सौदा - भाग १

लेखिका: प्रियाली
लेखनप्रकारः गूढकथा
आयरा लेवीन यांच्या सुप्रसिद्ध रोजमेरी'ज बेबीवर आधारित.

"झालीस का गं तयार?" निलिमाताईंनी अनघाला हाक दिली.
बेडरूममध्ये अनघा आपल्याच विचारांत गढली होती. भारतात परतून दोन महिने झाले होते. आज विक्रम परतायचा होता. चार वर्षांपूर्वी त्यांची अमेरिकेत भेट होते काय, सहा महिन्यांत लग्न आणि आता अचानक अमेरिका सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय, भारतात विक्रमला मिळणारी गलेल्लठ्ठ पगाराची नवी नोकरी, ऑफिसकडून शिवाजीपार्कजवळ मिळणारा प्रशस्त फ्लॅट... आयुष्याचा झपाटा इतक्यावरच थांबला नव्हता. दोन महिन्यांपूर्वी अनघा पुढे येऊन घर वगैरे सेट करायला निघाली तेव्हा तिला पुढे येणार्या गोड बातमीची जाणीवही नव्हती परंतु हा नव्या घराचा गुण म्हणायला हवा. या घरात आल्यावर आठवड्या दोन आठवड्यातच येणार्‍या बाळाची चाहूल लागली होती.
तिने फोनवर विक्रमला कळवलं तेव्हा तो आनंदाने म्हणाला, "सांगितलं होतं ना ज्योतिषाने की नवी नोकरी, गाडी, घर, नवा पाहुणा सर्व येते आहे पुढल्या वर्षात असं. मला वाटतं मी योग्य तोच निर्णय घेतला. आता सर्व मनासारखं होईल... अगं म्हणजे होऊ लागलं आहे असंच म्हणूया. मी येतोच आहे परवा. कधी भेटतोय तुला असं झालंय."
विक्रमचं सर्व अनघाला पसंत होतं; हे एक ज्योतिषी प्रकरण सोडून. हुशार होता, कर्तबगार होता, धाडसी होता पण प्रारब्ध, दैव, नशीब या गोष्टींवर नको तेवढा विश्वास ठेवणारा होता. धाडसी असला तरी अमेरिका सोडून यायचा निर्णय घेतला तेव्हा तो मनातून काहीसा धास्तावला होता आणि ते साहजिकही होतं. त्याला माहित होतं की ज्योतिष वगैरेवर अनघाचा अजिबात विश्वास नाही; त्यामुळे तिला न सांगताच तो गुपचूप ज्योतिषाकडे जाऊन आला होता. येताना सोबत एक कसलासा ताईतही घेऊन आला होता. घरी आल्यावर लगेच त्याने तो आपल्या गळ्यात घातला होता. त्यानंतर थोडे दिवस तो गप्पगप्पच असे. अनघालाही ते जाणवलं होतं. तिने खोदून विचारल्यावर आपला निर्णय बिचकतच अनघाच्या कानावर घातला पण त्याच्या नशिबाने अनघाने त्याच्या निर्णयाला होकार दिला. काहीतरी जिंकल्यासारखा आनंद झाला होता त्याला. 'सर्व काही ठरल्यासारखं जमून येतंय. पुढेही सर्व जमून येईल असं मानू.' असं म्हणाला होता.
"अगं, काय विचारत्ये मी? झालीस का तयार?" निलिमाताई बेडरूममध्ये येत म्हणाल्या आणि अनघाचा चेहरा पाहून चपापल्या. "बरं नाही का वाटत तुला? तू घरीच आराम करतेस का? काय होतंय?"
"काही नाही गं आई. मळमळल्यासारखं होत होतं. जेवलेलं सगळं वर येतंय की काय असं वाटलं. डॉक्टर म्हणाल्या होत्या ना की पहिले तीन-चार महिने असं होणं कॉमन आहे असं. मी येत्येय एअरपोर्टला. बरी आहे मी. किती दिवसांनी विक्रम भेटणार आहे. मी गेले नाही तर नाराज होईल ना! पण अगं, कंगवा शोधत होते. कालपासून कुठे गायब झाला आहे कोणजाणे. इथेच होता, आता मिळत नाहीये." अनघा तोंडावर हसू आणून म्हणाली.
विक्रम परतल्यावर आठवड्याभरात निलिमाताई परत गेल्या. तशाही त्या तात्पुरत्या अनघाच्या सोबतीला आल्या होत्या पण त्यांचा जीव दिल्लीला अनघाच्या बाबांत अडकला होता. त्यांच्या जेवणाखाण्याची आबाळ होत असेल याची चिंता त्यांना लागली होती. आता विक्रम परतल्याने त्या दोघांच्या संसारात त्या काय करणार होत्या म्हणा.
चार वर्षांपूर्वी अनघाने विक्रमशी लग्न करण्याचा निर्णय घरी कळवला तेव्हा अनघाचे आई-बाबा थोडे नाराज झाले होते. विक्रमचे आई वडील तो कॉलेजला असतानाच अपघातात गेले होते. काकांनी कर्तव्य म्हणून त्याचा काही वर्षे सांभाळ केला होता. नंतर शिक्षणासाठी म्हणून विक्रम अमेरिकेला गेला आणि तिथेच रमला. पुढे एकत्र नोकरी करताना त्याची ओळख अनघाशी झाली आणि तिथेच त्यांनी लग्न करायचं ठरवलं. त्यावेळी निलिमाताई आणि आनंदराव; अनघाचे बाबा थोडे धास्तावले होते. विक्रम अनघापेक्षा चांगला ८ वर्षांनी मोठा होता. वयातला फरकही आनंदरावांना नापसंत होता. पण लग्नासाठी ते अमेरिकेला गेले, विक्रमशी भेट झाली आणि त्यांच्या सर्व शंका दूर झाल्या. देवाधर्मावर अनघाचा अजिबात विश्वास नव्हता पण विक्रम सर्व सांभाळणारा आहे हे पाहून निलिमाताईंना तो जास्तच आवडला. या मंदीच्या काळात विक्रमची नोकरीत फार ओढाताण होत होती तेव्हा त्याने भारतात परतण्याबद्दल आपल्या सासूसासर्यां चा सल्लाही घेतला होता. विक्रमला अचानक इतकी मोठ्या पदाची नोकरी मिळाली होती की सासूसासरे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता आणि आता तर नातवाच्या चाहूलीने निलिमाताई आणि आनंदराव दोघेही हरखले होते. अनघाला सातवा लागला की निलिमाताई परत यायच्या होत्या आणि नातवाला बघायला आनंदरावही... आता मात्र त्यांना दिल्लीला घरी परतणं भाग होतं. तसं अडीअडचणीला अनघाच्या शेजारचं परांजपे कुटुंब अगदी तत्पर होतं. परांजपेमामींची आणि अनघाची चांगली मैत्री जमली होती आणि घरही मुंबईला अगदी मोक्याच्या जागी होतं. काळजीचं काही कारणच नव्हतं...
दादरच्या कॅडल रोडवर, म्हणजेच आताच्या वीर सावरकर मार्गावर सूर्यवंशी हॉल लागतो. तिथे अगदी जवळच्याच गल्लीत समुद्राच्या जवळ मल्हार नावाची सात मजली इमारत आहे. तशी जुनी इमारत आहे. ४०-४५ वर्षे तरी झाली असतील तिला पण भक्कम आहे आणि आतले फ्लॅट अगदी प्रशस्त. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर विक्रमला ऑफिसचा फ्लॅट मिळाला होता. मजल्यावर तीनच फ्लॅट होते. एका फ्लॅटमध्ये परांजपे कुटुंब राहत होते तर दुसर्‍यात राहणार्‍या होत्या दिलनवाझ दस्तुर; या गेल्या वर्षीच राहायला आल्या होत्या. सुमारे सत्तरीची ही बाई एकटीच त्या फ्लॅटमध्ये राहत होती. तिच्याकडे मालपाणी भरपूर असावं असा अनघाचा अंदाज होता. परांजपेकाकांचा स्वत:चा व्यवसाय होता. तेही नवराबायको ६०-६५ चे असावेत.
विक्रम परतल्यापासून नव्या नोकरीत गर्क झाला होता. काही दिवस फार घाईघाईने निघून गेले. ऑफिसची गाडीही एव्हाना आली होती. अनघाची तब्येत मात्र थोडी मलूल होती. जेवण फारसं जात नव्हतं. काही खाल्लं तर उलटून पडत होतं. डॉक्टरांचा सल्ला घेतलेला होताच, काळजीचं काही कारण नव्हतं. तिला पुढल्या आठवड्यात सोनोग्राफीसाठी जायचं होतं, नेमकं त्याच दिवशी विक्रमला कामानिमित्त बंगलोरला जायचं होतं. परांजपेमामी सोबतीला येणार होत्या पण अनघा थोडीशी हिरमुसली होती.
“अगं काय अनघा! तू स्वत: प्रोफेशनल कॉर्पोरेट जगात काम केलं आहेस. नवी नोकरी आहे. अजून सर्व सेट व्हायचं आहे. समजून घे ना प्लीज. दोन दिवसांचा प्रश्न आहे. हा मी गेलो आणि आलो!” विक्रम समजावण्याच्या सुरात म्हणाला, “चल आपण गाडी घेऊन शिवाजीपार्कला जाऊ. एक राउंड मारू, तुला डॉक्टरांनी सांगितलं आहे ना की फिरा-चाला म्हणून... चल बघू.” विक्रमने बळेच अनघाला उठवून तयार केलं.
घराबाहेर पडताना अनघाला कॉफी टेबलवर एक पुस्तक दिसलं. “ए विक्रम, हे कुठलं नवीन पुस्तक आणलंस रे?” तिने सहज विचारलं.
“अगं मित्तलसरांचं आहे. मी मुद्दाम वाचायला मागून घेतलं. आपला बॉस कसली पुस्तकं वाचतो ते माहित असावं.” विक्रमने घर लॉक करत म्हटलं.
शिवाजीपार्कच्या लोकांनी भरलेल्या खेळीमेळीच्या वातावरणात अनघा आपला रुसवा विसरून गेली. विक्रमही तिला नव्या नोकरीच्या गोष्टी सांगत होता, मुलं क्रिकेट खेळताना गलका करत होती, पेन्शनर म्हातार्‍यांच्या गप्पा रंगल्या होत्या, काही तरुण जोडपी मन रमवायला आली होती, मध्येच भेळवाल्याची हाक ऐकू येत होती; अनघाला अगदी प्रसन्न वाटलं.
फेरफटका झाल्यावर दोघे गाडीपाशी परत आले. विक्रमने गाडी अनलॉक केली आणि तो झटकन आत शिरला. अनघाला मात्र सावरून आत शिरायला किंचित वेळ लागला आणि शिरता शिरता कोणीतरी तिच्या दंडाला स्पर्श केल्याची जाणीव तिला झाली. तिने वळून पाहिलं तर एक साठी बासष्टीची वृद्ध बाई हात पसरून याचना करत होती. अनघाने तिच्याकडे निरखून पाहिलं. त्या बाईच्या अंगावर साधे सुती कपडे होते, जुने होते पण मळकट नव्हते. केस तेल लावून घट्ट बांधले होते. गळ्यात काळा पोत होता. ते मंगळसूत्र होतं की काय ते चट्कन लक्षात येत नव्हतं. बाई दिसायला साधारण होती पण तिच्या डोळ्यांत विलक्षण चमक होती. ’अरेरे! बाई बर्‍या घरातली दिसते. काय तरी प्रसंग येतात एकेकावर.’ अनघाच्या मनात विचार आला.
“दे... दे ना! देतेस ना” ती बाई पुटपुटली तशी अनघा भानावर आली. तिने दहाची नोट काढली आणि त्या बाईच्या हातात कोंबली आणि ती आत जाऊन बसली.
“काय गं कोण होतं?” गाडी सुरू करत विक्रमने विचारलं.
“अरे.. भिकारीण होती रे...” त्या बाईला भिकारीण म्हणताना अनघाच्या जिवावर येत होतं पण तिने हात पसरून केलेली याचना तिला भिकारीणच ठरवत होतं. गाडीच्या साइड मिरर मधून अनघाने पुन्हा एकवार त्या बाईकडे बघण्याचा प्रयत्न केला आणि ती अधिकच गोंधळात पडली. आरशातून तिला मागे ती बाई दिसत होती. दिलेल्या दहाच्या नोटेला चुरगळून भिरकावून देताना...
रात्री झोपताना अनघाला त्या बाईची आठवण झाली. ’काय विचित्र बाई होती, हात पसरून उभी होती आणि दहाची नोट दिली तर तिने ती भिरकावून दिली. भिकार्‍यांचेही चोचले फार वाढले आहेत हल्ली.’ त्या विचारांतच तिचा डोळा लागला. दुसर्‍या दिवशी संपूर्ण सकाळ विक्रमच्या गडबडीत आणि घरातलं आवरण्यातच निघून गेली. मध्येच परांजपेमामी डोकावून गेल्या. नेहमीप्रमाणे पालेभाज्यांचा हिरवागार रस घेऊन आल्या होत्या. अनघाला तो रस अजिबात आवडत नसे पण मामी इतक्या प्रेमाने घेऊन येत की नाही सांगणं तिला शक्य नव्हतं.
दुपारी दोन घास खाल्ल्यावर अनघा बेडरूममध्ये पडल्या पडल्या पुस्तक वाचत होती. वाचता वाचता कधीतरी तिचा डोळा लागला. दुपारचे साडेतीन वाजत आले असावे. कशानेतरी अनघाची झोप मोडली. तिने डोळे किलकिले केले, हात ताणून आळस दिला आणि स्वत:ला सावरत ती उठू लागली. अचानक पलंगाच्या पायाशी कोणीतरी उभं असल्याचं तिला जाणवलं म्हणून तिने नजर वळवली.
पलंगाच्या पायथ्याशी ती कालची बाई हात पसरून उभी होती... “दे ना, देशील ना?”

