प्रेमयोग

प्रेम कुणावरं करावं?....कुणावरही करावं
राधेच्या वत्सल स्तनावर करावं
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं
भीष्मद्रोणाच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं
दुर्योधन कर्णाच्या अभिमानी,अपराजित मरणांवर करावं
प्रेम कुणावरही करावं.....
सुदामा नावाच्या भटजीवर करावं
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं
बासरीतुन पाझरनार्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं
यमुनेचा डोह जहरुन टाकणार्या कालियाच्या फण्यावर करावं
प्रेम कुणावरही करावं
रुक्मीनिच्या लालस ऒठावरं करावं
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं
मोराच्या पिसार्यातील अद्भुत लावण्यावर करावं
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं
आणी
खङगाच्या पात्यावर कराव
प्रेम कुणावरही करावं
प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं
पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं
यशोदेच्या दुधावर....देवकीच्या आसवांवर करावं
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नागराच्या फाळावर करावं
कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावरं करावं
ज्याला तारायचं...त्याच्यावर तर करावंच ,
पण ज्याला मारायचं,त्याच्यावरही करावं
प्रेम कुणावरही करावं
प्रेम योगावर कराव..प्रेम भोगावर करावं
आणी त्याहुन अधिक त्यागावर करावं
प्रेम चारी पुरुषा्रथाची झींग देणा्रया जीवनाच्या द्रवावर करावं
आणी पारध्याच्या बाणांनी घायाळ होवुन
अरण्यात एकाकी पडणार्या स्वताच्या शवांवरही करावं
प्रेम कुणावरही करावं कारण,
प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणी...
भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा ऎकमेव..............


कवी - कुसुमाग्रज
देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ऋण । आहे ते कां नेदिसी अझून ।

अवगलासी झोडपणें । परि मी जाण जीवें जिरों नेदी ॥१॥

कळों येईल रोकडें । उभा करीन संतांपुढें ।

तुझें काय एवढें भय आपुलें मागतां ॥२॥

आजीवरी होतों नेणता । तों तुज फावलें रे अनंता ।

कवडीचा तों आतां । पडों नेदीन फेर ॥३॥

ठेविला ये जीवनीं जीव । म्हणे तुकयाचा बांधव ।

माझा गळा तुझा पाव । एके ठायी बांधेन ॥४॥


- संत कान्होबा महाराज
भवजळ काया पंचतत्त्वमाया । भजन उभया पंढरीरावो ॥ १ ॥

तारक पंढरी प्रत्यक्ष भीमातीरीं । ब्रीदें चराचरीं बोले वेदु ॥ २ ॥

माया मोहजाळ ममता निखळ । सेवितां सकळ होय हरी ॥ ३ ॥

निवृत्तीचें फळ सकळ हा गोपाळ । तोडी मायाजाळ संकीर्तने ॥ ४ ॥


- संत निवृत्तीनाथ
चोखा चोखट निर्मळ । तया अंगी नाही मळ ॥१॥

चोखा सुखाचा सागर । चोखा भक्तिचा आगर ॥२॥

चोखा प्रेमाची माउली । चोखा कृपेची साउली ॥३॥

चोखा मनाचें मोहन । वंका घाली लोटांगण ॥४॥


- संत वंका/ संत बंका
सर्व हा गोपाळ भरियेला.
काढले कुटाळ वासना वरळ ।
सर्व हा गोपाळ भरियेला ।।१।।

गेले पै परते शरीर दिसे ।
नाशिवंत भूते दूरी केली ।।२।।

स्थावर जंगम स्थावरिला राम ।
सर्वगत शाम नि:संदेहे ।।३।।

सोपान निवटे परब्रह्म घोटे ।
प्रपंच सपाट निवाटियेला ।।४।।


- संत सोपानदेव

वासुदेव

टळोनि गेले प्रहर तीन । काय निजतां झांकोन लोचन ।
आलों मागावया दान । नका विन्मुख होऊं जाण गा ॥ १ ॥

रामकृष्ण वासुदेवा । जाणवितों सकल जिवा ।
द्या मज दान वासुदेवा । मागुता फेरा नाहीं या गांवा गा ॥ २ ॥

आलों दुरुनी सायास । द्याल दान मागायास ।
नका करूं माझी निरास । धर्मसार फळ संसारास गा ॥ ३ ॥

एक भाव देवाकारणें । फारसें नलगे देणें घेणें ।
करा एकचित्त रिघा शरण । हेंचि मागणें तुम्हांकारणें गा ॥ ४ ॥

नका पाहूं काळ वेळां । दान देई वासुदेवा ।
व्हां सावध झोपेला । सेना न्हावी चरणीं लागला गा ॥ ५ ॥




- संत सेनान्हावी
संपवून कामधाम यावें तुझियाजवळ

पापणीशीं झेपलेंलें जरा सारावें जावळ

आवराया बाळचाळे कवळावें दोही हातीं

रागारागावत गाल कुस्करावे भुक्या ओठीं

घ्यावें बळेंच कुशींत गात अंगाई लाडकी

काऊ चिऊंची धाडावी हट्टी झोपेला पालखी !

गंध पाकळींत रात सांजावल्या क्षितिजांत

तशी यावी नीज डोळां रेशमाच्या पावलांत

जड मिटतां पापणी घ्यावें ओढून उबेंत

मायकुशीला लाभावें शिंपपण भाग्यवंत !