निरोप

बाबा रे,

निरोपाचा सोहळा करण्याइतके
जवळ काही उरले तरी आहे का ?

कबूल की दिल्याघेतल्या गोष्टींना
मनाचा वास होता एकेकाळी धुंद
पण आता चिमूटभर कोरडी मातीच ना नुसती ?
एक फोन उचलला तरी मधल्या अंतरातून
तारेवर सरसरतेय निर्जन वाळवंटच लांबलचक किती !

असं बघ
ही माती आणि ही वाळूदेखील
ओली असती पुरेशी
तर पेरली असती रोपे हिरवी
उद्या घमघमतील अशी
निदान नुसतीच रंग उधळणारी, जशी गुलबशी

ते वृक्षारोपण आणि एखादे स्वप्नभरले नाजूक भाषण
एकमेकांसाठी एवढे तरी केलेच असते आपण.

म्हणून म्हणते,
हट्ट नको बाबा रे
आंदोळून गेले एकवार सुखाचे वारे
तथास्तु म्हण, एवढेच पुरे.


कवियत्री - अरूणा ढेरे

सकाळी उजाडता उजाडता

सकाळी उजाडता उजाडता उठले, पाहिलं
..... आणि कमालच!
एक वीट निखळलेली.
मी उचलून लावली ती जिथल्या तिथे.
पुन्हा चार दिवसांनी
पूर्वा लाल व्हायच्या आधीच उठले, पाहिलं,
तर अर्ध्याअधिक विटा उचकटून फेकलेल्या !
पुन्हा माझी कारागिरी!
पुन्हा काही दिवसांनी
मध्यरात्रीच जाग आली, पाहिलं :
थडगं पूर्ण उस्कटलेलं !
आणि उघडलेल्या शवपेटीत
मन चक्क डोळे चोळीत
उठून बसलेलं!
तसं रडतच होतं म्हणा. पण जिवंत?
अकल्पनीय!
म्हणजे थडगं बांधूनही मन...
याला निलाजरं म्हणायचं की असहाय्य !


कवयित्री - पद्मा गोळे

फुकटात केस कापुन

एक माणुस मुलाला घेऊन सलुन मध्ये गेला. स्वता:चे केस कापुन घेतल्यावर तो दुकानदाराला म्हणाला, "मी पंधरा मिनटात येतो. तो पर्यंत याचे केस मस्त कापुन ठेव."

दुकानदाराने मुलाचे केस कापुन ठेवले. दोन तास झाले तरी तो माणुस परत आला नाही. दुकानदार त्या मुलाला म्हणाला, "अरे बाळा, तुझ्या बरोबर जे गृहस्थ होते ते कुठे गेले? कोण होते ते तुझे ?"

मुलगा म्हणाला, "मला ते कुठे गेले हे माहीत नाही, आणि ते कोण होते हे सुद्धा माहित नाही. मला ते म्हणाला, चल तुला फुकटात केस कापुन देतो. बाकी मला काही माहित नाही."

CCTV चा फायदा

पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले...
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल रूमला आलेला पहिला फोन..:

.
.
.
.
"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना,
चितळे उघडले आहेत का...?"

निसर्ग

प्रेमळ पवित्र करी तुझा स्पर्श !

हास हास बाई कलिके एकदा

आपुल्या सुगंधा सोड सोड

लडिवाळपणे केल्या गुदगुल्या

परी काही केल्या हासेना ती

तिला फुलवाया हवा रविकर

वायूची लहर खेळकर

व्यर्थ हे करिती गाण्याचा आग्रह

नाही अनुग्रह देवा, तुझा

प्रेमळ पवित्र करी तुझा स्पर्श

गाईन सहर्ष वाडेकोडे


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

अजुनी चालतोचि वाट

अजुनी चालतोचि वाट! माळ हा सरेना
विश्रांतिस्थल केव्हा यायचे कळेना!

त्राण न देहात लेश, पाय टाकवेना,
गरगर शिर फिरत अजि होय पुरी दैना!

सुखकर संदेश अमित पोचविले कोणा,
भार वाहुनी परार्थ जाहलो दिवाणा!

काट्य़ांवरी घातलाची जीव तयासाठी,
हसवाया या केली किती आटाआटी!

हेच खास माझे घर म्हणुनी शीण केला,
उमगुनी मग चूक किती अश्रुसेक झाला;

दिन गेले, मास तसे वत्सरेही गेली,
निकट वाटते जीवनसंध्या ही आली!

कुठुनी निघालो, कोठे जायचे न ठावे,
मार्गातच काय सकळ आयु सरुनि जावे!

काय निरुद्देश सर्व जीवन मम होते
मरुसरितेपरी अवचित झरुनि जायचे ते?

पुरे! पुरे ही असली मुशाफरी आता,
या धुळीत दगडावर टेकलाच माथा


कवी - ए.पां.रेंदाळकर

दत्ताचा पाळणा

जो जो जो जो रे सुकुमारा । दत्तात्रया अवतारा ॥धृ॥

कमलासन विष्णू त्रिपुरारी । अत्रिमुनीचे घरी ।

सत्त्व हरु आले नवल परी । भ्रम दवडिला दुरी ॥१॥

प्रसन्न त्रिमूर्ति होऊनी । पुत्रत्वा पावुनि ।

हर्ष झालासे त्रिभुवनी । राहे ॠषिचे सदनी ॥२॥

पालख बांधविला सायासी । निर्गुण ऋषिचे वंशी ।

पुत्र जन्माला अविनाशी । अनसूयेचे कुशी ॥३॥

षट्दश नामासी आधार । दत्तात्रय अवतार ।

कृष्णदासासी सुख थोर । आनंद होतो फार ॥४॥