सौदा - भाग २

अनघा ताडकन उभी राहिली. समोर नेमकं काय घडतं आहे हे तिला क्षणभर समजलं नाही पण नंतर मागचा पुढचा कोणताही विचार न करता ती सुसाट धावत घराबाहेर पडली आणि तिने परांजपेमामींची बेल ठणाठणा वाजवली. मामी दार उघडेपर्यंत तिच्या जिवात जीव नव्हता. मामींनी दार उघडलं तशी ती धडपडतच आत शिरली आणि त्यांच्या सोफ्यात जाऊन पडली.
"अगं काय झालं? अहो बाहेर या, ही अनघा बघा कशी करत्ये." परांजपेमामी काळजीने मामांना बोलवत होत्या. "अगं काय झालं अनघा?” त्यांनी अनघाच्या डोक्यावर हात फिरवत विचारलं. मामींच्या प्रेमळ आवाजाने अनघाला धीर आला. आपण स्वप्न पाहिलं असावं... किती हा बावळटपणा!
“क..क..काही नाही मामी. बहुतेक स्वप्न पडलं. चांगलं स्वप्न नव्हतं.” अनघाने सांगितलं.
“अगं तुला चौथा महिना आहे. आतापासून जास्तच सांभाळायला हवं. अशी वेड्यासारखी धावू नकोस. कुठे धडपडली असतीस तर? आणि हे बघ गरोदरपणात अशी वेडीवाकडी स्वप्नं पडतात कधीतरी. आपण वेगळ्या अनुभवातून जात असतो ना म्हणून. त्यात घाबरण्यासारखं काही नसतं.”
एव्हाना मामाही बाहेर आले होते. अनघाची विचारपूस करत होते. अनघाला खरंच बरं वाटत होतं.
“चहा टाक गं. अनघालाही चहा प्यायला की तरतरी येईल. काय गं, काय पाहिलंस स्वप्नात? कोणता आग्यावेताळ आला होता? हाहाहाहा!” मामा स्वत:च्याच विनोदावर गडगडाटी हसत म्हणाले.
“अं! आठवत नाही. विसरले... काहीतरी भयंकर होतं खरं...” अनघाने वेळ मारून नेली आणि ती हळूच मामींच्या स्वयंपाकघरात घुसली.
मामींच्या स्वयंपाकघराच्या खिडकीत छान कुंड्या एका ओळीत लावल्या होत्या. त्यात कसलीतरी झाडं मामींनी मोठ्या हौशीने लावली होती.
“मामी, कधीपासून विचारायचं होतं..ही कसली रोपटी, वेली लावल्यात हो?”
“अगं, तुळस, ओवा, मंजिष्ठा, गुग्गुळ अशी आयुर्वेदीक रोपटी आहेत. घरात असावीत. आपल्या आयुर्वेदात किती उपयुक्त वनस्पती आहेत. मी तुला तो रस काढून देते ना रोज, त्यात या झाडांची पानंही टाकते थोडीशी.”
त्या रसाच्या आठवणीने अनघाला मळमळून आलं पण मामी इतक्या प्रेमाने काळजी घेत होत्या की त्यांना नाराज करणे तिला पटले नाही. मामी जी नावं सांगत होत्या त्या वनस्पती कशा दिसतात हे ही अनघाला माहित नव्हते की त्यांचा उपयोगही माहित नव्हता पण मामी जे करतील ते चांगल्यासाठीच याची तिला खात्री वाटत होती.
चहा पिता पिता मामी अनघाची समजूत घालत होत्या. “तू एकटी असतेस घरात. सांभाळून राहत जा. अशी धावपळ करू नकोस. आम्ही आहोतच बाजूला. घाबरण्यासारखं काही नाही. तुझी जबाबदारी आहे आमच्यावर. काही गडबड झाली तर आम्हाला उत्तर द्यावं लागेल हे समजून घे.” मामींच्या आवाजाला धार चढल्यासारखी वाटत होती.
अनघाने मामींकडे आश्चर्याने पाहिलं. “शब्द दिलाय आईला तुझ्या. माझ्या पोटच्या मुलीसारखी काळजी घेईन अनघाची असा.” बोलता बोलता मामींचा आवाज अचानक हळवा झाला होता. परांजपे मामा-मामींना स्वतःचे अपत्य नव्हते.
दुसर्‍या दिवशी सोनोग्राफीसाठी गेलेली अनघा हिरमुसून घरी परतली. बाळाचं पहिलं दर्शन घ्यायला ती अगदी मनापासून उत्सुक होती. अनघा आणि मामी सोनोग्राफी करण्यासाठी पोहोचल्या तोच तिथे अचानक लाईटच गेली. काय प्रकार होता कोण जाणे पण डॉ. क्षोत्रींच्या क्लिनिकमध्ये साधा जनरेटरही नव्हता. चांगलं तासभर तिथे ताटकळून दोघी परतल्या. डॉक्टरांनी पुढल्या आठवड्यात पुन्हा बोलावलं होतं पण तिच्या आजच्या उत्साहावर पाणी फिरलं होतं. मामी तिला समजावत होत्या. त्यांच्या मते अनघाची गायनॅक डॉ. क्षोत्री घरापासून फारच लांब होती आणि तरुणही. तिला म्हणावं तेवढा अनुभव दिसत नव्हता. परत येताना मामी अनघाला गळ घालत होत्या की तिने डॉ. मखिजांच्या नर्सिंग होममध्ये जावं. ते या भागात अतिशय प्रसिद्ध होते. डॉ. क्षोत्रींचं नाव अनघाच्या अंधेरीला राहणार्‍या मामे बहिणीने, श्रद्धाने, सुचवलं होतं म्हणून अनघा तेथे जात होती पण दादर ते अंधेरी प्रवास जरा जास्तच होता हे अनघालाही दोन-चार भेटींत कळलं होतं.
घरी येऊन अनघाने पंखा लावला आणि ती सोफ्यावर टेकली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. उन्हं उतरली होती पण दिवेलागणीची वेळ नव्हती झाली. तिला घरात उगीचच उदास वाटलं. घर..घर...घर डोक्यावरचा पंखा फिरत होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पंख्याचा वारा सुखद नव्हताच. अनघाने नजर फिरवली. या घराला रंग द्यायला हवा. उगीच भकास वाटतंय. भाड्याच्या घरात आपण आपले निर्णय घेऊ नाही शकत; विक्रम आला की सांगायला हवं. तिने क्षणभर डोळे मिटले.
गार वार्‍याची झुळुक अंगावर शिरशिरी उठवून गेली. हॉलच्या मोठ्या खिडक्या समुद्राकडे उघडत. त्या उघड्या असल्या की त्यातून गार वारा येत असे. अनघा खिडक्या बंद करूनच बाहेर गेली होती पण मग खिडकी उघडली कशी आणि कोणी? अनघाने खिडकीकडे नजर फिरवली. खिडकीशी बाहेर समुद्राकडे तोंड करून कोणीतरी उभं होतं. मगासपेक्षा थोडं जास्तच अंधारलं होतं, अनघाला समोरचं स्पष्ट दिसत नव्हतं. कुणीतरी तरुण बाई होती. तिने सुरेख पांढरा नाईटगाऊन घातला होता. तिच्या घोट्यांपर्यंत तो पोहोचत होता.
“को..ण?” अनघाने धीर करून विचारलं, “कोण आहे तिथे?”
ती मागे वळली. तिशी-बत्तीशीची असावी. तिचे काळेभोर केस अस्ताव्यस्त खांद्यापर्यंत रुळत होते. त्या केसांतून होणारं तिचं दर्शन ती सुस्वरूप आणि देखणी असल्याचं दर्शवत होतं, मात्र तिच्या चेहर्‍यावर विलक्षण दु:ख दिसत होतं. एक गोष्ट अनघाच्या अगदी नजरेत भरली. तिचं पोट... सहा सात महिन्यांची गरोदर असावी. अनघाने तिच्या डोळ्यांत पाहिलं. तिच्या नजरेत दु:खासोबत अविश्वासही दिसत होता. अनघा चकित होऊन बघत होती आणि आसभास नसताना अघटीत घडलं. ती बाई गर्रकन वळली आणि क्षणार्धात तिने स्वत:ला खिडकीतून खाली झोकून दिलं.
"थां....ब!अगं, आई गं!!" अनघाने तोंडावर हात दाबला आणि डोळे उघडले. तिचं सर्वांग घामाने थबथबलं होतं. स्वप्न! पुन्हा एक स्वप्न? ते ही इतकं भयानक; तिच्या तोंडचं पाणी पळालं होतं. सोफ्याच्या बाजूला फोन होता. तिने कसाबसा मामींचा नंबर फिरवला. मामा आणि मामी दोघेही ताबडतोब धावत आले.
“अगं अनघा, काय झालं?” मामींच्या आवाजात काळजी होती. त्यांनी अनघाचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवून त्या लगबगीने पाणी आणायला गेल्या. सोफ्याजवळच्या खुर्चीत परांजपेमामा टेकले.
“अगं बाई बरी आहेस ना? काय झालं तुला?” त्यांचा सूरही काळजीचा होता. अनघाने मान डोलावली. मामींनी आणलेला पाण्याचा ग्लास तिने घटाघटा पिऊन संपवला.
“आता सांग काय झालं?”
“काही नाही! काहीतरी विचित्र पाहिलं मी. स्वप्न होतं पण स्वप्नासारखं नाही वाटलं.” अनघाने सर्व प्रसंग मामा-मामींना सांगितला. मामींचा चेहरा उतरल्यासारखा वाटत होता. त्यांची नजर मामांवर खिळून होती. मामा मटकन अनघाशेजारी सोफ्यावर बसले. “अघटीत आहे खरं.”
“तुम्हाला काहीतरी माहित्ये. तुम्ही मला सांगायलाच हवं.” मामामामींचे चेहरे पाहून अनघाने ताडलं होतं की त्यांना काहीतरी माहित आहे.
“अगं... आता काय सांगू तुला? दिलआंटी राहतात ना त्या फ्लॅटमध्ये पूर्वी सोनिया राजपूत म्हणून एक टीव्ही मालिकांची लेखिका राहत होती. तिच्या दोन तीन सिरिअल्स फार प्रसिद्ध झाल्या होत्या. एक तर आजही लागते. तिने तरुण वयात प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळवलं होतं पण बाई थोडीशी चंट होती. तिच्याकडे कोण येई, कोण जाई, कसल्या कसल्या पार्ट्या होत कोणास ठाऊक. रात्री बेरात्री वाट्टेल तेव्हा वर्दळ असे. आमचे तिचे फार घरोब्याचे संबंध नव्हते पण मजल्यावर राहतो त्यामुळे बर्‍यापैकी ओळख होती.
मग एके दिवशी आम्हाला शंका आली की ती प्रेग्नंट असावी. आमची शंका खात्रीत बदलल्यावर आम्ही तिला सहज विचारलंही होतं की हे काय आहे? तिने उडवाउडवीची उत्तरं दिली पण मग हळूहळू पोट दिसायला लागलं आणि ती थोडीशी चिंताग्रस्त दिसत असे. आमच्याशी बोलणंही तिने बंद करून टाकलं आणि मग एके दिवशी कसलाही आसभास नसताना संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास तिने तिच्या खिडकीतून खाली उडी मारून जीव दिला. दोन वर्षं झाली असतील या घटनेला.” परांजपे मामींचा आवाज हे सर्व सांगताना पडला होता. त्या वारंवार मामांकडे पाहत होत्या.
“पोलिस केस झाली. कसलीही झटापट वगैरे झाल्याची चिन्हे नव्हती. उलट एक चिठ्ठी मिळाली. त्यात तिने आपली चूक झाली... यातून सुटकेचा एकच मार्ग दिसतो असं लिहिलं होतं. पोलिसांनी केस बंद केली. तिच्या त्या मुलाचा बाप कधी पुढेच आला नाही. पुढे मग दिलआंटी त्यांचे मिस्टर गेल्यावर मलबार हिलचा फ्लॅट विकून इथे राहायला आल्या पण त्यांना कधीच असा विपरित अनुभव आला नाही. तुलाच का असं काहीतरी दिसावं... कोडंच आहे.” मामींची नजर पुन्हा मामांवर स्थिरावली होती.
मामांनी घसा खाकरला आणि ते अनघाच्या जवळ आले. “अनघा, एक सांग. या इमारतीतल्या कुणी तुला सोनियाचा किस्सा सांगितला होता का? तुला स्वप्न पडलं आणि ती दिसली हे खरं वाटत नाही.”
“नाही हो मामा! मला कुणीच नाही काही म्हणालं. मी खरंच सांगते, मला दिसली ती..” अनघाचा आवाज नकळत ओलसर झाला होता. तिने नाराजीने मामांकडे पाहिलं. एक गोष्ट चटकन तिच्या डोळ्यांत भरली. तिने या आधी कधी मामांकडे निरखून पाहिलंच नव्हतं. मामांच्या कानाची उजवी पाळी किंचित कापलेली होती.
“अगं हो हो, तुम्ही गप्प बसा हो. उगीच त्या पोरीला आणखी त्रास नको. घाबरू नकोस अनघा. असं कर तू आमच्या बरोबर चल. विक्रम आला की त्यालाही तिथेच बोलवू. मी आज छोले-पुरीचा बेत केला होता. सोबतीला श्रीखंडही आहे. तुम्ही आमच्याकडेच जेवा. आपण दिलआंटींनाही बोलावू.” मामी विषय बदलत म्हणाल्या.
रात्री जेवताना विक्रमच्या आणि परांजपेमामांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. मामा विक्रमला स्वत:च्या व्यवसायातल्या खाचाखोचा समजावून देत होते. दुसर्‍या खोलीत अनघा, दिलआंटी आणि परांजपेमामींच्या गप्पा रंगल्या होत्या. बोलता बोलता मामींनी अनघाला पुन्हा डॉक्टर बदलायची गळ घातली.
“हे बघ. डॉक्टर मखिजा अगदी प्रसिद्ध आहेत इथे आणि अनुभवी आहेत. अंधेरी कुठल्या कुठे. तिथे जाणं त्रासाचं आहे.”
“मामी पण अहो मला फिमेल डॉक्टर हवी. अशा गोष्टींसाठी बाई असेल तर बरं वाटतं.”
“अरे डिकरी, डॉक्टरसमोर शरम कस्ली? ते पैले वारची प्रेग्नंसी हाय ना तर चांगल्या डॉक्टरकडेच दाखव.” दिलआंटींनी सल्ला दिला.
“हे बघ आपण उद्या सकाळीच जाऊ. मी येते ना सोबतीला.”
“पण मी डॉ. क्षोत्रींना सांगितलं आहे की बाळंतपणासाठी तिथेच येईन आणि श्रद्धा काय म्हणेल. तिने मला खास सुचवलं होतं या डॉक्टरचं नाव.” अनघा म्हणाली.
“त्यात काय झालं? ही मुंबई आहे. इथे सर्व काही व्यवहार आहे. तू अद्याप काही अ‍ॅडवान्स दिलेला नाहीस ना तिथे. मग झालं तर? आपण उद्या सकाळीच डॉक्टर मखिजांकडे जाऊ. आमची ओळख आहे त्यांच्याशी. ते तुला अगदी व्यवस्थित सल्ला देतील.”
अनघाला नाही म्हणता येईना; तिला मामींचा गळेपडूपणा आवडला नाही. त्या रात्री तिने विक्रमला ते स्वप्न सांगितलं आणि मामींनी दिलेला डॉक्टर बदलायचा सल्लाही सांगितला. विक्रमने तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. मामी सांगतील तेच करूया, त्यांना जास्त कळतं असं त्याचं मत होतं. स्वप्नाचं ऐकून मात्र त्याचा चेहरा काळजीत पडल्यासारखा झाला.
“उद्या तू डॉक्टरांकडे जाशील ना तर त्यांना तुझा मूड चांगला राहिल किंवा मन शांत राहिल अशी औषधं द्यायला सांग. प्रेग्नन्सीमध्ये बायकांना मानसिक व्याधी जडल्याची उदाहरणं आपण ऐकली आहेत. तुला काळजी घ्यायला हवी.”
“मला काहीही झालेलं नाहीये आणि तुला इतकी काळजी आहे तर तू चल ना माझ्याबरोबर डॉक्टरकडे. मी आतापर्यंत एकटीच गेली आहे. तू चल की एखाद दिवस. मी आई होणार आहे तर तूही बाप होणार आहेस ना!”
“शांत हो! तुझा त्रागा सांगतोय की तुझं चित्त ठिकाणावर नाही. मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगतो आहे ना. काळजी घ्यायला हवी.” अनघाला जवळ घेत विक्रम म्हणाला पण अनघाला त्याचा स्पर्श थंडगार वाटला. त्यात नेहमीची जवळीक नव्हती.
"विक्रम, अरे तो ताईत का नाही तुझ्या गळ्यात?" विक्रमच्या गळ्यात ताईत न दिसल्याने कुतूहलाने अनघाने विचारलं.
"अगं त्या ताईताने त्याचं काम केलं आहे. आता त्याची गरज नाही. जे साध्य करायचं होतं ते साध्य केलं ना मी. आता फक्त परतफेड करायची आहे. तू झोप. कशाला नसती काळजी करतेस. नाहीतरी तुझा विश्वास नाहीच ना अशा गोष्टींवर. झोप हं आणि कसलीतरी भलती स्वप्नं बघू नकोस प्लीज." विक्रमने तिच्या अंगावरची चादर सारखी केली आणि अनघानेही पुढे काही न बोलता डोळे मिटले.

