण्यासाठी
वसंतात तू, वसंतात मी, वसंत अवती भवती
मोहरलेल्या, वृक्षाला दे, बहर प्राशिण्यासाठी

नसेल जर का, तुला भरवसा,
नसेल जर का, तुला भरवसा, श्र्वासांची तू, झडती घे
रूप तुझेही, भरून उरले, डोळ्यांची तू, झडती घे
दुसरा तिसरा, विचार नाही, अविरत चिंतन, तुझेच गे
कधी अचानक, धाड टाकुनी, स्वप्नांची तू, झडती घे
तेल, वात अन्‌, ज्योत दिव्याची, तुझी आठवण, आणी मी
कसे तुला, समजावू वेडे, प्राणांची तू, झडती घे
क्षणाक्षणावर, तुझाच ताबा, तुझीच सत्ता, सभोवती
वाटल्यास मम, रोजनिशीच्या, पानांची तू, झडती घे
कळेल तुजला, कळेल मजला, भाकित अपुल्या, प्रीतीचे
तुझ्या नि माझ्या, तळहातांच्या, रेषांची तू, झडती घे
या ह्रदयाचा, अथांग सागर, नभी चंद्रमा, रूप तुझे
काठाची तू, झडती घे अन्‌, लाटांची तू, झडती घे
अजुन कोणता, हवा पुरावा सांग `इलाही' सांग तुला
तुझ्याच रंगामध्ये रंगलो, ग़ज़लांची तू, झडती घे


कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - भावनांची वादळे

अशी गोड तू....

फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे अशी गोड तू
निशेने नव्या मंद गंधात न्हावे अशी गोड तू

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता,
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू

ढगांनी झुलावे हळूवार आता तुझ्या अंगणी,
नभाने तुला पाहताना झुकावे अशी गोड तू

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू

दिल्या या मनाला सुगंधी सखे तू यातना,
व्यथेने पुन्हा वेदनेला भुलावे अशी गोड तू 
प्राजक्ताच्या झाडाखाली टपटपणारे एकाकीपण
निरोप तू घेताच बिलगले धगधगणारे एकाकीपण   

पानगळीच्या मोसमापरी गळू लागले तारे आता
कसे थोपवू उल्केसम हे कोसळणारे एकाकीपण       
          
कधीतरी तू पुन्हा भेटशील अनोळखी माणसाप्रमाणे
दिसेन  मी पण दिसेल का तुज गोठविणारे एकाकीपण           

हलाहलाचे कितीक प्याले एकदाच तू रिचाविलेस पण
सांग शंकरा पचवशील  का गोठविणारे एकाकीपण 


कवी - इलाही जमादार
गझलसंग्रह - अर्घ्य
वास नाही ज्या फुलांना फक्‍त ती पाहून घे,
धुंद आहे गंघ ज्यांना तो तिथे जाऊन घे.

चांदणे लाटात जेथे साजल्या वाळूमधे,
रात्र संपेतो इमाने गीत तू गाऊन घे.

प्रीत जेव्हा जागणारी सर्वभावे वाहते
बाहुंचा वेढा तिचा तू साहसे साहून घे.

वाढत्या ग्रीष्मात जेव्हा मेघ माथी कोसळे
सारुनी संकोच सारा त्यांत तू न्हाऊन घे

नेम ना लागेल केव्हा तुष्टतेची वाळवी :
वाळण्या ती या जगाचें दु:ख तू लावून घे.

वाटतां सारेंच खोटें, प्रेमनिष्ठा आटतां,
एकटा अंतर्गृहींच्या ज्योतिने दाहून घे.


कवि - बा. भ. बोरकर

भुलाबाईची गाणी

पहिली गं भुलाबाई देवा देवा साथ दे
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी
अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी
गंगेच्या पाण्याने वेळवीला भात
जेविता कंठ राणा भुलाबाईचा.
ठोकीला राळा हनुमंत बाळा
हनुमंत बाळाचे लांब लांब झोके
टिकाऊचे डोळे हात पाय गोरे
भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी
झळकतीचे एकच पान
दुरून भुलाबाई नमस्कार
एवढीशी गंगा झुळझुळ वाहे
ताव्या पितळी नाय गं
हिरवी टोपी हाय गं
हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो
सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला
जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई
चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं
खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली
तळय़ा तळय़ा ठाकुरा
भुलाबाई जाते माहेरा
जाते तशी जाऊ द्या
तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या
बोटभर कुंकू लावू द्या
तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या
तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय
आउले पाऊल नागपूर गांव
नागपूर गावचे ठासे ठुसे
वरून भुलाबाईचे माहेर दिसे.