आनंदलोक

माझ्या आनंदलोकात
चंद्र मावळत नाही
दर्या अथांग प्रेमाचा
कधी वादळत नाही

माझ्या आनंदलोकात
केले वसंताने घर
आंब्या-आंब्याच्या फांदीला
फुटे कोकिळेचा स्वर

सात रंगांची मैफल
वाहे येथे हवेतून
येथे मरणही नाचे
मोरपिसारा होऊन.


कवी - कुसुमाग्रज

कोकिळा

कोकिळा जेव्हा सुरांचा
फ़ुलविते पंखा निळा
आम्र लेउनी पंख तेव्हा
होउ बघतो कोकिळा

कोकिळा जेव्हा स्वरांची
उघडिते अबदागिरी
जंगले शाहीर होती
शब्द होते मंजिरी

कोकिळा जेव्हा स्वरांची
काश्मिरे करते उभी
हो नदीची नृत्यशाला
रुमझुमे वारा नभी

कोकिळा जेव्हा स्वरांची
माळते सुमनावली
तेधवा वणवा म्हणे मी
चंदनाची सावली

कोकिळा घाली स्वरांचा
मोरपंखी फ़ुल्वरा
जांभळ्या डोही झपूर्झा
खेळती त्या आसरा

कोकिळा जेव्हा ढगांना
आर्ततेने बाहते
धूसरावर स्वप्न त्यांच्या
एक सुंदर वाहते

कोकिळा जेव्हा सुरांचे
गेंद गगनी फ़ेकते
अंचलावर पैठणीच्या
रात्र अत्तर ओतते

कोकिळा स्वरशिल्प असले
बांधता शून्यावरी
आसमंते होत सारी
क्षुब्ध आणिक बावरी

कोकिळा शिशिरात शिरुनी
बर्फ़ जेव्हा होतसे
या जगाला सर्व तेव्हा
जाग थोडी येतसे


कवी - कुसुमाग्रज

एकाकी

’तुझा’ आणि ’तुझ्यासाठी’
शब्द सारे खोटे,
खरी फ़क्त क्वचित कधी
बिलगणारी बोटे
बिलगणारी बोटे तीही
बिलगून सुद्धा दूर
खोल खोल भुयारात
कण्हणारे सूर.
दूरदूरच्या ओसाडीत
भटकणारे पाय
त्वचेमागील एकाकीपण
कधी सरते काय?


कवियत्री - शांता शेळके

पालखीचे भोई

पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई
पालखीत कोण? आम्हां पुसायाचे नाही!

घराण्याची रीत जुनी पीढीजात धंदा
पोटाबरोबर जगी जन्मा आला खांदा
खांद्याकडे बघूनीच सोयरीक होई ॥

काटंकुटं किडकाची लागे कधी वाट
कधी उतरण, कधी चढणीचा घाट
तरी पाय चालतात, कुरकुर नाही ॥

वाहणारा आला तेव्हा बसणारा आला
मागणारा आला तेव्हा देणाराही आला
देणाऱ्याचं ओझं काय न्यावयाचं नाही? ॥

बायलीचा पडे कधी खांद्यावरती हातं
कडे घेतलेलं पोर तिथं झोपी जातं
पालखीचा दांडा मग लई जड होई ॥


कवि - शंकर वैद्य
कवितासंग्रह - दर्शन

ती माणसेच होती..!

ती माणसेच होती..!
देहाविना जळाली..ती माणसेच होती..
पुन्हा फुलून आली..ती माणसेच होती..!!

गोळी समोर छाती देण्यात अर्थ नाही --'
...हे सांगुनी पळाली..ती माणसेच होती..!!

फासावरी खुन्यांना देवू नका परन्तू--
ज्यांची शिकार झाली..ती माणसेच होती..!!

माझा तुझ्या लढ्याशी संबंध काय येतो ?
...ऐसे मला म्हणाली..ती माणसेच होती..!!

चवचाल उंदरांना साऱ्या बिळात जागा..
जी पोरकी निघाली..ती माणसेच होती..!!