सौदा - भाग ३

दुसर्‍या दिवशी सकाळी १०च्या ठोक्याला मामी तयार होऊन अनघाकडे आल्या. अनघाला कळून चुकलं की मामी काही पाठ सोडत नाहीत. तिने काही न बोलता तयारी केली आणि ती मामींबरोबर बाहेर पडली. डॉक्टर मखिजांच्या क्लिनिकमध्ये सकाळी फार गर्दी नव्हती. दोन बायका बसल्या होत्या. अनघाचा नंबर तिसरा होता. सुमारे अर्ध्या तासाने अनघाचा नंबर आला. डॉक्टर मखिजा साठीचे असावेत. त्यांच्या डोक्याचे सर्व केस पांढरे झाले होते पण चेहर्‍यावर तुकतुकी होती. मध्यम शरीरयष्टीचे आणि चांगल्या उंचीचे मखिजा बोलण्या वागण्यात अतिशय सराईत होते. त्यांच्या बोलण्यातून अनेक वर्षांचा अनुभव चटकन कळून येत होता. अनघाची तपासणी झाल्यावर त्यांनी तिला अनेक सल्ले दिले. तिने काय खावं, काय प्यावं, काय खाऊ नये, कोणते व्यायाम करावे, काय करणे टाळावे याबद्दल ते भरभरून बोलत होते पण औषधांबद्दल, गोळ्या किंवा विटॅमिन्सबद्दल ते काहीच सांगत नव्हते असे वाटल्याने अनघाने त्यांना विचारले,
“डॉक्टर, मी औषधे कोणती घेऊ? डॉक्टर क्षोत्रींनीच दिलेली सुरू ठेवू का तुम्ही वेगळी देणार? माझी सोनोग्राफीही राहिली आहे. ती कधी करायची?”
डॉक्टर मखिजा स्मितहास्य करून म्हणाले, "बाहेरच्या गोळ्या आणि औषधं घेण्यापेक्षा निसर्गातून मिळणार्‍या विटॅमिन्सचा वापर करावा. हे गोळ्या-औषधांवर विसंबून राहण्यात मला कधीच विश्वास वाटलेला नाही."
“मी देते ना रोज अनघाला पालेभाज्यांचा रस.” मामी घाईने म्हणाल्या. “हिरव्या भाज्या, आयुर्वेदिक पाले असं सगळं ठेचून रस काढते मी रोज.”
“उत्तम! हेच हेच सांगत होतो मी." डॉ. मखिजा उल्हासित होऊन म्हणाले. "अनघा, तुला काळजी करण्याचं कारणच नाही. परांजपेबाई तुमची काळजी व्यवस्थित घेतात असं दिसतं आहे."
“पण.. डॉक्टर माझं वजन घटल्यासारखं वाटतं आहे. मला उत्साहही वाटत नाही आणि मला सोनोग्राफीही करायची होती. मला माझ्या बाळाचं पहिलं दर्शन घेण्याची इच्छा आहे डॉक्टर."
“सोनोग्राफी? आणि ती कशाला? सोनोग्राफी नव्हती तेव्हा काय लोकांना मुलं होत नव्हती? माझी प्रॅक्टिस सुरू झाली तेव्हा असली कोणतीही फ्याडं नव्हती आणि वजनाची काळजी नको. भरपूर खा, भरपूर विश्रांती घे. परांजपेबाई करून देतात तो रस घे की झालं.”
“मी घेतेच आहे तिची काळजी. तिला काय हवं काय नको, सर्व डोहाळे मी पुरवणार आहे.” मामी हसून म्हणाल्या.
“पण मला अल्ट्रासाउंड टेस्ट करून घ्यायची आहे.” अनघा हट्टाने म्हणाली. तसे मखिजा हसून म्हणाले, “ठीक पण आता नको. सहाव्या सातव्या महिन्यांत करू. सर्व काही ठीक आहे. हेल्दी प्रेग्नंसी आहे. उगीच काळजी कशाला करायची?”
“बरं डॉक्टर, हिला थोडा डिप्रेशनचा त्रास होतो आहे असं मला वाटतंय. तिला कोणीतरी दिसतं. म्हणजे तिला कसलीतरी भयंकर स्वप्नं पडतात आणि मध्यंतरी एक बाईही दिसली होती.” मामींनी बोलताना सूचक नजरेने मखिजांकडे पाहिले.मामींनी हा विषय काढलेला अनघाला अजिबात आवडले नाही पण ती गप्प बसली. मामींनी सोनियाबद्दल काहीच सांगितले नाही हे तिच्या लक्षात आलं.
"अरेच्चा! अनघा, हे काय सगळं? पण असू दे... काही जगावेगळं नाही. प्रेग्नन्सीत असं होतं बरं! मूड डिसॉर्डर्स होतात. झोप कमी होते, स्वप्नं पडतात, उगीचच रडू येते, अस्वस्थता वाटते, अगदी मरणाचे विचारही डोक्यात येतात. मी सध्या तुला काही औषधं लिहून देतो. निदान त्याने तुला स्वस्थ झोप तरी लागेल आणि ती वृद्ध बाई दिसते, ती तुला काही करत नाही ना. मग ती गार्डीयन एंजल आहे असं समज. आपण आणावे तसे विचार डोक्यात येतात." डॉक्टर हसत हसत म्हणाले.
परतताना टॅक्सी सिग्नलकडे थांबली होती. अनघाने बाहेर नजर फिरवली. समोरच्या फूटपाथवर तिला ती वृद्ध बाई दिसत होती. इतक्या दूरवरूनही ती आपल्याकडे टक लावून बघते आहे याची जाणीव तिला झाली. तिने मामींचा हात दाबला. “काय झालं अनघा?”
“मामी, ती बघा. ती भिकारीण... अं ती बाई मी सांगत होते ना. समोर त्या फूटपाथवर.”
“कोण? कुठे? कुठली बाई अनघा. मला तर काहीच दिसत नाहीये.” गोंधळून मामी म्हणाल्या आणि तोपर्यंत सिग्नल हिरवा झाला आणि टॅक्सीने वळण घेतलं.
घरी येईपर्यंत अनघा गप्पच होती. तिच्या मनात विचार चमकून गेला की परांजपेमामींचं आणि डॉक्टर मखिजांचं आधीच काहीतरी बोलणं झालं असावं. मामींनी नक्की मखिजांना काहीतरी सांगितलं होतं पण त्याही पेक्षा एक महत्त्वाची गोष्ट तिच्या ध्यानात आली. डॉक्टर मखिजांच्या उजव्या कानाची पाळी कापलेली होती.
दिवसभर अनघा थोडी अस्वस्थच होती. आपण डॉक्टर बदलून चूक तर केली नाही ना ही बोचणी तिला लागली होती आणि त्यात पुन्हा त्या बाईचं दर्शन. संध्याकाळी विक्रम घरी आला तसा तिने त्याच्यासाठी चहा टाकला. दिवे लागणीची वेळ झाली होती. घराची बेल वाजली म्हणून तिने दरवाजा उघडला. बाहेर कोण असेल याचा अंदाज तिला होताच.
मामा मामी दोघे घरात शिरले. अनघाला खरेतर ते यावेळेस नको होते. शेजारी असले म्हणून काय झालं. या दोघांनी जसा अनघाच्या आयुष्याचा ताबा घेतला होता. तिला विक्रमबरोबर थोडा मोकळा वेळ हवा होता पण विक्रमने उत्साहाने उठून त्यांचं स्वागत केलं, "या! मामा. आता यावेळेला... चहा घेता का?"
“दिवेलागणीची वेळ आहे. मी पूजा करत होतो. आजपासून अनघासाठी नवा पाठ सुरु केला आहे. आज हा पाठ तुमच्यासमोर म्हणेन असे म्हणत होतो. अनघाचा विश्वास नाही. रोज नाही ऐकलं तरी चालेल तिने पण आजतरी तुम्हा दोघांच्या कानावरून जाऊ द्या. बाळासाठी हं सर्व." मामांनी चटकन सोबत आणलेली चटई जमिनीवर पसरली आणि ते मांडी घालून बसले.
“मामा, अहो माझा विश्वास नाही अशा गोष्टींवर.” अनघा नाराजीने म्हणाली पण विक्रमने तिला दटावले, “अनघा, मामा तुझ्या चांगल्या करता सांगताहेत. इथे बस स्वस्थ.” त्याने तिचा हात धरून तिला मामांशेजारी बसवले. मामीही बसल्या. मामांनी ओल्या कुंकवाने जमिनीवर स्वस्तिकाचं चिन्ह काढलं आणि त्यानंतर बराच वेळ मामा जोरजोरात काहीतरी म्हणत होते. अनघाला ते शब्द अनोळखी होते.
अर्ध्या तासाने मामा उठले आणि म्हणाले, “काळजी करू नकोस. मुलगा होईल बघ तुला. जय भैरवनाथ.”
त्या रात्री अनघा जागीच होती. आपल्यासोबत काहीतरी विचित्र घडतं आहे याची जाणीव तिला झाली होतीच पण त्या घडण्यात मामा, मामी आणि विक्रमचाही हात असावा की काय अशी शंका तिला येऊ लागली. मामा जे काही बोलत होते ते नेहमीच्या पाठपूजेतले शब्द नव्हते आणि ते स्वस्तिक चिन्ह, ते चक्क उलटं काढलेलं होतं. अनघाचा अशा गोष्टींवर विश्वास नसला तरी उलटं काढलेलं स्वस्तिक चिन्ह अशुभ असतं हे तिला माहित होतं आणि भैरवनाथ? तिने निवांत घोरणार्‍या विक्रमकडे पहिलं आणि तिचं मन खट्टू झालं. किती घाणेरडे विचार करत होती ती. जे तिची काळजी घेत होते त्यांच्यावरच शंका घेत होती.... पण नाही, काहीतरी आक्रित घडत होतं हे निश्चित.
त्या रात्री अनघाला झोप लागली नाही. मन अस्वस्थ झालं होतं, मध्यरात्रीपर्यंत डोळा लागला नाही तशी ती हळूच उठली आणि आवाज न करता बाहेर आली. तिने काळोखातच बाहेरच्या खोलीत लॅपटॉप सुरू केला आणि इंटरनेटवर ती गूगल सर्च करू लागली; आपण नेमकं काय शोधावं, कुठून सुरुवात करावी ते तिला कळत नव्हतं. पेगनिजम, कल्ट असे काहीतरी शोध ती घेत होती पण ती जे नेमकं शोधत होती ते मिळत नव्हतं. ती हताश होऊन लॅपटॉप बंद करायला जाणार तेवढ्यात तिच्या कानाशी कोणीतरी कुजबुजलं. एक थंड झुळुक बाजूने गेल्यासारखी वाटली आणि अनघा जागीच शहारली. तिने आजूबाजूला पाहिलं पण कोणाची चाहूल लागली नाही. तिचा हात पुन्हा लॅपटॉपकडे गेला आणि पुन्हा तिच्या कानात कोणीतरी कुजबुजलं “कपालि..क”
कपालिक! कपालिक म्हणजे? अनघाने घाई घाईत कपालिक शब्दावर शोध घेतला. गूगलने बरेच दुवे पुढ्यात आणले. त्यापैकी एका दुव्यातली माहिती तिने वाचायला सुरुवात केली. 'कपालिक हा अघोर पंथाचा एक गट. भैरवाला मानणारा. करणी करणारा. ज्याच्यावर करणी करायची त्याची वस्तु हस्तगत करून काळी जादू करणारा, स्मशानात संचार करणारा, मानवी कवटी पुढे करून त्यात भीक मागणारा, कधी कधी नरमांसभक्षण करणारा... आणि...आणि त्यांच्या अघोर विधींसाठी मानवी बळी देणारा... विशेषत: अर्भकांचे.'
"इइइ.. काहीतरीच" अनघा बसल्याजागी थरथरू लागली. तिला दरदरून घाम फुटला आणि त्याच क्षणी खोली उजेडाने भरून गेली. अचानक डोळ्यांवर पडलेल्या उजेडाने अनघाने गपकन डोळे मिटले. डोळे उघडले तेव्हा समोर विक्रम उभा होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता.
“काय चाललंय? काय शोधत होतीस अंधारात?” त्याने लॅपटॉपच्या स्क्रिनवर नजर टाकली आणि तो किंचाळलाच “आर यू आउट ऑफ युवर माइंड? हे काय वाचते आहेस रात्रीबेरात्री. वेड लागलंय का तुला?” त्याने खाडकन लॅपटॉप बंद केला आणि रागाने इंटरनेटची केबल उचकटून काढली.
“झोपायला जा. आत्ता! उठ आधी. हा लॅपटॉप उद्यापासून माझ्या ऑफिसात जाणार. हे असलं काहीतरी वाचायला नाही ठेवलेला तो इथे.”
“अरे विक्रम पण...” अनघा उठून उभी राहिली आणि तोच “आई...गं!” तिच्या पोटात अचानक कळ आली. “विक्रम, अरे काहीतरी होतंय मला. पोटात अचानक दुखायला लागलं आहे.” अनघा घाबरून म्हणाली तसा विक्रमचा राग पळाला.
“अनु अगं काय होतंय? थांब मी मामींना बोलावतो.”
“अरे नको. इतक्या रात्री...” पण अनघा बोलेपर्यंत विक्रम दरवाजा उघडून बाहेरही गेला होता.
मामी झोपेतून उठून धावतच आल्या. अनघाने त्यांना पोटात येणार्‍या कळांबद्दल सांगितलं. मामींनी मागचापुढचा विचार न करता डॉक्टर मखिजांना फोन लावला त्यावेळी रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते. अनघाला अजिबात अपेक्षा नसताना पुढल्या पंधरा मिनिटांत डॉक्टर घरी हजर झाले. त्यांनी अनघाला तपासलं आणि ते म्हणाले, “काही घाबरू नकोस. म्हटलं तर काळजीचं कारण नाही आणि म्हटलं तर आहे. पुढले तीन चार महिने तरी तुला बेडरेस्ट घ्यावी लागेल. कुठे जायचं नाही, उठायचं नाही. पूर्णवेळ झोपून राहायला लागेल. अगदी घरातल्या घरात थोडं फिरलीस तर चालेल पण धडपडून काम नाही.”
अनघाला आश्चर्य वाटत होतं. स्पेशालिस्ट असा रात्री अपरात्री धावत येतो. विक्रम, मामा, मामी आणि डॉक्टर मखिजाही. गळाला लागलेल्या तडफडणार्‍या माशासारखी आपली गत झाली आहे हे अनघाच्या लक्षात येऊ लागलं होतं.
“औषध कुठलं घेऊ? दुखतंय मला.” अनघाने कण्हत म्हटलं.
“मी देतो लिहून. या औषधाने थोडीशी गुंगी आल्यासारखं वाटलं तरी औषध योग्य काम करेल.”
त्या रात्री औषधाने अनघाला झोप लागली. दुसर्‍या दिवशी ती उठली तेव्हाही दुख कायम होतीच. सक्काळीच परांजपेमामी चहा घेऊन आल्या. दुपारचं जेवण अगदी रात्रीचं जेवण सर्व त्यांच्याकडूनच येईल असं त्यांनी बजावलं. विक्रमला त्यांनी सांगितलं की दिवसा त्या चार-पाच फेर्‍या मारतील आणि दिलआंटीही अध्येमध्ये येऊन अनघापाशी बसतील. मामाही होतेच काही लागले तर.
मामींनी दिलेला चहा पिऊन अनघा उठली. तिला थोडा अशक्तपणा आल्यासारखं वाटत होतं. कदाचित औषधामुळे थोडं चक्करल्यासारखंही वाटत होतं. तिने उठून मोबाइल शोधला आणि आईला फोन लावला. निलिमाताई सकाळीच अनघाचा फोन आल्यावर काळजीत पडल्या होत्या. त्यांनी तिची चौकशी करायला सुरूवात केली.
“आई, माझ्या पोटात खूप दुखतंय. डॉक्टरांनी बेडरेस्ट घ्यायला सांगितली आहे. तू येशील का गं इथे? मला बरं नाही वाटत. खूप आठवण येते आहे तुझी.” अनघाला हुंदका आवरला नाही. तिने फोन कानाकडून थोडासा बाजूला केला आणि त्याक्षणी तो खस्सकन मागून कोणीतरी खेचला.
विक्रम मागेच उभा होता. त्याने चटकन फोन आपल्या कानाला लावला. फोनवरून निलिमाताई चौकशी करत होत्या.
“अनघा, अगं काय झालं? असं कसं झालं अचानक? मी येते तिथे. तू काळजी करू नकोस.”
“अहो आई... काही विशेष नाही झालेलं,” विक्रमचा आवाज शांत आणि दिलासा देणारा होता. “अनघा बरी आहे. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितलं आहे आणि इथे तिचा शब्द झेलायला मी, मामा-मामी, दिल आंटी सर्व आहोत. आता तर स्वयंपाकही मामीच करून देणार आहेत. तुम्हाला इथून जाऊन ३-४ महिने होताहेत. तुम्ही कुठे परत ये-जा करताय. अनघा उगीच घाबरली आहे. पहिली वेळ आहे ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका.” बोलत बोलत विक्रम खोलीबाहेर गेला. पुढे विक्रम आणि निलिमाताईंचं नेमकं काय बोलणं झालं ते अनघाला कळलं नाही पण काय झालं असावं याचा अंदाज आला.
विक्रम पुन्हा खोलीत आला तेव्हा त्याच्या हातात मोबाईल नव्हता. “विक्रम मला आईशी बोलायचं आहे.” अनघाने हट्टाने सांगितलं. तसा विक्रम समजूतीच्या सुरात म्हणाला, “अगं फोन कधीही कर. तुला आईशी बोलायला नको म्हटलंय का? पण तू असं त्यांना काळजीत घालणं बरं नव्हे. मी तुझा फोन परांजपे मामींकडे दिला आहे. तू कधीही आईंना फोन कर पण मामी समोर असताना. तुझी मन:स्थिती बरी नाही. तुला प्रेग्नन्सी डिप्रेशन आलं आहे ते मी आईंना सांगितलं आहे. फोन केलास तर त्या तुला माझ्यापेक्षा जास्त चांगलं समजावतील.”
अनघाला कळून चुकलं होतं की आपण आता पुरते अडकलो आहोत. ’नरबळी... अर्भकांचे बळी’ तिच्या डोक्यात किडा वळवळला. तिने पलंगावरून उठण्याचा प्रयत्न केला आणि पोटातली कळ मस्तकात गेली. विक्रम ऑफिसला गेल्यावर लगेचच मामी पाल्याचा रस घेऊन हजर झाल्या. त्यांनी तिला गोळ्याही दिल्या. गोळ्यांनी अनघाला दुखायचं कमी झाल्यासारखं वाटलं पण सोबत डोळ्यांवर झापडही आली. दुपारी जेवायच्या वेळेस मामींनी अनघाला उठवलं तेव्हा तिच्या पोटातलं दुखणं पुन्हा बळावलं होतं. काही खायला नको असं तिला झालं होतं. मामींनी बळेबळेच दोन घास खायला घातले पण इतर वेळेस जी चव मामींच्या जेवणाला येते ती नव्हती... किंवा आपल्याच तोंडाची चव गेली आहे. अनघा विचार करत होती पण तिच्या आठवणींवर आणि जाणीवांवर कसलातरी पडदा पडल्यासारखं तिला वाटत होतं. दुपारी दिलआंटी येऊन बसल्या. बाळासाठी स्वेटर विणायला घेतला होता त्यांनी. विक्रम परत येईपर्यंत त्या सोबतीला होत्या.
त्यानंतर या गोष्टी नेमाने होऊ लागल्या. मामी आणि दिलआंटींनी अनघाचा जणू कब्जाच घेतला होता. अनघाला एकांत फक्त संडास बाथरूमला जाताना मिळे तेवढाच पण ती इतकी अशक्त झाली होती की तिला तिथेही आधार लागत होता. पण त्या दरम्यान बाळ पोटात आकार घेऊ लागलं होतं. त्याचं हलणं, फिरणं, लाथ मारणं अनघाला सुखावून जात होतं. अध्येमध्ये डॉक्टर मखिजा फेरी मारत. अनघाला तपासत. त्यांच्या चेहर्‍यावरून सर्व काही ठीक आहे असा अंदाज अनघाला येत होता. ते पोटातलं दुखणं मात्र कमी होत नव्हतं.
आईशी तिचं बोलणं होई परंतु परांजपे मामी आणि दिलआंटीच्या समोर तिला काही सांगता येत नसे. सांगायचं म्हटलं तरी फारसं काही आठवत नसे. एखाद्या अंमलाखाली वावरत असल्यासारखं तिचं आयुष्य रेटलं जात होतं. आई तिला फोनवर सांगत असे की ती सातव्या महिन्यात येते आहे. एक तेवढीच अंधुक आशा तिच्या मनात जागी होती. कधीतरी तिला स्वप्नात ती रस्त्यावरली बाई दिसे, तर कधी सोनिया. जे समोर चाललं आहे ते सत्य की भास हे ओळखायचीही तिची मन:स्थिती नव्हती. जेव्हा पूर्ण जागं असल्यासारखं वाटे तेव्हा पोटातल्या कळा तिला हैराण करत.
मध्यंतरी एक दिवस तिची मामे बहीण श्रद्धा येऊन गेली. तिच्यासमोरही मामी हजर होत्या. अनघाने तिच्याशी बर्‍याच दिवसांत काही संपर्कच ठेवलेला नसल्याने ती थोडी काळजीत पडली आणि सरळ उठून भेटायलाच आली. अनघा आणि श्रद्धा यांच्यात तशी फार जवळीक नव्हती. लहानपणापासून अनघाच्या बाबांच्या बदल्या होत त्यामुळे नातेवाईकांशी खूप जवळीक निर्माण होणे शक्य नव्हते परंतु तरीही समवयस्क आणि आता मुंबईतच राहायला आल्याने दोघी थोड्याफार जवळ आल्या होत्या. अनघाची अवस्था आणि अस्वस्थता दोन्ही श्रद्धाच्या नजरेने टिपल्या.