घनदाट पावसाचे केले तुफान वादे..
..अन कोरडी निघाली..ती माणसेच होती..!!

आता कुणाकुणाचे मांडू हिशेब बोला..?
जी आरशास भ्याली..ती माणसेच होती..!!
                                             

कवी - ज्ञानेश वाकुडकर

हा असा पाउस पडत असताना

हा असा पाउस पडत असताना
तुमच्यासारख्या अनोळखी तरूणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंस वाटलं…. याचं बरं वाटलं..!!
ह्या अशा पावसाच्या वेळी कुणीतरी बरोबर हवंच…!

छत्री तशी छोटीच आहे, पण घेईल सामावून दोघांना..
समजूतीने चाललो तर…!
पुढं पाणी बरंच साचलेलं आहे, रस्ता चाचपीतच पावलं टाकायला हवीत.

शक्य असेल तर माझ्या हाताचा…
अं…खांद्याचा आधार घ्या,
म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर नीट चालत रहाल… न पडता.
शिवाय तुम्हाला पाहीजे तितकं तुम्ही मला दूरही ठेवू शकाल.

मी तुमच्याकडे न पाहताच चाललो आहे खरा…
पण मला कुठूनतरी केवड्याचा वास येतो आहे.
अं.. तुमचं नांव ‘केतकी’च आहे, असं मी धरून चाललो आहे.

तुमच्या बोटांतली अंगठी कळत्येय माझ्या खांद्याला;
लक्शं कसं सारखं तिथेच घोटाळतंय…

अरे..!
तुमच्या पोहचण्याचं ठिकाण तर मागेच गेलं.. तुम्ही बोलल्या कशा नाहीत?
अं…माझं काय..?!
अमूक एका ठिकाणी पोहचण्याचा उद्देश नव्हताच माझा.

पावसाचा जोर एकदम वाढलाय म्हणून तुमच्या हाताची पकड घट्ट झाल्यासारखी वाटत्येय.
पण घाबरू नका.. पुढचा रस्ता चांगला आहे!

एक पाहिलंत का?
तुम्ही अगदी नीट चालल्या आहात… माझ्याबरोबर..!
त्यामुळे….छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटत्येय… नाही का..?!!


कवि - शंकर वैद्य
कवितासंग्रह - दर्शन

शेवटचे पान

आवर पद हे मत्त प्रवासी,

पहा जरा परतून प्रवासी, पहा जरा परतून्

घेत सुगंधाचा मागोसा

अलीपरी आलास विलासा

आणि फुलोरा लुटून जासी नव वेलीवरतून्

प्रवासी, पहा जरा परतून्

कलेकलेने चान्द खरोनी

आवस आली माझ्या गगनी

तोच उदेले दोन सुधाकर सुन्दर नयनातून्

प्रवासी, पहा जर परतून्

आणि चान्दणे सवे घेउनी

दुणावुनी तम जासी निघुनी

कशी साहुं रे धुन्द रात ही बाहेरून आतून्

प्रवासी, पहा जरा परतून्

क्षणभर येउन क्षणभर राहुन

क्षणभर हांसुन क्षणभर पाहुन

क्षणात जासी चार युगांचा घाव उरी घालून

प्रवासी, पहा जरा परतून्

वाळवण्टि तू एक पदाती

ना कुणि सोबत ना साङ्गाती

पायतळी पेटेल आग उद्दाम शिरावर ऊन्

प्रवासी, पहा जरा परतून्

परत पाखरा, खन्त कशाला

घालिन तनुची तुला दुशाला

उन्नत माझे ऊर उशाला घोष तुझा ज्यांतून्

प्रवासी, पहा जरा परतून्

जाणारच का-सुखात जा तर

बाग मोहरो तव वाटेवर

माग घेत तव चंद्र पुनेचा येवो गगनातून्

प्रवासी, पहा जरा परतून्

शेवटले जा पान मिटू दे

सुखेनैव यापुढे तुटू दे-

ह्रदयाचे रेशीम पदी तव बसलेले गुंतून

प्रवासी, पहा जरा परतून्


कवी - कुसुमाग्रज
ठिकाण - पुणे
सन - १९३८