सौदा - भाग ४

“अगं मी कितींदा फोन केला तुला? पण सतत तुझ्या व्हॉइसमेलवर जात होता म्हणून शेवटी भेटायलाच आले. बरी आहेस ना.”
“नाही गं. माझ्या पोटात सतत कळा येतात. आता सहावा महिना लागला तरी बंद होत नाहीयेत. जेवण फारसं जात नाही.. आणि.. आणि..”
अनघा पुढलं फार बोलू नये यासाठी मामींनी चटकन तोंड उघडलं.
“अगं श्रद्धा, तिची मानसिक स्थितीही बरी नाहीये. तिला भास होतात. कोणीतरी बायका दिसतात. इतकंच काय आम्ही सगळे तिच्या वाईटावर आहोत असं तिला वाटू लागलंय. तू निलिमाताईंनाही विचार हवं तर. अनघाच्या मनाचे विचित्र खेळ सुरू आहेत, आम्ही सर्व काळजीत आहोत.” मामी चेहरा पाडून म्हणाल्या.
श्रद्धा या अचानक पुढे आलेल्या गोष्टींनी गोंधळून गेली. मामींसारख्या अनुभवी बाईवर तिचा विश्वास बसत होता आणि अनघाची झालेली दशा काळजीत टाकणारीही होती.
“पण पोटात दुखणं नॉर्मल नाही अनघा. असं सतत पोटात दुखत नाही कुणाच्या. आधी मला सांग की तू अचानक डॉक्टर का बदललास? आणि कुठली औषधं घेते आहेस?” श्रद्धाने चौकशी सुरू केली पण अनघाचा चेहरा पाहून तिला कळत होतं की अनघा बोलण्यास कचरते आहे.
"डॉ. मखिजा मला सांगत होते की प्रत्येक प्रेग्नन्सी वेगळी असते. त्यांनी पोटात दुखण्याच्या अशा केसेस पाहिलेल्या आहेत." अनघा म्हणाली.
“मामी, चहा टाका ना. दुपारचे तीन वाजत आले. आपण सर्व मिळून चहा पिऊया.” मामींना काही क्षणांसाठी तरी खोलीबाहेर घालवायची श्रद्धाची युक्ती नामी होती.
मामी बाहेर गेल्या तशी अनघा म्हणाली, “श्रद्धा, माझ्या बाळाला धोका आहे गं. मला खूप भीती वाटते आहे. मला हे मूल हवहवसं आहे आणि हे सर्व या बाळाला माझ्यापासून दूर करतील अशी सतत भीती वाटत राहते. मी सतत दडपणाखाली असते.” तिचा आवाज कातर झाला होता. श्रद्धा आणखीच गोंधळात पडली.
“तू प्लीज माझ्यासाठी एक करशील का? इंटरनेटवर किंवा लायब्ररीत जाऊन कपालिक या पंथाची माहिती घे.” अनघा अजीजीने म्हणाली.
“कपालिक? म्हणजे?” श्रद्धाने आश्चर्याने विचारले.
“अघोर पंथ आहे. करणी, काळी जादू, नरबळी वगैरे करणारा. त्यातून सिद्धी प्राप्त करून घेणारा. स्वार्थ साधणारा.”
“पण तुला काय माहित? इथे काय संबंध याचा?”
“मला कळलं असं समज. मामा, मामी, दिलआंटी आणि विक्रमही सर्व माझ्या बाळाच्या जिवावर उठले आहेत. मला शंका आहे की हे सर्व कपालिकांना मानतात... अगदी विक्रमही. त्याने ही नोकरी, करिअरसाठी काहीतरी चुकीचा मार्ग निवडला आहे.” अनघाला हुंदका आवरला नाही. श्रद्धाला आपण जे ऐकतो आहोत त्यावर विश्वास बसेना. ती चक्रावून गेली. त्यापुढे त्यांचे काही बोलणं होऊ शकलं नाही कारण चहा टाकून मामी पुन्हा हजर झाल्या होत्या.
श्रद्धा घरी जायला निघाली तेव्हा तिला तिचा हातरूमाल सापडत नव्हता. इतका वेळ तो तिच्या हातातच होता पण चहा पिण्यासाठी तिने तो खाली ठेवला आणि त्यानंतर तो मिळत नव्हता. शेवटी शोधूनसुद्धा मिळालाच नाही तसा तिने नाद सोडला आणि ती घरी जायला निघाली.
“अनघा तू काळजी करू नकोस. मी बघते काय करता येईल ते.”
त्या दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास घरातला फोन खणखणला. विक्रमने उचलला आणि अनघाला सांगितलं की श्रद्धाचा फोन आहे. अनघाने खोलीतून झोपल्या झोपल्या कॉर्डलेस उचलला. “अनघा,” श्रद्धाचा आवाज चिंतातुर वाटत होता. “मी तुझ्याकडून निघाले ती तडक माझ्या लायब्ररीत गेले. तिथे काही मिळते का ते पाहिलं नंतर इंटरनेटवर शोधलं. हे बघ तू कपालिकांबद्दल म्हणालीस त्यात तथ्य आहे पण तरीही तुझ्या आजूबाजूची सर्व माणसंच तुझ्याविरुद्ध आहेत हे मला पटत नाहीये गं. मी एक करेन म्हणते, तुला जर तिथे बरं वाटत नसेल तर तू डिलीवरीपर्यंत माझ्याकडे येऊन राहा. पाहिजे तर आपण डॉक्टर बदलू. पुन्हा क्षोत्रींकडे जाऊ. तू इथे माझ्या घरी सुखरूप राहशील.”
अनघाला कुठेतरी दूरवर आशेचा किरण दिसला. ती श्रद्धाकडे जायला एका पायावर तयार होती. दोघींचे थोडे अधिक बोलणे झाले. बोलणं संपायला आलं तशी अनघाला 'खट्ट' असा आवाज ऐकू आला. ती क्षणात समजली की विक्रम बाहेरून त्यांचं बोलणं ऐकत होता. तिने श्रद्धाशी बोलणं आवरतं घेतलं. श्रद्धा दोन दिवसांनी येऊन तिला घेऊन जाणार होती. ती स्वत: विक्रमशीही याबाबत बोलणार होती. अनघानेही बोलून घ्यावं असं त्यांच्यात ठरलं. फोन ठेवल्यावर अनघाने आपल्या पुढे आलेल्या पोटावर हात फिरवला आणि ती पुटपुटली, "मला आणि माझ्या बाळाला इथून सुटका हवी. इथून निघायला..."
विक्रमला समोर उभं बघून तिचे पुढले शब्द घशातच विरले. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. “हा काय मूर्खपणा लावलाय? पुरे झाली ही नाटकं आता अनघा. मी शांतपणे घेतो आहे. तुझे आरोप सहन करतो आहे पण आता तू जगासमोर रडगाणं गायला लागलीस का?”
“नाही विक्रम.” अनघा निर्धाराने म्हणाली. “तू, मामा-मामी, दिल आंटी तुम्ही काहीतरी षडयंत्र रचताय. माझ्या बाळाला तुमच्यापासून धोका आहे. विक्रम तू किती आनंदला होतास रे आपल्याला बाळ होणार आहे हे ऐकून. असा कसा बदललास? तू मला सांग की कसला सौदा केला आहेस तू मामामामींशी आपल्या बाळाच्या बदल्यात? कसली काळी जादू करताय तुम्ही? अर्भकांचे बळी देतात ना काही साध्य करण्यासाठी, काय हवंय तुला? ...” अनघाच्या तोंडातून पुढे शब्द फुटेना. तिने आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकून रडायला सुरूवात केली.
“अनघा, अनु!” विक्रमचा आवाज मवाळ झाला होता. “अगं काय लावलं आहेस हे वेड्यासारखं. तू एवढी शिकली सवरलेली. कसल्या भयंकर शंका येताहेत तुला. आपल्या बाळाला इजा पोहोचवेन का मी?” विक्रमने सुस्कारा सोडला आणि म्हणाला, “या सर्व गोंधळात मी तुला सांगायला विसरलो. आमचे डायरेक्टर आहेत ना, मि. मित्तल. ते कामानिमित्त बंगलोरला होते. त्यांच्या कारला मोठा अपघात झाला आहे. जबर जखमी झाले आहेत ते. वाचतील असं वाटत नाही. आज संध्याकाळी तातडीची मिटींग होती. बहुतेक त्यांच्या गैरहजेरीत आणि कदाचित पुढेही मला डायरेक्टरची पोझिशन सांभाळावी लागेल.”
अनघा बातमीने चकित झाली. विक्रमला फारच लवकर हवं ते साध्य होत होतं. फारच झपाट्याने आणि अनपेक्षितरित्या. तिच्या मनातल्या कुशंकांनी पुन्हा उचल खाल्ली. या सर्व सुखांसाठी, बढतीसाठी विक्रमने काहीतरी सौदा केला होता. बहुतेक बाळाचाच.
पुढले दोन दिवस अनघा, श्रद्धाच्या फोनची वाट बघत होती पण फोन आलाच नाही किंवा तिला त्या औषधांनी इतकी झोप येत असे की फोन आल्याचे कळलेच नाही. शेवटी दोन दिवसांनी मोठ्या आशेने तिने श्रद्धाला फोन लावला. श्रद्धाने फोन उचलला खरा पण तिचा आवाज अतिशय मलूल होता. अनघाने चौकशी केली तेव्हा कळलं की अनघाला भेटून आल्यावर दुसर्‍या दिवशी श्रद्धा घरातून बाहेर जाण्यासाठी पायर्‍या उतरत असताना अचानक तिचा पाय सटकला होता आणि ती गडगडत खाली गेली. पायाला फ्रॅक्चर झालं होतं आणि आता ३ आठवडे तरी पाय प्लास्टरमध्ये राहणार होता. त्यानंतरही पुढले काही आठवडे तिला कुबड्या घेऊन चालणे भाग होते. अशा परिस्थितीत ती अनघाची काळजी घेऊ शकत नव्हती.
अनघा निराश झाली. आता एकच आशा उरली होती ती म्हणजे तिची आई सातव्या महिन्यांत येणार होती ती; पण आता अनघाला भरवसा नव्हता... होणार्‍या गोष्टी आपोआप घडत नसून घडवून आणल्या जात होत्या. तिने त्या साइटवर वाचलं होतं. एखाद्यावर करणी करण्यासाठी त्या माणसाची एखादी वस्तू हस्तगत करावी लागते. मि. मित्तलांचं पुस्तक आणि श्रद्धाचा रूमाल... आणि.. आणि बहुधा अनघाचा कंगवा. ती मनात प्रार्थना करत होती की आई-बाबांना काही न होवो. त्यांची तब्येत बरी राहो, पण नाही, तसे घडायचे नव्हते.
अनघाला आठवा महिना सरत आला होता. एके रात्री घरातला फोन खणखणला. विक्रमचा आवाज फोनवर खूप काळजीत असल्यासारखा वाटत होता. अनघाचं मन शंकेने ग्रस्त झालं. तिला उठवत नव्हतं तरी ती कशीबशी उठली आणि बाहेर गेली. तिच्या पोटात कळा येत होत्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तिने विक्रमला काय झालं ते विचारलं. विक्रमने तिला सोफ्यावर बसवलं आणि फोन तिच्या हातात दिला. आईचा फोन होता. रडत होत्या फोनवर. आनंदरावांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं. परिस्थिती गंभीर होती.
अनघाचे हातपाय कापायला लागले. तिच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता. विक्रम तिला धीर देत होता पण तिने विक्रमचा हात झिडकारून दिला. निलिमाताई विक्रमशी बोलत होत्या. त्यांची अवस्था कठीण झाली होती. आनंदरावांचं पाहायचं झालं तर अनघाकडे दुर्लक्ष होणार होतं. विक्रमने त्यांची समजूत काढली. इथे सर्व होते अनघाची काळजी करायला. तिला काही कमी पडू देणार नव्हते. शेवटी निलिमाताईंनी विक्रमचं म्हणणं मानलं. अनघाचा उरलेला आधारही तुटून पडला होता...
नववा महिना लागला तशी अचानक अनघाच्या पोटातली दुख कमी व्हायला लागली. तिला जेवण जायला लागलं. तरतरीही येऊ लागली. डॉक्टर मखिजांनी सांगितलं की ’ती घरातल्या घरात थोडी उठूफिरू शकते. आता डिलीवरी कधीही झाली तरी प्रश्न नव्हता. सर्व काही ठीक होतं.’ अनघाला आश्चर्य वाटत होतं की सर्व काही ठीक होतं तर मग इतके महिने पोटात का दुखत होतं? पण तिने समजूतीने घ्यायचं ठरवलं होतं.
नववा महिना भरत आला होता. एके दिवशी विक्रम घरात शिरला तो कान धरून. त्याच्या कानावर बँडेज होतं. "काय झालं विक्रम?" अनघाने विचारलं तरी काय झालं असावं याची कल्पना तिला आली होती.
"काही विशेष नाही. खाली पोरं क्रिकेट खेळत होती. मी गाडीतून उतरलो तर कानावरती फाटकन बॉल लागला. डॉक्टरकडे जाऊन बॅंडेज करून आलो." विक्रम उत्तरला.
'खोटं.' विक्रम खोटं बोलतो आहे हे अनघाला कळून चुकलं होतं. तिने वाद घालायचा नाही, शांत राहायचं ठरवलं आणि ती उठून बेडरूममध्ये निघून आली.
अनघा भीतीने थरथरत होती. तिच्या सर्वांगावर काटा फुलला होता. “को..कोण... का..का..काय पाहिजे?” तिने उसनं अवसान आणून विचारलं.
दुसर्‍या दिवशी सकाळी विक्रम ऑफिसला गेल्यावर अनघा आंघोळीसाठी बाथरूममध्ये शिरली, तिने दरवाजाची कडी लावली आणि ती मागे वळली. बाथरूममध्ये कोणीतरी होतं. एक अस्फुट किंचाळी तिच्या तोंडून निघाली. शॉवरखाली सोनिया उभी होती.
"इथून जा अनघा. इथून निघून जा. ते बाळ यांना देऊ नकोस. ते बाळ तिला देऊ नकोस." सोनिया मान खाली घालून म्हणाली आणि रडायला लागली. तिचं ते भेसूर रडणं अनघाला ऐकवेना. डोकं गच्च धरून ती मटकन तिथेच खाली बसली. थोड्यावेळाने भानावर आल्यावर तिच्या लक्षात आलं की बाथरूममध्ये तिच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. ती भिंतीच्या आधाराने सावकाश उठली आणि तशीच बाहेर आली. एका लहान बॅगेत तिने हाताला येतील ते कपडे भरले, थोडे पैसे घेतले, मोबाईल उचलला आणि ती तडक घराबाहेर पडली.
घराबाहेर पडल्यावर तिने श्रद्धाला फोन केला पण तिच्या दुर्दैवाने फोन लागत नव्हता. सारखा वॉइसमेलवर जात होता. तिने मुख्य रस्त्यावरून टॅक्सी केली तेव्हा तिच्या लक्षात आलं की समोर ढेंगभर अंतरावर ती सुती साडीतली, वृद्ध बाई उभी होती. अनघाकडे पाहून ती स्मितहास्य करत होती. अनघाला शहारून आलं.
“आई गं!” टॅक्सीत बसत असतानाच अनघाच्या पोटात कळ आली. पूर्वीच्या कळांपेक्षा ही कळ तिला वेगळी वाटली. तिने टॅक्सीवाल्याला डॉ. क्षोत्रींच्या क्लिनिकचा पत्ता दिला. ती डॉक्टरच्या क्लिनिकपाशी उतरली तेव्हा सकाळचे ११ वाजून गेले होते. डॉ. क्षोत्री क्लिनिकमध्येच होत्या. बाहेर रिसेप्शनिस्टला अनघाने आपली अवस्था सांगितली तशी तिला चटकन आत घेतलं गेलं. डॉ. क्षोत्री तिला बघून चकित झाल्या होत्या.
“आज इतक्या महिन्यांनी? तुम्ही येणंचं बंद केलंत आणि आज अचानक?” डॉ. क्षोत्री आश्चर्याने म्हणाल्या तसा अनघाच्या भावनांचा बांध फुटला. ती हमसून हमसून रडायला लागली आणि तिने घडलेल्या सर्व घटनांची जंत्री डॉ. क्षोत्रींना दिली. तिला ते बायांचं दिसणं, कपालिक, परांजपे मामींचा तो रस, मित्तल, श्रद्धा, बाबांचे अचानक झालेले अपघात आणि आजारपणं, तिचं ते सतत पोटात दुखणं, परांजप्यांवर आणि विक्रमवर असणारा तिचा संशय तिने काहीही आडपडदा न ठेवता सर्व सांगून टाकलं.
“मी वेडी नाहीये डॉक्टर. यू मस्ट ट्रस्ट मी. हे सर्व मी अनुभवलं आहे. मला त्या लोकांनी बंदिस्त केलं होतं इतके महिने. हेल्प मी डॉक्टर, हेल्प मी... प्लीज! ते माझ्या बाळाला मारणार आहेत. त्याचा बळी देणार आहेत.” अनघा ओक्साबोक्शी रडू लागली तसं डॉ. क्षोत्रींनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्या नजरेतली करूणा पाहून अनघाला थोडा धीर आला.
“डोन्ट वरी. यू आर इन सेफ हॅंड्स नाउ. रडू नकोस. ते बरं नाही तुझ्यासाठी. रिलॅक्स. तुला कसलीही भीती नाही. ये. इथे आतल्या खोलीत येऊन स्वस्थ पडून राहा. मी पुढली तयारी करते.” डॉ. क्षोत्रींच्या हळूवार आवाजाने अनघाला हायसं वाटलं. डॉक्टरांनी तिला आतल्या खोलीत नेऊन झोपवलं आणि तपासायला सुरुवात केली.
“डॉक्टर तुम्ही श्रद्धाला फोन कराल? मी नंबर देते. मी करत होते पण लागत नव्हता. प्लीज, तिला बोलवा.” अनघा काकुळतीला येऊन म्हणाली.
“बरं, द्या नंबर, पण आता काळजी करायची नाही. आराम करा. तुमचे दिवस भरले आहेत. थोड्यावेळात कळांची फ्रिक्वेन्सी वाढेल, तोपर्यंत टेक रेस्ट.” डॉ. हसून म्हणाल्या आणि खोलीबाहेर गेल्या. आज इतक्या दिवसांत अनघाला पहिल्यांदाच सुरक्षित वाटत होतं. पोटात एक हलकीशी कळ आली पण तिला त्याचं काही वाटलं नाही. तिने डोळे बंद केले.
दरवाजा खाडकन उघडला तसे अनघाने डोळे उघडले. दारात विक्रम, डॉ. मखिजा आणि परांजपे मामा उभे होते. डॉ. मखिजा, डॉ. क्षोत्रींचे आभार मानत होते. “शी इज अंडर ट्रेमेन्डन्स स्ट्रेस. आय होप यू अंडरस्टॅंड.”
“हो. तिच्या बोलण्यावरून मला कल्पना आलीच की तिला प्रेग्नन्सी डिप्रेशन आलं आहे. तुमचा नंबर माझ्याकडे होताच म्हणून तुम्हाला इथे बोलावून घेता आलं. तिची काळजी घेण्याची गरज आहे.” डॉ. क्षोत्री चिंतेने विक्रमकडे म्हणाल्या.
“खरंय डॉक्टर. माझाच हलगर्जीपणा झाला. मी तिच्याकडे यापेक्षा जास्त लक्ष द्यायला हवं होतं पण आता देईन. चल अनघा, येतेस ना” विक्रम म्हणाला. अनघाने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या कानावरचं बँडेज निघालं होतं आणि कापलेल्या पाळीची ताजी खूण उठून दिसत होती.
“प्लीज डॉक्टर. मला नाही जायचं. हे लोक माझ्या बाळाला मारणार आहेत. सौदा केलाय या माणसाने पोटच्या पोराचा. प्लीज... हेल्प मी!” अनघा रडत होती पण कोणावर फारसा परिणाम नाही झाला. परांजपेमामा आणि विक्रमने तिला उठवून उभं केलं आणि क्लिनिकबाहेर नेऊन गाडीत बसवलं.
“तुझी हिम्मत कशी झाली अनघा हे असले चाळे करायची?” गाडीत बसल्यावर विक्रम डाफरला.
“पुरे! टेक इट इझी मि. विक्रम” डॉक्टर मखिजा म्हणाले, “आता काहीच तासांचा अवकाश आहे. तिच्या कळा सुरू झाल्या आहेत. मी डॉ. क्षोत्रींबरोबर कन्फर्मही केलं आहे.”
“माझ्या बाळाला मारू नका. प्लीज! इतके कसे क्रूर होऊ शकता तुम्ही सगळे?” अनघा हताश आवाजात म्हणाली.
“अनघा,” परांजपेमामांनी तोंड उघडलं, “कोण मारतंय तुझ्या बाळाला? आम्ही सर्व इतके महिने तुझी काळजी घेतो आहोत. तुला हवं, नको ते बघतोय ते या बाळाला मारायला का? शांत हो बरं!”
विक्रमने गाडी सरळ घरी नेली. घरात मामी आणि दिलआंटी हजर होत्याच. आपली डिलिवरी इथेच होणार हे अनघा समजून चुकली होती. या सर्वांच्या तावडीतून सुटायला आता कोणताच मार्ग शिल्लक नव्हता. अनघाच्या डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखे झाले आणि नंतर काय घडते आहे त्याची शुद्ध तिला राहिली नाही....

सौदा - भाग ५

अनघाने डोळे उघडले तेव्हा क्षणभर आपण कुठे आहोत याची जाणीव तिला होईना. क्षण दोन क्षणांनी आपण आपल्याच बेडरूममध्ये असल्याचं तिला जाणवलं. समोर दिलआंटी बसून सटासट स्वेटर विणत होत्या. अनघाकडे त्यांचं लक्षही नव्हतं. हळूहळू अनघाला मागल्या प्रसंगांची आठवण होऊ लागली तशी तिचा हात आपसूक पोटाकडे गेला. पोटाचा वाढलेला घेर तिला जाणवला नाही.
“माझं बाळ...” अशक्तपणामुळे तिच्या तोंडातून आवाज फुटत नसला तरी दिलआंटींच्या डोळ्यांनी हालचाल टिपली होती.
“अरे डिकरी.. तू जागी झालीश... थांब मी सर्वांना बोलावते.” दिलआंटी पटकन उठून उभ्या राहिल्या.
“माझं बाळ..” अनघा पुन्हा पुटपुटली पण तोपर्यंत दिलआंटी खोलीच्या बाहेर पडल्या होत्या.
दिलआंटी, परांजपे मामा-मामी आणि विक्रम लगबगीने बेडरूममध्ये आले तेव्हा अनघा उठून बसायचा प्रयत्न करत होती. “हं, हं झोपून राहा. अद्याप अशक्तपणा आहे.” विक्रम पुढे होत म्हणाला.
“माझं बाळ कुठे आहे मामी?” अनघाने विक्रमचा हात झिडकारला.
“अनघा, मी काय सांगते ते ऐक. तुझं बाळ गेलं. जन्मत:च मृतावस्थेत होतं. डॉक्टरांनी कसलीही कसर ठेवली नव्हती पण तुझ्या नशिबात बाळ नव्हतं.” मामींचा आवाज कोरडा होता.
अनघाला ते ऐकून धक्का बसला तरीही धीर करून ती म्हणाली,“खोटं! बाळाची तब्येत उत्तम होती. तुम्ही मारलंत त्याला. बळी घेतलात माझ्या बाळाचा. शी:! त्या अर्भकाची दया नाही आली का तुम्हाला कोणाला? क्रूर... क्रूर आहात तुम्ही आणि विक्रम तू... किळस वाटते मला तुझी.”
“अनु, अगं हा वेडेपणा प्लीज पुरे कर. आम्ही कोणीही बाळाला काहीही केलेलं नाही. त्याचं नशीब. तेवढंच आयुष्य होतं त्याचं.” विक्रम म्हणाला पण त्याने अनघाची नजर चुकवली.
“खोटं, खोटं. तू मारलंस बाळाला. हव्यासापायी. नोकरी, प्रमोशन, पगार, तुझं करिअर हेच हवं होतं ना. त्यापायी तू मित्तलांना वाटेतून काढलंस. श्रद्धा मला मदत करत्ये म्हटल्यावर तिला दूर केलंत. बाबांची तब्येत बिघडली. सर्व प्लॅन्ड होतं. स्वार्थी! स्वार्थी आहेस तू.” अनघा रडत म्हणाली.
“अनघा, शांत हो.” मामांनी आवाज वाढवून सांगितलं. “तुझं बाळ गेलं यात कोणी काहीही केलेलं नाही. कोणाचाही दोष नाही. तुम्ही दोघे तरुण आहात. आणखी मुलं होतील तुम्हाला. हा काही जगाचा अंत नव्हे. सावर स्वत:ला. आराम कर.”
“अनु, मामा योग्य ते सांगाताहेत. अगं, आपण आणखी २ मुलं जन्माला घालू.” विक्रम अनघाला म्हणाला.
“नाही... कधीच नाही. मला तुझं तोंडही बघायचं नाही विक्रम. तू सौदा केलास. आपल्या बाळाचा. आपल्या पोटच्या गोळ्याचा.” अनघाने तोंड ओंजळीत खुपसलं आणि ती रडायला लागली.
“ठीक! अनघा, तू बरी हो. मी तुला दिल्लीचं तिकिट काढून देतो. आईबाबांना भेटून ये. तुला आणि त्यांनाही बरं वाटेल पण त्यासाठी आधी चालण्याफिरण्याची शक्ती मिळव.” विक्रम शांतपणे म्हणाला.
पुढले ४-५ दिवस अनघा झोपूनच होती. मामी कर्तव्य म्हणून जेवण करून देत होत्या पण त्या आणि दिलआंटी पहिल्यासारखं अनघाचा ताबा घेतल्यागत वागत नव्हत्या. बहुधा, त्यांच्या दृष्टीने अनघाची गरज संपली होती. आता डोकावल्याच तर जेवणाचा डबा देण्या-नेण्यापुरत्या. विक्रमही ऑफिसला जाऊ लागला होता. अनघात आणि त्याच्यातले संबंध तुटल्यासारखे झाले होते. बोलणं जवळपास खुंटलंच होतं. आठवड्याभरात अनघा घरातल्या घरात हिंडूफिरू लागली होती. थोडंफार कामही करू लागली होती. तिचं मन अद्याप सावरलं नसलं तरी अजून आठवडाभराने इथून निघून जायचा बेत तिने नक्की केला होता.
तिच्या बाळाला जाऊन १०-११ दिवस होत आले होते. विक्रम ऑफिसच्या कामानिमित्त दोन दिवस बंगलोरला गेला होता. त्या दिवशी सकाळी दूधवाल्याने बेल वाजवली तशी दुधाची पिशवी आणायला अनघा बाहेर गेली. पिशवी उचलताना एक आगळा आवाज तिच्या कानावर पडला... मजल्यावर कुणीतरी तान्हं बाळ रडत होतं.
अनघा मनातल्या मनात चरकली. ’हे भास थांबायला हवेत. हे रडणं नाही ऐकू शकत मी.’ तिने घाईघाईत आत येऊन दरवाजा लावून घेतला आणि ती पुन्हा येऊन पलंगावर पडली पण तिच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळू लागला होता. तिचे कान पुढला पूर्ण दिवस त्या रडण्याची चाहूल घेत होते. विचारांनी डोकं शिणून गेलं होतं, “माझं बाळ जिवंत आहे. या लोकांनी त्याला अद्याप जिवंत ठेवलं आहे. एखाद्या मुहूर्तावर ते त्याचा बळी... शी शी... मला बाळाला वाचवायला हवं. या सर्वांच्या तावडीतून सोडवायला हवं.” तिने एकदोनदा दरवाजा उघडून कानोसा घेतला पण तिला दिवसभरात कसलाही आवाज ऐकू आला नाही. कदाचित भास असावा...
त्या रात्री विक्रम बंगलोरहून परतला तेव्हा त्या दोघांमध्ये संभाषणही झालं नाही. दुसर्‍या दिवशी मजल्यावर वर्दळ असल्याचं तिला जाणवत होतं. बहुधा परांजप्यांकडे माणसं येत होती. काहीतरी कार्यक्रम असावा पण मग मला कसं नाही कळवलं? अनघाचं मन पुन्हा शंकाग्रस्त झालं. ’आज माझ्या बाळाचं काहीतरी...’ ती दिवसभर दरवाजापाशीच घुटमळत होती. सकाळी एकदा तिला रडण्याचा अस्पष्ट आवाज ऐकू आला पण भास की सत्य हे तिला ठरवता येत नव्हतं.
दुपारचे तीन वाजले असावे. अनघा दारापाशीच कान लावून उभी होती. शेवटी तिने मनाचा हिय्या करून परांजप्यांची बेल वाजवली. दरवाजा दिलआंटींनी उघडला. “तू इकडे काय करते अनघा?” अनघाने उत्तर न देता दिलआंटींना बाजूला सारलं आणि ती तडक आत घुसली. आत अनोळखी वीस-पंचवीस माणसं होती त्यात डॉक्टर मखिजा होते. विक्रमही होता. तो तिथे असल्याचं तिला आश्चर्य वाटलं नाही पण सर्वात आश्चर्याची गोष्ट होती ती म्हणजे तिथे ती तिला सतत दिसणारी वृद्ध बाईही हजर होती. फरक एवढाच होता की आज ती अनघसोबत इतरांनाही दिसत होती. खोलीच्या कोपर्‍यात जमिनीवर पद्मासन घालून ती बसली होती आणि तिच्या बाजूला पाळणा होता.... बाळाचा पाळणा! अनघाच्या बाळाचा पाळणा.
अनघाला पाहून खोलीत कुजबूज सुरू झाली. “अनघा, तू परत जा. तुझं इथे काही काम नाही.” परांजपेमामा अनघाचा रस्ता अडवून म्हणाले.
“बाजूला व्हा. तुम्ही माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करून इथे ठेवलं आहे. मी त्याचं रडणं ऐकलं आहे. मला माझ्या बाळाला भेटू द्या.” अनघा रागाने म्हणाली पण परांजपेमामा तसूभर हटले नाहीत.
“परांजपे, रस्ता सोडा तिचा. आई आहे ती बाळाची. ये अनघा, बघ बाळाला. जवळ घे त्याला. त्यालाही आईची गरज आहे.” ती वृद्ध बाई धीरगंभीर आवाजात म्हणाली. “ये. घाबरू नकोस. आता सर्व कसं व्यवस्थित झालं आहे.”
सर्व काही इतकं सरळ आणि सोपं असेल असं अनघाला वाटलं नव्हतं. ती थोडी पुढे सरली तशी परांजपेमामा तिच्या वाटेतून बाजूला झाले. “तुम्ही माझ्या बाळाचं काय करणार आहात? प्लीज त्याला मारू नका. त्या जिवाने अजून डोळेही उघडले नसतील. मला माझं बाळ परत द्या. आम्हाला इथून जाऊ द्या.” अनघाने रडवेल्या आवाजात विनंती केली.
“अनघा, तुला कोणी सांगितलं आम्ही बाळाला मारणार म्हणून? किती दिवस झाले, एकच धोशा लावला आहे. पुरे झालं. आज आनंदाचा सोहळा आहे. उज्जैनहून खास महायोगिनी भानुमती येथे आल्या आहेत.” मामी अनघाला म्हणाल्या.
“तिला येऊ द्या पुढे. ये अनघा,” महायोगिनींचा धीर गंभीर आवाज पुन्हा घुमला. अनघा पुढे झाली. “बस! बाळ तुझंच आहे आणि स्वस्थ आहे, सुदृढ आहे पण त्याला बघायच्या आधी तुझ्याशी काही बोलायचं आहे. बस इथे अशी.” साधारण दिसणार्‍या त्या बाईच्या आवाजात विलक्षण जादू होती. अनघा आणखी थोडी पुढे सरकली आणि खाली बसली.
“शिवस्वरूप भैरव जन्माला येणार हे सत्य गेली ४ वर्षे आम्ही जाणून आहोत. महायोगी कलकनाथांच्या निर्वाणाआधीच साक्षात भैरव जन्माला येईल हे वक्तव्य त्यांनी केलं होतं.” महायोगिनी थांबून अनघाकडे पाहत म्हणाल्या. त्या काय बोलताहेत त्याचा बोध अनघाला होत नव्हता. तिला काही समजून घ्यायचंही नव्हतं. तिला फक्त तिचं बाळ हवं होतं. मेंदू बधीर झाला होता. राहून राहून तिचं लक्ष पाळण्याकडे जात होतं.
“त्यांचा जन्म पुन्हा या पृथ्वीवर व्हावा या साठी एका पुरूष आणि एका खास स्त्रीचा समागम होणे आवश्यक होते. तो होताना तंत्रविद्येचे प्रयोगही त्यांच्यावर होणे आवश्यक होते. जिच्या पोटी हा गर्भ राहिल ती स्त्री वैशाख अमावास्येच्या दिवशी जन्मलेली हवी. तिच्या गर्भाची देखरेख आम्ही जातीने करणार होतो. बदल्यात त्या जोडप्याचा उत्कर्ष आम्ही कबूल केला होता. परांजप्यांची जुनी शेजारीणही वैशाख अमावास्येची. ती स्वखुशीने तयार झाली... आयुष्यात मोठा पल्ला गाठायचा होता तिला...पण आयत्या वेळेला तिने पड खाल्ली. तिला मूल नको झालं आणि आम्हाला ती...” सोनियाचं काय झालं असावं याचा अंदाज अनघाला आता येत होता. ती गप्प राहून ऐकून घेत होती.
“विक्रमच्या रूपाने आम्हाला हवा तसा भक्त भेटला.” महायोगिनींनी मंद हास्य करून विक्रमकडे पाहिलं तशी त्याने मान झुकवली. “तुझाही जन्मही वैशाख अमावास्येचा. सर्व गोष्टी जुळून आल्या. गर्भधारणेसोबत विक्रमला आयुष्यात हवं ते मिळत गेलं आणि आता पुढेही मिळत राहिल. पैसा, हुद्दा सर्व काही येत राहिल. फक्त या अर्भकावर हक्क आमचा. साक्षात भैरव परत आला आहे.” शेवटचं वाक्य महायोगिनी ठसवून म्हणाल्या तशा जमलेल्या लोकांनी “जय भैरवनाथ”चा घोष केला.
“मी तुझ्या गर्भारपणात सतत तुझ्यासोबत वावरत होते. तू आणि बाळ दोघे आम्हाला महत्त्वाचे. त्याची काळजी घ्यायला मी सतत तुझ्या सोबतीला होते. आम्ही तुझे कायम ऋणी राहू, अनघा. साक्षात भैरवनाथ परत आला आहे. भैरव स्मशानात राहतो. रात्री बाहेर पडतो. नरमुंड बाळगतो. नग्नावस्थेत मानवी रक्षा शरीराला फासून अंधारात मार्गक्रमण करतो. सर्व सिद्धिंचा पालक, तंत्रविद्येचा अधिकारी... जय भैरवनाथ!” महायोगिनी एका तालात, आपल्याच धुंदीत बोलत होत्या.
“तुम्ही माझ्या बाळाचं काय केलंत? मला माझ्या बाळाला बघायचं आहे.” अनघाने मनाचा हिय्या करून तोंड उघडलं.
“ते बाळ तुझं नाही. ते बाळ आता आमचं आहे. आम्हा सर्वांचं... आम्हा कपालिकांचं पण तू आई आहेस त्याची. तू त्याची क्षुधापूर्ती करू शकतेस. त्याला दूध पाजून तृप्त करू शकतेस. आमच्या मार्गावर आमच्या सोबत चालू शकतेस. विक्रमही आमच्यासोबत आहे. तूही ये. हे बाळही आहे.” महायोगिनी गंभीर परंतु आर्जवी स्वरात म्हणाल्या. त्यांच्या बोलण्यात दुसर्‍याला भुरळ घालण्याचा गोडवा होता.
अनघा गोंधळून गेली. तिच्या खांद्यावर कुणाचातरी हात पडला तशी तिने नजर वर करून पाहिलं. विक्रम होता.
“अनु, महायोगिनी बरोबर सांगत आहेत. आपल्या आयुष्यात झालेले चांगले बदल तू पाहिले आहेस. हे बाळ त्यांचं आहे. मी कबूल केलं होतं की पहिलं मूल तुम्हाला देईन... पण तूही आमच्या सोबत ये. आम्हाला साथ दे. बाळाला आपलंसं कर.”
अनघाच्या अंगावर शहारा आला पण तिने मान खाली घालून निमूटपणे हलवली. “मला बाळाला बघायचं आहे. ते सुखरूप आहे ना, विक्रम?”
“तूच बघ अनघा. ते कसंही असलं तरी तुझं बाळ आहे आणि आम्हा सर्वांना प्रिय आहे.” विक्रम म्हणाला.
अनघा पाळण्याच्या दिशेने पुढे सरकली. 'कसं असेल बाळ? काळं, कुरुप, नाकी-डोळी बटबटीत? कसंही असलं तरी माझं बाळ आहे. माझ्या पोटचा गोळा. मी आई आहे त्याची. नऊ महिने पोटात वाढवलं आहे. मला साथ द्यायला हवी. माझ्या बाळासाठी. कोणजाणे कदाचित मी त्याला या सर्वांपासून दूर घेऊन जाण्यात यशस्वीही होईन.' पाळण्याजवळ जाणार्‍या प्रत्येक पावलासरशी अनघाचा विरोध गळून पडत होता.
ती धडधडत्या हृदयाने पाळण्यात डोकावली. कपड्यात गुंडाळलेलं तिचं बाळ पाळण्यात स्वस्थ झोपलं होतं. गोरं, डोक्यावर काळंभोर जावळ, लालचुटुक ओठ. इतर १०-१२ दिवसांच्या कोवळ्या अर्भकांसारखंच दिसत होतं. बाळाला बघून अनघाचा उर भरून आला होता, ते सर्वसाधारण बाळ आहे हे पाहून तिने सुटकेचा निश्वास टाकला आणि ती झरकन पुढे सरकली. पाळण्यातल्या निर्धास्त झोपलेल्या जिवाला तिने थरथरता हात लावला. बाळाचा पहिला स्पर्श. त्याची उब तिच्या हातांना जाणवत होती. तिचे डोळे भरून आले. थरथरत्या हातांनीच तिने बाळाच्या सर्वांगावरून हात फिरवायला सुरुवात केली.
तिच्या हाताचा स्पर्श झाला तशी बाळाची झोप चाळवली. कपड्यातल्या त्या इवल्याशा बोचक्याने हालचाल करून आपली झोपमोड झाल्याचे दाखवले आणि हाताला झटका लागल्यागत अनघा मागे झाली. बाळाने झोपेतून डोळे उघडले होते पण... पण तिथे डोळे नव्हतेच. होते ते फक्त रिकाम्या खोबणींत चमकणारे लाल ठिपके. ते ठिपके अनघाकडे रोखून बघत होते. १२ दिवसांच्या त्या अर्भकाने जांभई दिली आणि अनघाला त्याच्या बोळक्यात बत्तीस दातांचं दर्शन झालं.
"अरे देवा! हे काय केलंत तुम्ही माझ्या बाळाचं?" अनघाला आपल्या पायांतलं त्राण जातं आहे याची जाणीव होत होती. ते घर, ती माणसं, पाळणा सर्व आपल्या भोवती गरगर फिरतं आहे असं अनघाला वाटू लागलं आणि ती धाडकन तिथेच कोसळली.
कोणीतरी तिच्या तोंडावर पाणी मारत होतं. तिने डोळे उघडले तेव्हा विक्रम आणि परांजपे मामी तिला उठवत होत्या. “इट्स ओके अनघा. डोळे उघड. सावर स्वत:ला” विक्रम तिला सांगत होता पण तिच्या कानावर शब्द आपटून मागे फिरत होते. क्षणभराने तिने स्वत:ला सावरलं आणि ती निग्रहाने उठून उभी राहिली.
“मी उचलून घेऊ बाळाला? त्याला छातीशी धरायचं आहे.” ती शांत आवाजात म्हणाली.
“जय भैरवनाथ! जय भैरवनाथ! जय भैरवनाथ!” उपस्थितांनी संतोषाने एकच जयघोष केला.

'पांचट पणा'

सर : एक आंब्याच्या झाडावर १० केळि लागलेले आहेत, आणि त्यामधून ७ डाळिँब तोडुन टाकले तर
किती द्राक्षे शिल्लक राहतिल
?
.
.
बंड्या : सर ९ हत्ती
.
.
सर : शाब्बास बंड्या तुला कसे माहित ?????
.
.
बंड्या : सर मी दुपारच्या जेवनामध्ये गोबीची भाजी आणली....
.
.
तात्पर्य : दररोज ब्रश करत जा नाहितर पेट्रोल महाग होईल

भंगार

एखादीदोघीजणी साठीतल्या
पार्लरमधे गेल्या
दोन तासांनी बाहेर
तरुण बनून आल्या

पहिली:

मी इतकी नटते सवरते
पण ’हे’ भारीच रुक्ष
’तो’ पहा, एकटक बघतोय
जसा तो शिकारी अन मी भक्ष्य

दुसरी:

पुरे, नकली सौंदर्याने
मिळणार नाही मोक्ष
तो आहे कबाडी, त्याचं
जुन्या भंगाराकडेच लक्ष


कवी - निशिकांत देशपांडे